25 Feb 2017

एमपीसी न्यूज - मराठी राजभाषा दिनानिमित्त एक विशेष कार्यशाळा रेडिओ एफटीआयआय येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत मराठी भाषेसंबंधाने तसेच कवी व नाटककार कुसुमाग्रज यांच्या साहित्याचा जागर अभिनव पद्धतीने करण्यात येणार आहे. प्रसार माध्यमांतील मराठी या विषयावरही चर्चा होणार आहे. ही कार्यशाळा थेट तसेच ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती रेडिओ एफटीआयआयचे संजय चांदेकर यांनी दिली.

 

यामध्ये पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. अविनाश सांगोलकर, विद्यावाणी रेडिओ प्रमुख आनंद देशमुख, भैरवी पुरंदरे, प्रा.वैशाली जुंदरे, 'मराठी काका' प्रा. अनिल गोरे आणि रेडिआ एफटीआयआयचे संजय चांदेकर व प्रा.आश्विन सोनोने सहभागी आहेत. याच दिवसापासून एकूण तब्बल 75 भागांच्या दोन मराठी भाषा विषयक मालिका प्रसारित करण्यात येणार असून याची निर्मिती पुणे महापालिकेने तसेच रेडिओ एफटीआयआयने केलेली आहे.

 

या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण रेडिओ एफटीआयआय 90.4 एफ.एम.वरून सकाळी 10 ते सायंकाळी 6 करण्यात येणार आहे. ही कार्यशाळा विनामूल्य असून "प्रथम येईल त्याला प्राधान्य" या तत्त्वावर असून प्रवेश मर्यादा फक्त 10 जागांची आहे. अशा कार्यशाळेचे रेडिओ माध्यमाद्वारे थेट प्रक्षेपण हे याचे वेगळेपण आहे. या कार्यशाळेकरिता This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ई-मेल वर किंवा 9423007993 वर संपर्क साधावा, असे आवाहन रेडिओ एफटीआयआयतर्फे करण्यात आले आहे.

25 Feb 2017

एमपीसी न्यूज - जम्मू आणि काश्मीरमध्ये तेथील नागरिकांसाठी योजना सुरू करण्यात आल्या. त्याबरोबरच पर्यटन या माध्यमातून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत होईल. तेथे पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी ही सर्वांची इच्छा आहे. जम्मू कश्मीरविना देश अपूर्ण आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी व्यक्त केले.

 

सरहद संस्थेतर्फे आयोजित केलेल्या काश्मीर फेस्टिवलचे उद्घाटन रमेश यांच्या हस्ते झाले. यावेळी जम्मू काश्मीरचे पर्यटन विभागाचे संचालक मेहमूद शाह, मोहम्मद हसन मीर, सरहदचे संजय नहार आदी उपस्थित होते.

 

जयराम रमेश म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये गेल्या वर्षी 13 लाख पर्यटक गेल्याची माहिती मिळाली. तेथे अनेक नवीन योजना आणल्या गेल्या. 8 आणि 10 वी नापास आणि शाळा सुटलेल्या मुलांसाठी प्रशिक्षण आणि रोजगारासाठी हिमायत नावाची योजना राबविण्यात आली. त्यानंतर उडाण आणि उम्मीद या दोन योजना तरुणांसाठी आणि महिलांसाठी आणल्या गेल्या. या योजनांमधून आणि पर्यटनाच्या माध्यमातून जम्मू काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत होईल. जम्मू कश्मीरची संस्कृती ही वेगळी नाही. त्यामुळे जम्मू कश्मीरविना आपण अपूर्ण असून देशही त्यांच्याशिवाय अपूर्ण आहे.

 

मेहमूद शाह म्हणाले की, पुण्याने आमच्याकडील मुलांना सन्मान दिला. त्यातून परस्पर संबंध दृढ होण्यास मदत होणार आहे. तेथील वातावरण तणावपूर्ण झाल्यास येथील नागरिकही व्यथित होतात. पुण्यात आम्हाला घरच्यासारखे वातावरण असल्यासारखे वाटते.

 

संजय नहार म्हणाले की, जम्मू कश्मीरचे पुण्याशी जवळचे नाते असल्याने पुण्यात काश्मीर फेस्टिव्हल सुरू केले. त्यांच्याशी आपल्याला जोडून घ्यायचे असेल तर कोणत्याही अपेक्षेशिवाय आपल्याला दोन पावले पुढे टाकावी लागणार. ही चळवळ सर्वांची आहे.

Page 11 of 82