• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
15 Jun 2017

दिनानाथ घारपुरे

एमपीसी न्यूज - स्वभाव हा एक वेगळा पैलू असतो, स्वभावाप्रमाणे आपल्या जीवनाची जडण-घडण होत असते, स्वभाव हा माणसाला मिळालेला शाप आहे की वरदान हे कोणीच सांगू शकत नाही, विविध स्वभाव वैशिष्ठये असलेली माणसे आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो, स्वभावामुळे त्या व्यक्तीची वृत्ती बनत असते, क्वीन मेकर मध्ये विविध स्वभावाच्या मनोवृत्तीच्या व्यक्तिरेखा पाहायला मिळतील. 

माणूस जर स्वतःचा विचार करणारा आणि अतिमहत्वाकांक्षी असेल तर त्या महत्वाकांक्षेच्या पुढे आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे अगदी घरच्या माणसांचा सुद्धा तो विचार करीत नाही, आपल्या हेकेखोर, हट्टी स्वभावामुळे आपली जीवनतत्वे दुसऱ्यांच्यावर लादतो, पण अश्या माणसाच्या जीवनात शेवटी एकटेपण येते, आजूबाजूची माणसे दुखावतात शेवटी त्याला एकाकी जीवन कंठावे लागते, स्वभावामध्ये भावनेला महत्व देणे गरजेचे आहे. असा हा मध्यवर्ती धागा पकडून निर्माती जॉय भोसले यांनी त्यांच्या जॉय कलामंच या नाटयसंस्थेतर्फे " क्वीन मेकर " या नाटकाची निर्मिती केली आहे, नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे असून संगीत परीक्षित भातखंडे यांनी दिले आहे. वेशभूषेची जबाबदारी कहू नागेश भोसले हिने सांभाळलेली आहे. अक्षर कोठारी, शीतल क्षिरसागर, अंकिता पनवेलकर, इलिना शेंडे, अमित गुहे या कलाकारांनी भूमिका सादर केल्या आहेत. 


क्वीन मेकर ही कथा मीर देशपांडे, नेहा देशपांडे यांची असून ती दोघे कॉर्पोरेट जगात उच्च स्थानावर असतात, मीर देशपांडे हा अत्यंत हुशार कर्तबगार असून कॉर्पोरेटच्या विश्वात त्याला खूप मान असतो, स्वतःच्या बुद्धिमत्तेवर त्याचा प्रचंड आत्मविश्वास असतो. त्यामुळे स्वभाव अहंकारी आणि हट्टी बनलेला असल्याने दुसऱ्यावर हुकूमत गाजवायची हेच त्याला माहित असते, लहान मुले तर त्याला अजिबात आवडत नाहीत सदैव त्यांचा तिरस्कार करीत असतो, नेहा त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करणारी सामान्य मध्यमवर्गीय हुशार मुलगी असते. एक दिवस मीर तिला मागणी घालतो आणि आपली राणी बनवून कॉर्पोरेट जगामध्ये " क्वीन " बनवतो, लग्नापूर्वी त्याने तिला आपल्याला मुलबाळ होऊ द्यायचे नाही ही अट घातलेली असते त्यावेळी नेहा ते मान्य करते पण पुढे तिला आई व्हावेसे वाटते, तिला दिवस जातात, मीर आकांत-तांडव करतो पण नेहाला मातृत्वाची ओढ लागलेली असते. त्यामुळे मीर तिला आपल्या आयुष्यातून वेगळे व्हायला सांगतो. नेहा घर सोडून निघून जाते. हे सारे त्यांचा कॉमन मित्र राहुलच्या समोर घडते.

मीर एकटा पडतो, त्याच्या ऑफिसमधील त्याची सेक्रेटरी मीनल ही एक गरीब घरातील मुलगी असते. तो तिला लग्नाविषयी विचारतो मोठी-मोठी स्वप्ने दाखवतो, पुढे त्यांचे लग्न होते, मीनलला सुद्धा मोठे व्हायचे असते घरातील पांच / सहा जणांची जबाबदारी असते, त्यामुळे ती लग्नाला होकार देते. मीरचा मित्र राहुल त्याची दोन लग्ने झालेली असतात, तो आता दुसऱ्या बायकोला घटस्फोट देऊन पुन्हा पहिल्या बायकोशी संसार करणार असतो, तो आपल्या विश्वात सुखी असतो. कालांतराने नेहा ने एका लहान परी नावाच्या मुलीला दत्तक घेतलेले असते आणि ती परीला घेऊन मीर च्या घरी येते आणि आपल्या खोलीत मीर च्या परवानगीने राहायला लागते, परी ही मूक-बधिर मुलगी असली तरी ती हुशार असते, परिस्थितीची जाणीव तिला झालेली असते, मीर ला ती मुलगी आवडत नाही पण प्रत्येक ठिकाणी तिची लुडबुड असतेच.

एक दिवस मीर च्या आयुष्यात एक अशी घटना घडते की, त्यामुळे त्याचे जीवन डळमळीत होऊ लागते, त्याचे बालपण आठवते, त्या घटनेमुळे मीर ला त्या लहान परीचा सहभाग मान्य करावा लागतो. मीर ला तिच्याविषयी प्रेम आपुलकी वाटू लागते, ते प्रेम कश्यामुळे, कोणामुळे, कोणत्या कारणाने वाटते ? परीची मदत का घ्यावीशी वाटते ? परी सुद्धा मीर ची काळजी घेत असते ? शेवटी नेमके काय घडते ? अश्या अनेक प्रश्नाची उत्तरे ह्या नाटकात मिळतील. मीर ची भूमिका अक्षर कोठारी यांनी सहजतेने केली आहे. त्याचा हट्टीपणा, अरेरावीपणा, अहंकार इत्यादी भावना त्यांनी छान व्यक्त केल्या आहेत. नेहा ची भूमिका शीतल क्षीरसागर हिने अत्यंत संयमाने, विलक्षण ताकदीने रंगवली आहे. सुरवातीचे मीर बरोबरीचे वागणे आणि नंतर वेगळे झाल्यानंतर चे वागण्यातील फरक तिने छान पद्धतीने सादर केला आहे. मीनल ची भूमिका अंकिता पनवेलकर हिने मनलावून सादर केली असून स्वतःच्या सुखासाठी काय करावे लागते आणि शेवटी नशिबात काय येते ह्या भावना सुरेख दाखवल्या आहेत. राहुल ची भूमिका अमित गुहे यांनी सहजतेने सादर केली आहे. लहान परी ही एक मूक-बधिर मुलगी इलिना शेंडे हिने सुरेख आणि समजून सादर केली आहे, ती सुद्धा लक्षांत राहते.

भावना ही सुप्रीम आहे, अंतिम सुख हे अर्थात मानसिक सुख हे आपल्याला भावनेमधूनच मिळते, माणसाने बुद्धी आणि भावनांचा समतोल राखणे गरजेचे आहे, माणसांनी, माणसाशी, माणसासारखं वागावं, अंतिम सुख हे भावनेमध्ये आहे, आपल्या यशापुढे आपल्या माणसांना विसरून जाऊ नये, यश मिळणे हि प्रगती जरी असली तरी तेथे भावनेला प्राधान्य देणे गरजेचं आहे असा संदेश हे नाटक कळत न कळत देऊन जाते.

15 Jun 2017

दिनानाथ घारपुरे

एमपीसी न्यूज - तरुणांचे लग्न झाले -
हनिमून झाला की आई वडिलांचे डोळे नातवाच्या आगमनाकडे लागतात, पण काही जोडप्यामध्ये ते शक्य होत नाही, त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागते आणि शेवटी त्यांना वेगळाच निर्णय घ्यावा लागतो अशाच कौटुंबिक धागा पकडून सोनल प्रोडक्शन ह्या नाट्य संस्थेने डोन्ट वरी बी हॅपी ह्या नाटकाची निर्मिती केली असून लेखन मिहीर राजदा यांचे आहे, दिगदर्शन अद्वैत दादरकर यांनी केले असून नेपथ्य प्रदीप मुळ्ये, प्रकाश योजना अमोघ फडके आणि संगीत साई पियुष यांनी दिले आहे. ह्या मध्ये स्पृहा जोशी, आशुतोष गोखले, उमेश कामत या कलाकारांनी आपापल्या भूमिका सहजतेने केल्या आहेत.

अक्षय आणि प्रणोती हे तरुण जोडपे, प्रणोती ही एका टीव्ही मालिकेची प्रोग्रामिंग हेड असून ती आपल्या कार्यक्रमासाठी मेहनत घेत असते तसाच अक्षय नोकरी करत असून तो सुद्धा सदैव कामात असतो, असा त्यांचा संसार सुरु असतो, अक्षय चे आपल्या आईवर अतोनात प्रेम असते तिचे तो नेहमीच ऐकत असतो पण लग्न झाल्यावर प्रणोतीच्या सांगण्यावरून तो वेगळा संसार थाटतो, दोघेही एका वेगळ्या जागी रहायला येतात, त्या जागेत येताना प्रणोती तिचा आवडता कुत्रा घेऊन येते अर्थात तिचा वेळ त्याच्याबरोबर जात असतो, हे अक्षयला आवडत नाही त्यावरून वाद होतात, प्रणोतीला व्यवस्थितपणाची जेव्हडी सवय असते तितकी सवय अक्षयला नसते त्यावरून त्यांचे सुसंवाद होतात, अक्षयच्या आईला नातू हवा असतो पण ह्या दोघांचे प्लॅनिंग चाललेलं असल्याने इतकयात मुलबाळ होणे शक्य नसते, प्रणोती आपल्या करियरचा विचार करीत त्यामध्ये गुंतलेली असते त्याचा स्ट्रेस तिच्या मनावर आणि शरीरावर होतो त्यातून तिला वेगळ्याच आजाराला सामोरे जावे लागते, त्यादोघांचा कॉमन मित्र चिंतन ह्याला हे सारे माहित असते तो त्या दोघांच्यात वाद होऊ नये ह्यासाठी प्रयत्नशील असतो,तरुणाच्या बारीक-सारीक समस्या नाटकात लेखकांनी कुशलतेने मांडल्या आहेत, दोघांचे प्रेम-विरह-मनाच्या वेदना अश्या भाव-भावनांचा खेळ ह्या नाटकात आहे, हि नवरा-बायकोची कथा असून अक्षय आणि प्रणोती हे एकमेकांना आनंदात ठेवण्याच्या प्रयत्नात एकमेकांवर कुरघोडी करत असतात, त्यातील घटना दोघांनी नाटयपूर्णतेने सादर केल्या आहेत, अर्थात समज-गैरसमज ची मांडणी गंमतीदारपणे केली असून त्याला संघर्षाची झालर आहे, प्रणोतीला गर्भाशयाचा आजार असतो आणि तो पुढे वाढत जातो अक्षयच्या सुद्धा काही समस्या आहेत त्याचा परिणाम वादावादी नंतर विभक्त होण्यापर्यंत जातो आणि शेवट नेमका काय होतो हे तुम्ही नाटक पाहूनच अनुभव घ्या.


दिगदर्शक अद्वैत दादरकर यांनी हे नाटक व्यवस्थितपणे बसवले असून त्यात अक्षय [ उमेश कामत ] आणि प्रणोती [ स्पृहा जोशी ] यांच्या अभिनयाची सहजतेने झालेली जुगलबंदी पाहण्यात मजा येते, त्याला योग्यती साथ चिंतन [ आशुतोष गोखले ] यांनी दिली आहे. प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य, अमोघ फडके यांची प्रकाश योजना आणि साई पियुष यांनी दिलेलं संगीत नाटकाच्या जमेच्या बाजू आहेत, एकंदरीत हे नाटक आल्हादायक असून मनाला भावणारे आणि आनंद देणारे आहे.

Page 1 of 29
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start