• 1.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • punenews.jpg
17 May 2017

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नितीन करमाळकर यांची निवड

 
एमपीसी न्यूज  - क्रांती ज्योती सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे शिक्षणासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात. मात्र, त्यांच्या मनामध्ये सध्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून त्या पार्श्वभूमीवर येत्या काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर भर राहील. यावर लक्ष केंद्रित असणार आहे, अशी माहिती नवनियुक्त क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर यांनी माहिती दिली. तसेच उद्या या पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर म्हणाले की, विद्यापीठातून दरवर्षी लाखो विद्यार्थी डिग्री घेऊन बाहेर पडतात. मात्र, त्यांच्याकडे फक्त डिग्री हातामध्ये न राहता त्यांच्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवून देण्यासाठी काम करणार आहे आणि त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर येत्या काळात साडेसहा लाख माजी विद्यार्थीच्या माध्यमातून विद्यापीठाची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांचा कार्यकाळ 15 मे रोजी संपला. त्यानंतर आज डॉ. नितीन करमळकर यांची विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड करण्यात आली.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीमार्फत कुलगुरुपदासाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. कुलगुरुपदासाठी एकूण 90 अर्ज आले होते. त्यांच्या छाननीनंतर एकूण 36 उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी करण्यात आली.

डॉ. नितीन करमाळकर यांच्यासह प्रा. एम. राजीवलोचन, प्रा. भूषण पटवर्धन, प्रा. अंजली क्षीरसागर अशी काही प्रमुख नावे या 36 जणांच्या यादीत पाहायला मिळाली होती.  विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा मान कुणाला मिळतो, याकडे संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले होते.

करमाळकर मागील 25 वर्षांपासून अध्यापनाचे काम करीत आहेत. भूगर्भशास्त्र आणि भूरसायनशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता. विद्यापीठाच्या अनेक समितींवर त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या आज निवडीमुळे विद्यापीठ परिसरातील प्राध्यापक त्यांची भेट घेऊन अभिनंदन करीत होते.

17 May 2017

एमपीसी न्यूज - वारंवार तक्रार देऊन तसेच पुरावे सादर करूनही देहूरोडचे पोलीस निरीक्षक अरुण मोरे यांच्यावर कारवाई होत नसल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते हे उद्यापासून (दि.18) मुंबईत मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहेत.

देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अरुण मोरे यांनी एप्रिलमध्ये देहूरोड किवळे येथील मुकाई चौकातील पंजाबी स्वाद या हॉटेलवर छाप टाकला होता. त्यावेळी त्यांनी हॉटेलमध्ये काम करणा-या कर्मचाऱ्याला मारहाण करून पंचनामा न करता गल्ल्यातील रक्कम काढून घेतली. रक्कम काढत असताना हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये सर्व दृष्य कैद झाले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दोन हजारांच्या नोटा असल्याचे स्पष्ट दिसत आहे. परंतु मोरे यांनी स्टेशन डायरीमध्ये गुन्हा नोंद करताना कमी रक्कम दाखवली. श्रीजीत रमेशन यांनी हॉटेल चालकाकडे याची चौकशी केली. त्यावेळी हॉटेल चालकाने बारा ते तेरा हजार रुपये गल्ल्यामध्ये असल्याचे सांगितले.

याबाबत एमपीसी न्यूजशी बोलताना रमेशन म्हणाले की, मी मोरे यांच्यावर कारवाई होत नाही म्हणून पुणे विधान भवनासमोर ही उपोषण केले होते. यावेळी मला जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी तातडीने सर्व चौकशी अहवाल मागवू, असे सांगितले होते. त्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनाही यांसदर्भात तक्रार केली होती. मात्र, कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे मी उद्यापासून मुंबईत मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार आहे, असे रमेशन यांनी सांगितले.

17 May 2017

एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरणातील मंगळवारी (दि.16) रात्रीपासून बत्ती गुल झाली आहे. ऐन उन्हाळ्यात बत्ती गुल झाल्याने प्राधिकरणातील नागरिक हैराण झाले आहेत. वीजपुरवठाबाबत विद्युत अधिका-यांना विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.

निगडी, प्राधिकरण एलआयजी कॉलनीतील मारुती मंदिराशेजारील विद्युत पुरवठा करणारी केबल जळाली होती. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासून एलआयजी कॉलनी, सिंधूनगर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने प्राधिकरणातील नागिरक मात्र चांगलेच हैराण झाले आहेत. विद्युत विभागाच्या अधिका-यांना याबाबत विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे, नागरिकांचे म्हणणे आहे. 

एलआयजी कॉलनी येथील मारुती मंदीराशेजारील विद्युत पुरवठा करणारी केबल जळाली आहे. केबल कुठे जळाली हे शोधण्यासाठी वेळ लागला. तसेच दोष सापडल्यानंतर खोदाई करण्यासाठी वेळ गेला आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरू होण्यासाठी वेळ लागत आहे. दुरुस्तीचे काम हाती घेतले असून दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होईल, असे विद्युत विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.

17 May 2017

एमपीसी न्यूज - लोकल म्हटल की गर्दी, गर्दी म्हटली वाद हे जणु समिकरणच बनले आहे. पुण्यामध्येही अगदी मुंबईसारखी नाही पण त्रास होईल इतपत गर्दी असतेच. याच गर्दीतून आजही पुणे-लोणवळा या सकाळच्या लोकलमध्ये आजही नेहमीप्रमाणे गर्दी होती. यात एका गृहस्थांचा पाय पायावर पडला त्याचा राग आल्याने गृहस्थांनी जागा अडवली यासा-या रागातून त्याने चक्क हातातील ऊसच त्याच्या डोक्यात घातला. भांडण चागलेच पेटले मात्र या भांडणाचा शेवट गोड होत दोघांनीही चूक कबूल करुन एकमेकांची माफी मागितली.

 

लोकलमध्ये जागेवरुन, दारात अडमुठेपणे उभारण्यावरुन. धक्का-बुक्की, विक्रेते अशा विविध कारणावरुन भांडणे होतात. या भांडणात मारहाण, शिवीगाळ प्रसंगी गाडीतून ढकलून देणे, चावा घेणे, अशी बरीच उदाहरणे आत्तापर्यंत ऐकली आहेत. आजही सकाळी 8.10 लोकलमध्ये अशीच भांडणे झाली. सुरुवात तक्रारीवरुन झाली. तक्रारीचे रुपांतर भांडणात झाले. यावेळी एकाने हातातील ऊस दुस-याच्या डोक्यावर घातला. यामध्ये त्याच्या डोक्याला जखम झाली व त्यातून रक्त आले. ही घटना कासारवाडी ते पिंपरी या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान घडली.

 

भांडण विकोपाला पेटले त्यामुळे दोघांहनीही देहुरोडचे रेल्वे पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर दोघांनीही आपली बाजू मांडली मात्र दोन्ही बाजू ऐकल्यानंतर दोघांनाही आपल्याच चुकांची जाणीव झाली. त्यांनी तेथेच एकमेकांची माफी मागीतली व पोलीस ठाण्यात जाऊनही तक्रार दिली नाही. त्यामुळे भांडण करणे सोपे असते. मात्र स्वतःची चूक कबुल करुन माफी मागणे ही मोठी गोष्ट असते. कारण गर्दी असते धक्का तर लागणारच, शिवाय सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना इतरांचाही विचार व्हायलाच हवा. असा समजुदार पणा प्रत्येकाने दाखवला तर भांडणे होणारच नाहीत.

 

कारण रेल्वेत जागा आडवणे, दारात उभे राहणे या गोष्टी रोज होतात. मात्र त्या उलट एकमेकांना मदत करण्याच्या ही अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या घटनेलाही आपण एक सकारात्मक घटना म्हणून पहायला हरकत नाही. बाकी गर्दी असते, त्रास तर होणारच...थोड समजून घ्या...प्रवास सुखकर होईल....

17 May 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील हिंदुस्तान अॅन्टिबायोटिक्स लिमिटेडसह (एचए) बेंगॉल केमिकल अॅण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेड (बीसीपीएल), इंडियन ड्रग्ज अॅण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेड (आरडीपीएल) या चार औषधानिर्माण सार्वजनिक उपक्रमांच्या अतिरिक्त जमिनींची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. ही अतिरिक्त जमीन केवळ शासकीय संस्थांनाच खरेदी करता येणार आहे. खुल्या स्पर्धात्मक लिलावातून विक्री केली जाणार आहे. एचए कंपनीच्या पिंपरीतील सुमारे 88 एकर जमिनीची विक्री केल्यानंतर आलेल्या रकमेतून सर्व देणी फेडल्यानंतर कंपनीच्या भवितव्याचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

 

औषध उत्पादन श्रेत्रातील स्पर्धेमुळे सार्वजनिक उपक्रमाच्या औषधनिर्माण कंपन्या डबघाईला आल्या आहेत. बंद उत्पादन, कामगारांचे पगार, शासकीय-खासगी देणी यामुळे केंद्र सरकार मेटाकुटील आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने 21 डिसेंबर रोजी घेतलेल्या बैठकीत हिंदुस्तान अॅन्टिबायोटिक्सचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कंपनीकडे असणा-या अतिरिक्त जमिनीची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता.

 

सध्या कंपनीला 821 कोटी रुपयांची देणी आहेत, ती पूर्ण करण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. अनेक दिवसांपासून थकीत असणारे कर्मचा-यांचे पगार देण्यासाठी केंद्र सरकराने 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. जमीनविक्रीची जाहिरात मंगळवारी (दि.16) प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार केंद्र सरकारने ही जमीन विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एमएसटीसी लिमिटेड या सरकारी कंपनीची नियुक्ती केली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत जमीन विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. कंपनीला या जमिनीच्या विक्रीमधून एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळणार आहे.

 

केंद्र सरकारने 21 डिसेंबर रोजी घेतलेल्या बैठकीत हिंदुस्तान अॅन्टिबायोटिक्सचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कंपनीकडे असणा-या अतिरिक्त जमिनीची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या कंपनीला 821 कोटी रुपयांची देणी आहेत, ती पूर्ण करण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. अनेक दिवसांपासूनव थकीत असणारे कर्मचा-यांचे पगार देण्यासाठी केंद्र सरकराने 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला.

 

कंपनीच्या या जमीन लिलाव प्रक्रियेत प्रामुख्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध उपक्रमांना सहभागी होता येणार आहे. प्राप्तिकर विभाग, केंद्रीय उत्पादन शुल्क, पासपोर्ट कार्यालय, म्हाडा आदींना याठिकाणी जमीन घेता येणार आहे.

 


हिंदुस्तान अॅन्टिबायोटिक्सकडे 87.70 एकर अतिरिक्त जमीन आहे. नेहरुनगर आणि अन्य ठिकाणी 62.70 एकर जमीन रिकामी, 25 एकर जमीन हिंदुस्तान अॅन्टिबायोटिक्स कॉलनीत आहे. विविध आकारमानाचे एकूण 17 भूखंड आहेत. जमिनीचे क्षेत्र तीन लाख 54 हजार 906 चौरस मीट आहे. लिलावाची प्रक्रिया पाच महिने 15 दिवस चालणार असून त्यापैकी 90 दिवसांचा अवधी हा जमीन घेणा-यांना रक्कम भरण्यासाठी देण्यात येणार आहे.

17 May 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उद्या (गुरुवारी) चिंचवड येथे मेळावा होणार आहे.

 

चिंचवड, लिंक रोड येथील दर्शन हॉलमध्ये गुरुवारी (दि.18) दुपारी साडेचार वाजता हा मेळावा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. मेळाव्याला पक्षाचे माजी आमदार, माजी महापौर, आजी-माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.

 


राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष संग्राम कोते पाटील युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष व कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या जागी कोते पाटील यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

 

निवडीनंतर कोते पाटील यांनी युवकांचे संघटन करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार त्यांचा राज्यभरात दौरा सुरु आहे. त्यांच्या उपस्थितीत गुरुवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा चिंचवडमध्ये युवक मेळावा पार पडणार आहे. यावेळी कोते पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजी-माजी पदाधिकरी, कार्यकर्त्यांनी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

17 May 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती (दि. 31) रोजी साजरी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने करावयाच्या नियोजनाबाबतची बैठक गुरुवारी (दि.18) घेण्यात येणार असल्याचे, महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.

 

या जयंतीच्या नियोजनाबाबतची बैठक गुरुवारी दुपारी चार वाजता स्थायी समिती सभागृहात होणार आहे. या बैठकीला उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित राहणार आहेत. या नियोजनाकामी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आपली मते मांडावीत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

17 May 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष आणि युवक अध्यक्ष या दोन्ही पदासाठी राष्ट्रवादीमध्ये चूरस निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही दोन्ही पदे रिक्त आहेत. विद्यमान नगरसेविकेलाच महिला शहराध्यक्ष आणि वय वर्ष 28 असलेल्या तरुणाकडेच युवक अध्यक्षपदाची धुरा देण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. मे अखेर या दोन्ही पदांची निवड केली जाणार आहे.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या 15 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. 2017 च्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. त्यानंतर शहरात पक्षसंघटना वाढविण्यासाठी पक्षात मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार केरळ दौ-यावरुन परतले असल्याने लवकरच संघटनेत बदल केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तत्कालीन शहराध्यक्षा सुजाता पालांडे यांनी महापालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती घेतला. तेव्हापासून महिला शहराध्यक्ष पद रिक्त आहे.

 

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ पंधरा दिवसातून एकदा पिंपरी-चिंचवड शहरात येवून महिला संघटनेची आढावा बैठक घेत आहेत. महिला संघटनेच्या कामाचा आढावा घेत आहे. महिलांचे संघटन करण्यावर राष्ट्रवादीने भर दिला आहे. महिला शहराध्यक्षपदी विद्यमान नगरसेविकाच असावी, अशी महिला कार्यकर्तींची मागणी आहे. शहराध्यक्ष पदासाठी माजी महापौर व विद्यमान नगरसेविका मंगला कदम, डॉ. वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, वैशाली काळभोर, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती अनुराधा गोफणे यांची नावे चर्चेत आहेत.

 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे. नगरसेवक मयुर कलाटे यांच्यानंतर युवक अध्यक्षाची निवडच पक्षाने केली नाही. संघटना बांधणीसाठी युवक अध्यक्षाची निवड करण्याची मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे.

 

28 ते 30 वयोगटातील तरुणच युवकचा अध्यक्ष असला पाहिजे, असा पक्षाचा नियम आहे. युवक अध्यक्षपदासाठी विशाल वाकडकर, संतोष कवडे आणि निलेश काटे यांची नावे चर्चेत आहे. पक्ष संघटना वाढविण्यासाठी लवकरात लवकर सगळ्या निवडी करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. महिला, युवक अध्यक्षांसोबतच ओबीसी, अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षांचीही निवड केली जाणार आहे.राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष आणि युवक अध्यक्षाची मे अखेर निवड केली जाणार आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी सांगितले

17 May 2017

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र सरकारने महसूल वाढवण्यासाठी इंधनावरील सरचार्ज एक रुपयांनी वाढवला आहे. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये दोन रुपयांनी घट झाली असली तरी, महाराष्ट्रात प्रत्यक्षात फक्त 1 रुपयांचीच घट झाली आहे.

 

सोमवारी रात्री तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर 2 रुपये 16 पैशांची तर डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 2 रुपये 10 पैशांनी कमी केल्या होत्या. त्यानंतर राज्यसरकारने मंगळवारी (दि. 16) रात्री इंधनावर एक रुपया सरचार्ज वाढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीही सुरु केली. त्यामुळे महाराष्ट्रात केवळ एकच रुपयांनी इंधनाच्या दरात धट झाली आहे.

 

1 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत किंचित वाढ करण्यात आली होती. त्यावेळी पेट्रोलच्या किंमतीत 1 पैसा तर डिझेलच्या किंमतीत 44 पैशांची वाढ करण्यात आली होती. 16 एप्रिल रोजी पेट्रोलच्या किंमतीत 1 रुपये 39 पैसे प्रती लीटर तर डिझेलच्या किंमतीत 1 रूपया 4 पैशांची वाढ झाली होती.

16 May 2017

अलंकापुरीत 16 जूनला हरिनाम गजरात स्वागत प्रवेश 
      

एमपीसी न्यूज - संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी  सोहळ्यासाठी श्रींचे अश्वांचे वैभवी प्रस्थान अंकलीतील राजवाड्यातून 6 जूनला होणार असल्याची माहिती अश्वसेवेचे मानकरी श्रीमंत सरदार महादजीराजे शितोळे सरकार (अंकलीकर) यांनी दिली.

अंकली गावातील राजवाड्यातून श्रींचे अश्वांचे हरीनाम गजरात प्रस्थान सव्वानऊच्या सुमारास झाल्यानंतर अंकलीत नगर प्रदक्षिणा होणार आहे. प्रदक्षिणा झाल्यानंतर मांजरीवाडी, कागवाड मार्गे पहिल्या मुक्कामासाठी म्हैसाळ (दि.6) येथे अश्व विसावणार आहेत. त्यानंतर सांगली मार्गे सांगलवाडी राम मंदिर येथे (दि.7 ) मुक्काम होईल. तुंग, कारंदवाडी मार्गे मिरज वाडीतुन अश्व पेठनाका मळ्यात (दि.8) मुक्कामी रहाणार आहेत. पेठनाका मळ्यातून नेर्ले वहागावला (दि.9 )मुक्काम होईल. भरतगाव (दि.10), भुईंज (दि.11), सारोळा (दि.12), शिंदेवाडी (दि.13), त्यानंतर श्रींचे अश्व कात्रज मार्गे प्रवास करून पुण्य नगरीत दोन दिवसांचे मुक्कामासाठी (दि.14 व 15 ) पाहुणचारासह थांबणार आहेत. पुण्यात सरदार रस्ते वाड्यात अश्वांचा दोन दिवस मुक्काम होणार आहे.


पुण्य नगरीतील दोन दिवसांचा पाहुणचार घेत श्रींचे अश्व वैभवी पालखी सोहळ्याचे प्रस्थानसाठी अलंकापुरीकडे मार्गस्थ होऊन (दि.16) हरीनाम गजरात येतील.येथील  वेशीवर श्रींचे अश्वांचे आळंदी देवस्थान आणि सोहळ्यातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रीकृष्ण मंदिरात विसावा घेत आळंदीत स्वागत होईल.तत्पूर्वी पुणे आळंदी मार्गावरील श्रीकृष्ण मंदिरात (बिडकर वाडा) सरदार हरप्रीतसिंह बिडकर,उमेश बिडकर परीवाराचे वतीने स्वागत होणार आहे.अंकली ते आळंदीत या दरम्यान ११ दिवसांच्या प्रवासानंतर श्रींचे अश्व आळंदी मंदिरात पूजा,दर्शन,स्वागत झाल्यानंतर येथील फुलवाले धर्मशाळेत मुक्कामी राहणार आहेत.श्री.ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे वतीने आळंदीत पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर पवार,राजेंद्र आरफळकर पवार आळंदी देवस्थानच्या वतीने अश्वांचे आगमन झाल्यानंतर परंपरांचे पालन करीत स्वागत होईल.  


श्रीचे अश्वांचे प्रवास नियोजन श्रीमंत सरदार उर्जितसिंह शितोळे सरकार (अंकलीकर) यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.अश्व चालक व व्यवस्थापक म्हणून तुकाराम कोळी प्रवासात काम पाहणार असल्याचे श्रीमंत सरदार महादजीराजे शितोळे सरकार(अंकलीकर) यांनी सांगितले.वारकरी भाविक आणि टाळकरी,पखवाज वादक साधक सेवकांनी आपापले साहित्य घेऊन सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. श्रींचे अश्वांचे प्रस्थांसाठी अंकलीकर राजवाड्यासह ग्रामस्थ,वारकरी भाविकांतून अंकलीत तयारीसाठी लगबग सुरु झाली आहे.

Page 8 of 127
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start