25 Feb 2017
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेवर प्रथमच भाजपचे कमळ फुलले आहे. त्यामुळे भाजपचा महापौर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. भाजपकडून महापौर पदासाठी 10 जण प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. 


पिंपरीचे महापौरपद ओबीसी गटासाठी राखीव आहे. भाजपकडून या गटातील 24 उमेदवार निवडून आले आहेत. त्यापैकी दहा जण महापौर पदासाठी प्रबळ दावेदार आहेत. महापौर पदासाठी चिंचवड मतदार संघातून शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, सुरेश भोईर, शशिकांत कदम पिंपरी मतदार संघातून संदीप वाघेरे, केशव घोळवे, भोसरी मतदार संघातून नितीन काळजे, सागर गवळी, संतोष लोंढे हे प्रबळ दावेदार आहेत.  


महापौर पदासाठी निष्ठावान आणि आयात हा मुद्दा कळीचा ठरु शकतो. राष्ट्रवादीतील अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करुन विजयी झाले आहेत. त्यांचीही महापौर होण्याची इच्छा आहे. निष्ठावंताला पद देण्याचा विचार झाल्यास चिंचवड मतदार संघातून भाजपचे जुने कार्यकर्ते नामदेव ढाके हे प्रबळ दावेदार आहेत.   


भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार  लक्ष्मण जगताप आपला समर्थक महापौर होण्यासाठी तर, भोसरीचे आमदार महेश लांडगे आपल्या समर्थकाला महापौरपदी विराजमान करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महापौर पदाच्या दावेदारांचीही  हे पद आपल्याला मिळावे व आपण या पदासाठी कसे चांगले आहोत,  हे नेत्यांसमोर सांगण्याची चढाओढ सुरु झाली आहे.


पिंपरी-चिंचवड महापालिकेवरील राष्ट्रवादीची एकहाती सत्ता उलथवून टाकण्यात भाजप यशस्वी झाला आहे. भाजपचे तीनवरील संख्याबळ 77 पर्यंत गेले आहे. तर, सत्ताधारी राष्ट्रवादीचे 83 वरुन 36 वर संख्याबळ आले आहे. शिवसेनेचे पूर्वीपेक्षाही संख्याबळ घटले आहे.

24 Feb 2017

एमपीसी न्यूज - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिवसेनेला फटका बसला आहे. गेल्यावेळी पेक्षाही शिवसेनेचे संख्याबळ घटले आहे. शिवसेनेचे पुणे जिल्हासंपर्क प्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्यावेळी शिवसेनेचे 14 नगरसेवक होते. एका पोटनिवडणुकीत शिवसेनेचा नगरसेवकही निवडून आला होता. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ 15 झाले होते. यावेळी शिवसेनेचे संख्याबळ घटून नऊवर आले आहे. त्यामुळे शिवसेनाचा हा मोठा पराभव आहे.

 

शहरात शिवसेनेचे  दोन खासदार एक आमदार आहेत. तरीही शिवसेनेचे संख्याबळ गेल्यावेळी पेक्षा घटले आहे. खासदार शिवाजीराव आढळराव यांनी भोसरी मतदार संघात आपली ताकद पणाला लावली होती. परंतु, भोसरी मतदार संघातून शिवसेनेचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी चिंचचवड मतदार संघात आपली ताकद लावली होती. थेरगावातही बारणे शिवसेनेचे सगळे उमेदवार निवडून आणू शकले नाहीत. पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार हेही पिंपरी मतदार संघातून शिवसेनेचे अधिक नगरसेवक निवडून आणू शकले नाहीत.

 

शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, विद्यमान नगरसेवक धनंजय आल्हाट, विमल जगताप, संपत पवार यांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. पुण्यातही शिवसेनेचे संख्याबळ घटून दहावर आले आहे. त्यामुळे शिवसेनेला हा मोठ्ठा धक्का आहे.

 

शिवसेनेचे पुणे आणि पिंपरी-चिंचवड संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. शिवसेना पराभवाची कारणे शोधणार आहे.