• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
03 May 2017

भीमशाही युवा संघटनेचा प्रशासनाला इशारा


एमपीसी न्यूज - खराळवाडी येथील सुहास हळदणकर खून प्रकरणात नगरसेवक सदगुरू कदम व अन्य तिघा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर गुन्हे चुकीच्या व्यक्तींवर दाखल करण्यात आले असल्याने 'चोर सोडून सन्याशाला फाशी' अशा प्रकारचा कायदा प्रशासनाने चालविला आहे.


ख-या आरोपींना अटक करून खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांना सोडण्यासाठी भीमशाही युवा संघटनेच्या वतीने मागील तीन दिवसांपासून उपोषण अस्त्र उपसण्यात आले आहे. तीन दिवस झाले तरी अद्यापही प्रशासनाने प्रकरणाची दखल घेतली नसून यापुढेही प्रशासनाने जर याबाबत डोळेझाकपणा केला तर संघटनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात येईल, अशी माहिती भीमशाही युवा संघटनेचे कमलेश वाळके यांनी पत्रकाद्वारे दिली.


युधान फाऊंडेशन, आदर्श मित्र मंडळ, खराळ आई ज्येष्ठ नागरिक संघ, कोकण महासंघ पुणे, पिंपरी-चिंचवड, जयभीम सेवा संघ, निल ऑटो प्रा. लि. चाकण, धम्मानंद प्रतिष्ठान, भारतीय बौद्ध महासंघ आदी संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. रास्ता रोको करण्याबाबत उपोषणस्थळी बैठक घेण्यात आली. अजय पाताडे, एकनाथ कदम, विजय कदम आदी बैठकीस उपस्थित होते.

03 May 2017

एमपीसी न्यूज - 'स्मार्ट सिटी'त समावेश झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संकेतस्थळ गेल्या अनेक दिवसांपासून अपडेट झाले नाही. त्यामुळे करदात्या नागरिकांना महापालिकेमार्फत होत असलेल्या कामांची माहिती मिळत नसून नागरिकांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. महापालिकेचे संकेतस्थळ लवकरात लवकर अपडेट करण्याची मागणी होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संकेतस्थळावर क्षेत्रीय कार्यालयनिहाय विविध विकासकामांचे दिलेले आदेश, करारनामे मागील वर्षीचे आहेत. परंतु, चालू वर्षाचे नाहीत. त्यामुळे शहरातील करदात्या नागरिकांना विकासकामांची माहिती मिळत नाही. तसेच महापालिकेच्या संकेतस्थळाचा उद्देशही सफल होत नाही.तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या कार्यकाळात महापालिकेचे संकेतस्थळ दररोज अपडेट होत होते. कामाचे आदेश, काम करणा-या ठेकेदाराची संपूर्ण माहिती दिली जात होती. त्यामुळे सामान्य जनतेला घरबसल्या महापालिकेत होत असलेल्या विविध घडामोडी व कामांची माहिती समजत होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून पालिकेचे संकेतस्थळ अपडेट होत नसल्याने करदात्या नागरिकांना माहिती मिळणे कठीण झाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचा केंद्र सरकारच्या बहुचर्चित स्मार्ट सिटी या योजनेत समावेश झाला आहे. परंतु, या स्मार्ट सिटीतील महापालिकेचे संकेतस्थळ ऑफलाइन आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संकेतस्थळ अपडेट झाले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे.महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पदभार स्वीकारताच गतीमान आणि कार्यक्षम प्रशासनावर भर देणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. परंतु, महापालिकेचे संकेतस्थळच अपडेट होत नसेल तर आयुक्त साहेब गतीमान प्रशासनावर कसा भर देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

03 May 2017

एमपीसी न्यूज - राजेंद्र कोरे हे केवळ वास्तूविशारद नाहीत तर ते लेखक, कवी, निवेदक, व्याख्याते असे अष्टपैलू व्यक्तीमत्व आहे. यांचे लिखाण वाचताच लक्षात येते की, ते किती हळव्या मनाचे लेखक आहेत, असे मत पिंपरी महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी व्यक्त केले.

 


राजेंद्र कोरे यांच्या 'पिठलं भाकर' व 'पत्रास कारण की' या पुस्तकांचा प्रकाशन सेहळा काल (दि.2 मे) निगडी येथील मनोहर वाढोकर सभागृहात पार पडला यावेळी ते बोलतहोते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव चाळक, भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष मनोहर भिसे, नगरसेविका सुमन पवळे, नगरसेवक केशव घोळवे, नटराज कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश स्वामी, एस.एम.जोशी विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकुमार साखरे, मराठवाडा युवा मंचचेअध्यक्ष सत्यजीत चौधरी, संवेदना प्रकाशनचे प्रकाशक नितीन हिरवे आदी उपस्थित होते.

 


'पिठलं भाकर' या काव्यसंग्रहाच्या दुस-या आवृत्त्तीचे लातूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यकारीणी सदस्य रामचंद्र तिरुके यांच्या हस्तेप्रकाशन झाले तर 'पत्रास कारण की' या पत्रसंग्रहाच्या पहिल्या आवृत्तीचे पाटबंधारे विभागाचे निवृत्त अधिक्षक अभियंता महादेव पाणदारे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यातआले.

 


यावेळी पवार म्हणाले की, राजेंद्र कोरे यांचे वास्तू निर्मीतीचे काम तर कौतुकास्पद आहेच पण त्यांचे लेखनही वाखाणण्या जोगे आहे. त्यांनी आत्तापर्यंत 200 मंदिरांचीविनामुल्य उभारणी केली त्या प्रमाणेच त्यांच्या पुस्तकांच्याही भविष्यात शंभर आवृत्ती निघोत हीच सदिच्छा , असे मत त्यांनी व्यक्त केले.
राजेंद्र कोरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, हा सोहळा पुस्तक प्रकाशना पेक्षा माझ्यासाठी मोठा कृतज्ञता सोहळा आहे. मी मराठवाड्याचा जरीअसलो तर मला भाकरं निगडीने दिली, तर जगण्याचे तत्व पवना माईने दिले. त्यामुळे मी मुळचा लातूरचा असलो तरी आज मी जेव्हा आकुर्डीच्या खंडोबा माळावर येतोतेव्हा मला आपल्या शिवारात आल्याची भावना मनात येते.

 

राजेंद्र कोरे यांच्या या दोन्ही पुस्तकांचे संवेदना प्रकाशन तर्फे प्रकाशन करण्यात आले. राजेंद्र कोरे यांनी आत्तापर्यंत अनेक वास्तूरचना केल्या आहेत. तर 200 मंदिराच्यामोफत वास्तु रचना केल्या आहेत. त्यांच्या या कार्याबद्दलच त्यांना समाज गौरव, राष्ट्रीय निर्माण रत्न, मराठवाडा गौरव अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप गांधलीकर यांनी केले.यावेळी पुस्तक निर्मीतीस सहाय्य करणा-या सर्वच सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

03 May 2017

श्रीजित रमेशन यांच्या तक्रारीवर कारवाई करण्याचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश

 

एमपीसी न्यूज - महापालिका निवडणुकीत मतदानासाठी वापरलेल्या 'ईव्हीएम' मशीनमध्ये गैरप्रकार झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांनी राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यांच्या तक्रारीची राष्ट्रीय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून राज्य निवडणूक आयोगाला कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

फेब्रुवारी 2017 मध्ये पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील दहा महापालिकेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत मतदानासाठी वापरलेल्या 'ईव्हीएम' मशीनमध्ये घोळ झाल्याचा आरोप विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केले होते.

 

या गैरप्रकाराविरुद्ध माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी पुणे विधान भवनासमोर उपोषण केले होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ईव्हीएम मशीनच्या घोळ प्रकरणी आवाज उठविण्याचे आश्वासन दिल्यानंतर रमेशन यांनी उपोषण मागे घेतले होते.

 

रमेशन यांनी याप्रकरणी राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यांच्यासह मुंबई, नागपूर, सोलापूर, अहमदनगर येथील सजग नागरिकांनीही ईव्हीएम मशीनच्या घोळाबाबत तक्रार केली होती. याबाबत राज्य निवडणूक आयोग यामध्ये आम्ही हस्तक्षेप करु शकत नाहीत, असे सांगत होते.

 

रमेशन यांनी याबाबत पाठपुरावा सुरुच ठेवला होता. अखेर राष्ट्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून राज्य निवडणूक आयोगाला योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आता राज्य निवडणूक आयोग कशा पद्धतीने चौकशी करतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

03 May 2017
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नागरिकांना आवाहन 
 
एमपीसी न्यूज - गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरणा-या दहावी निकालाच्या तारखांबाबत निरनिराळ्या अफवा पसरवल्या जात आहे. मात्र, फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या या परिक्षांबद्दलच्या निकालांच्या तारखांबद्दल कोणतीही अधिकृत घोषण झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी आणि विद्यार्थांनी सोशल मीडियावर फिरणा-या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या कडून करण्यात आले आहे. 
 
फेसबुक, व्हाट्स अप यासारख्या सोशल साईट वरून अनधिकृत तारखा पसरत आहेत. परंतु शिक्षण मंडळाकडून कोणत्याही अधिकृत तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. निकालाचे काम अद्याप सुरू असून काम पूर्ण होताच शिक्षण मंडळाकडून मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in  या अधिकृत संकेतस्थळावर निकालाची तारीख जाहीर करण्यात येईल, असे राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले.

03 May 2017
शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी  
 
एमपीसी न्यूज - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी केली. 
 
शिष्टमंडळात मनसेचे पिंपरी-चिंचवड शहर प्रभारी गणेश सातपुते, रणजीत शिरोळे, शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले, माजी नगरसेविका अश्विनी चिखले, सीमा बेलापुरकर, रुपेश पटेकर, राजू साळवे, शाम जगताप, अक्षय करांडे, प्रबुध्द कांबळे, रोहीत काळभोर, विकी कांबळे, मनोज लांडगे आदी उपस्थित होते.
 
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्नासंदर्भात शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांशी चर्चा केली. तसेच शहरातील सर्व सामान्य नागरिकांना भेडसावणा-या समस्या सोडविण्याची मागणी केली. या सर्व समस्या संदर्भात लवकरच योग्य तो निर्णय घेऊन त्या सोडविण्यात येतील अशी ग्वाही, आयुक्त हर्डीकर यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिली.
03 May 2017

एमपीसी न्यूज - स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शहरातील नागरिकांची मते, अभिप्राय, सूचना जाणून घेऊन त्यांचा स्मार्ट सिटी प्रपोजलमध्ये समावेश करण्यात येणार आहे. नागरी सहभाग आणि वॉर रूम सेटअपद्वारे स्मार्टसिटी प्रस्ताव तयार करण्यासाठी मुंबईतील डीसीएफ अ‍ॅडवायझरी सर्व्हिसेस या कंपनीला काम देण्यात आले आहे. या कंपनीला प्रवास खर्च, मुक्काम यासाठी दीड लाख रूपये देण्यात येणार आहेत.

 

केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' या महत्वाकांक्षी योजनेमध्ये पिंपरी-चिंचवड शहराची निवड करण्यात आली आहे. महापालिकेचे स्मार्ट सिटी प्रपोजल तयार करून ते राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे 31 मार्च 2017 पूर्वी पाठविणे आवश्यक होते. स्मार्ट सिटी प्रपोजल तयार करण्यासाठी शहरातील नागरिकांची मते, अभिप्राय, सुचना जाणून घेऊन त्यांचा स्मार्ट सिटी प्रपोजल मध्ये समावेश करून घेणे आवश्यक होते.

 

नागरी सहभाग आणि वॉर रूम सेटअपद्वारे स्मार्टसिटी प्रस्ताव तयार करण्यासाठी डीसीएफची सेवा देणे या कामासाठी डीसीएफ अ‍ॅडवायझरी सर्व्हिसेस यांनी पत्र सादर केले आहे. या कंपनीला सरकारच्या पुणे बस डे, अपेक्षा महाराष्ट्राचा, जलदींडी, सर्व जल अभियान यासारखे विविध उपक्रम, योजनांच्या कामकाजाचा अनुभव आहे. तसेच स्मार्ट सिटी प्रपोजल तयार करण्यासाठी शहरातील नागरिकांची मते, अभिप्राय, सूचना जाणून घेऊन त्यांचा स्मार्ट सिटी प्रपोजलमध्ये समावेश करून घेण्यात येणार आहे. तसेच त्यासाठी वॉर रूम सेट अप करण्याचे कामकाज पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे शहरात केलेले आहे. या कंपनीमार्फत महापालिकेस प्रकल्प व्यवस्थापक आणि दोन प्रकल्प समन्वयक असे तीन जणांचे पथक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

 

या कामकाजासाठी डीसीएफ अ‍ॅडवायझरी सर्व्हिसेस यांना महापालिकेमार्फत सल्लागार शुल्क दिले जाणार नाही. तर, डिलीवरींग चेंज फाऊंडेशन ही संस्था हे शुल्क देणार आहे. त्यानुसार, डीसीएफ अ‍ॅडवायझरी सर्व्हिसेस यांनी मुंबई - पुणे या प्रवासासाठी 50 हजार रूपये, स्थानिक पातळीवरील प्रवासासाठी 20 हजार रूपये, पुण्यातील मुक्कामासाठी 50 हजार रूपये आणि विद्यार्थी स्वंयसेवकांसाठी 30 हजार रूपये असा एकूण दीड लाख रूपये खर्च अपेक्षित धरला आहे.

 

डीसीएफ अ‍ॅडवायझरी सर्व्हिसेस यांनी 28 फेब्रुवारी 2017 रोजी हे कामकाज सुरू केलेले आहे. त्यामुळे या कंपनीस दीड लाख रूपये अधिक 15 टक्के सेवाकर अथवा प्रत्यक्ष खर्चाची बीले प्राप्त झाल्यानंतर जी रक्कम असेल ती कामाचा करारनामान करता आणि थेट पद्धतीने देण्यासाठी स्थायी सभेची मान्यता घेण्यात येणार आहे.

03 May 2017

एमपीसी न्यूज -- पवना धरणात केवळ 37 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने मंगळवार (दि. 2) पासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, पहिल्याच दिवशी महिलावर्ग आणि नागरिकांची तारांबळ उडाली त्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याचे चित्र आहे.

 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरात दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या स्थितीला पवना धरणात केवळ 37 टक्के पाणी साठा असून गेल्या वर्षी याच दिवशी 26 टक्के पाणीसाठा होता. वाढलेली लोकसंख्या व पाणीउपसा लक्षात घेऊन, प्रत्यक्ष पाऊस होऊन धरणात पुरेसा पाणीसाठा होईपर्यंत उपलब्ध पाणीसाठा जपून वापरणे गरजेचे आहे, त्यामुळे महापौरांनी गटनेते, पक्षनेते आणि प्रशासनाची बैठक घेऊन पाणी कपातीचे धोरण स्वीकारले. यासाठी शहराचे दोन भाग करण्यात आले. त्यापैकी मंगळवारी एका विभागात पाणीपुरवठा करण्यात आला. तर दुस-या विभागात त्याच्या दुस-या विभागात पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नियमितपणे होणाºया पाण्यात २५ टक्के कपात करण्यात येत आहे.

 

नियोजन कोलमडले

 

पाणीपुरवठा विभागाने महापालिका क्षेत्रात दिवसाआड पाण्याचे नियोजन केले आहे. याबाबतची माहिती प्रभाग स्तरांवरून नागरिकांना देणे गरजेचे होते. याबाबत दवंडी पीटविणे किंवा पत्रकाद्वारे माहिती देणे गरजेचे होते. पहिल्याच दिवशी वेळापत्रक शहरातील बहुतांश भागातील नागरिकांना न कळाल्याने तारांबळ उडाली होती. ‘‘बिले न भरणाºयांवर नळजोड तोडण्याची कारवाई पाणीपुरवठा विभाग करते, यासाठी प्रबोधन करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात, पाणी कपातीची माहिती नागरिकांना कळावी, यासाठी प्रयत्न झालेले नाहीत. पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पूर्णकल्पना द्यायला हवी होती. याबाबत नाराजी व्यक्त केली. चिंचवड, निगडी, सांगवीच्या काही भागांत नियोजित वेळेत पाणीपुरवठा झाला नाही. तसेच काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला.

 

पाऊस लांबल्यास कपात वाढविणार

 

पाऊस येण्यास उशीर झाला, तर आढावा बैठक घेऊन कपातीमध्ये वाढ करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिन्यांमधील गळती शोधण्यासाठी विभागीय कार्यालयांमध्ये भरारी पथक नेमण्यात येत आहे. तसेच पाण्याचा गैरवापर, अपव्यय करणाºया नागरिकांवर प्रसंगी नळजोड खंडित करण्याची कारवाई भरारी पथकामार्फत करण्यात येणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल, असेही महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर व धरणातील पाणीसाठा पुरेसा वाढल्यानंतर दैनंदिन एकवेळ पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

03 May 2017
एमपीसी न्यूज -  गेल्या 19 दिवसांपासून गंभीर बनलेला पुण्याचा कचरा प्रश्नावर उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांसोबत काल (मंगळवारी) आयुक्त कुणाल कुमार यांनी घेतलेली बैठक  विरोध दर्शविल्याने निष्फळ ठरली आहे. त्यामुळे पुणे शहराचा कचरा प्रश्न आणखी गंभीर झाला आहे.
 
 
शहरातील कचरा उरुळी आणि फुरसुंगी येथे टाकू न देण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे गेल्या 19 दिवसांपासून पुणे शहरात ठिकठिकाणी कच-याचे ढिग साचले आहेत. त्यामुळे नागिरकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आयुक्तांनी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. मात्र. यामध्ये कचरा टाकण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शविल्याने पुणेकरांची कचराकोंडी कायम आहे.
 
 
दरम्यान, येथील ग्रामस्थांनी या दोन्ही ठिकाणी कचरा टाकण्यास भजन, कीर्तन, जागरण गोंधळ, घंटानाद, अर्ध नग्न अशा विविध प्रकारे विरोध केला आहे. तसेच तृतीय पंथीयांनी देखील या विरोधात आंदोलन कचरा टाकण्यास विरोध केला आहे. 
 
 
महापौरांच्या परदेस दौ-यावर विरोधकांचे आंदोलन 
 
 
गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहराचा कचरा प्रश्न गंभीर झाला आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी कच-याचे ढिग साचले आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असताना महापौर नागरिकांना वा-यावर सोडून परदेश दौ-यावर कशा जाऊ शकतात असा प्रश्न उपस्थित करीत महापालिका भवनात विरोधकांनी आदोंलन करीत भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

03 May 2017

एमपीसी न्यूज - मागील काही आठवडाभरापासून पिंपरी-चिंचवडमधील उष्णतेचा पारा वाढला असून पारा 36 अंशांच्या पुढे पोहोचला आहे. तर उन्हाच्या झळा वाढल्याने दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचे चित्र सध्या उद्योगनगरीत दिसून येत आहे. उन्हाच्या झळा वाढल्याने नागरिकांप्रमाणेच जनावरांनाही काही प्रमाणात उष्णतेचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उन्हाचा परिणाम वाहतूक, बाजारपेठ, तसेच दैनंदिन कामकाजावर होताना दिसत आहे. काल पुण्याचे तापमान 39 अंशावर पोहोचले होते तर पुण्यातील लोहगावचे तापमान 40 अंशावर होते. पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.उन्हाचे चटके जाणवत असल्याने कामानिमित्ताने घराबाहेर पडणारे नागरिक डोक्‍यावर टोपी परिधान करत असल्याचे दिसून येते. वाढत्या उन्हाचा परिणाम वाहतूक वर्दळीसह हातगाडीधारक, विविध वस्तू विक्रेते तसेच फेरीवाले यांच्या व्यवसायावर काही प्रमाणात झाला आहे. दुपारच्या वेळी उन्हाचे चटके सहन करावे लागत असल्यामुळे रस्त्यावरची वाहतूक काहिशी मंदावली आहे. उन्हाच्या झळा वाढल्याने थंडगार लस्सी, ताक, मठ्ठा तसेच शीतपेय, बर्फ गोळा या वस्तूंना मागणी वाढली आहे.

 

उन्हामुळे अंगाची लाहीलाही होऊ लागली असून महामार्गालगत तसेच बाजारच्या ठिकाणी रसाची गुऱ्हाळे व थंडपेयांच्या दुकानांत ग्राहकांची गर्दी वाढली आहे.  तर काही ठिकाणी नागरिक झाडांच्या सावलीला विश्रांती घेत असल्याचे दिसत आहे. वाढत्या उन्हाचा परिणाम शहरातील मंडईत देखील दिसून येत आहे. मंडईत विक्रीसाठी येणा-या फळभाज्या, पालेभाज्या महाग झाल्याने महिलांचे घरातील महिन्याचे बजेट कोलमडले आहे.

 

उन्हाचा पारा वाढू लागल्याने रसवंती गृह, आईस्क्रीम पार्लर शितपेयांची मागणी वाढली आहे. रहदारीच्या मार्गावर जागोजागी कलिंगाडाची दुकाने थाटली आहेत. उन्हाळ्यात गारवा देणारे कलींगडाला मागणी वाढली असून वेगवेगळ्या जातीचे कलींगड 50 रूपयांपासून 150 रूपयांचा दर आकारला जात आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानाचा परिणाम व्यवसायावर झाला असून दुपारच्या वेळी शहरातील काही भागातील दुकानदार दुकाने बंद ठेवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Page 82 of 183
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start