21 Apr 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवक पतसंस्थेचे संचालक भूषण शंकरराव गावडे (वय-33) यांचे मंगळवार (दि.18) रोजी दुपारी साडेचार वाजता अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची आई, भाऊ, भाऊजई असा परिवार आहे.

 

भूषण गावडे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चिंचवड विभागीय करसंकलन विभागात लिपीक या पदावर कार्यरत होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे प्रथम अध्यक्ष स्व. शंकरराव गावडे यांचे ते चिरंजीव होते. त्यांच्यावर मोरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

21 Apr 2017

एमपीसी न्यूज - पोलीस आयुक्ताच्या कार्यालयातील एका झाडावर आज (शुक्रवारी) सकाळी 9.30 च्या सुमारास नायलॉन मांज्यात अडकलेल्या घारीचे प्राण पक्षीप्रेमींनी वाचविले. या घारीचे पंख आणि पाय नायलॉन मांज्यात अडकले होते. यातून सुटका केलेल्या  या पक्षावर उपचार केल्यानंतर त्याला परत निसर्गात सोडण्यात येणार आहे.

 

पुणे पोलीस आयुक्तालयातील एका कर्मचा-याला ही पक्षी आढळला. त्यानंतर त्यांनी तत्काळ याची माहिती 100 नंबरवर दिली. त्यानंतर मंगलवार पेठेतील पक्षीप्रेमी अरविंद साळवे आणि ओमकार साळवे यांनी घटनास्थळी धाव घेत सदर पक्षाची सुटका केली.

 

त्या पक्षावर कोरेगाव पार्क येथे उपचार सुरू आहेत. उपचारानंतर त्याला परत निसर्गात सोडण्यात येणार आहे अशी माहिती पक्षीप्रेमी साळवे यांनी दिली. शहरात कुठेही अशाप्रकारे पक्षी आढळल्यास 9326992347 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अरविंद साळवे यांनी केले.

21 Apr 2017

तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बँकेच्या महाराष्ट्रातील चालक ते मालक घोटाळ्याच्या पुण्यातील तपासणीसाठी आलेल्या सक्तवसुली संचालनालय (ईडी)च्या अधिका-याला डांबून ठेऊन मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार सोमवार (दि.10) रोजी सोमाटे फाटा येथील सिद्धीवीनायक लॉजीस्टीक येथे दुपारी अडीच ते रात्री आठच्या सुमारास घडला. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेशकुमार योगेश गांधी (वय-34, रा. वडाळा, मुंबई ईस्ट) असे मारहाण करण्यात आलेल्या अधिका-याचे नाव असून त्यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गुजरातमधील 'चालक ते मालक' या योजने अंतर्गत एका लॉजिस्टेक्स कंपनीला 658 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. यामध्ये बँकेची फसवणूक करण्यात आली असल्याचे तपास उघडकीस आले होते. याप्रकरणी गुजरातमधून मुख्य सुत्रधाराला अटक करण्यात आली आहे. उमेशकुमार गांधी हे मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात कार्यरत आहेत. या घोटाळ्या प्रकरणी सोमाटणे फाटा येथील सिद्धीवीनायक लॉजीस्टीकच्या मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.

सोमवारी (दि.10) रोजी त्यांना सोमाटणे फाटा येथील सिद्धिवीनायक लॉजिस्टिक्स मधील मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. गांधी दुपारी अडीच्या सुमारास सिद्धिवीनायक लॉजिस्टेक्स या ठिकाणी आले होते. त्यावेळी त्यांनी सोसायटीचे सुपरवायझर दत्ता काकडे यांच्याकडे 16 ए डी आणि सी या मालमत्ते बाबत चौकशी केली. दत्ता काकडे याने या ठिकाणी अशी कोणतीच मालमत्ता नसल्याचे सांगून त्यांना दुस-या ठिकाणी घेऊन गेला.

त्याठिकाणी गांधी यांना चौकशी करण्यासाठी सांगितलेल्या मालमत्ता मिळाली. त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला असता त्यांना आतमध्ये असलेल्या एका पुरुषाने घरात येण्यास सांगितले. गांधी यांनी आपण ईडी कडून आलो असल्याचे सांगून मालमत्तेची कागदपत्रे मागीतली. परंतु उपस्थित इसमाने त्यांना तू खोटा अधिकारी असल्याचे सांगून त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली.

तसेच त्यांना फरशीवर बसवून लाकडी दांडक्याने मारहाण केली. या इसमाने फोन करुन आणखी तीन जणांना बोलावून घेतले. त्यांनी देखील गांधी यांना मारहाण केली. रात्री आठच्या सुमारास गांधी यांनी तेथून आपली सुटाक करुन घडलेला प्रकार आपल्या वरिष्ठांना सांगितला. वरिष्ठांच्या सांगण्यावरुन गांधी यांनी पाच जणा विरुद्ध तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तळेगाव पोलीस तपास करीत आहेत.

21 Apr 2017
महसूली खर्चात वार्षिक दोन कोटींची होणार वाढ
सर्वसाधारण सभेची मंजुरी
 
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या फेररचना प्रस्तावाला विरोध करत सत्तारुढ भाजपने क्षेत्रीय कार्यालयांची संख्या आठ केली आहे. त्यासाठी लोकसंख्येचे कारण पुढे केले आहे. नव्या दोन क्षेत्रीय कार्यालयामुळे भाजपच्या नगरसेवकांची राजकीय सोय होणार असली तरी महापालिकेच्या सेवकखर्चात, महसूली खर्चात वार्षिक दोन कोटी रुपयांची वाढ होणार आहे.
 
महापालिका प्रशासकीय कामकाजासाठी 1997 मध्ये चार क्षेत्रीय कार्यालयांची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर तत्कालिन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी कामकाजाच्या विकेंद्रीकरणासाठी आणखी दोन क्षेत्रीय  कार्यालयांची निर्मिती केली. गेल्या पाच वर्षांपासून महापालिका मुख्यालय आणि सहा क्षेत्रीय कार्यालयांतून प्रशासनाचा गाडा चालविला जातो.
 
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक बहुसदस्यीय प्रभागपद्धतीने नुकतीच झाली. त्यानुसार 32 निवडणूक प्रभाग झाले. या प्रभाग रचनेमुळे सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत मोठे बदल झाले. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा येऊ नये, नागरी सुविधा पुरविणे सोयीचे व्हावे यासाठी आयुक्त दिनेश वाघमारे यांनी क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना करण्याचे ठरविले. त्याबाबतचा प्रस्ताव गुरूवारी झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला.
 
त्यावेळी भाजपने आठ क्षेत्रीय कार्यालये स्थापन करण्याची उपसूचना मांडत विनाचर्चा मंजूरी दिली.
 
आठ क्षेत्रीय कार्यालयांची रचना!

'अ' क्षेत्रीय कार्यालय, भेळ चौक, प्राधिकरण निगडी

1) प्रभाग क्रमांक 10 (संभाजीनगर),  2) प्रभाग क्रमांक 14 (मोहननगर, आकुर्डी ),  3) प्रभाग क्रमांक 15 (प्राधिकरण),  4) प्रभाग क्रमांक 19 (आनंदनगर, भाटनगर)
 
'ब' क्षेत्रीय कार्यालय,  एल्प्रो कंपनी आवार, चिंचवडगाव  
1) प्रभाग क्रमांक 16 (रावेत),   2) प्रभाग क्रमांक 17 (बिजलीनगर, चिंचवडेनगर),   3) प्रभाग क्रमांक 18 (चिंचवड),  4) प्रभाग क्रमांक 22 (काळेवाडी)
 
'क' क्षेत्रीय कार्यालय, हॉकी स्टेडीयमजवळ, नेहरुनगर       
 1) प्रभाग क्रमांक 2  (बो-हाडेवाडी),   2) प्रभाग क्रमांक 6  (धावडेवस्ती),  3) प्रभाग क्रमांक 8  (इंद्रायणीनगर),  4) प्रभाग क्रमांक 9 (नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा)
 
'ड' क्षेत्रीय कार्यालय,  औंध - रावेत रस्ता,   रहाटणी     
 1) प्रभाग क्रमांक 25 (वाकड), 2) प्रभाग क्रमांक 26 (पिंपळे निलख),  3) प्रभाग क्रमांक 28 (पिंपळे सौदागर),   4) प्रभाग क्रमांक 29 (पिंपळे गुरव)
 
'इ' क्षेत्रीय कार्यालय,  पांजरपोळ समोर,  पुणे - नाशिक रस्ता 
 1) प्रभाग क्रमांक 3 (च-होली),   2) प्रभाग क्रमांक 4 (दिघी),  3) प्रभाग क्रमांक 5 (गवळीनगर),  4) प्रभाग क्रमांक 7 (भोसरी)
 
'फ' क्षेत्रीय कार्यालय, प्राधिकरण जुनी इमारत,  निगडी      
 1) प्रभाग क्रमांक 1 (चिखली),  2) प्रभाग क्रमांक 11 (कृष्णानगर),  3) प्रभाग क्रमांक 12 (तळवडे - रुपीनगर),   4) प्रभाग क्रमांक 13 (यमुनागनर, सेक्टर क्रमांक 22)
 
'ग' क्षेत्रीय कार्यालय,  करसंकलन कार्यालय,  थेरगाव गावठाण   
 1) प्रभाग क्रमांक 21 (पिंपरीगाव),  2) प्रभाग क्रमांक 23 (थेरगाव), 3) प्रभाग क्रमांक 24 (गणेशनगर), 4) प्रभाग क्रमांक 27 (रहाटणी)
 
'ह' क्षेत्रीय कार्यालय,   करसंकलन इमारत,  सांगवी       
 1) प्रभाग क्रमांक 20 (संत तुकारामनगर - कासारवाडी), 2) प्रभाग क्रमांक 30 (दापोडी - फुगेवाडी - कासारवाडी),  3) प्रभाग क्रमांक 31 (नवी सांगवी),   4) प्रभाग क्रमांक 32 (सांगवी)
 
 
21 Apr 2017

सूडबुद्धीने  पोलीसात तक्रार केल्याचा डॉ . इनामदार यांचा आरोप

एमपीसी न्यूज - जावेद सय्यद यांना मारहाण प्रकरणात  मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष डॉ . पी . ए . इनामदार यांना 1 महिन्याची साधी कैद आणि १ हजार दंड सुनावल्याच्या निकालाला 20 एप्रिल रोजीच स्थगिती दिली गेली आणि जामीन मंजूर करण्यात आला. असे डॉ.पी.ए.इनामदार यांच्यावतीने सांगण्यात आले.  तसेच 'जावेद सय्यद  यांनी सूडबुद्धीने  पोलीसात तक्रार केल्याचा आरोप डॉ . इनामदार यांनी केला.

 

जावेद सय्यद यांनी मुस्लिम बँकेचे कर्ज परतफेड न केल्याने ती कायदेशीर प्रक्रियेने लिलावात विकली गेली होती ,त्याचा राग येऊन त्यांनी मारहाणीची खोटी फिर्याद पोलिसात दाखल केली होती . दबावाखाली ही फिर्याद दाखल करण्यात आली होती . ही फिर्याद सूडबुद्धीने करण्यात आली होती.

 

बँकेच्या थकीत कर्ज प्रकरणी वसुलीची नियमानुसार कायदेशीर कारवाई करावीच लागते . तशीच कारवाई केली होती . या प्रकरणी कॅन्टोन्मेंट न्यायालयाच्या निकालाला स्थगिती मिळाली आहे आणि जामीनही मंजूर झाला आहे . कैद आणि दंडाच्या निकालाविरुद्ध जिल्हा आणि सत्र न्यायालयात आम्ही अपील करू 'असे डॉ . पी ए इनामदार यांनी म्हटले आहे .

21 Apr 2017
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांनाही आता बायोमेट्रिक हजेरी द्यावी लागणार आहे. सर्वसाधारण सभा आणि विषय सभांना आल्यानंतर सभेत प्रवेश करताना आणि बाहेर जाताना नगरसवेकांचे बायोमेट्रीक पद्धतीने थम्ब इंप्रेशन व फेसरीडिंग घेतले जाणार आहे.
 
या बाबतच्या प्रस्तावाला गुरुवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली. महापौर नितीन काळजे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच पुढील सर्वसाधारण सभेपासून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.
 
पिंपरी पालिकेत पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपने सर्वपक्षिय नगरसेवकांना शिस्त लावण्याचा निर्णय घेतला. सर्वसाधारण सभांना हजर राहणा-या नगरसेवकांची बायोमेट्रीक पद्धतीने थम्ब इंप्रेशन आणि फेस रीडिंग घेण्याचे निश्चित केले. त्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त दिनेश वाघमारे यांनी तयार करुन सर्वसाधारण सभेसमोर ठेवला होता.
 
विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले, बायोमेट्रीक पद्धत राबविण्यास आमचा विरोध नाही. पालिकेच्या कारभारात पारदर्शकता सगळ्यांनाच हवी आहे. प्रचलित पद्धत बंद करा. बायोमेट्रीकबाबत घाई न करता, नगरसेवकांच्या शंकाचे निराकरण करण्याची मागणी त्यांनी केली.
 
सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, अनेक नगरसेवक सभेला हजर न राहता स्वाक्ष-या करत होते. त्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे. नगरसेवकांना शिस्त लागली पाहिजे, यासाठी हा  निर्णय घेतला आहे.
 
त्यानंतर महापौर काळजे यांनी हा विषय मंजूर केला. तसेच पुढील सर्वसाधारण सभेपासून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
20 Apr 2017

एमपीसी न्यूज - किवळे, रावेत, मामुर्डी, साईनगर आणि वाल्हेकरवाडी या परिसरातील कचरा गेल्या काही दिवसांपासून उचलला जात नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांनी आज (गुरुवारी) महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कचरा फेको आंदोलन केले.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेची आज सर्वसाधारण सभा होती. त्यासाठी सर्व नगरसेवक महापालिकेत आले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वार्ड क्रमांक 16 मधील किवळे, रावेत, मामुर्डी, साईनगर आणि वाल्हेकरवाडी या परिसरातील कचरा गेल्या काही दिवसांपासून उचलला गेला नाही.

 

प्रभागातील कचरा उचलणा-या घंटागाड्या नादुरुस्त आहेत. जागोजागी साचलेल्या कच-याच्या ढिगांमुळे दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

 

नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरणा-या कच-याचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही तर अधिका-यांच्या कार्यालयात कचरा टाकण्यात येईल. तसेच अधिका-यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशाराही, नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांनी दिला आहे.

 

महापालिका प्रशासनाला या गंभीर प्रश्नांची जाणीव व्हावी, यासाठी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कचरा फेकून आंदोलन करण्यात आले. यापुढे प्रशासनाने लक्ष न दिल्यास अधिका-यांच्या कार्यालयात कचरा टाकू, असा इशारा माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांनी दिला आहे.

20 Apr 2017

सोनेरी स्मृतींना उजाळा देत आठव्या राजा परांजपे महोत्सवाची सांगता


एमपीसी न्यूज - ज्येष्ठ अभिनेता मोहन जोशी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करत आठव्या राजा परांजपे महोत्सवाची सांगता झाली. 20 एप्रिलला राजा परांजपे यांच्या 107 व्या जयंतीच्या मुहूर्तावर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते जोशी यांना जीवनगौरव प्रदान करण्यात आला. त्यानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मोहन जोशी यांची मुलाखत घेतली. 

 

यावेळी मोहन जोशी, मुक्ता टिळक, प्रवीण तरडे यांच्यासह मोहर ग्रुपचे भरत देसडला, राजा परांजपे प्रतिष्ठानचे ट्रस्टी अर्चना राणे, अजय राणे व राजा परांजपेंच्या कन्या नीला कुरूलकर हे उपस्थित होते.  


जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर मोहन जोशी म्हणाले, इतक्या मोठ्या माणसाच्या नावाने सन्मान स्वीकारताना अंगावर शहारा आला. राजा परांजपे हे खऱ्या अर्थाने ग्रेट होते. त्यांना संगीताचेही उत्तम ज्ञान होते. ज्यूनिअर आर्टिस्ट म्हणून काम करत करत आपल्या चिकाटीच्या बळावर ते एक महान दिग्दर्शक बनले. असा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी कौतुकास्पद बाब आहे.


एक उत्तम व दिग्गज कलाकाराच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार तितक्याच ताकदीच्या व्यक्तीला दिला जात आहे. लहानपणी राजा परांजपेंचे चित्रपट मी आवर्जून बघायचे. त्यांनी आपला काळ खऱ्या अर्थाने गाजवला, असे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या.


भरत देसडला यावेळी बोलताना म्हणाले की राजा परांजपे यांनी चित्रपटसृष्टीवर 40 वर्षे राज्य केले. ब्लॅक अॅन्ड व्हाईटच्या जमान्यातही त्यांनी पडद्यावर सात रंग भरण्याचे काम केले. राजा परांजपे महोत्सवाचे उद्घाटन डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.14) झाले होते. त्यावेळी आशुतोष गोवारीकर, मेधा मांजरेकर, महेश काळे व जितेंद्र जोशी यांना राजा परांजपे सन्मान देण्यात आला होता. यावेळी आगाशे यांच्यासह इतर मान्यवरांनी राजाभाऊंच्या आठवणींना उजाळा दिला होता.


राजा परांजपे यांच्या सोनेरी स्मृती मराठी मनात वर्षानुवर्षे टिकून आहेत. त्यांचा कार्याचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. 14 ते 20 एप्रिल असा एक आठवडाभर चित्रपट रसिकांना राजा परांजपे दिग्दर्शित लाखाची गोष्ट, हा माझा मार्ग एकला, पेडगावचे शहाणे, ऊन पाऊस, गंगेत घोडं न्हालं, पुढचं पाउल व जगाच्या पाठीवर हे गाजलेले चित्रपट दाखवण्यात आले. याचसोबत इतर चित्रपट, नाटके  व कार्यक्रमांचा आस्वाददेखील रसिकांनी घेतला.

20 Apr 2017
एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये 120 महिलांची तपासणी करण्यात आली. 
 
मावळ, येथील बेबडे ओव्हळ येथे नुकत्याच झालेल्या शिबिराचे उद्‌घाटन जिल्हा प्रांतपाल रो. गौरी शिकरपूर  यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, निगडी रोटरी कल्बच्या अध्यक्षा डॉ. शुभांगी कोठारी आदी उपस्थित होते. 
 
महिला दिनाचे औचित्य साधून मावळातील बेबडे ओव्हळ येथे रोटरी कल्ब ऑफ निगडीच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 120 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये डॉ. मनिषा हराळे, डॉ. सुहास रन्ना, डॉ. माधवी माटे यांनी प्रत्येक महिलेची वजन, उंची, शुगर, रक्तदाब, हिमोग्लोबीनची तपासणी केली. तसेच  ईसीजी तपासणी देखील करण्यात आली. कर्करोग तज्ज्ञ डॉ. राकेश नेवे यांनी विविध आजारांबाबत माहिती दिली. 
 
यावेळी बोलताना रो. गौरी शिकरपूर म्हणाल्या, सततच्या व्यापातून महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे ब-याचदा एखादा विकार बळावल्यानंतरच त्या हॉस्पिटलमध्ये जातात. त्यामुळे कोणताही विकार होण्यापूर्वी तो होऊच नये, याची खबरदारी महिलांना येत्या काळात घ्यावी लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर महिलांनी स्वतःची आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि योग्य वेळी आहार व विविध पथ्यांविषयी त्यांना जाणीव व्हावी, या उद्देशाने हे शिबिर झाले. रविवारी असूनही डॉक्टर काम करत आहेत, हे कौतुकास्पद आहे. तसेच डॉक्टरांनी आरोग्य शिबिर यशस्वी केले. 
20 Apr 2017

सत्ताधारी-विरोधक आमने सामने

 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सत्ताधारी विरोधक एकमेकांना भिडले. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले. तसेच महापौरांना सुरक्षारक्षाकांच्या गराड्यात त्यांच्या दालनात नेण्यात आले. या गोंधळामुळे भाजपच्या सत्तेनंतरची पालिकेची पहिलीच सभा सर्वांच्याच लक्षात राहणार आहे.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेची आज (गुरुवारी) सर्वसाधरण सभा पार पडली. 100 टक्के शास्तीकर माफ करण्याच्या मुद्यावरुन गोंधळ घातल्याच्या ठपका ठेवत भाजपने विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, दत्ता साने, मयुर कलाटे यांना तीन सर्वसाधारण सभेसाठी निलंबित केले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. 

 

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी सुरू केल्यावर सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी देखील घोषणा देण्यास सुरुवात केली. सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक तर आकांड-तांडव करत होते. त्यामुळे सभागृहात गोंधळाची परस्थिती निर्माण झाली. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार एकदम गोंधाळले होते. कोण विषयाचे वाचन करत होते. तर, काही अनुमोदन देत होते. कोणाचा कोणाला ताळमेळ नव्हता.

 

निलंबनानंतर सभागृहाच्या प्रवेशद्वारासमोर बसून राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेचे नगरसेवक भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. सभा संपल्यानंतर महापौर त्यांच्या कार्यालयात जात असताना राष्ट्रवादीने महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी केली. महापौरांना सुरक्षारक्षकांच्या गराड्यात त्यांच्या दालनात नेण्याची वेळ सत्ताधारी नगरसेवकांवर आली.

 

पोर्चमध्ये राष्ट्रवादी - भाजपचे नगरसेवक एकमेकांच्या विरोधात घोषणा देत थांबले होते. त्यामुळे पालिकेत तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर भाजपचे नगरसेवक महापौरांच्या दालनात गेले. त्यांच्या पाठीमागे राष्ट्रवादीचेही नगरसेवक घोषणा देत, महापौरांच्या दालनासमोर गेले. सुरक्षारक्षकांनी त्यांना कार्यालयात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.

 

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात जाऊन निलंबन केल्याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तिथेही राष्ट्रवादीच्या मंगला कदम, वैशाली घोडेकर आणि भाजपच्या सीमा सावळे, आशा शेंडगे यांच्यात चांगलीच जुंपली होती. 

 

वास्तविक पाहता सत्ताधा-यांवर सभागृहाचे काम करण्याची जबाबदारी असते. विरोधकांना सोबत घेऊन काम करण्याचे त्यांचे कर्तव्य आहे. परंतु, सत्ताधारी भाजपचेच नगरसेवक सभागृहात गोंधळ घालत होते. सभागृहात घोषणाबाजी करत होते. सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार तर पुरते गोंधळले होते.

 

राष्ट्रवादीकडे अनेक अनुभवी नगरसेवक आहेत. भाजपला ते नियमात पकडण्याचा, त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करणारच, सत्ताधा-यांपुढे त्यांचे डावपेच हाणून पाडण्याचे मोठे आव्हान असणार आहे. विरोधकांचे डावपेच हानून पाडत त्यांना सोबत घेऊन सत्ताधा-यांना कामकाज करावे लागणार आहे. आजच्या सगळ्या परिस्थितीमध्ये सत्ताधा-यांवर विरोधकच भारी ठरले असेच म्हणावे लागेल.

Page 9 of 93