24 Mar 2017

एमपीसी न्यूज - भाजपा सरकारने शहराला शास्तीकरातून 100 टक्के मुक्त करावे या मागणीसाठी मनसेचे गटनेते व नगरसेवक सचिन चिखले यांनी आज (शुक्रवारी) पिंपरी येथे सकाळी नऊ पासून एकदिवसीय लाक्षणीक उपोषणाला सुरुवात केली आहे.


पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गळ्यात गाजरे घालून मनसेतर्फे या उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी  शहराध्यक्ष हेमंत डांगे, शहर सचिव रुपेश पटेकर, उपाध्यक्ष शशी राजेगावकर, विशाल मानकरी, सीमा बेलापूरकर, आश्विनी बांगर, स्नेहल बांगर, राहुल जाधव, परमेश्वर चिल्लरगे, अमित तापकीर आदी उपस्थित आहेत. 


यावेळी त्यांनी शहराला सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 100 टक्के शास्तीकर माफ करावा अशी प्रमुख मागणी केली आहे. भाजपा सरकारने 2017 च्या निवडणुकीत शहराला शास्तीतून सुटका देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र तसे न करता केवळ काही बाबतीत शास्तीमधून सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे ही नागरीकांची फसवणूक आहे. कारण सराकारने दिलेल्या सवलतीत 1000 चौ.फुटाच्या वरील बांधकामांना कोणतीच सवलत नाही व या स्वरुपाचे  शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे आहे. त्यामुळे हा मध्यमवर्गीय व गरीब लोकांवर अन्याय आहे. सरकार पिंपरी-चिंचवड शहरवासीयांची शास्तीकराबाबत करत असलेल्या फसवणुकीच्या निषेर्धात महाराष्ट्र नवनिर्माणसेना हे उपोषण करत आहे.


तसेच शास्ती कराबाबत स्थानिक संस्थानी निर्णय घ्यावा, याचे सर्वाधिकार स्थानिक संस्थाना दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शास्ती माफीचा ठराव मांडून तो मंजूर करण्यात यावा. तसेच 31 मार्च नंतर वाढणा-या अनधिकृत बांधकामावर हा  शास्तीचा निर्णय लागू करावा, अशी मागणीही चिखले यांनी केली. आहे. हे निवदेन चिखले सायंकाळी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांना देणार आहेत.

24 Mar 2017

एमपीसी न्यूज - व्हॉट्स अॅप युजर्सना हवे असलेले जुने स्टेटस फिचर व्हॉट्स अॅपने परत सुरु केले आहे. नवीन फिचर लॉन्च केल्यानंतर जुने टेक्स्ट स्टेटस फिचर बंद करण्यात आले होते, मात्र सोशल मीडियामधून नवीन फीचरबद्दल युजर्सकडून नाराजी व्यक्त केली जात होती, त्यामुळे जुनेच फिचर परत चालू करण्यात आले आहे.


व्हॉट्स अॅप अपडेट केल्यावर अँड्रॉईड फोनमध्ये टेक्स्ट फिचर उपलब्ध होईल. या फिचरला आता ‘अबाऊट अॅण्ड फोन नंबर’ला म्हटले जाणार आहे. प्रोफाईल टॅबमधून सेटिंग्जमध्ये गेल्यावर वापरकर्त्यांना टेक्स्ट स्टेटसपर्यंत पोहोचता येईल.


सध्या तरी व्हॉट्स अॅपने टेक्स्ट फिचर फक्त अँड्रॉईड फोन वापरण्यांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. मात्र येत्या काही आठवड्यांमध्ये हे फिचर आयफोनवरही उपलब्ध होईल. इन्स्टंट मेसेजिंग अॅप असलेल्या व्हॉट्स अॅपने काही दिवसांपूर्वीच नवीन व्हॉट्स अॅपने स्टेटस फिचर सुरू केले होते. स्टेटस फिचरमुळे व्हॉट्स अॅपवरूनही फेसबुकप्रमाणेच फोटो किंवा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करता येऊ लागला होता.


नवीन फीचर येण्याआधी अनेकांचे फोटो आणि स्टेटस एकमेकांना अनुसरून असायचे. त्यामुळे आताही युजर्सना  ‘Available’, ‘Busy’ या बरोबरच आवडत्या कवितेतल्या गाण्यांच्या ओळ्या देखील परत ठेवता येणार आहेत.

24 Mar 2017

ईव्हीएम  विरोधी कृती समितीतर्फे शनिवारी शनिवारवाडा ते काऊंसिल हॉलपर्यंत मोर्चा


एमपीसी न्यूज - राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकादरम्यान 'मतदान यंत्रात (ईव्हीएम)' फेरफार झाला आहे. दरम्यान, त्यासंदर्भात  निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतदानाची सर्व आकडेवारी जुळून येत नाही. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आणि राष्ट्रपतीकडे धाव घेण्यात येणार असल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर आणि तेहसिन पुनावाला यांनी पत्रकार परिषदेत दिली. येत्या 25 मार्चला ईव्हीएम विरोधी कृती समितीच्या वतीने शनिवारवाडा ते काऊंसिल हॉलपर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.


यावेळी  दत्ता बहिरट, बाळासाहेब बोडके, रुपाली पाटील, प्रशांत कनोजिया, मयुरी शिंदे आदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मतदान यंत्रात हेराफेरीच्या विरोधात आणि बॅलेटपेपरवर मतदान घेण्यासाठी कृती समीतीच्या वतीने  मोर्चा काढण्यात येणार आहे. भारतीय लोकशाही टिकवायची असेल तर ईव्हीएम मशीनवर मतदान न घेता बॅलेट पेपरवर घ्यावे, अन्यथा लोकशाही संपुष्टात येईल. ईव्हीएम मशीनद्वारे दिलेले मत मतदाराला पाहता यावे यासाठी निवडणूक आयोगाने लवकरात लवकर लक्ष द्यावे.

 

दरम्यान, लोकशाहीला बाधक ठरणार्‍या घटनेविरुद्ध तरुणांनी आवाज उठविला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी परभणी, लातूर आणि चंद्रपूर महापालिका निवडणुकीत पेपर ट्रेल वापरला जावा अशी मागणी निवडणूक आयुक्त सहारिया यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितलं.

 

पुनावाला म्हणाले की, मतदान यंत्रात घोळ झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. निवडणूक आयोगाची भाजप हिताची भूमिका सशंयास्पद आहे. याविरोधात ईव्हीएम कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे जलीकट्टूला विरोध करण्यासाठी सर्वसामान्य जनतेसह अनेक जण रस्त्यावर उतरले, तसा ईव्हीएम मशीनचा विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्रित आले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या पुढील काळात होणारे मतदान ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेट पेपरवर घ्यावे किंवा मशीनला परस्पर ट्रे जोडलेला असावा अशी मागणी त्यांनी केली.

 

दरम्यान, शनिवारी काढण्यात येणार्‍या  मोर्चाचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर करणार आहेत तर प्रमुख मार्गदर्शक तेहसीन पुनावाला आहेत. या मोर्चात ईव्हीएम मशीनवर ताबडतोब बंदी आणून मतपत्रिकेवर फेरनिवडणुका घेण्यात याव्या, तसेच ज्या शासकीय अधिकार्‍यांनी निवडणुकांदरम्यान चुकीच्या पद्धतीने निर्णय  घेतले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करून एक सदस्य वार्डस्तरीय निवडणुका घेण्यात याव्यात, अशा  मागण्या करण्यात येणार आहेत. मोर्चा सकाळी 11 वा शनिवारवाडा येथून निघणार आहे, असे दत्ता बहिरट यांनी सांगितले.

24 Mar 2017

(शर्मिला पवार)


एमपीसी न्यूज - पिंपरी महापालिकेच्या अग्निशमन दलाने नुकत्याच तीन नव्या गाड्या खरेदी केल्या असून या गाड्यांमुळे दलाची कार्यक्षमता अजून वाढणार आहे. या गाड्या आधुनिक तर आहेतच पण त्यांचे रुपही नव्या स्वरुपाचे आहे. या गाड्या 1 एप्रिलपासून रुजू होणार आहेत.


खरे पाहता या गाड्यांची मागणी पाच वर्षापूर्वींची होती मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे या गाड्या महापालिकेला खरेदी करता आल्या नव्हत्या, शेवटी टाटा मोटर्सतर्फे मागणीनुसार या आधुनिक तीन गाड्या अग्निशमन दलाने खरेदी केल्या आहेत.


याविषयी एमपीसी न्यूजशी बोलताना अग्निशमन दलाचे प्रमुख किरण गावडे म्हणाले की, या गाड्यांची पाणीधारण करण्याची क्षमता, इंजीन पॉवर, प्रदूषण नियंत्रण अशा विविध गोष्टी या जुन्या गाड्यांच्या मानाने खुप आधुनिक आहे. त्यामुळे या गाड्यांचा  आमच्या दलाला नक्कीच फायदा होणार आहे. नुकत्याच या गाड्यांची पासींग झालेली आहे, त्या येत्या 1 एप्रिल पासून कामावर दाखल होतील. मात्र त्या कोठे वितरीत करण्यात याव्यात याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. जेथे ख-या अर्थाने गरज आहे अशा केंद्राला या गाड्या पाठवल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.


या गाड्यांची वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे

# पूर्वीच्या गाड्यांची पाण्याची क्षमता 6 हजार लिटर होती या गाड्यांची पाण्याची क्षमता ही 8 हजार लीटर आहे.

# या गाड्यांचा पाण्याचा पंपही आधुनिक असून गरजेनुसार पाण्याचे प्रेशेर कमी-जास्त करता येते.

# गाडीला गरजेनुसार जनरेटर सिस्टीम असून पूर्वीच्या गाडीचे जनरेटर 5 केवीएमचे होते हे 7 केवीएमचे आहे.

# या गाड्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गाड्या बीएस - 4 (भारत स्टेज इमीशन) या सरकारच्या नवीन कायद्यानुसार नवीन तंत्रज्ञानाच्या आधारवर या गाड्या बनवल्या  आहेत. त्यामुळे पुणे किंवा पिंपरी-चिंचवड शहरातील किमान प्रदूषण पातळी राखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होणार आहे. त्यामुळे प्रदूषणात अधिकची कोणतीही भर पडणार नाही.

# या एका गाडीची सर्व उपकरणे व सुविधा यांचा समावेश करुन किंमत 70 लाख रुपये आहे.

# या गाडीचा क्षमता विचारात घेता ही गाडी 250 टन वजन  उचलू शकते व या गाडीचे इंजिनही 210 बीएचपी पॉवरच्या या गाड्या आहेत.

 
# या गाडीसाठी दलाने बॅकअप म्हणून 12 हजार लीटर क्षमतेचा वॉटर ब्राऊजरही खरेदी केलेला आहे. त्यामुळे आपतकालीन परिस्थितीत ऐनवेळी पडणारी पाण्याची गरजही भागवली जाणार आहे.

# या मोठ्या तीन गाड्यांबरोबरच दोन छोट्या टाटा झेनॉन गाड्याही खरेदी करण्यात आल्या आहेत. ज्या छोट्या गल्ली-बोळात जाऊनही काम करु शकतील, तसेच स्टँडबाय म्हणूनही त्या गाड्यांचा फायदा होणार आहे. या गाड्यांची 400 लीटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे.

 
# पिंपरी महापालिकेने 8 वर्षापूर्वी अग्निशमन दलासाठी गाड्या खरेदी केल्या होत्या त्यानंतर आता नव्याने या गाड्या खरेदी केल्या गेल्या आहेत.

शहराची गरज पाहता सध्या पाच ठिकाणी गाड्यांची गरज आहे. त्यामध्ये तळवडे, चिखली, रहाटणी अशा भागांचा समावेश आहे. मात्र अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय प्रशासनाने घेतलेला नसून तोही येत्या दोन दिवसात घेण्यात येणार आहे. तसेच दलाने आधुनिक स्वरुपाचे 20 फायर सूट खरेदी केले होते. त्याप्रमाणे आणखी सूट खरेदी करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. या तीन लाल प-यांमुळे पिंपरी महापालिका अग्निशामन दलाची आधुनिकता व क्षमता दोन्ही वाढणार आहे.

23 Mar 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी महापालिकेच्या करसंलन विभगाने थकबाकीदारांवर नोटीसनंतर आता जप्तीची कारवाई सुरू केली असून आज (दि.23) महापालिकेतर्फे पाच जणांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये दोघांवर जप्ती केली गेली तर तीन थकबाकीदारांकडून 1 कोटी 17 लाख 4 हजार रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे.

 

यामध्ये  थेरगाव येथील गायकवाड क्लासेस व किवळे येथील ज्ञानोबा भोंडवे व निगडी येथील न्यू दिल्ली पुना रोड वेज इ. वर जप्तीची कारवाई करण्यात आली. यापैकी थेरगाव करसंकलन येथील खाजगी क्लासेस व निगडी मधील वाहतूक नगरी येथील कंपनीवर अनुक्रमे 26, लाख 5 हजार व 8 लाख 79 हजार 232 रुपयांची थकबाकी होती.

 

जप्ती पथकाने कारवाई सुरू करताच, किवळे येथील मिळकत धारकाने 11 लाख 54 हजार, निगडी येथील मिळकत धारकाने 1 लाख 50 हजार रुपयांचा व चिंचवड येथील मिळकत धारकाने 1 कोटी 4 लाख असे एकूण 1 कोटी 17 लाख 4 हजार रुपयांचे  धनादेश करसंकलन विभागाच्या अधिका-यांकडे सुपूर्त केले. ही कारवाई सहा आयुक्त दिलीप गावडे, प्रशासन अधिकारी संदीप खोत  यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल भोसले, नंदकिशोर वाघ, व  प्रमोद काशिकर सहायक मंडलाधिकारी व त्यांचे सहकारी यांनी मिळकत जप्तीचे कामकाज केले.

 

महापालिकेतर्फे काल दोघांवर जप्तीची कारवाई केली गेली. ज्यामध्ये थकबाकीदारांकडून 1 कोटी 39 लाख 65 हजार रुपयांचा थकित कर वसूल करण्यात आला. आज अखेर करसंकलन विभागाकडे 4 लाख 49 हजार 812 मिळकतीच्या नोंदी असून त्यापैकी 3 लाख 04 हजार 887 मिळकतधारकांनी 368.16 कोटी रुपये मिळकतकराचा भरणा केला आहे.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने  10 हजार रुपयांच्यावर मिळकतकर थकबाकी असणा-या 42 हजार 365 थकबाकी धारकांना जप्ती पूर्वीच्या नोटीस पाठवल्या होत्या. त्यानुसार ज्या थकबाकीदारांनी नोटीस देऊनही कर भरलेला नाही, अशा थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. त्याअतंर्गत ही कारवाई केली जात आहे.

23 Mar 2017

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या माध्यमातून उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील गावांमध्ये 2008 पासून 66 कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहे. हे लक्षात घेता भविष्यात ही दोन्ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती या गावातील ग्रामस्थांसमवेत झालेल्या बैठकीनंतर महापौर मुक्ता टिळक यांनी दिली. यावेळी अनेक महत्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आले.

 

पुणे महापालिकेत महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांची गावातील समस्यांबाबत बैठक पार पडली. यावेळी महापालिका आयुक्त कुणाल कुमार, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले तसेच अधिकारी उपस्थित होते.

 

या बैठकी विषयी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की, उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असून त्याचा विचारकरता पूर्वी महापालिका 40 टँकरने पाणी पुरवठा करीत होती. तर आता त्यामध्ये 10 टँकरची वाढ करण्यात आली आहे. तर 50 एच पी च्या 2 मोटर दिल्या जाणार आहे. त्या गावामध्ये पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या होत्या. मात्र, त्यापैकी काही टाक्या दुरावस्था झाल्याने नव्याने 100 टाक्या देणार असून 100 एमएलडीची पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर या दोन्ही गावामध्ये 2008 ते 2016 दरम्यान 66 कोटींची विकास कामे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर शहारतील कचरा समस्या सोडविण्यासाठी ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याच्या दृष्टीने नागरिकांमध्ये प्रबोधन देखील केले जाणार आहे.

 

पुणे शहरातील कचरा उरुळी देवाची - फुरसुंगी येथील कचरा डेपोत मागील 20 वर्षांपासून टाकला जात होता. मात्र, वर्षभरात महापालिकेच्या माध्यमातून छोटे छोटे प्रकल्प उभारण्यात आल्याने शहरातील सुका कचरा डेपोमध्ये टाकला जात असून मागील 20 वर्षांमध्ये तिथे टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे विहिरीचे पाणी दूषित झाले, जमीन शेती करिता पूरक राहिली नाही. या सह अनेक समस्यांना उरुळी आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांना सामोरे जावे लागले आहे.

 

या सर्वाचा विचार करता 2008 पासून पुणे महापालिकेच्या माध्यमातून या दोन्ही गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करणे, रस्ते बांधणे, आरोग्य विषयक सुविधा पुरविणे, अशी अनेक कामे केली जात आहे. मात्र अद्यापपर्यंत तेथील कचरा डेपो हलविण्यात आला नाही. या मागणीसाठी तेथील ग्रामस्थांनीं अनेक वेळा आंदोलने केली. प्रत्येक वेळी सरकारकडून आश्वासना पलीकडे काही मिळाले नाही. त्या पार्श्वभूमीवर आज पुणे महापालिकेत महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यावेळी तेथील ग्रामस्थांनी कचरा डेपो कधी हलवणार, आरोग्याचा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, अशा समस्या मांडण्यात आल्या. ग्रामस्थांच्या बाजूने या बैठकीत निर्णय घेतल्याचे पाहावयास मिळाले.

23 Mar 2017
एमपीसी न्यूज - महाराष्ट्र मजदूर संघटना आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माथाडी कायद्याचे जनक कै. अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिंचवड येथील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 
यावेळी महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते इरफान सय्यद, नगरसेवक तुषार हिंगे, केशव घोळवे, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे कार्याध्यक्ष परेश मोरे, सचिव प्रवीण जाधव, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट संघटनेचे उपाध्यक्ष पोपटराव धोंडे तसेच बाळासाहेब देसाई, अंकुश लांडे, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे मुरली कदम, खंडू गवळी, पांडुरंग कदम, सर्जेराव कचरे, राजू तापकीर, सतीश कंठाळे, हनुमंत तरडे यांच्यासह माथाडी कामगार उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना इरफान सय्यद म्हणाले की, माथाडींचे आराध्य दैवत कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी गोरगरीब जनतेला स्वाभिमानाने जगता यावे यासाठी केलेले कार्य एका दीपस्तंभासारखे आहे. त्यांनी माथाडी कामगारांना एकीचे बळ दिले.
 
मेहनतीचे, हमालीचे काम करणा-या कामगारांना त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या कौटुंबिक आर्थिक, सामाजिक जीवनात अमूलाग्र प्रगती करण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचे कार्य समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी राहील, असे सय्यद म्हणाले.
23 Mar 2017

एमपीसी न्यूज - चैत्र शुक्‍ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा! साडेतीन मुहूर्तांपैकी एक. हा सण हिंदू नववर्षाचा प्रारंभ दिन असल्याने पंचगंगापूजन करून घरोघरी गुढ्या उभारण्याची परंपरा आहे.  त्यामुळे  साखरेच्या गाठ्यांना बाजारात मागणी आहे. यंदा 15 टक्क्यांनी साखरगाठी महागल्या आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड, निगडी, भोसरी आदी ठिकाणी बाजारपेठांमध्ये साखरगाठी विक्रीसाठी आल्या आहेत. दहा रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यत या साखरगाठींच्या किंमती आहे. पाडव्याला विशेष महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्‍या साखरगाठींना विशेष मागणी असून, छोट्या साखरगाठींच्या हारांचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. साखरगाठीमध्ये खारीक व नारळमध्ये असणा-या गाठ्या बाजारात आल्या आहेत. साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि हिंदू नववर्षारंभाचा दिवस असलेला गुढीपाडवा सण  साजरा होत आहे. शहरवासीयांनी यानिमित्त तयारी सुरू केली असून, बाजारात गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठा सजल्या आहेत.

 

नवीन वस्त्र; तसेच पूजेचे साहित्य बाजारात दाखल झाले असून, रंगीत साखरगाठींना विशेष मागणी आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने सकाळी मुहूर्तावर गुढी उभारली जाणार आहे. त्यासाठी नवीन वस्त्र आणि साखरगाठीचे विशेष महत्त्व असते. बाजारात विविध रंगांमध्ये साखरगाठी विक्रीसाठी उपलब्ध झाल्या असून, मागील वर्षीपेक्षा पाच ते दहा रुपयांनी त्यांची  किंमत वाढल्याची  माहिती  विक्रेत्यांनी दिली.

23 Mar 2017

एमपीसी न्यूज - शेतकरी कर्च माफीची मागणी करणा-या 19 आमदरांचे विधानसभा अधिवेषनातून निलबंन करण्यात आले. त्याच्या निषेधार्थ आज (गुरुवारी) पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीच्या वतीने भाजपा सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला होता.

राष्ट्रवादीतर्फे आज दुपारी पाचच्या सुमारास पिंपरी येथील आंबेडकर चौकात आमदारांच्या निलंबना विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रवक्ते फजल शेख, नगरसेवक राजू मिसाळ, नगरसेविका अनुराधा गोफणे, सुलक्षणा धर , पोर्णिमा सोनवणे, वैशाली घोडेकर, वैशाली काळभोर, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष सुनिल गव्हाणे, सामाजिक न्याय विभागाचे विनोद कांबळे, सेवादलाचे अध्यक्ष आनंदा यादव आदी पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी बोलताना संजोग वाघेरे म्हणाले की, लोकशाहीचा गळा घोटत भाजपा सरकारने शेतक-यांच्या कर्ज माफीची मागणी  करणा-या 19 आमदारांचे निलंबन केले आहे. शेतक-यांची कर्ज माफी मागणे म्हणजे काही गुन्हा नाही. लोकशाही मध्ये आपल्या हक्कांसाठी भांडण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यामुळे आमदरांचे निलंबन हे नियमाला धरुन नाही. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे सरकाला कोडींत धरु पाहत होते मात्र सरकारने खेळी करत या आमदरांचे निलंबन केले. त्यामुळे हे निलंबन त्वरीत मागे घ्यावे अशी आमची मागणी असून सरकारच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करत आहोत, असेही वाघेरे म्हणाले.

यावेळी कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक हातात घेतले होते व सरकारविरोधी घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

23 Mar 2017

एमपीसी न्यूज -  चिखली येथील एक वर्षाच्या मुलाचा स्वाईन फ्लूमुळे काल (दि.22) रात्री मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लूमुळे मृत्यू होण्याची शहरातली ही सातवी घटना आहे.

 

चिखली येथील एक वर्षाच्या मुलाला स्वाईन फ्लूच्या लक्षणामुळे यशवंतराव चव्हाण रुग्णालयात 20 मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती खालवली व त्याचा  काल (दि.22) रात्री साडेनऊ वाजता उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

 

यापूर्वीही शहरातील विविध भागातील 5 जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. तर अहमदनगर येथील व सोलापूरमधील अशा दोन रुग्णांचा वायसीएममध्ये उपचार घेतना मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता 7 वर पोहोचली आहे. तर 49 लोक हे स्वाईन फ्लूचे सदोष रुग्ण असून त्यापैकी 9 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

 

दरम्यान, आज वायसीएमच्या निवासी डॉक्टरांनी सामोहीक रजा घेतली आहे. याविषयी एमपीसी न्यूजशी बोलताना आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय म्हणाले की, रजेवर गेलेल्या डॉक्टरांशी आमची चर्चा झाली असून त्यांना आम्ही उद्यापासून कामावर बोलवत आहोत. तसेच स्वाईन फ्लू विभागाचा त्या डॉक्टरांशी काहीसंबंध नसून, स्वाईन फ्लूसाठी आमची स्वतंत्र यंत्रणा  व औषध पुरवठा आहे. जो पूर्णपणे कार्यरत आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर या रजेचा काही फरक पडणार नाही, असेही रॉय यांनी स्पष्ट केले. 

Page 5 of 51