25 Mar 2017

शिक्षण मंत्र्यांसोबत आमदार लांडगे यांची चर्चा

एमपीसी न्यूज - आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विधी शाखेच्या  विद्यार्थ्यांनी आज (शनिवारी) शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची मुंबई येथे भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी आमदार महेश लांडगे यांनीही विनोद तावडे यांच्याशी विद्यार्थ्यांच्या समस्ये विषयी चर्चा केली.

या निवेदनात म्हटले आहे की,  विधी शाखेत उत्तीर्ण होण्यासाठी गुणांची मर्यादा 50 न ठेवता पूर्वीप्रमाणे 40 गुणांची करावी. पुन: गुणांकन,  पुन:मुल्यांकन आणि पेपरी नकल उपलब्ध करण्यासाठी लागणारे शुल्क सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारे असावे. पुन:गुणांकणाबाबतचे प्रमाणपत्र त्वरित मिळावे. विशेष म्हणजे, विद्यापीठ प्रशासनाकडून पेपर तपासणीबाबत वारंवार हलगर्जीपणा होत आहे. त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यात यावी. आगामी शैक्षणिक वर्षासाठी लागू करण्यात येणारा 70/30 हा पॅटर्न सध्या सुरू असलेल्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांसाठीही लागू करण्यात यावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन शिक्षणमंत्री तावडे यांना देण्यात आले आहे.

याबाबत शिक्षणमंत्री तावडे म्हणाले की, पुणे विद्यापीठातील विधी शाखेतील विद्यार्थ्यांच्या मागण्यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा करून मार्ग काढण्यात येणार आहे. तसेच, आगामी काळात विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा आणि शैक्षणिक मदत सक्षमपणे केली जाईल, अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिका-यांना देण्यात येतील.

25 Mar 2017

एमपीसी न्यूज - ''देशाचे उज्वल भविष्य तुमच्या हातात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ड्रीम, डिझायर, डेडीकेशन, डिटरमिनेशन, डिसिप्लिन”  हे  “ पाच ‘डी’ जीवनात अवलंबणे गरजेचे आहे, असा यशस्वी जीवनाचा कानमंत्र पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना दिला. 

वाकड येथील कमल प्रतिष्ठान ट्रस्ट संचलित माऊंट लिटेरा झी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आयुक्त वाघमारे बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवसेना शहरप्रमुख व नगरसेवक राहुल कलाटे, नगरसेवक श्याम लांडे, नगरसेवक अमित गावडे, वृषाली कलाटे, मुख्याध्यापिका रुपाली करडीले, बाबा कांबळे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाघमारे पुढे म्हणाले की, शिक्षणाबरोबरच कला आणि संस्कृती यांची जोड असल्यास विद्यार्थी परिपक्व होतो. बाह्यरूप महत्त्वाचे नसून व्यक्तीचे आंतरिक सौंदर्य, कलागुण महत्त्वाचे आहेत. त्यामुळे शाळेने मुलांच्या आंतर्गुणांना पोषक वातावरण करून त्यांना प्रोत्साहन आणि वाव देणे गरजेचे आहे, असे मत महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केले.

यावेळी चिमुकल्यांनी विविध प्रांतातील संगीतावर आधारित संगीत फेस्ट संकल्पनेवर आधारित अनेक रचना सादर करीत वाहवा मिळविली. राजस्थानी नृत्य, ''मेरे देश की धरती'', ''शिव तांडव'', ''आय लव्ह माय इंडिया'', ''सारे जहाँ से अच्छा'' आदी नृत्यांना पालकांनी टाळ्यांनी दाद दिली. यावेळी अभ्यास, कला, क्रीडा आणि विविध स्पर्धेत प्रावीण्य मिळविणा-या गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सूत्रसंचालन मीरा दाते यांनी केले.

25 Mar 2017

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवडच्या प्रभाग क्रमांक 13 मधील स्थानिक समस्या सोडविण्यसाठी नगरसेवक व स्थायी समिती सदस्य उत्तम केंदळे व कमल घोलप यांनी हेल्पलाईन सेवा चालू केली आहे.

प्रभागातील विविध समस्या प्रभाग पातळीवरच सोडविण्यात याव्यात यासाठी केंदळे व घोलक यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. यानुसार सकाळी सात ते रात्री 10 वाजेपर्यंत निगडी परिसरातील नागरिकांना 9850510510 या क्रमांकावर आपल्या छोट्या-मोठ्या समस्या सांगता येणार आहेत. 

याविषयी एमपीसी न्यूजशी बोलताना केंदळे म्हणाले की, महापालिकेकडे सारथी ही हेल्पलाईन सुविधा आहे. मात्र, महापालिकेकडून प्रभागात येण्या ऐवजी  प्रभागस्तरावरच समस्या सोडवली तर ती लवकरात लवकर सोडवली जाईल. अगदी प्रभागात खराब पाणी आले, मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आदी समस्या प्रभाग अधिका-यांशी बोलूनच सोडवल्या जातील. शिवाय काही मोठी तक्रार असेल तर आम्हीही सारथीला मदत करू तिचा लाभ घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

केंदळे म्हणाले की हेल्पलाईन बरोबरच परिसरात सीसीटीव्ही बसवणे, उद्यानात मोफत वायफाय चालू करणे अशा अनेक योजना आम्ही प्रभाग स्तारावर येत्या पाच वर्षात राबवणार आहोत.

25 Mar 2017

तीन दिवसात 9 कोटींची कर वसूली

एमपीसी न्यूज -  निगडीतील पाच मोबाईल टॉवरवर आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंलन विभागाने कारवाई केली. यासह आज मिळकत कराची थकबाकी असलेल्या एकूण दहा मिळकतींवर करसंकलन विभागामार्फत जप्तीची कारवाई करण्यात आली.

यामध्ये  32 लाख 79 हजार 420 रुपयांची थकबाकी असलेल्या बिगर निवासी मिळकतीवर पथकाने मिळकती जप्त करण्याची कारवाई केली. यापैकी 4 लाख 2 हजार 831 रुपयांचा भरणा डी. डी. द्वारे करण्यात आला. तसेच सांगवी विभागीय कार्यालयाकडील पिंपळे निलख येथील 11 लाख 59 हजार 866 रुपये व चिखली विभागाकडील बिगर निवासी मिळकती थकबाकीपोटी  7 लाख 81 हजार 220 रुपयांची थकबाकी धनादेशाद्वारे कर भरला.

करसंकलन विभागामार्फत दिनांक 22 मार्चपासून मिळकत जप्तीची मोहीम राबविण्यात येत असून आजअखेर 35 मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात आली. सर्व विभागीय कार्यलयाचा दिनांक 22 ते 25 मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत एकूण  9 कोटी 14 लाख 93 हजार 129 रुपयांचा मिळकतकर वसूल झाला आहे.

25 Mar 2017

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढे यांची निवड झाल्याचे कळताच स्वारगेट येथील पीएमपीएमएलचे कर्मचारी आणि कामगार मंचाकडून फटाके वाजवून त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले.

तुकाराम मुंढे यांची शुक्रवारी रात्री उशिरा नवी मुंबई महापालिका आयुक्त पदावरून बदली केली होती. मुंढे यांच्या जागी मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक डॉ. एन. रामास्वामी यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, मुंढे यांना नवीन ठिकाणी नेमणूक दिली नव्हती. शनिवारी त्यांची पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी नेमणूक केली आहे.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या निवडीचे पुणे शहरातील अनेक सामाजिक संस्थांनी स्वागत केले. पीएमपी प्रवाशी मंचचे जुगल राठी, विवेक वेलणकर, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमचे रोहित निघोजकर, खासदार अनिल शिरोळे यांनी मुंढे यांच्या निवडीचे स्वागत करत पुणेकरांना आता स्मार्ट पीएमपीएमएल अनुभवण्यास मिळेल अशी आशा व्यक्त केली.

25 Mar 2017

पीएमपी प्रवासी मंचचे जुगल राठी, विवेक वेलणकर पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमचे रोहन निघोजकर यांच्या प्रतिक्रिया

एमपीसी न्यूज - पीएमपीएलचा कारभार स्वच्छ आणि गतिमान होण्यासाठी चांगल्या अधिकार्‍याची आवश्यकता आहे. या अनुषंगाने तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकार्‍याची पीएमपीएलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काल (दि. 24 ) रात्री केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी आज तातडीने त्यांची पीएमपीएलच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल सर्व पुणेकरांच्या वतीने मी मुख्यमत्र्यांचे आभार मानत असल्याचे पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी सांगितले.

"पीएमपीएलला पूर्णवेळ सक्षम अधिकार्‍याची नियुक्ती झाल्याने पुणेकरांना लवकरच अत्यंत चांगली सार्वजनिक वाहतूक मिळेल. यापूर्वी देखील मुख्यमंत्र्यांनी श्रीकर परदेशी सारखे चांगले अधिकारी पीएमपीएलसाठी दिले होते. यातूनच मुख्यमंत्री हे पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे,'' असे देखील शिरोळे यांनी या प्रसंगी नमूद केले.

पीएमपी प्रवासी मंचचे जुगल राठी म्हणाले की, पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढे यांची निवड होणे ही आनंदाची बाब आहे. सध्या पीएमपीएमएलची फारच दुरावस्था आहे. डॉ. श्रीकर परदेशी अध्यक्ष असताना पीएमपीएमएलच्या कारभारात ब-यापैकी सुधारणा झाल्या होत्या. परंतू तीन-चार महिन्यातच त्यांची बदली झाली आणि पीएमपीएमएल अगदी रसातळाला गेली. अशा परिस्थितीत आम्ही मुख्यमंत्री, शहरातील खासदार आमदार यांच्याकडे पाठपुरावा करून पीएमपीएमएलला सक्षम अधिकारी देण्याची मागणी केली होती. आमच्या या प्रयत्नाला यश आले आहे. आता ते चांगले कार्य करतील आणि प्रवाशांच्या हिताचे निर्णय घेतील, अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि त्यांच्या या कार्याला पीएमपी प्रवासी मंचचा कायम पाठिंबा राहील.

पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमचे रोहन निघोजकर म्हणाले की, तुकाराम मुंढे यांची पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी निवड झाली ही खूपच स्वागतार्ह बाब आहे. सर्वप्रथम मी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या वतीने त्यांचे स्वागत करतो. खूपच आव्हानात्मक परिस्थीतीत त्यांना काम करावे लागणार आहे. याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. परंतू अतिशय कणखरपणे आणि आपल्या वेगळ्या शैलीत ती ही जबाबदारी चांगल्या रितीने पार पाडतील. आता स्मार्ट पुणे आणि स्मार्ट पिंपरी-चिंचवड सोबतच स्मार्ट पीएमपीएमएलही आम्हाला पहावयास मिळेल.

सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीचे स्वागत केले. ते म्हणाले. ही निश्चितच आनंदाची बाब आहे. परंतू सोलापूर येथून 2 वर्ष, नवी मुंबई येथून 1 वर्ष याप्रमाणे त्यांची बदली होऊ नये. त्यांना या पदावर तीन वर्षाचा कालावधी पूर्ण करू द्यावा. कारण पीएमपीएमएलचा 10 वर्षाचा इतिहास पाहता कुठलाही अधिकारी जास्त दिवस राहिला नाही. श्रीकर परदेशी सारख्या सक्षम अधिका-याची अध्यक्षपदावरून सहा महिन्यात बदली झाली.

25 Mar 2017

पुणे रेल्वे स्थानकावर सोलर पॅनल, वायफाय आदी सुविधांचेही उद्घाटन

एमपीसी न्यूज - पुणे स्थानकावरून सुटणारी पुणे-दौंड-बरामती या बहुप्रतीक्षित डेमू (डिझेल मल्टीपल युनिट)  रेल्वेचे रेल्वेमंत्री प्रभू यांच्या हस्ते व्हिडिओ  कॉन्फरन्सिंगद्वारे आज (दि. 25) दुपारी सव्वा एकच्या सुमारास करण्यात आले.

तीन महिन्यापासून रखडलेल्या  पुणे-दौंड-पुणे डेमूचे आज रेल्वेमंत्री प्रभू यांच्या हस्ते कोल्हापूर येथून लोकार्पण करण्यात आले. याबरोबरच पुणे रेल्वे स्थानकावरील 160 कि. वॅट सोलर पॅनलचे अनावरण, पुणे रेल्वे स्थानकावरील वायफायचे व वॉटर रिसायकलिंग प्लॅन्टचे उद्‌घाटनही यावेळी करण्यात आले. महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, खासदार अमर साबळे, खासदार सुप्रिया सुळे, पुणे रेल्वे स्टेशन प्रबंधक गुरुराज सोनी, रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा, दौंड-पुणे प्रवासी संघाचे विकास देशपांडे, पर्सिस्टंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आरती दंडवते आदी उपस्थित होते.

डेमूसह पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, पुणे-दौंड विद्युतीकरण, पुणे रेल्वे स्थानकावर 160 केडब्ल्यूपी सोलर पॅनल, पुणे रेल्वे स्थानकावर मोफत वाय-वाफ, वेस्ट वॉटर रिसाकलिंग प्लांटचे उद्घाटन देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले.

पुणे-दौंड-बारामती ही डेमू रेल्वे ही या मार्गावरील सर्वच स्थानकांवर थांबणार असून त्यामध्ये पुणे, हडपसर, मांजरी-बुद्रुक, लोणी, उरुळी, यवत, खुटबाव, केडगाव, कडेठाण, पाटस दौंड अशा प्रमुख स्थानकांचा समावेश आहे. यासाठी पहिली  गाडी पुण्यावरून साडेदहा वाजता सुटणार असून  दुपारी साडेबारा वाजता दौंडला पोहोचणार आहे. तर दुसरी गाडी 2:20 ला पुण्यावरून निघणार असून ती  4.00 वाजता दौंडला पोहोचेल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

डेमूवरुन श्रेयवाद-


डेमूवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पोस्टर लावण्यात आले होते. यावेळी भाजपतर्फे त्याचा निषेध करण्यात आला. रेल्वेवर पोस्टर लावण्याकरिता रेल्वेची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र प्रोटोकॉल व नियम मोडून डेमूवर पोस्टर लावण्यात आले होते. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पुणे जिल्हा महिला आघाडीच्या वैशाली नागवडे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी डेमूच्या इंजिनासमोरील पोस्टर काढण्यात आले.

25 Mar 2017

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएलच्या झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी पीएमपी प्रवासी मंच यांच्या वतीने प्रवासी लढ्याचे नियोजन व कृती आराखडा ठरविण्यासाठी येत्या रविवारी (26 मार्च) सायंकाळी 4.30 ते 6.30 या वेळेत म्हात्रे पुलाजवळील इंद्रधनुष्य याठिकाणी पीएमपी बस प्रवासी मेळाव्याचे आयोजन केले आहे.

पुण्यासह पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या परिसरातील प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एकमेव पर्याय म्हणून पीएमपीएमएलकडे पाहिले जाते. परंतू पीएमपीएमएलच्या सध्याच्या दुरावस्थेकडे राज्यशासनाचे लक्ष नाही. तब्बल 11 महिन्यानंतर आज पीएमपीएमएलला अध्यक्ष मिळाले आहेत. बहुतांश बसेस मार्गावर धावतच नाहीत. काही बसेस या मध्येच बंद पडतात. वाढती अपघातांची संख्या, सेवकांची उद्धट व बेशिस्त वागणूक या सारख्या अनेक अडचणी संबंधी मेळाव्यात चर्चा होणार आहे.

या मेळाव्यात डॉ. विश्वंभर चौधरी मार्गदर्शन करणार आहेत. प्रवाशांनी आपले बस प्रवासाचे अनुभव व अडचणी तसेच प्रवाशांच्या संघटित लढ्याच्या कृती आराखड्यासंबंधी सूचना मांडण्यासाठी हा प्रवासी मेळावा सर्वांसाठी खुला राहणार आहे.

25 Mar 2017

एमपीसी न्यूज -  असोसिएशन ऑफ स्मॉल अॅण्ड मीडियम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी राष्ट्रीय सचिव अजित म्हात्रे यांच्या सहमतीने सतीशचंद्र बापूसाहेब जकाते यांची फेरनियुक्ती करण्यात आली.

यासंबंधीचे लेखी पत्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांच्या वतीने जकाते यांना द्ण्यात आले आहे. संघटनेचे भरीव कार्य गतीमान होण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. वृत्तक्षेत्रातील जकाते यांच्या अनुभवाचा संघटनेच्या समस्या सोडवण्यासाठी नक्कीच उपयोग होईल, अशी खात्रीही आप्पासाहेब पाटील यांनी व्यक्त केली आहे.

तसेच राज्य उपाक्ष्यक्ष चंद्रशेखर गायकवाड, राज्य संघटक प्रवीण पाटील व विभागीय अध्यक्ष दत्तात्रय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्याची बैठक घेऊन जिल्हा कार्यकारिणी तयार करून मंजुरीसाठी पाठवावी, असेही आप्पासाहेब पाटील यांनी सतीशचंद्र बापूसाहेब जकाते यांना पत्राद्वारे कळवले आहे.

25 Mar 2017

एमपीसी न्यूज - नवी मुंबई महापालिका आयुक्तपदावरून तडकाफडकी बदली केलेल्या तुकाराम मुंढे यांची पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांची शुक्रवारी रात्री उशिरा नवी मुंबई महापालिका आयुक्त पदावरून बदली केली होती. मुंढे यांच्या जागी मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक डॉ. एन. रामास्वामी यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, मुंढे यांना नवीन ठिकाणी नेमणूक दिली नव्हती. शनिवारी त्यांची पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी नेमणूक केली आहे.

नवी मुंबईचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात नवी मुंबई महापालिकेने अविश्वास ठराव पारित केल्यापासून तुकाराम मुंढे चर्चेत होते. त्यांच्या बदलीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महापालिकेच्या सभागृहात अविश्वास ठरावही मंजूर केला होता. मुंढे यांची बदली करण्यासाठी भाजपचे नगरसेवकही आक्रमक झाले होते.

पीएमपीचे माजी अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांची नऊ महिन्यांपूर्वी नाशिकच्या महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून पीएमपीच्या अध्यक्षपदाचा प्रभारी कारभार पुण्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे सोपविण्यात आला होता. सुरुवातीला पीएमपीच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब मिसाळ यांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी पुण्यातील बदलीला नकार दिल्यामुळे आता याठिकाणी तुकाराम मुंढे यांची वर्णी लागली आहे.

तुकाराम मुंढे यांची नवी मुंबईतील कारकीर्द पाहता याठिकाणीही ते आपली छाप काढणार का, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. यापूर्वी श्रीकर परदेशी पीएमपीचे अध्यक्ष झाल्यानंतर काही महिन्यांतच त्यांनी मंडळाच्या कारभारात आमुलाग्र बदल केला होता.

दरम्यान, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी पीएमपीएमएलचा कारभार स्वच्छ आणि गतिमान होण्यासाठी तुकाराम मुंढे यांची पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी मागणी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मुंढे यांची अध्यक्षपदी नेमणूक केल्याने शिरोळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

Page 2 of 51