20 Mar 2017

 

एमपीसी न्यूज - संतोष कांबळे यांनी  सांगवी येथून  महापालिकेची निवडणूक लढवली होती. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना  कांबळे यांना पहिल्याच  प्रयत्नात यश मिळाले आहे. मुळचे व्यायवसायीक असणारे कांबळे यांचा हा राजकारणातील पहिलाच प्रयत्न होता. ज्यामध्ये त्यांना जनतेने भरघोस मतांनी निवडून दिले आहे.


याविषयी बोलताना  संतोष कांबळे म्हणाले की, मी राजकारणात येईन, असे मला कधीच वाटले नव्हते. मला तशी इच्छाही नव्हती मात्र प्रभागत पडलेले आरक्षण व नागरिकांचा आग्रह म्हणून मी निवडणुकीत उतरलो व मला पहिलयाच प्रयत्नात यश मिळाले. त्यामुळे माझ्यासाठी ही सुखद धक्काच होता. कारण मी मुळ व्यायवसायी आहे. माझा 2008 सालापासून बांधकाम व्यवसाय आहे. त्यापूर्वी मी नोकरी करत होतो त्यामुळे मी कधी राजकारणात येईन किंवा नगरसेवक होईन असे वाटले नव्हते. पण जनतेने मला ती संधी दिली आणि मी विजयी झालो.


पहिल्यांदा शहराच्या सभागृहात जाण्याची संधी मिळाली तशीच माझी जबाबदारीही तेवढ्याच पटीने वाढली आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.


कांबळे हे मुळचे सांगवीचेच. त्यांनी पिंपरीच्या महात्मा फुले महाविद्यालयातून बीएससीच्या पदवीसाठी प्रवेश घेतला होता मात्र घरच्या परिस्थीतीमुळे त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले. पुढे नोकरी करत-करत त्यांनी  स्वतःचाच यश डेव्हलपर्स या नावाने व्यवसाय सुरु केला. त्यात त्यांना नगरसेवक पदाची जबाबदारीही मिळाली. त्याबरोबरच 2010 पासून फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून सांगवी परिसरात विविध उपक्रम राबवले.

 

संतोष कांबळे याना वैयक्तीक आवडीमध्ये मैदानी खेळ खेळायला आवडतात. त्यांची व्यवसायातील आवड पाहता त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आगामी कामाविषयी बोलताना कांबळे म्हणाले की,  मला तरुणांना व महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यायची आहे. त्यासाठी मी प्रयत्नही करत आहे. कोणतेही राजकारण न करता सामाजिक कामे करायची माझी इच्छा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

20 Mar 2017
एमपीसी न्यूज  - पुणे शहरात बेकरी चालकांना संरक्षण मिळावे. तसेच बेकरीतील कामगारांना नुकसान भरपाई मिळावी, या अशा अनेक मागण्यासाठी  23 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून त्या दिवशी शहरातील बेकरी व्यावसयिक बंद पाळणार आहेत. अशी घोषणा महाराष्ट्र बेकरी उत्पादक श्रमिक महासंघाचे अध्यक्ष नाना क्षीरसागर यांनी केली.


यावेळी क्षीरसागर म्हणाले की, मागील काही महिन्यात शहरातील बेक-यांमध्ये अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्ये निष्पाप कामगाराचा बळी गेला असून या घटना लक्षात घेता कामगाराना संरक्षण मिळावे, त्याचबरोबर बेकरी चालकांना आरोग्य परवाना सुलभपणे मिळावा तसेच त्यांच्यावर होणा-या हल्ल्याची नुकसान भरपाई मिळावी, या अनेक मागण्यांसाठी शहरातील सर्व बेकरी चालक संपामध्ये सहभागी होणार आहेत.


यामध्ये जवळपास 2 हजार टेम्पोचालक आणि 5 हजार छोटे मोठे व्यासायिक देखील सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

20 Mar 2017
एमपीसी न्यूज - सामाजिक बांधिलकी जपणा-या जैन सोशल ग्रुप डायमंडच्या पिंपरी-चिंचवड  अध्यक्षपदी अनुप शहा यांची निवड करण्यात आली. जैन सोशल ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष लालचंद जैन यांच्या उपस्थितीत शहा यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली.  

हॉटेल कलासागरमध्ये रविवारी (दि. 19) झालेल्या कार्यक्रमाला जैन सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि पुना रिजनचे सचिव दीपक डागा, राष्ट्रीय अध्यक्ष सतीश बाफना, गो ग्रास कमिटीचे अध्यक्ष सौरभ शहा, मावळते अध्यक्ष सुनील गांधी, उपाध्यक्ष जगदीश शहा, माजी अध्यक्ष नयन भंडारी, नरेश शहा, कामेश शहा, माजी खजिनदार देवेंद्र बोरा, अतुल धोका आदी उपस्थित होते.  

जैन सोशल ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष लालचंद जैन यांच्या उपस्थितीत शहा यांच्यासोबत उपाध्यक्ष सुनील शहा, सचिव पंकज गुगळे, खजिनदार प्रशांत गांधी आणि सहसचिव अनिल धोका यांनीही पदभार स्विकारला. 

यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष अनुप शहा म्हणाले, वर्षभराच्या कालावधीमध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणार आहे. जैन समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार आहेत.  

सामाजिक बंधुता आणि मनोरंजन या हेतूने जैन सोशल ग्रुपची पिंपरी-चिंचवड शहरात स्थापना झाली. ग्रुपच्या वतीने गोरगरिब मुलांसाठी शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात येते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन देखील केले जाते.  वृद्धाश्रमातील नागरिकांना मदत करण्यात येते. रक्तदान असे विविध सामाजिक उपक्रम वर्षभरामध्ये राबविले जातात. 

ग्रुपमधील सभासदांसाठी महिन्यातून एक कार्यक्रम घेण्यात येत असतो. धार्मिक, मनोरंजनात्मक, स्पर्धात्मक, आरोग्यासाठी सायकलिंग, ट्रेकिंग असे विविध कार्यक्रम घेण्यात येत असतात.  ग्रुपमधील सभासदांसाठी ती एक निखळ आनंद आणि बांधिलकीची पर्वणी ठरत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कासवा आणि मनीषा जैन यांनी केले. तर, पंकज गुगळे यांनी आभार मानले.
20 Mar 2017

एमपीसी न्यूज - लहानपणापासून आंबेडकर चळवळीत काम केले. चळवळीच्या माध्यमातून समाजासाठी झटणारे विकास डोळस आता पिंपरी महापालिकेचे नगरसेवक झाले आहेत. दिघी-बोपखेल प्रभागात भव्य असे 'संविधान भवन' उभारणार असल्याचे, नगरसेवक डोळस यांनी 'एमपीसी न्यूजशी' बोलताना सांगितले. 

प्रभाग क्रमांक 4 दिघी-बोपखेल प्रभागातून विकास हरिश्चंद्र डोळस भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही.

विधानसभा निवडणुकीपासून डोळस यांनी आमदार महेश लांडगे यांच्यासोबत राजकरणात काम करण्यास सुरुवात केली. महापालिका निवडणुकीत आमदार लांडगे यांनी डोळस यांना भाजपची उमेदवारी दिली. प्रभागातील नागरिकांच्या भक्कम पाठिंब्यामुळे ते मोठ्या मताच्या फरकाने विजयी झाले.  

   
विकास डोळस इलेक्ट्रानिक इंजिनिअर आहेत. त्यांनी काही वर्ष शिवाजीनगर येथे एका खासगी कंपनीत नोकरी देखील केली. नोकरी सोडून त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. लहानपणापासून ते आंबेडकरी चळवळीत सक्रिय होते. व्यवसाय बघत ते चळवळीत सक्रिय काम करत आहेत. 

दहावीत असताना 1998 साली विज्ञानामध्ये 150 पैकी 146 गुण मिळाले होते. त्यावेळी महापालिकेने मला पाच हजार रुपयांचे बक्षिस दिले होते, अशी आठवण सांगत ते म्हणाले  ज्या महापालिकेने मला बक्षिस दिले. त्या महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्याचा मला मनस्वी आनंद होत आहे. 

दिघी-बोपखेलचा पिंपरी महापालिकेत समावेश होऊन 20 वर्ष झाले. मात्र, प्रभागात अजूनही मुलभूत सुविधांची वानवा आहे.  अंतर्गत रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधा नागरिकांना देणार आहे. प्रभागातील सर्व आरक्षणे ताब्यात घेऊन विकसित करणार असून  क्रिडांगण, उद्यान, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र प्रभागात करणार असल्याचे, डोळस यांनी सांगितले. तसेच दिघीतील डोंगराचे सुशोभिकरण आणि संवर्धन करणार आहे. 

दिघी-बोपखेल प्रभागात देशातील सर्वांत चांगले 'संविधान भवन' प्रभागात करण्याचा माझा मानस आहे. त्यामध्ये संविधानाने सर्वसामान्य नागरिकाला दिलेले हक्क सांगितले जाणार आहेत. संविधान तज्ज्ञांना बोलावून व्याख्यानाचे आयोजन केले जाणार आहे. संविधानाचे मोठे संग्रहालय, ग्रंथालय, स्पर्धात्मक परिक्षा केंद्र सुरु करणार असल्याचे, डोळस यांनी सांगितले. 
 

दिघी-बोपखेल प्रभागातील नागरिक, भोसरीचे आमदार महेश लांडगे, कुलदीप परांडे आणि डोळस बंधूमुळे निवडून आल्याचे, विकास डोळस यांनी सांगितले.

20 Mar 2017

एमपीसी न्यूज - भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) 57 व्या स्थापना दिनानिमित्त नागरिकांसाठी आज (सोमवारी) लघुपट पाहण्याची संधी देण्यात आली आहे.


या कार्यकक्रमात संस्थेच्या प्रमुख चित्रपटगृहात सकाळी 11.30 ते 1 या वेळात हे लघुपट दाखवले जाणार आहेत.  तसेच  संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून बनवलेले आणि त्या त्या वेळी पारितोषिकांनी नावाजले गेलेले हे लघुपट पाहण्याची संधी या कार्यक्रमातून नागरिकांना मिळणार आहे.


यामध्ये क्रांती कानडे यांनी बनवलेला ‘चैत्र’, उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘गिरणी’, अरुण सुकुमार यांचा ‘व्हेन धीस मॅन डाइज’, कौशल ओझा यांचा ‘आफ्टरगो’, आंद्रे लॅनेटा यांचा ‘अल्ला इज ग्रेट’ आणि तुषार मोरे दिग्दर्शित ‘सदाबहार ब्रास बँड’ या लघुचित्रपटांचा समावेश आहे.


या कार्यक्रमापूर्वी सकाळी साडेदहा वाजता संस्थेचा इतिहास उलगडणाऱ्या छायाचित्रांचे ‘डाऊन मेमरी लेन’ हे प्रदर्शनही भरवले जाणार आहे. वाळूचा वापर करून कला साकारणारे सुदर्शन पटनाईक हे ओडिशाचे कलाकार प्रदर्शनाचे उद्‌घाटन करणार असून, पटनाईक यांच्या कलाकृतीही प्रदर्शनात मांडल्या जाणार आहेत. 


संस्थेच्या 57 वा स्थापना दिनानिमित्त संस्थेचे आवार व प्रसिद्ध ‘व्हिज्डम ट्री’चा परिसर रंगीबेरंगी दिव्यांच्या रोषणाईने सजवण्यात आला आहे. शनिवारी व रविवारी संस्था नागरिकांना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली होती.

 

ftii0

19 Mar 2017

एमपीसी न्यूज - पिंपरीतील एच. ए. मैदानावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन संस्थेच्यावतीने डी. वाय, पाटील विद्यापीठाच्या विशेष सहकार्याने २८ वे राज्यस्तरीय डिपेक्स प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनातील स्व. संदीप शेवडे कलादालनाचे उद्‌घाटन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते झाले.


प्रदर्शनास व कलादालनास विद्यार्थ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनातील कलादालनास अभाविपचे दिवंगत ज्येष्ठ कार्यकर्ते स्व. संदीप शेवडे असे नामकरण करण्यात आले. याचे उद्‌घाटन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्व. संदीप शेवडे यांचे वडील व माजी नगरसेवक वसंत शेवडे आदी उपस्थित होते.


या कलादालनात नारी सन्मान, थिंक इंडिया, वसुधैव कुटुंबकम, शिक्षण, विद्यार्थी कार्यप्रणाली, राष्ट्रसन्मान आदींचा वापर करुन चित्रप्रदर्शन भरविण्यात आले आहे.  तसेच डिपेक्सची माहिती, अभाविची कामे आदी प्रकार चित्रांद्वारे मांडण्यात आला आहे.


हे कलादालन उद्यापर्यंत (सोमवार)  विनामूल्य सकाळी दहा वाजल्यापासून खुले आहे.


हजारोंच्या संख्येने विविध महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी या ठिकाणी भेट देत आहेत. डिपेक्समध्ये 270 अभियांत्रिकी प्रकल्प आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांतील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे नावीन्यपूर्ण प्रकल्प यामध्ये पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. प्रदर्शनाचा उद्या (सोमवार) शेवटचा दिवस आहे.

dipex 1f

dipexf

 

19 Mar 2017
एमपीसी न्यूज - शिवसेना युवा सेनेच्या वतीने 9 एप्रिल रोजी राज्यभरात सीईटी आणि नीटची पुर्व तयारी सराव चाचणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती युवा सेनेचे वरिष्ठ नेते वरुण सरदेसाई यांनी दिली. 

आकुर्डी येथील शिवसेना भवनात युवा सेनेच्या पदाधिका-यांची आज (रविवारी) बैठक झाली. शिवसेनेचे शहरप्रमुख व महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे, शिरुरचे युवासेना अधिकारी गणेश कवडे, पिंपरीचे युवासेना अधिकारी व नगरसेवक अमित गावडे, चिंचवडचे राकेश वाकुर्डे, भोसरीचे सचिन सानप आदी उपस्थित होते. 

यावेळी सरदेसाई यांनी सीईटी आणि नीटच्या सराव परिक्षाबाबत माहिती दिली. सीईटी आणि नीटची पुर्व तयारी सराव चाचणीचे नियोजन कसे करायाचे याबाबतही त्यांनी पदाधिका-यांना मार्गदर्शन केले. 
19 Mar 2017

'सेव्ह आराध्या अभियान'साठी वैशाली यादवही रॅलीमध्ये सहभागी

एमपीसी न्यूज : नवी मुंबईच्या आराध्याया चार वर्षाच्या चिमुकलीला वर्षभरापूर्वी ह्रदयाचा आजार ( डायलेटेड कार्डिओमायोपॅथी) झाला आहे. तिला त्वरीत ह्रदय प्रत्यारोपणाची गरज आहे. मात्र 25 वर्षे वयाच्या आतील आणि 40 किलोग्रॅम असलेली ब्रेन डेड व्यक्तीचे तिला ह्रदयाचे दान करू शकते. या विषयाची जनजागृती करण्याबाबत ‘सेव्ह आराध्या अभियान’ सुरू करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून आज पुण्यात बालगंधर्व चौकात सेव्ह आराध्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून ह्रदयशस्त्रक्रिया करवून घेणारी वैशाली यादवही या रॅलीमध्ये सहभागी झाली होती. ती यावेळी म्हणाली की,प्रत्येक नागरिकाने अवयवदान करण्याची गरज आहे.ज्या प्रकारे मोदी काकानी मला मदत केली तशीच आराध्याला देखील करतील.


बालगंधर्व रंगमंदिर ते गुडलक चौक, ज्ञानेश्‍वर पादुका चौक आणि तेथून मॉर्डन कॉलेज मार्गाने पुन्हा  बालगंधर्व चौकात शेवट करण्यात आला.


यावेळी आराध्याचे बाबा योगेश मुळे म्हणाले की, सध्या मुंबईतील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये आराध्या ही उपचार घेत आहे. तिच्या ह्रदयाची क्षमता केवळ 10 ते 15 टक्केच आहे. केवळ ह्रदय प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय आहे. यासाठी मुंबईतील विभागीय अवयव प्रत्यारोपण समिती (झेडटीसीसी) कडेही ह्रदयासाठी नोंदणी करण्यात आली आहे. मात्र केवळ 25 वर्षाच्या आतील आणि 40 किलोग्राम वजनाच्या आतीलच ब्रेनडेड व्यक्ती तिला ह्रदयाचे प्रत्यारोपण हाऊ शकते. या प्रकारचा दाता मिळणे दुर्मिळ आहे. म्हणून आराध्याचे ह्रदय प्रत्यरोपण अद्याप होऊ शकले नाही. 25 या वयोगटातील आणि 40 किलो वजनच्या आतील ब्रेनडेड रुग्ण झाल्यास संबंधित रुग्णालयांनी किंवा नातेवाईकांनी झेडटीसीसी किंवा मुंबईतील फोर्टीस रूग्णालयाला संपर्क करून आराध्याला नवीन जीवन देण्यास मदत करावी, असे आवाहन केले.या विषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पत्र लिहून यामध्ये लक्ष घालावे आणि तिला मदत करावी.या मागणीचे पत्र पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.


बालगंधर्व रंगमंदिर ते गुडलक चौक, ज्ञानेश्‍वर पादुका चौक आणि तेथून मॉर्डन कॉलेज मार्गाने परत बालगंधर्व  येथे रॅली पार पडली.

19 Mar 2017
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील अभियांत्रिकी शाखेमधील विद्यार्थ्यांना झी 24 तास या मराठी वृत्त वाहिनीच्या वतीने देणात येणा-या ''यंग इनोव्हेटर 2016' पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. 
मुंबई विद्यापीठात हा पुरस्कार सोहळा झाला. पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील विद्यार्थी वैभव पोपट चौदार,  तेजस्विनी भरत चोरगे आणि किरण सुदाम मदगे यांना ''लिनिअर अँड अंगुलर स्केल मेजरींग कंपास'' यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव आणि  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, कवी लेखक व आयटी तज्ज्ञ अच्युत गोडबोले, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख आदी उपस्थित होते. 

वैभव व त्याच्या मित्रांनी मिळून एक 'कर्कटक' तयार केले आहे. त्याच्या साहाय्याने आपण हवी ती त्रिज्या असणारे वर्तुळ काढू शकतो. यासाठी आपणास पट्टी वापरायची गरज नाही. तसेच आपण या कर्कटकच्या साहाय्याने दोन रेषांमधील कोण मोजू शकतो. यासाठी  आपणास कोनमापकाची सुद्धा गरज नाही. एकंदरीत जर हे कर्कटक आपल्या जवळ असेल तर  पट्टी व कोनमापक वापराची गरज नाही.

या संशोधनाचे वैभव याने पेटंट देखील  केले आहे. आई-वडील, महाविद्यालय आणि मित्रांचा संशोधनात मोठा वाटा असल्याचे, वैभव याने सांगितले.
19 Mar 2017
एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा शिवसेनेचे युवा अधिकारी व नवनिर्वाचित नगरसेवक अमित राजेंद्र गावडे यांचा वाढदिवस आज (रविवारी) विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त घेण्यात आलेल्या ''जनकल्याण महाआरोग्य शिबिरा''चा 550 हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. 

निगडी, प्राधिकरण येथील स्वामी समर्थ मंदिराच्या प्रांगणात अमित गावडे मित्र परिवार आणि स्टार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ''जनकल्याण महाआरोग्य शिबिर'' घेण्यात आले. स्टार हॉस्पिटलचे डॉ. प्रमोद खोबडे, डॉ. विश्वजित पवार यांनी रुग्णांची तपासणी केली. 

हृदयरोग सर्जरी, अ‍ॅन्जिओप्लास्टी, हृदयविकार, शिरा, धमनी, रक्तवाहिन्या यांची गुंतागुंत, शस्त्रक्रिया, न्युरो सर्जरी, मेंदु व मणक्यांची सर्जरी, अस्थिरोग शस्त्रक्रिया, मुत्रपिंड विकार, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, कानाची तपासणी करण्यात आली. 

तसेच गरजू रुग्णांना श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर ईसीजी, शुगर, रक्तदाब अशा विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. निगडी परिसरातील नागरिकांचा शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. दिवसभर चाललेल्या या ''जनकल्याण महाआरोग्य शिबिराचा'' 550 हून अधिक नागरिकांनी  लाभ घेतला. आरोग्य शिबिराबरोबरच दिवसभर विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. 

मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी मतदार संघाचे आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेनेचे शहरप्रमुख व महापालिकेतील गटनेते राहूल कलाटे, उपमहापौर शैलजा मोरे, माजी उमहापौर व नगरसेवक राजू मिसाळ, नगरसेविका शर्मिला बाबर, कामगार नेते प्रकाश ढवळे, राजू बाबर, अनुप मोरे, तसेच शिवसेनेचे विभाग प्रमुख अमोल निकम, विकास भिसे, शाखा प्रमुख रवी पवार, शरद जगदाळे, पार्थ गुरव, निखिल पांढारकर यांच्यासह निगडी प्रभागातील नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून नगरसेवक गावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Page 10 of 51