27 Mar 2017

फेसबुकवर लाईक आणि कमेंट करण्यावरून वाद


एमपीसी न्यूज - माझ्या फेसबूक पेज वर लाईक आणि कमेंट का करतोस असा जाब विचारल्याने मनसेचे नगरसेवक वसंत मोरे आणि भाजप नगरसेविकेचे पती आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.


ही घटना रविवारी (दि. 26) सकाळी साडेअकरा वाजता सुखसागरनगरमध्ये घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हे दाखल केले आहे.


वसंत मोरे (वय 43, रा. कृष्णलीला निवास, कात्रज) यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर रवी एकनाथ संकपाळ (वय 44, रा. आनंदनगर सोसायटी, सुखसागरनगर) राहुल कामठे आणि राजाभाऊ कदम, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी राजाभाऊ कदम यांच्या पत्नी भाजपाच्या विद्यमान नगरसेविका आहेत. रवी संकपाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर नगरसेवक वसंत मोरे, मंगेश रासकर बंडू  आणि सूर्यवंशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या प्रकरणी अधिक माहिती अशी की, नगरसेवक वसंत मोरे आणि त्यांचे मित्र सुखसागरनगर येथून जात असताना त्यांनी संकपाळ यांना ‘कारण नसताना तू माझ्या फेसबुकवर कमेंट का करतो असतोस’ अशी विचारणा केल्यानंतर चिडलेल्या संकपाळ, कदम आणि कामठे यांनी त्यांना मारहाण केली. ही भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या सूर्यवंशी व रासकर यांनाही मारहाण झाली.

26 Mar 2017
एमपीसी न्यूज - जुन्या भांडणातून तिघा जणांनी दोघांवर कोयत्याने वार केले. ही घटना शनिवारी (दि.25) सायंकाळी सातच्या सुमारास वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली. 

याप्रकरणी महादेव तुपे, निलेश कांबळे आणि संदीप बढे ( सर्व रा. तुपे चाळ, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत हिरालाल चव्हाण (वय 19, ) विशाल सोपान सोनवणे (दोघे रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे वार झालेल्या दोघांची नावे आहेत. अभिजीत याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

फिर्यादी आणि आरोपींची कबुतर चोरल्याच्या कारणावरुन पूर्वी भांडणे झाली होती. त्यातून त्यांच्यात वैमनस्य आहे. शनिवारी सायंकाळी अभिजीत आणि विशाल हे दोघे वाल्हेकरवाडी येथून दूचाकीवरुन जात होते. 

त्यावेळी आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये विशाल गंभीर जखमी झाला असल्याचे, पोलिसांनी सांगितले. चिंचवड ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आर. जे. पाटील तपास करत आहेत.

25 Mar 2017

चोरट्याकडून 15 तोळे सोने हस्तगत; चार गुन्हे उघडकीस

एमपीसी न्यूज - लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेच्या एसी डब्यांमधून प्रवाशांच्या बॅगा लंपास करणा-या चोरट्याला अखेर बेड्या ठोकल्या. यावेळी त्याच्याकडून चोरीचे 15 तोळे सोने हस्तगत करण्यात आले. तर चार गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक संजय सातव यांनी दिली.

राजीव रंजन नथुनी साह (वय 48, रा. झारखंड), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खब-यामार्फेत मिळालेल्या माहितीनुसार सातव यांनी विशाखापट्टणम गाडीमध्ये पथक पाठवले. पोलिसांना टेहळणी करताना आरोपीच्या संशयास्पद हालचालींमुळे त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. चौकशीत त्याने अनेक रेल्वे गाड्यांमधील एसी डब्यांमधून बॅगा चोरल्याचे सांगितले.

चोरीमधून मिळालेले सोने त्याने कानपूर, उत्तरप्रदेशातील सराफांना विकले आहे. त्यानुसार एक पथक कानपूरला रवाना करण्यात आले आहे. आरोपीकडून एकूण चार गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून 15 तोळे सोने जप्त करण्यात आले आहे.

25 Mar 2017

एमपीसी न्यूज - पुण्यात आज शहरातील शिवाजीनगर व फर्ग्युसन रस्त्यावर घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनेत नागरिकांनी चोरट्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यापैकी पीएमटी बसमध्ये महिलांच्या पर्स तसेच दागिने चोरणा-या महिलेला पकडले. मात्र, तिची साथीदाराला फरार होण्यात यश आले. तर फर्ग्यूसन रोडवरील दुस-या एका घटनेत कारमधून बॅग लंपास करणाताना चोरट्याला रंगेहाथ पकडून चांगलाच चोप दिला. दरम्यान, डेक्कन परिसरात घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली.

शिवाजीनगर परिसरातील घटनेत सुनिता शाका सकट (वय 35, रा. गुलबर्गा, कर्नाटक) या पर्स चोर महिलेला अटक करण्यात आली आहे. तर, तिची साथीदार महिला फरार आहे. याप्रकरणी प्रमिला प्रदीप व्यास (वय 33, रा. मुंबई) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमिला व्यास या मूळच्या मुंबईच्या आहेत. त्या पुण्यात बहिणीकडे आल्या होत्या.  शनिवारी दुपारी शिवाजीनगर परिसरातून धानोरीकडे पीएमटीने जात होत्या. त्यावेळी आरोपी सुनिताही त्याच पीएमटीमधून जात होती. त्यावेळी आरोपी सुनिताने प्रमिला व्यास यांची पर्स चोरली. मात्र, प्रमिला व्यास यांना पर्स चोरल्याचे समजले. त्यांनी तात्काळ सुनिताला विचारणा केली. त्यावेळी तिने पर्स फेकून दिली. यानंतर दोघींमध्ये गोंधळ उडाला.

बस थांबवण्यात आली. नागरिकांनीही पर्स चोरून फेकून दिल्याचे पाहिले होते. या गोंधळात आरोपी सुनिता हिची साथीदार गर्दीचा फायदा घेऊन फरार झाली. नागरिकांनी सुनिताला पकडून डेक्कन पोलिसांच्या हवाली केले. डेक्कन पोलिसांनी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.  याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन किंवा तीन महिलांची पर्स चोरणारी टोळी असण्याची शक्यता आहे.

25 Mar 2017

एमपीसी न्यूज - शिवसेनेच्या एका पदाधिका-यासह 6 जणांना वाहतूक पोलिसांविरोधात फ्लेक्स लावल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

संजय हरिश्चंद्र मोरे (वय 44), अमीर इब्राहीम शेख (वय 39), इम्रान दस्तगीर खान (वय 34), अहमद ताहेरहुसेन खान (वय 32), राहूल रमेश माने (वय 19) आणि अन्वर हबीब शेख (वय 20, सर्वजण रा. नाना पेठ), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

वाहतूक पोलीस घोळक्याने चौकांमध्ये दंड वसुली करतात, अशा आशयाचे फ्लेक्स शहरात दोन दिवसांपूर्वी लावण्यात आली होते. अशा प्रकारचे फ्लेक्स लावून त्यामधून पोलिसांवर टीका केली होती. दरम्यान, या प्लेक्समुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली होती. पुणेकरांनी त्याचे कौतुकही केले होते. मात्र, या माध्यमातून वाहतूक पोलीसांवर सरळ टीका केल्याने वाहतूक पोलीस दुखावले होते. 

विश्रामबाग पोलिसांनी फ्लेक्स काढले. त्यानंतर शहराचे विद्रुपीकरण केल्याच्याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रकरण वरिष्ठांपर्यंत गेले होते. फ्लेक्स लावणाऱ्यांचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार  पोलिसांनी सहाजणांस अटक केली आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा समावेश आहे.

25 Mar 2017

एमपीसी न्यूज - ओंकारेश्वर पुलावरून उडी मारून एकाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लक्ष्मण अय्यप्पा मुदगुणी (वय 45, रा. 312 गुलाब निकेतन अपार्टमेंट, रोकडोबा मंदिराजवळ, शिवाजीनगर पुणे), असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेअकराच्या सुमारास मयत लक्ष्मण याने ओंकारेश्वर पुलावरून उडी मारली. लक्ष्मण हा अनेक दिवसापासून कामावर जात नव्हता. यावरून घरात सतत भांडणे होत असत. या सर्वाच्या नैराश्यातून त्याने आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ओंकारेश्वर पुलावरून उडी मारून आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करीत आहे.

25 Mar 2017

एमपीसी न्यूज - बँकेत पैसे भरायला आलेल्या एकाला कंपनीच्या मालकाची ओळख सांगून पैसे भरायला घेऊन एक लाख 24 हजार 500 रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना शुक्रवारी (दि.24) दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास भोसरी येथे घडली.

याप्रकरणी किरण गाडेकर (वय 27, रा. च-होली, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण हा एका खासगी कंपनीत नोकरी करतो. दिवसभराचे कंपनीतील पैसे भरण्यासाठी किरण शुक्रवारी दुपारी भोसरी येथील बँक ऑफ बंडोदामध्ये आला होता. त्यावेळी बँकेत आलेल्या एका अनोळखी इसमाने ''मला ओळखले का'' असे म्हणून किरण याला कंपनीच्या मालकाची आणि इतर लोकांची ओळख सांगितली.

पैसे मी कॅश कांऊटरला भरतो, असे सांगून किरण याच्याकडील 1 लाख 48 हजार 500 रुपयांची रोकड घेऊन कॅश कांऊटरला दिली. त्यानंतर माझे बँकेच्या बाजूला राजेश एन्टरप्रायजेस या नावाने कार्यालय आहे. तेथून पाच लाख रुपये आणण्यास किरण याला पाठविले. कॅश काऊंटरला दिलेल्या 1 लाख 48 हजार 500 रुपयांपैकी 1 लाख 24 हजार 500 रुपये काढून घेऊन अनोळखी इसम निघून गेला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

भोसरी ठाण्याचे फौजदार ए.एल.गवारी तपास करत आहेत.

25 Mar 2017

एमपीसी न्यूज - पैसे काढण्यास मदत करतो, असे सांगून एटीएम कार्ड बदलून घेऊन भामट्याने एकाची 32 हजार 600 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार नुकताच भोसरीत उघडकीस आला.

याप्रकरणी संतोष अर्जुन झेंडे (वय 39, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

झेंडे हे एका खासगी कंपनीत नोकरी करतात. 3 मार्चला दुपारी तीन वाजता ते भोसरी रोड येथील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी आलेल्या एका अनोळखी इसमाने झेंडे यांना पैसे काढण्यासाठी मदत करतो, असे सांगून त्यांच्याकडून एटीएम कार्ड घेतले आणि कार्ड बदलून घेऊन निघून गेला. त्या एटीएममधून 32 हजार 600 रुपये काढून घेतले. भोसरी ठाण्याचे फौजदार पी.आर.कठोरे तपास करत आहेत.

25 Mar 2017

एमपीसी न्यूज - पिंपळेसौदागर येथे दुकानासाठी जागा देतो, असे सांगून बांधकाम व्यावसायिकाने एका उद्योजकाची  67 लाखांची फसवणूक केली. हा प्रकार नुकताच उघडकीस आला.

याप्रकरणी एमबीएम डेव्हलपर्सचे भागीदार खेमचंद उत्तमचंद भोजवानी (वय 53, रा. वाकड) आणि कन्हैयालाल होतचंद मतानी (वय 59, रा. पिंपरी) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत चंदू लक्ष्मणदास रामनानी (वय 53, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी चंदु रामनानी हे उद्योजक आहेत. तर, खेमचंद भोजवानी त्यांचे मित्र असून बांधकाम व्यावसायिक आहेत. रामनानी यांना दुकानासाठी जागा पाहिजे होती. खेमचंद यांनी 2010 मध्ये रामनानी यांना पिंपळेसौदागर येथे 2400 स्क्वेअर फुटाचे दुकान देतो, असे सांगितले. त्यासाठी त्यांच्याकडून भोजवानी कन्स्ट्रक्शनच्या नावे 65 हजार रुपये घेतले. 2012 पर्यंत दुकानाचा ताबा देण्याचे ठरले होते. मात्र, रामनानी यांना दुकान दिले नाही.

रामनानी यांनी पिंपळेसौदागर येथे जाऊन जागेची पाहणी केली. मात्र, त्याठिकाणी बांधकाम सुरू झाले नव्हते. त्यानंतर भोजवानी यांनी  माझा भागीदार कन्हैयालाल होतचंद मतानी यांच्यासोबत ए.बी.एम.डेव्हलपर्स फर्म असून आमचे पिंपळेसौदागर येथे बांधकाम सुरू आहे. तेथे सातव्या मजल्यावरील दोन सदनिका डिसेंबर 2014 मध्ये देतो, असे रामनानी यांना सांगितले.

दुकानासाठी दिलेले 65 लाख दोन सदनिकांसाठी एमबीएम डेव्हलपर्सच्या नावे ट्रान्स्फर  करून घेतले. तसेच एम.बी.एम.डेव्हलपर्सचे खाते उतारे देखील दिले. रामनानी यांनी 2014 मध्ये पिंपळेसौदागर येथे जाऊन पाहणी केली असता हायफेज नावाने इमारतीचे काम सुरू होते. तीन मजलेच अर्धवट बांधकाम झालेल्या अवस्थेत होते. त्यानंतर तिथे तीनच मजल्याची परवानगी असल्याचे समजले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रामनानी यांनी पोलिसात धाव घेतली.

पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

24 Mar 2017

एमपीसी न्यूज - बँक ऑफ इंडियाच्या हेड ऑफिसमधून बोलत असल्याची बतावणी करून एटीएम कार्डची गोपनीय माहिती विचारून एका व्यक्तीची 49 हजार 900 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला.

अकबर मंडल (वय-39, रा. पुखरीया, जिल्हा नदीया) यांनी तक्रार दिली आहे. 26 डिसेंबर 2016 रोजी फिर्यादींना बँक ऑफ इंडियातून बोलत असून तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक होणार आहे, असे खोटे सांगून गोपनीय माहिती मिळवली आणि त्यांच्या बँक खात्याच्या डेबिट कार्डवरून 49 हजार 900 रुपये काढून घेत फसवणूक केली.

पोलीस निरीक्षक पंडित अधिक तपास करीत आहेत.

24 Mar 2017

एमपीसी न्यूज - सासरी होत असलेल्या छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे शहरातील पाषाण परिसरातून उघडकीस आला. याप्रकरणी विवाहितेच्या पतीला अटक करण्यात आली. ही घटना 22 मार्चला उघडकीस आली.

निकिता चंदन पुरोहित (वय-30, रा. रेणुका हील्स, फ्लॅट नं.6, सुस रोड, पाषाण, पुणे), असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती चंदन कैलेशचंद्र पुरोहित (वय-29) याला अटक केली. मयत विवाहितेचे वडील शंभुदत्त बोडा (वय-56, जोधपूर, राजस्थान) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांची मुलगी सासरी नांदत असताना आरोपी चंदन पुरोहित याने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. या सर्व प्रकाराला कंटाळून तिने 22 मार्चला राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एम.बोबडे करीत आहेत.

24 Mar 2017

एमपीसी न्यूज - भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या टोळक्याने पोलिसांनाच अपशब्द वापरत लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 22) रात्री सव्वादहाच्या सुमारास थेरगाव येथे घडली. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

 

रुपेश शामदास वाघमारे, स्वप्नील साधुराम वाघमारे, सत्यविजय साधुराम वाघमारे, साधुराम वाघमारे यांना अटक करण्यात आली आहे. तर, त्यांचा साथीदार लखन उर्फ प्रवीण बारणे आणि एका महिलेसह 8 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वाकड ठाण्याचे पोलीस नाईक विक्रम जगदाळे यांनी फिर्याद दिली आहे.

 

आरोपी साधुराम वाघमारे याचा टेलरिंगचा व्यवसाय आहे. तर, संतोष अशोक सूर्यवंशी यांची खाणावळ आहे. सूर्यवंशी हे आरोपी वाघमारे याला जेवणाचे डबे देतात. वाघमारे यांनी जेवणाचे पैसे धनादेशाद्वारे दिले होते. मात्र, तो धनादेश बाऊन्स झाला. त्यामुळे सूर्यवंशी हे आरोपी वाघमारे याच्याकडे पैसे मागण्यास आले होते, असे पोलिसांनी सांगितले.

 

पैसे देण्यावरून बुधवारी रात्री त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. आरोपींकडे लाकडी दांडके, हॉकिस्टिक अशी धारदार हत्यारे होती. त्याचवेळी पोलीस नाईक विक्रम जगदाळे पोलिसांसह हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यांची भांडणे सोडविण्यास गेले होते. त्यावेळी आरोपींनी पोलिसांनाच अपशब्द वापरून लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण केली. तसेच धमकी दिल्याचे, पोलिसांनी सांगितले. वाकड पोलीस तपास करत आहेत.

24 Mar 2017

एमपीसी न्यूज - सख्या चुलत्यानेच सात वर्षाच्या अल्पवयीन पुतणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आज (शुक्रवारी) पिंपरी परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी चुतल्याला ताब्यात घेण्यात आले आहे. 

याप्रकरणी 28 वर्षीय चुलत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्याच्यावर बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पास्को) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत पीडित मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चुलता आणि मुलीचे आई-वडील एकत्र राहत आहेत. रविवारी मुलीची आई कामावर गेली होती. त्यावेळी मुलगी एकटी घरी असताना चुलत्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीने आपल्या आईला आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.

मुलीच्या आईने आज शुक्रवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चुलत्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे. पिंपरी ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत तपास करत आहेत.

24 Mar 2017

तब्बल 14 लाखांच्या चरस सह एक स्विफ्ट कार जप्त

 

गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाची कारवाई

 


एमपीसी न्यूज - पुणे-नगर रोडवरील फिनिक्स मॉलसमोर अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी 5 जणांना दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली. कारवाईत यामध्ये 13 लाख 80 हजार किमतीचे (3 किलो 450 ग्रॅम) चरस  यासह 6 लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार जप्त करण्यात आली. काल (गुरुवारी) रात्री पावणेअकरा वाजता ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेले पाचही आरोपी अहमदनगर येथील आहेत.

 

समाधान दत्तू गोरे (वय 25 रा. मु. पो. महीम , ता. सांगोला जिल्हा अ.नगर) असाराम गणपत गोपाळघरे (वय 28 रा. मु. पो. नागोबाची वाडी, पोष्ट खर्डा, ता. जामखेड अ. नगर) वैजनाथ रामा सांगळे  (वय 29 रा. मु आनंदवाडी, पोस्ट नायगाव, ता. जामखेड जि. अ. नगर) भास्कर दत्तू गोपाळघरे (वय 27, रा.मु नागोबाची वाडी पो खर्डा, ता. जामखेड जि. अ.नगर ) फिरोज इकबाल पंजाबी (वय 37 रा. जि. अहमदनगर), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा प्रतिबंधक पथकातील पोलिसांना काल रात्री पुणे-नगर रोडवरील फिनिक्स मॉलसमोर या पाचही आरोपींकडे अमली पदार्थ बाळगले असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर तातडीची कारवाई करीत सर्व माल जप्त करीत त्यांना अटक करून विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विमानतळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

पोलीस उपायुक्त पी.आर. पाटील, सहाय्यक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाने केली कारवाई.

24 Mar 2017
एमपीसी न्यूज - बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवारी) सकाळी अकराच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली. 
 

रवी माने (वय 30) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. 
 

पिंपळे सौदागर येथे सुरु असलेल्या एका बांधकाम साईटवर रवी काम करत होता. शनिवारी सकाळी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर काम करत असताना तो अचानक खाली पडला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
 

मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरीतील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेण्यात आला आहे.

24 Mar 2017

एमपीसी न्यूज - सहा जणांच्या टोळक्याने एका महिलेला 'तुमच्या घराशेजारची जागा आम्हाला विकली आहे, ती जागा तुम्ही खाली करा. अन्यथा तुमचे राहते घर तोडून टाकण्याची, धमकी दिली. हा प्रकार काळेवाडीतील ज्योतिबानगर येथे बुधवारी (दि.22) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला.

 

सचिन नढे (रा. काळेवाडी) याच्यासह सहा जणाविरूद्ध वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी जयराणी पिल्ले (वय 53, रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

 

सचिन नढे याच्यासह त्याचे पाच साथीदार पिल्ले यांच्या घरासमोर गेले. सचिनने पिल्ले यांना तुमच्या घराशेजारची जागा योगेश कदम यांनी मला विकली असल्याचे सांगितले. त्यामुळे ती जागा तुम्ही खाली करा. घराचा दरवाजा बंद करा.  अन्यथा तुमचे राहते घर तोडून टाकू, अशी धमकी दिल्याचे, फिर्यादीत नमूद केले आहे. वाकड ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव तपास करत आहेत.

24 Mar 2017

एमपीसी न्यूज - भर दिवसा रस्त्यावर पार्क केलेल्या मोटारीचा दरवाजा उघडून  चोरट्यांनी 18 हजार रुपयांची रोकड चोरून नेली.  ही घटना आज (गुरुवारी) दुपारी एकच्या सुमारास पिंपरी चौकात घडली.

 

याप्रकरणी बिल्वा उदय देव (वय 32, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

बिल्वा देव यांनी त्यांची इंडिका मोटार (एमएच 14, एएम 9877) ही गुरुवारी दुपारी पिंपरी चौकात गांधीनगरकडे जाण्याच्या दिशेच्या रस्त्यावर लॉक करून पार्क केली होती. त्यावेळी आलेल्या चोरट्यांनी मोटारीचा दरवाजा उघडून मोटारीतील ठेवलेल्या पर्समधील 18 हजार रुपयांची रोकड आणि महत्वाची कागदपत्रे चोरून नेली. चोरट्यांनी पर्स तिथेच फेकून दिली आहे. दिवसा-ढवळ्या मोटारीचा दरवाजा उघडून रोकड लंपास केल्याने परिसरात घबराट पसरली होती. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

 

दरम्यान, मोरवाडी येथे दुपारी एकच्या सुमारास मोटारीची काच फोडून लॅपटॉप आणि रोकड लंपास केल्याची माहिती मिळत आहे. मात्र, पोलिसांनी याला दुजोरा दिला नाही. परराज्यातील टोळी पिंपरी-चिंचवड शहरात आली आहे. मोटारीची काच फोडून रोकड आणि साहित्य चोरून नेत असल्याचे, पिंपरी पोलिसांनी सांगितले.

24 Mar 2017

मुलगा न झाल्याचा रागातून केले कृत्य

 

मृतदेह लपवून केला अपहरणाचा बनाव

 

एमपीसी न्यूज - आपल्याला मुलगा नाही व जावेला आहे. या कारणामुळे तसेच कायम टोचून बोलले जात असल्याच्या रागातून 5 वर्षाच्या सख्या पुतण्याचा गळा आवळून खून करून घराजवळील पाण्याच्या ड्रममध्ये मृतदेह लपवून ठेवणाऱ्या या नराधम महिलेला कोणताही पुरावा नसताना तपास कौशल्य वापरून हडपसर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने 24 तासात अटक केली.

 

माणुसकी व नातेसंबंधांना काळिमा फासणाऱ्या या घटनेने हडपसर परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. माऊली विनोद खांडेकर (वय 5, रा. काळेपडळ, हडपसर), असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अनिता खांडेकर (वय 32, रा. काळेपडळ) हिला अटक करण्यात आली आहे.

 

हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता हिला चार मुली आहेत. त्यामुळे सासू तिला टोचून बोलत व रागराग करत. तीन भावांमध्ये फक्त धाकट्या जावेलाच माऊली हा एकटाच मुलगा होता. त्यामुळे त्याचे घरात लाड होत असे तर अनिताच्या मुलींचा लाड होत नसे.

 

या असूया व रागातून थंड डोक्याने तिने माऊलीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह घरातील कॅाटखाली ठेवला, आणि नंतर घरातील मंडळी आणि पोलीस मुलाच्या शोधात घराबाहेर पडल्याची संधी साधून घरामागील पाण्याच्या ड्रममध्ये तिने मृतदेह टाकला. त्यानंतर माऊली बेपत्ता झाल्याचा बनाव तिने केला. शोधाशोध करूनही माऊली मिळून न आल्याने तो बेपत्ता झाल्याची तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात गुरुवारी कुटुंबीयांनी दिली. कुटुंबीय व पोलीस माऊलीचा शोध घेत होते.

 

दरम्यान, शेजारील महिलेच्या दोन महिन्यापूर्वी चोरलेल्या सिमकार्डद्वारे अनिताने माऊलीच्या वडिलांना निनावी फोन करून माऊली जेजुरी रेल्वे स्टेशनवर असल्याचे सांगितले. घरातील मंडळी माऊलीला शोधण्यासाठी जावीत व मृतदेहाची विल्हेवाट लावावी हा अनिताचा हेतू होता. अखेर फोन केलेल्या सिमकार्डच्या आधारे पोलीस अनितापर्यंत पोहोचले. या कार्डवरूनच तिने दीड महिन्यापूर्वी भावालादेखील फोन केल्याचे तपासात उघड झाले. त्यामुळे अनितानेच हा खून केला असावा, असा संशय बळावला. त्या आधारे अनिताची चौकशी केली. मात्र, अनिता सुरुवातीला पोलिसांना दाद देत नव्हती. अखेर पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. गुन्हे पोलीस निरीक्षक अंजूम बागवान सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने 24 तासांत खुनाचा तपास केला.

Page 1 of 13