21 Feb 2017

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेची निवडणूक शांततामय पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाने आणि पोलीस विभागाने विशेष प्रयत्न केले. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काही भागात हाणामारीच्या घटना आणि मतदार यादीतील घोळ होण्याचे प्रकार घडले. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पाहण्यास मिळाली. तरी पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 55.53 टक्के इतके मतदान झाले आहे. या विषयी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी माहिती दिली. यामध्ये केंद्र सरकारने स्मार्ट सिटीसाठी घोषित केलेल्या परिसरात केवळ 40 टक्के इतके मतदान झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीतील स्मार्ट मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट झाले आहे.    


या निवडणुकीबाबत महापालिका आयुक्त कुणाल कुमार म्हणाले की,  पुणे महानगरपालिकेच्या 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शहारत 26 लाख 34 हजार 798 मतदार असून त्यापैकी 14 लाख 10 हजार 974 मतदारांनी मतदान केले आहे. या आकडेवारीवरून 53 टक्के 55 टक्के मतदान करण्यात आले आहे. तसेच बाणेर, बालेवाडी आणि पाषाण या प्रभाग क्रमांक 9 मध्ये 40 टक्के मतदान झाल्याचे आकडेवारीवरून माहिती समोर आली आहे. यातून स्मार्ट सिटीच्या भागातील मतदारांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट होत आहे. प्रभाग क्रमांक 15 मधील शनिवार पेठ, सदाशिव पेठ यामध्ये सर्वाधिक 62.51 टक्के इतके मतदान करण्यात आले आहे.


त्याचबरोबर यंदाच्या महापालिका निवडणुकी दरम्यान काही ठिकाणी मतदार स्लिपा वेळेत मतदारापर्यंत पोहोचल्या नाहीत. यामुळे नागरिकांना त्रासाला देखील सामोरे जावे लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दुपारी चार नंतर काही प्रभाग केंद्रावर गर्दी देखील वाढली. त्यामध्ये हडपसर आणि बोपोडीचा भाग असून त्या मतदार केंद्रावर रात्री 9 वाजेपर्यंत मतदान चालले असल्याची माहिती त्यांनी दिली.

21 Feb 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 127 जागांसाठी 1 हजार 608 मतदान केंद्रावर आज मतदान झाले. मात्र, ज्या मतदारांनी यापूर्वी दोन-तीन वेळाच मतदान केले आहे, अशा मतदारांची नावेच मतदार यादीत नसल्याने मतदारांना मतदानच करता आले नाही, अशा तक्रारी पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध भागातून दिवसभर येत होत्या.


गेल्या काही वर्षांपासून आम्ही मतदान करत आहोत. तसेच आम्हाला जी मतदार यादी मिळाली त्यामध्ये नाव आहे म्हणून त्यात दिलेल्या प्रभागात गेल्यानंतर केंद्रावर तुमचे या मतदार यादीत नाव नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही मतदान कोणाला करणार, असा प्रश्न विचारला असता प्रशासनानेही उडवाउडवीची उत्तरे दिली, अशी तक्रार मतदारांमधून येत होती. काहींच्या म्हणण्यानुसार ऑनलाईन यादीत मतदाराचे नाव आहे. मात्र, प्रत्यक्षात मतदानकेंद्रावर नाही. त्यानंतर शोधा-शोध केली असता भलत्याच प्रभागाच्या मतदानकेंद्रावर नाव आले होते.


याविषयी प्रशासानाशी विचारणा केली असता, काही मतदारांना उमेदवारांनी विधानसभेची मतदार यादी दिलेली आहे. त्यामुळे त्यांना जुन्या यादीनुसार मतदानकेंद्र दाखवले गेले. मात्र, नवीन यादीत त्यांची नावे  योग्य त्या मतदान केंद्रावरच होते, असे उत्तर दिले.


मात्र, मतदार यादीतील या सावळ्या गोंधळामुळे अनेक मतदार मतदानाला मुकले. तसेच अनेक मतदारांमध्ये प्रशासनाने योग्य ती मदत न केल्यामुळे मतदान करता आले नाही, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली.

Page 1 of 45