23 Mar 2017

हे आंदोलन म्हणजे राजकीय स्टंट नाही तर पारदर्शी कारभार - योगेश बहल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील विरोधी पक्षनेते पदाचे कार्यालय अतिशय छोटे आहे. त्यासाठी आम्ही महापौर व सत्तारुढ पक्षनेत्यांकडे मागणी केली. मात्र, त्यांनी याला स्टंट म्हटले आहे. मात्र, हा स्टंट नसून आमचा पारदर्शी कारभार आहे, असा टोला विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी यावेळी लगावला.

 

विरोधी कार्यालयातील सर्व खुर्च्या महापौर कार्यालयाबाहेरच्या मोकळ्या जागेत मांडून स्वतः विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी बाहेरच आपले विरोधी पक्षनेते कार्यालय थाटले आहे. त्यामुळे महापालिकेत येणा-या ब-याच जणांच्या भूवया आपोआप उंचावल्या जात होत्या.

 

याविषयी पत्रकारांशी बोलताना बहल म्हणाले की, विरोधी पक्ष असलो तरी आमची सदस्यसंख्या 36 आहे. व आत्ताचे विरोधी पक्षनेते कार्यालय अतिशय छोटे आहे. त्याऐवजी आम्हाला उपमहापौर कार्यालय द्यावे किंवा इतर कोणतेही कार्यालय द्यावे जिथे आमचे 40 ते 45 सदस्य बसू शकतील. याविषयी आम्ही आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, महापौर नितीन काळजे यांच्याकडे विनंती केली. मात्र, त्यांनी केवळ समजून घ्या एवढेच आश्वासन दिले. त्यासाठी आम्ही असे बाहेर कार्यालय थाटले आहे. त्यामुळे हा आमचा कोणताही राजकीय स्टंट नसून आमचा हा पारदर्शक कारभार आहे, असे बहल म्हणाले.

 

याविषयी एमपीसी न्यूजशी बोलताना महापौर नितीन काळजे म्हणाले की, राष्ट्रवादीच्याच काळातील ही रचना आहे. त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. आत्ता आमचेही 77 सदस्य आहेत. त्यांनाही महापौर किंवा सत्तारुढ पक्षनेत्यांच्या कार्यालयातही जागा पुरत नाही. त्यामुळे तुर्तास सर्वांनी समजून घेणे व एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. मोठ्या कार्यालयासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे आश्वासन महापौरांनी यावेळी दिले.

 

मात्र, जोपर्यंत मोठे कार्यालय मिळत नाही तोपर्यंत आम्ही असे बाहेरच बसू, अशी भूमिका विरोधी पक्षाने घेतली आहे.

23 Mar 2017

एमपीसी न्यूज - इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) पिंपरी-चिंचवड-भोसरी शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. संजय देवधर आणि सचिवपदी डॉ. संजीव दात्ये यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.   

 

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांची निवडणूक झाली. त्यामध्ये अध्यक्षांसह सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 

कार्यकरणी पुढीलप्रमाणे - पेट्रन डॉ. दिलीप कामत, अध्यक्ष डॉ. संजय देवधर, उपाध्यक्ष डॉ. सुहास माटे, उपाध्यक्ष डॉ. सुशील मुथीयान, सचिव डॉ. संजीव दात्ये, सहसचिव डॉ. विजय सातव, खजिनदार डॉ. सचिन कोल्हे, आयएमए डायरी चेअरमन डॉ. एस. आर. पाटील, स्पंदन संपादक डॉ. राकेश नेवे यांची निवड करण्यात आली आहे.

 

निवडणूक अधिकारी म्हणून डॉ. सचिन पाटील यांनी काम पाहिले. 1 एप्रिलपासून नव्या कार्यकारिणीचा कार्यकाळ सुरू होणार असून दोन वर्षांसाठी ही कार्यकारिणी कार्यरत राहणार आहे. 

 

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) एमबीबीएस, एमडी, एमएस, अॅलोपॅथी डॉक्टरांची संघटना आहे. पिंपरी-चिंचवड शहरात 1 हजार डॉक्टर कार्यरत आहेत. संघटनेच्या माध्यमातून शहरातील डॉक्टरांच्या अडी-अडचणी सोडविल्या जातात. चर्चासत्र, कार्यशाळा घेतल्या जातात. संघटनेच्या महाराष्ट्रात 208 शाखा आहेत.

23 Mar 2017
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची आज (गुरुवारी) सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये संख्याबळानुसार भाजपच्या 10, राष्ट्रवादी 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा 1 नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत.

 
क्रीडा, कला, साहित्य, व सांस्कृतिक समिती सदस्य - अंबरनाथ कांबळे, भिमाबाई फुगे, बाळासाहेब ओव्हाळ, लक्ष्मण सस्ते, राजेंद्र गावडे (भाजप), मंगला कदम, डब्बू आसवाणी, राजू बनसोडे (राष्ट्रवादी), अॅड. सचिन भोसले (शिवसेना)

 
विधी समिती - शारदा सोनवणे, स्विनल म्हेत्रे, सुरेश भोईर, अश्विनी जाधव, शितल शिंदे (भाजप) सविता काटे, संतोष कोकणे, जावेद शेख (राष्ट्रवादी), मीनल यादव (शिवसेना)

 
शहर सुधारणा समिती - विकास डोळस, शैलेश मोरे, सागर गवळी, शशिकांत कदम, संतोष कांबळे (भाजप), मयुर कलाटे, गिता मंचरकर, विनया तापकीर (राष्ट्रवादी), अश्विनी वाघमारे (शिवसेना) 
        
महिला व बालकल्याण समिती -  योगिता नागरगोजे, सुनिता तापकीर, चंदा लोखंडे, सोनल गव्हाणे, सागर आंगोळकर (भाजप), सुलक्षणा धर-शिलवंत, निकीता कदम, डॉ. वैशाली घोडेकर (राष्ट्रवादी),  रेखा दर्शले (शिवसेना)


यावेळी समितीत्या सदस्यांचा सत्कार करत असताना राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मात्र महापौरांजवळ न जाता खालूनच सत्कार स्वीकारला. याबाबत विरोधी पक्षनेते योगेश बहल यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मोठ्या कार्यालयाची मागणी अमान्य केल्याने आम्ही हा सत्कार खाालूनच स्वीकारला, असे त्यांनी स्पष्ट केले.

 
23 Mar 2017
एमपीसी न्यूज - चिखली परिसरातील गेल्या 15 दिवसांपासून कचरा उचलला जात नाही. महापालिका प्रशासनाचे त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांनी आज (गुरुवारी) महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर 'कचरा फेको' आंदोलन केले. 
 
पिंपरी महापालिकेची आज सर्वसाधारण सभा आहे. त्यापूर्वीच दत्ता साने यांनी प्रभागातील कचरा आणून महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर टाकला. 
 
चिखली परिसरातील कचरा गेल्या 15 दिवसांपासून उचलला जात नाही. प्रभागातील कचरा उचलणा-या 70 टक्के घंटागाड्या नादुरुस्त आहेत. साठलेल्या कच-यामुळे प्रभागात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना त्रास होत आहे. महापालिका प्रशासनाला त्याची जाणीव व्हावी, यासाठी महापालिका प्रवेशद्वाराजवळ कचरा फेकला, असे दत्ता साने यांनी सांगितले.  
 
याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांना निवेदन देण्यात आले. येत्या दोन दिवसांत प्रभागातील सगळा कचरा उचलला जावा. दोन दिवसांत कचरा जर नाही उचलला तर पुन्हा पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ कचरा आणून टाकला जाईल आणि अधिका-यांना त्यामध्ये उभा करण्यात येईल, अशा इशारा साने यांनी दिला आहे.
23 Mar 2017

वायसीएमएचचे 40 डॉक्टर संपावर; रुग्णसेवा कोलमडली

 

एमपीसी न्यूज -  रुग्णांसोबत नातेवाईकांचा लोंढाच रुग्णालयात येतो. काम सुरु असताना सरळ कानाला फोन लावला जातो व आमच्या रुग्णाला आधी तपासा, अशा  स्वरुपाच्या धमक्याच आम्हाला फोनवरुन दिल्या जातात, रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग नाही की सुरक्षा रक्षक नाहीत, असे गंभीर आरोप पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या (वायसीएमएच) डॉक्टरांनी आज (गुरुवारी) केले. 

 

धुळे येथे डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रभर डॉक्टरांनी संप पुकारला आहे. त्याचाच एक भाग वायसीएम रुग्णालयाच्या सर्व डॉक्टरांची आज सकाळी एक बैठक झाली. त्या बैठकीत डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. म्हणून आज पिंपरीतील वायसीएम रुग्णालयातील 38 निवासी डॉक्टर व रुबी अल केअरचे दोन अशा 40 डॉक्टरांनी हा संप पुकारला आहे.

 

यावेळी आपल्या मागण्या माडतांना उपस्थित डॉक्टरांनी आम्हाला मानधनही कमी मिळते, रुग्णालयात स्टाफ कमी आहे, तसेच रात्रीच्यावेळी किंवा एरवीही रुग्णाबरोबर 8 ते 10 नातेवाईक येतात. ते सुरक्षा रक्षकाला जुमानत नाहीत.  डॉक्टरांना उद्धटपणे बोलणे, धक्काबुक्की करणे किंवा सरळ कानाला फोन लावून हाततले काम सोडून आधी रुग्णाला तपासा अशा धमक्याच येतात. राजकीय दबावाखाली आम्हाला काम करावे लागत आहे, अशी तक्रारही त्यांनी केली. यावेळी त्यांनी सुरक्षा व्यवस्था वाढवा, मानधनामध्ये वाढ करा, कर्मचारी संख्याही वाढवा, अशी मागणी केली आहे.

 

यासंबंधी त्यांनी वायसीएम रुग्णालय प्रशासनाला निवदेन दिले असून ते महापौर व महापालिका आयुक्त यांचीही यासंबंधी भेट घेणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हा संप किती कालावधीसाठी असेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या संपामुळे आधीच कमी कर्मचारी व त्यात संप यामुळे रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत.

23 Mar 2017

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई या द्रुतगती मार्गावरील प्रवास एक एप्रिलपासून महाग होणार आहे. दर तीन वर्षांनी 1 एप्रिलपासून या मार्गावरील टोलमध्ये दरवाढ केली जाते. त्यामुळे आगामी 1 एप्रिलपासून या  मार्गावरून प्रवास करणाऱ्या चार चाकी हलक्या वाहनांना टोलसाठी 35 रूपये जास्त मोजावे लागणार आहेत.

 

त्यामुळे सध्या 195 रुपये असलेला टोल आता 230 रुपये इतका होणार आहे. अवजड वाहनांना टोलच्या रुपात 1317 रुपयांऐवजी 1555 रुपये द्यावे लागणार आहेत. यापूर्वी 2014 मध्ये पुणे-मुंबई  द्रुतगती मार्गावरील टोलचे दर वाढविण्यात आले होते.


राज्यातील टोलनाके बंद करणार असल्याची घोषणा करून भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवली होती. परंतु  राज्यभरातील 53 टोलनाके बंद केल्याचे सांगत नागरिकांची टोलमधून सुटका केल्याचा दावा राज्यसरकारने केला होता, परंतु हा दावा आता फोल ठरण्याची चिन्हे आहेत.

22 Mar 2017

1 एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू

एमपीसी न्यूज - ज्या रेल्वे प्रवाशांचे एक्स्प्रेस रेल्वेचे तिकिट कन्फर्म झाले नाही अशा प्रवाशांना आता त्याच तिकिटावर राजधानी, शताब्दी यासारख्या प्रतिष्ठित रेल्वे गाड्यांनी प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

शेवटच्या क्षणापर्यंत ज्या प्रवाशाचे तिकीट कन्फर्म झाले नाही व वेटिंगला त्यांचे नाव आहे अशा प्रवाशांना मेल, एक्स्प्रेसच्या तिकीट दरात शताब्दी, राजधानीने प्रवास करता येणार आहे. प्रवाशांना तिकीट बुक करताना राजधानी, शताब्दीचा पर्याय सुचवावा लागणार असून प्रतीक्षा यादीत नाव असल्यास त्यांना शताब्दी, राजधानीने प्रवास करता येणार आहे. दि. 1 एप्रिलपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

22 Mar 2017

विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कल्पकतेला चालना देण्यासाठी निगडीच्या ज्ञानप्रबोधिनीत उपक्रम

एमपीसी न्यूज - लहान मुले विविध वस्तू वेगळ्या करून जोडतात. त्यांच्या कल्पकता पाहून आपण भारावून जातो, असाच अनुभव निगडीतील ज्ञान प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी 'अटल इनोव्हेशन मिशन' या उपक्रमातून घेतला. दुचाकी, सायकल, पंखे, सीपीयू, प्रिंटर अशा विविध वस्तूंचे सुटे भाग वेगळे करून आपली कल्पकता दाखवून कमी वेळेत त्या वस्तू पुन्हा योग्यरितीने जोडण्याची किमया विद्यार्थ्यांनी करून दाखवली आणि त्यांची ही कल्पकता पाहून उपस्थित शिक्षकही भारावून गेले.  

विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त 'प्रॅक्टिकल' ज्ञानावर भर देण्यासाठी सरकारने 'अटल इनोव्हेशन मिशन' योजना सुरू केली आहे. प्रॅक्टिकलबरोबर प्रश्न सोडविणारे आव्हानात्मक प्रॅक्टिकल करायचे. त्यातून संशोधक तयार व्हायला पाहिजेत. यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.   

'अटल इनोव्हेशन मिशन' या योजनेअंतर्गत भारतातील ज्या शाळेत शालेय पाठ्यपुस्तकीय शिक्षणाव्यतिरिक्त वेगळ्या पद्धतीने शिकविले जाते. विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये काही प्रयोग केले जातात, अशा शाळांना 'अटल टिंकरिंग लॅब'साठी अर्ज पाठवायचे होते.

भारतातून 14 हजार शाळांनी यासाठी अर्ज भरले असून त्यापैकी 457 शाळा या निकषात पात्र ठरल्या आहेत. त्यात महाराष्ट्रातील 46 शाळा आणि  पुण्यातील 10 शाळांचा समावेश आहे.  निगडीतील ज्ञान प्रबोधिनी शाळाही त्यामध्ये निवडली गेली. त्यामध्ये पाचवी, सहावी, आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे 'प्रॅक्टिकल' ज्ञान वाढावे, यासाठी प्रात्यक्षिके सादर करायला लावली.

विद्यार्थ्यांना चुंबकीय, स्थिर विद्युत ऊर्जा या विषयांवर वैज्ञानिक खेळ दाखविले. काही कृती विद्यार्थ्यांकडून घेण्यात आल्या. गोष्टीच्या व विविध साधनांच्या आधारे ध्वनीची निर्मिती कशी होते, हे प्रयोगाद्वारे सांगितले. व्हिडिओच्या आधारे ध्वनी विषयीच्या कल्पना सांगण्यात आल्या. तसेच भारतीय शास्त्रज्ञांची चरित्रे सांगितली.

विद्यार्थ्यांनी अभ्यास करून सुटे भाग केलेल्या वस्तूंची जोडणी केली. त्यामध्ये वापरलेली यंत्रे, त्यामागील शास्त्रीय तत्व, विज्ञानाची संकल्पना याची मांडणी कागदावर लिहिणे, दिलेल्या साहित्यातून वर्किंग मॉडेल तयार करणे, मॉडेल बनविताना कशाप्रकारे बनविला आहे, ते स्पष्ट करण्यास लावले.  

यंत्र खोलो व जोडो स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेतल्या. विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभागी होऊन प्रात्यक्षिके करून दाखविली. यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळाला. त्यांच्या प्रॅक्टिकल ज्ञानामध्ये भर पडली. तसेच टाकाऊ साहित्यापासून विद्यार्थ्यांनी विविध नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर केले.

या प्रकल्पासाठी ज्ञानप्रबोधिनी शाळेने काम करण्यास सुरुवात केली. 30 ते 35 तज्ज्ञांची एक टीम तयार केली आहे. त्यामध्ये विज्ञान, गणित, संगणक, तंत्रज्ञानाचे शिक्षक आणि उद्योजक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकल्प राबविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानात भर पडणार आहे. विज्ञानामध्ये विद्यार्थ्यांचे भवितव्य होईल. देशाला नवे संशोधक भेटतील.

22 Mar 2017

एमपीसी न्यूज - पुणे-दौंड रेल्वे मार्गावर हडपसर स्थानकावर पुलाचे काम करण्यात येणार आहे. यामुळे शुक्रवारी (दि. 24) व शनिवारी (दि. 25) ब्लॉक ठेवण्यात आला आहे. सकाळी 9.50 ते दुपारी 2.50 वाजण्याच्या दरम्यान हा ब्लॉक असणार आहे.

 

या 'ब्लॉक'मुळे 51452 बारामती-पुणे पॅसेंजर शुक्रवारी दौंड पर्यंतच धावेल. त्याचप्रमाणे पुणे स्थानकावरुन दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी सुटणारी 51421 पुणे-निझामाबाद पॅसेंजर शुक्रवारी दौंड येथून सुटणार आहे. तर 17014 हैदराबाद-पुणे एक्स्प्रेस शनिवारी लोणी स्थानकात दुपारी 12.50 ते 1.30 वाजण्याच्यादरम्यान थांबविण्यात येणार आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

22 Mar 2017

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील 82 उद्याने आणि 46 रुग्णालयात मोफत वाय-फाय सेवा पुरविण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे एल अॅन्ड टी या कंपनीला कॉन्ट्रक्ट दिले आहे. या विषयावरून पालिका सभागृहात आज सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चर्चा रंगली होती.

 

याविषयी बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, उद्यानात वाय-फाय सेवा पुरविण्यासाठी सुरुवातीला औंध, बाणेर आणि बालेवाडी हा भाग निवडला होता. परंतू आता शहरभरातील उद्यानात यासंबंधीची कामे चालू आहेत. त्यामुळे औंध, बाणेर आणि बालेवाडी व्यतिरिक्त ही योजना राबविण्यासाठी जनरल बॉडीला विश्वासात घेतले होते का? असा प्रश्न विचारत सत्ताधारी विरोधकांना विश्वासात न घेता प्रकल्प राबवित असल्याचा आरोप केला.

 

तर वसंत मोरे यांनी शहरातील उद्यानातील विकासकामांसाठी करोडो रुपये खर्च केले. आणि आता वाय-फाय सेवेसाठी टॉवर उभारण्यासाठी उद्यानातील लॉन्स उखडल्या जात आहेत, जॉगिंग टॅक उखडले जात आहेत. मग केलेला खर्च वाया गेला का? तसेच हे वाय-फाय सुरू झाल्यानंतर त्यापासून तयार होणा-या रेडिअन्समुळे बागेत येणा-या नागरिकांवर, पक्षांवर काही विपरीत परिणाम होणार नाही याचा अभ्यास केला का? तसेच वाय-फाय सुरू झाल्यानंतर येणा-या तरुणाईच्या उपद्रवासाठी महापालिकेने काय उपाययोजना केल्या आहेत, असे विचारत इतर नागरिकांना जो उपद्रव होईल. त्यासंबंधीची काय उपाययोजना केली, अशी विचारणा केली.

 

दीपक मानकर यांनी महापालिकेचा रिलायन्स सोबत करार असतानाही एल अॅन्ड टी कंपनीला टेंडर का दिले अशी विचारणा केली. तर योगेश ससाने यांनी पुणे शहाराला वाय-फायपेक्षा स्वच्छतेची गरज आहे, उद्यानात झाडे लावण्याची गरज आहे. त्यासाठी पैसे खर्च करण्याची मागणी केली. अविनाश बागवे यांनी बीएसएनएलसारखी शासकीय संस्था असताना खाजगी कंपनीसोबत करार का केला, असे विचारत महापालिकेच्या योजना पुणेकरांसाठी की ठेकेदारांसाठी, असा सवाल उपस्थित केला. 

 

नगरसेवकांच्या प्रश्नांना उत्तर देताना आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रशासनाच्या वतीने बाजू मांडली. रिलायन्स आणि इंडससोबत करार आहे. परंतु महापालिकेच्या निर्णयानुसार थकबाकी भरल्यशिवाय पुढचे टेंडर देता येत नाही. या नियमामुळे त्यांना हे टेंडर देता आले नाही. तसेच बीएसएनएलच्या किमती या एल अॅन्ड टी पेक्षा 23 कोटींनी जास्त होत्या. त्यामुळे  एल अॅन्ड टी कंपनीची निवड केली. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेतली जाणार असून पर्यावरण सेंन्सर लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Page 6 of 51