22 Apr 2017
एमपीसी न्यूज - सर्व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात लोकशाही मार्गाने आवाज उठविणा-या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ महापौर नितीन काळजे यांच्या प्रत्येक शासकीय कार्यक्रमात काळे झेंडे दाखविण्याचा, इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने दिला आहे.
 
याबाबत विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांचा 100 टक्के  शास्तीकर माफ करण्याची मागणी, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी लोकशाही मार्गाने महापौरांकडे केली होती. परंतु, महापौर काळजे यांनी गोंधळ घातल्याचा ठपका ठेवत विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, नगरसेवक दत्ता साने आणि मयुर कलाटे यांना तीन सर्वसाधारण सभेसाठी निलंबित केले आहे.
 
राष्ट्रवादी सत्तेत असताना विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी अनेकदा सभागृहात गैरवर्तन केले आहे. आताचे सत्ताधारी विरोधात होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या अंगावर धावून गेले होते.  भाजप संघटनेच्या पदाधिका-यांनी स्थायी समितीच्या कक्षातील अध्यक्षांच्या टेबलवर नाचून गोंधळ घातला होता. पण त्यावेळेस देखील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने कोणाचे निलंबन वा कोणतीही कारवाई केली नव्हती, अशी आठवणही गव्हाणे यांनी सत्ताधा-यांना करुन दिली आहे.
 
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे निलंबन म्हणजे सत्ताधारी भाजपची हुकुमशाही असून लोकशाही संपवण्याचा  अजेंडा पुन्हा भाजपने अधोरेखित केला आहे. संसद, विधानसभा आणि महापालिका या पवित्र सभागृहात लोकशाही मार्गाने विरोध करणा-या  विरोधकांचे निलंबन करून  लोकशाहीचा गळा दाबून जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करने म्हणजेच भाजपाचा पारदर्शक कारभार आहे.
 
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे जोपर्यंत निलंबन मागे घेण्यात येत नाही. तोपर्यंत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महापौर नितीन काळजे यांच्या प्रत्येक शासकीय कार्यक्रमात काळे झेंडे दाखविण्यार असल्याचे, गव्हाणे यांनी सांगितले.
22 Apr 2017

पिंपळे-गुरवमध्ये साकारतेय नाट्य रसिकांसाठी सुसज्ज असे नाट्यगृह

 

एमपीसी न्यूज - कामगारनगरी म्हणून ओळख असणा-या पिंपरी-चिंचवड शहरात सांस्कृतिक वारसा जपणे त्याचे संवर्धन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी पिंपळे-गुरवमध्ये सुसज्ज असे नटसम्राट निळू फुले नाट्यगृह उभारण्यात येत आहे. या नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

 

शहरात महापालिकेच्या वतीने चिंचवडमध्ये प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, संत तुकाराम नगरमध्ये आचार्य अत्रे नाट्यगृह तर भोसरीत अंकुशराव लांडगे नाट्यगृह बांधण्यात आली आहेत. पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी परिसरामधील नागरीकांना त्यांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी इतर भागात जावे लागत होते. ही गरज ओळखून महापालिकेच्या वतीने पिंपळे गुरव येथील आरक्षण क्र. 345 च्या सुमारे 3502 चौ. मी. क्षेत्रावर भव्यदिव्य असे नाटयगृह उभारण्यात आले आहे. याचे काम 90 टक्के पुर्ण झाले असून विद्युत विषयक व साऊंड सिस्टिमचे काम बाकी आहे.

 

महापालिकेने सुमारे 35 कोटी रूपये खर्च करत शहरातील सर्वाधिक भव्यदिव्य असे हे नाट्यगृह उभारले आहे. या नाट्यगृहाचे उद्‌घाटन येत्या काही दिवसात होणार आहे. नाट्यगृहाचे आर्किटेक्ट मिलिंद किरदत तर ठेकेदार बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेन्क्रो. प्रा. लि. यांनी हे काम केले आहे, अशी माहिती बीआरटीएस विभागाचे सह शहर अभियंता राजन पाटील यांनी दिली.

 

नाट्यगृहाची वैशिष्टे

# आसन क्षमता बाल्कनीसह 613

# दुचाकी 312 व चारचाकी 78 अशी तळमजल्यावर पार्किंगची सोय

# पहिल्या मजल्यावर 210 चौ.मी. क्षेत्राचे बहुउद्देशीय सभागृह

# सभागृहासाठी स्वतंत्र जीना

# लहान कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देणे शक्य

# स्वतंत्र मोठ्या हॉलची व्यवस्था करणेत आलेली आहे.

# 35 कोटींचा खर्च

p11

p22

p111

22 Apr 2017

एमपीसी न्यूज - विरोधी पक्षनेत्याला पुरेसे कार्यालय दिले नसल्यामुळे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी महापौर नितीन काळजे यांच्या दालनासमोर आपले कार्यालय थाटले आहे. हे दालन काढून टाकण्याचे, आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यावरुन महापौर आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये जुंपली आहे. महापालिका काय कोणाच्या बापाची आहे काय? असा सवाल उपस्थित करत जो पर्यंत कार्यालय मिळत नाही, तोपर्यंत इथेच बसणार असे, बहल यांनी ठणकावून सांगितले.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच 36 नगरसेवक असलेला पक्ष विरोधी पक्षात आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील तिस-या मजल्यावरुन विरोधी पक्षनेत्याचे कार्यालय अपूरे पडत असल्याने दुसरे कार्यालय देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली होती. मात्र, महापौर काळजे आणि सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी मागणी धूडकाऊन लावली होती. त्यानंतर सत्ताधारी भाजपने विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादीला महापालिका मुख्यालयाच्या दुस-या मजल्यावर कार्यालय देण्याची तयारी दर्शविली आहे. तिथे फर्निचरचे काम देखील सुरु केले आहे. मात्र, राष्ट्रवादीला तिथे कार्यालय नको असून तिस-या मल्यावर पदाधिका-यांची दालने ज्या ठिकणी आहेत तेथेच विरोधी पक्षनेत्यालाही कार्यालय देण्याची मागणी, बहल यांनी केली.

 

महापौर नितीन काळजे म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांसाठी दुस-या मजल्यावर स्वतंत्र कार्यालय दिले आहे. तरीही विरोधी पक्ष महापौर कार्यालया समोर बसत असून हे चुकीचे आहे. उद्यापासून विरोधी पक्षाला इथे बसून न देण्याच्या त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. विरोधी पक्षनेत्याचा फलक देखील काढून टाकण्याचे सांगितले आहे.

 

योगेश बहल म्हणाले, राष्ट्रवादीचे 36 नगरसेवक आहेत. दोन स्वीकृत सदस्य निवडून येऊ शकतात. सध्याचे कार्यालय अपूरे पडत आहे. त्यामुळे उपमहापौरांच्या कार्यालया एवढे आम्ही कार्यालय मागितले आहे. परंतु, सत्ताधारी भाजप याचे राजकारण करत आहे. आम्हाला तिस-या मजल्यावरच कार्यालय हवे आहे.

 

आम्ही इथेच बसणार आहोत. महापौरांच्या दालनात बसलो नाही. त्यामुळे त्यांना राग येण्याचे कारणच नाही. हाकलून देण्याची भाषा कोणी करत असेल तर महापालिका काय कोणाच्या बापाची आहे का? आम्ही कोणालाही अडथळा न करता बसत आहोत. कार्यालय इथेच भरणार, हिम्मत असेल तर अडवून दाखवा, असेही बहल म्हणाले.

22 Apr 2017

मी लाटेतला नगरसेवक नाही, जनतेचा नगरसेवक

 

बोलणारे नगरसेवक भाजपला सभागृहात नको आहेत

 

एमपीसी न्यूज - शास्तीकर, रेडझोन या प्रश्नांसाठी गेल्या 10 वर्षांपासून मी भांडत आलो आहे. महापालिकेच्या सभागृहात गोरगरीबांच्या प्रश्नांसाठी मी नेहमीच आवाज उठविला आहे. 100 टक्के शास्तीकर माफ करण्याची मागणी करत असताना महापौरांनी आमचे निलंबन केले असून भाजपने माझे नगरसेवक पद रद्द करुन दाखवावेच, असे खुले आव्हान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांनी दिले आहे.

 

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत 100 टक्के शास्तीकर माफ करण्याच्या मागणीसाठी महापौरांच्या आसनाशेजारील कुंडी वरती ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे दत्ता साने यांचे नगरसेवकपद रद्द करणार असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता दत्ता साने यांनी नगरसेवक पद रद्द करुन दाखवण्याचे भाजपला खुले आव्हान दिले आहे.

 

मी सभागृहात कोणतेच गैरवर्तन केले नाही. महापौरांच्या आसनाशेजारील कुंडी वरती ठेवण्याचा प्रयत्न केला. राजदंड पळवून नेल्यास गैरवर्तन होते, मी राजदंडाला हातदेखील लावला नाही. 100 टक्के शास्तीकर माफ करावा, या मागणीसाठी मी गेल्या 10 वर्षापासून झगडत आहे. आम्ही मतदान मागत असताना महारौपांनी आमची मागणी मान्य केली नाही. यामध्ये कुरघोडीचा कोणताही प्रयत्न नव्हता आमचा प्रामाणिक प्रयत्न होता, असेही दत्ता साने म्हणाले.

 

मी जनतेचा नगरसेवक आहे. लाटेत निवडून आलो नाही. जनतेसाठी माझे दहावेळेस नगरसेवक पद रद्द केले, तरी मला काहीच फरक पडत नाही. जनता माझ्यासोबत आहे. नगरसेवक पद रद्द करणे सोपे नाही. त्याच्यावर मला न्यायालयात सुद्धा जाता येते.

 

भाजपला सभागृहात बोलणारे नगरसेवक नकोच आहेत, असेही साने म्हणाले. तसेच भाजपच्या ज्येष्ठ महिला नगरसेवकांनी 'कडेवर' उचलून घ्या म्हणणे, गैरवर्तन नाही का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

22 Apr 2017
एमपीसी न्यूज - नोटाबंदीच्या अपयशानंतर भ्रष्टाचार, दहशतवाद आणि काळा पैसा यावर भाजप सरकार एका शब्दाने बोलत नाही. यावर देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन नोटाबंदीचा विरोध केला असता, तर देशात अद्भूत आंदोलन झाले असते. मात्र, असे करण्यात  विरोधक अपयशी ठरल्याची खंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात व्यक्त केली. 
 
 
वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने  टिळक स्मारक मंदिरात आयोजित वसंत व्याख्यानमालेत 'निश्चिलनीकरण' या विषयावर ते बोलत होत.  वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक अध्यक्षस्थानी होते.
 
चव्हाण म्हणाले की, नोटाबंदीचे अपयश झाकण्यासाठी भाजप सरकारने आपला मोर्चा डिजिटल व्यवहाराकडे वळविला असून डिजिटल व्यवहारांबाबत सक्ती केली जात आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था कोलमडण्याची भिती निर्माण झाली आहे. कॅशलेश व्यवहारात लोकांचे आधार कार्ड, बँक खाते, एटीएम हॅंक केले जाणार नाहीत, याची शाश्वती भाजप सरकार देणार आहे का? कॅशलेश व्यवहारातही भाजपचा छुपा अजेंडा असल्याचेही म्हणत असे निर्णय घेण्यासाठी कोण भाग पाडायला लावत आहे. असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
22 Apr 2017
टक्केवारीसाठी ठेकेदांराची बिले अडविल्याचा आरोप 
 
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत ऐनवेळचे, वाढीव खर्चाचे विषय आणि ठेकेदारांची बिल अडविण्याच्या प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषन विभाग (सीआयडी) मार्फेत चौकशी करण्याची मागणी, माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे. तसेच ठक्केवारीसाठी ठेकेदांराची बिले अडविल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.  
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत भापकर यांनी पत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, भय, भ्रष्टाचार मुक्त महापालिका आणि पारदर्शक कारभाराची भाजपने घोषणा केल्याने शहरातील जनतेने आपल्या पक्षाला एकहाती सत्ता मिळवून दिली. 
 
सीमा सावळे यांनी स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारताच आपल्याला टक्केवारी माहीतच नसल्याचे सांगितले होते. ऐनवेळचे, वाढीव खर्चाचे विषय स्विकारणार नसल्याचे, जाहीर केले होते. अधिकारी, पदाधिकारी, ठेकेदार आणि सल्लागार यांची साखळी उद्धवस्त करु असेही, त्यांनी सांगितले होते. 
 
पंरतु, स्थायीच्या दुस-याच सभेत त्यांना त्यांच्याच घोषणेचा विसर पडला. बुधवारी (दि.12) झालेल्या स्थायीच्या सभेत प्रधानमंत्री आवाज योजनेसाठी सल्लागार नेमण्याचा सव्वा कोटीच्या ऐनवेळच्या विषय मंजूर केला आहे. तर, याच सभेत स्मार्ट सिटीचा सल्लागार नेमण्याचा 'क्रिसिल' संस्थेचा विषय लांबणीवर टाकण्यात आला होता. या संस्थेमुळे अनेक प्रकल्पांचे नुकसान झाल्याचे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी सांगितले होते. त्यानंतर बुधवारी (दि.19) झालेल्या स्थायी सभेत 'क्रिसिल'ची सल्लागार पदी नेमणूक करण्याच्या 63 लाख 25 हजार रुपयांच्या विषयाला मंजूरी देण्यात आली. तसेच याच सभेत वाढीव खर्चाला देखील मान्यता देण्यात आली आहे. 
 
आर्थिक वर्ष संपल्याचे कारण पुढे करत भाजप पदाधिका-यांच्या सांगण्यावरुन महापालिकेच्या मुख्य लेखापालांनी ठेकेदारांची बिले अडवून ठेवली आहेत. ठेकेदारांची बिले अदा करताना ज्या कामांना रीतसर मंजूरी मिळालेली आहे. जी कामे मंजूर झाली असून पैशांची तरतूद आहे, अशी बिले कुठेही अडविली नाहीत. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेने टक्केवारीसाठी ठेकेदारांची बिले अडविले असल्याचेही, भापकर यांनी पत्रात म्हटले आहे. 
 
ऐनवेळचा विषय व सल्लागार नियुक्ती, वाढीव खर्च आणि ठेकेदारांची बिले अडविण्यामध्ये कोट्यावधीचे गैरव्यवहार, भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सीयडी मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी, भापकर यांनी केली आहे. तसेच यामधील दोषींवर कठोर शिक्षा करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
22 Apr 2017

एमपीसी न्यूज - राज्य सरकारने पेट्रोलवरील व्हॅट प्रतिलीटर तीन रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे साध्या पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. अशी माहिती ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशनचे प्रवेक्ते अली दारुवाला यांनी सांगितले. नवीन दर मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत.

 

दारुवाला म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून 500 मीटर अंतरावर दारू विक्री करण्यास मनाई केली आहे. यामुळे राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. हे नुकसान भरुन काढण्यासाठी पेट्रोलवरील व्हॅट तीन रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

पुण्यामध्ये रात्री बारावाजेपर्यंत साध्या पेट्रोलचे दर 71.57, स्पीड पेट्रोलचा दर 74.03 रुपये इतका होता. तर डिझेलच्या दरामध्ये कोणताही फरक पडलेला नाही. केवळ पेट्रोलवरील व्हॅट वाढल्यामुळे शहरात आजपासून साधे पेट्रोलचे दर 4.78 रुपये तर स्पीड पेट्रोलचे दर 4.77 रुपयांनी वाढले आहेत.

22 Apr 2017
आंदोलनाला परवानगी न दिल्यास 'गनिमी' कावा वापरणार 
 
एमपीसी न्यूज - राज्य सरकारकडून दिलेल्या आश्वसानांची आठवण करुन देण्यासाठी  26 व 27 एप्रिलला होणा-या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या वेळी दोन दिवसांचे उपोषण करणार असल्याचे, माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी सांगितले. तसेच भाजपकडून पोलीस बळाच्या जोरावर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा, आरोपही त्यांनी केला आहे.  
 
आंदोलनाची भूमिका सांगण्यासाठी सर्वपक्षियांनी काल (शुक्रवारी) पत्रकार परिषेदत घेतली. त्यावेळी भापकर बोलत होते. यावेळी  भारिप बहुजन महासंघाचे देवेंद्र तायडे, स्वराज अभियानचे मानव कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे फजल शेख, आनंदा यादव,  एआयएमआयआयचे शब्बीर शेख, आरपीआय कवाडे गटाचे रामदास ताटे, समाजवादी पक्षाचे रफिक कुरेशी, शेतकरी कामगार पक्षाचे हरीश मोरे, नागरी हक्क सुरक्षा समितीचे प्रदीप पवार, भारतीय मायनॉरिटीज सुरक्षा महासंघाचे अमित कांबळे, ओबीसी संघर्ष समितीचे विशाल जाधव आदी विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
शहरातील अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी तत्कालीन विरोधकांनी मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. त्यावेळी विरोधात असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आंदोलकांना सामोरे गेले होते. आमची सत्ता द्या पहिल्याच मंत्रीमंडळाच्या बैठकीत पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सोडविला जाईल, असे त्यांनी सांगितले होते. भाजपची सत्ता येऊन तीन वर्ष झाली. तरीही, अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सुटलेला नाही. उलट शास्तीकराबाबत आंदोलन करणा-या नगरसेवकांना त्यांचे पदाधिकारी निलंबित करत आहेत, असे भापकर म्हणाले.  
 
भाजप सरकारने सत्तेवर येण्याआधी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, शेतक-यांच्या मालाला योग्य हमीभाव देवू, अशी विविध आश्वासने दिले होती. भाजपच्या काळात शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. तरीही सरकार शेतक-यांच्या बाबतीत असंवेदना दाखवत आहे. 
 
राज्यातील शेतक-यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाच्या निर्णयाबाबत स्पष्टता यावी, सरसकट शास्तीकर माफ करण्यात यावा, मराठी, मुस्लिम व धनगर समाजाला आरक्षण मिळावे, शहरातील गोरगरीबांना किमान शासकीय व महापालिकेच्या योजनेअंतर्गत किमान 500 चौरसफुटांची घरे मिळावीत, न्यायालयात जाऊन झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील लाभार्थींना घरांपासून वंचित ठेवण्यास कारणीभूत ठरलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांनी त्याबाबत जाहीर खुलासा करावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे, भापकर यांनी सांगितले.
21 Apr 2017

एमपीसी न्यूज - पक्षाकडून येणारा दबाव आणि जनतेतून होणारी टीका, यामुळे नाईलाजास्तव पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांनी आपल्या शासकीय मोटारीवरील 'लाल' दिवा आज (शुक्रवारी) हटविला आहे.

 

'व्हीव्हीआयपी' संस्कृतीला चाप लावण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने लोकप्रतिनिधींच्या 'लाल', 'अंबर' दिव्यांच्या वाहनांना प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 1 मेपासून लागू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी आपल्या मोटारीवरील दिले हटविले होते. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनीही लगेच दिवा काढला.

 

याबाबत पिंपरीचे महापौर काळजे यांना विचारले असता योग्यवेळी आपण मोटारीवरील दिवा काढू, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. मात्र, मोटारीवरील दिवा हटविण्यासाठी त्यांच्यावर पक्षातून दबाव होता, अशी चर्चा आहे. तसेच जनतेतून टीका होत होती. त्यामुळे महापौर काळजे यांनी शुक्रवारी सायंकाळी कार्यालयातून घरी जाताना आपल्या शासकीय मोटारीवरील 'लाल' दिवा हटविला.

21 Apr 2017

एमपीसी न्यूज - उन्हाळ्यामध्ये परगावी जाणा-या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पुणे स्थानकावरुन उन्हाळ्यासाठी 340 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. या विशेष गाड्या 5 जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 340 गाड्यांमध्ये 239 गाड्या पुणे स्थानकातून सुटणार आहेत तर 101 गाड्या पुणे रेल्वे स्थानकामधून धावणार आहेत.


या विशेष गाड्यांमध्ये पुणे ते जबलपूर, निजामुद्दीन, अजनी, संतरागाची, कामाख्या, नागपूर, मडगांव, पटना, तिरुनवेली, एरनाकुलम तसेच बिलासपूर या ठिकाणांचा समावेश आहे. याशिवाय ज्या गाड्या पुण्यातून जाणार आहेत त्यामध्ये यशवंतपूर-पंढरपूर, यशवंतपूर-जयपूर, चेन्नई-अहमदाबाद, अहमदाबाद-हैद्राबाद या गाड्या पुण्यात थांबणार आहे.


पुणे स्थानकातून सुटणा-या वातानुकुलीत गाड्यांमध्ये निजामुद्दीन, संतरागाची, अजनी आणि अमरावती या गाड्यांचा समावेश आहे. त्याप्रमाणे मुंबई-हैद्राबाद, मुंबई - यशवंतपूर या वातानुकुलीत गाड्या पुण्यातून धावत आहेत. प्रवाशांनी या गाड्यांचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गरज ओळखून सुरू केलेल्या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Page 7 of 93