क्राईम न्यूज

क्राईम न्यूज (74)

26 Feb 2017

एमपीसी न्यूज - दहावीच्या परिक्षेच्या अभ्यासाचे दडपण आल्याने विद्यार्थ्याने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी (दि.25) रात्री साडेआठच्या सुमारास निगडीतील, त्रिवेणीनगर येथे उघडकीस आला.


अथर्व संतोष पाटील वय (वय 16, रा. त्रिवेणीनगर, निगडी), असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.


अथर्व हा दहावीच्या वर्गात शिकत होता. काही दिवसावर दहावीची परीक्षा येऊन ठेपली आहे. परिक्षेचे  त्याच्यावर दडपण होते. अथर्व शनिवारी त्याच्या खोलीमध्ये अभ्यास करत बसला होता. रात्री उशीर झाला तरी त्याने दरवाजा उघडला नव्हता. त्यामुळे घरच्यांनी दरवाजा ठोठवला असता आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा तोडला असता अथर्व गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.


दहावीच्या परिक्षेचे दडपण असल्याने आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहिले, असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.

26 Feb 2017
 
एमपीसी न्यूज - बोपीडी येथील हॅरीस पुलावरुन नदीपात्रात उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या एका तरुणीला कामगारांनी आणि सुरक्षारक्षकांनी जीवनदान दिले. ही घटना आज (रविवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. 
 
तरुणी पिंपरी, संत तुकारामनगर येथील रहिवाशी आहे. तिच्यावर बोपोडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
 
रविवारी सकाळी बोपोडी येथील हॅरीस पुलावरुन  एका 18 वर्षाच्या मुलीने नदीपात्रात उडी मारली. पुलाचे काम करणा-या कामगारांनी आणि सुरक्षारक्षकांनी मुलीने उडीमारल्याचे पाहिले. त्यांनी लगेच नदीपात्रात उडी मारुन तिला बाहेर काढले. त्यामध्ये ती जखमी झाले आहे. तिच्यार बोपोडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे, खडकी पोलिसांनी सांगितले.  
कामगारांच्या आणि सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे मुलीचे प्राण वाचले. खडकी पोलीस व मुलीचे वडील घटनास्थळी आले आहेत.
26 Feb 2017

 

सैन्य दलातील अधिकाऱ्यांचा समावेश असण्याची दाट शक्यता

 

हडपसर येथील भेकराई नगर येथे आज होणाऱ्या सैनिक भरतीचा सराव पेपर लीक आला आहे. आज होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यासाठी 70 ते 80 जणांकडून प्रत्येकी 3 लाख रुपये घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे .या प्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली असून या प्रकरणामध्ये सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे.

 

संतोष शिंदे आणि धनाजी जाधव असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुण्यातील भेक्राईनगर येथे आज सैन्य दलातील भरतीसाठी लेखी परीक्षा होती. त्यासाठी आरोपींनी 70 ते 80 उमेदवारांना भेकराई नगर येथे काल रात्री अकरा वाजता बोलावले होते. त्यानंतर त्यांच्याकडून प्रत्येकी 3 लाख रुपये घेत व्हाट्सअपद्वारे त्यांना प्रश्नपत्रिका दिली.

 

ठाणे पोलिसांना याची सर्वप्रथम माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर सहायक आयुक्त सुरेश भोसले युनिट एकचे विनोद पाटील व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करत 8 आरोपीनी अटक केली. ठाणे पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत १८ आरोपींसह ३५० विद्यार्थ्यांना ठाणे, पुणे, नाशिक, नागपूरसह गोव्यात शनिवारी रात्री उशीरा छापे टाकून आरोपी आणि विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.

 

ही प्रश्नपत्रिका नागपूरहून फुटली असून सैन्य दलातील अनेक बडे अधिकाऱ्यांचा या प्रकरणात समावेश असण्याची दाट शक्यता आहे.

यातील आरोपी धनाजी जाधव याच्यावर यापूर्वीही सैन्य दलातील भरती घोटाळ्यासंदर्भत गुन्हा आहे. हा देशव्यापी घोटाळा असण्याची देखील शक्यता आहे.

25 Feb 2017

एमपीसी न्यूज - महापालिका निवडणुकीत कोणाचे काम करत होता आणि गाडी वेडीवाकडी का चालवतोस, असे म्हणत तिघांनी एका तरुणाला लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना आज (शनिवारी) दुपारी सव्वातीनच्या सुमारास वाकड येथे घडली.

 

या प्रकरणी तेजस गंगाराम देवकर (वय 32), चंद्रकांत भाऊसाहेब देवकर (वय 50, दोघे रा. देवकर वस्ती, वाकड) आणि विनोद हनुमंत वाकडकर (वय 36, रा. वाकडवस्ती, वाकड) यांच्याविरोधात कलम 324, 144, 341, 142, 143, 144, 146, 147, 148, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अक्षय तानाजी कलाटे (वय 20, रा. कलाटे वस्ती, वाकड) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

अक्षय हा वाकड येथून जात होता. त्यावेळी आलेल्या तेजस, विनोद आणि चंद्रकांत या तिघांनी महापालिका निवडणुकीत तू कोणाचे काम करत होता आणि गाडी वेडीवाकडी का चालवतोस, असे म्हणत अक्षय याला लाकडी दांडक्याने आणि हाताने बेदम मारहाण केली, असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

25 Feb 2017

एमपीसी न्यूज - पोलीस असल्याचे भासवून गुटखा विक्रेत्यांकडून जबरदस्तीने पैसे घेणा-या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. ही कारवाई काल (24 फेब्रुवारी) सिंहगड कॉलेजच्या परिसरात करण्यात आली.

 

रामधन संदीपान गिलबिले (वय-30, रा.आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) आणि दीपक भिलाजी आळणी (वय-50, रा.सोमवार पेठ, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे पथकातील पोलीस कर्मचारी बाबासाहेब नरळे यांना सिंहगड कॉलेज परिसरात दोन व्यक्ती पोलीस असल्याच्या नावाखाली गुटखा विक्रेत्यांकडून पैसे वसूल करत असल्याची बातमी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वरील आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता 10 हजार रुपये सापडले.

 

पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. यातील दुसरा आरोपी दीपक आळणे याने पोलीस असल्याचे भासवून पानटपरी चालक मोहनलाल बोराणा यांच्याकडून 10 हजार रुपये घेतले. या प्रकरणी बोराणा यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शेखर शिंदे अधिक तपास करीत आहेत.

25 Feb 2017

एमपीसी न्यूज - चिखलीतील उच्चशिक्षित नवदाम्पत्याच्या आत्महत्येप्रकरणी मुलाच्या भावाला अटक करण्यात आली आहे. तर, आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 19 फेब्रुवारीला रात्री आठच्या सुमारास चिखली येथे उघडकीस आली होती.

 

अभिजीत विलास ढमाले (वय 25, रा. साने चौक, चिखली) याला अटक करण्यात आली आहे. तर, आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत विलास ढमाले (वय 25) व अश्विनी अनिकेत ढमाले (वय 22) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी अश्विनीचे वडील संभाजी गायकवाड (वय 48, रा. चांदखेड, मावळ) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

अनिकेत हा मेकॅनिकल इंजिनिअर तर अश्विनी ही फॅशन डिझायनर होती. त्यांचे 13 महिन्यांपूर्वीच एक जानेवारी 2016 ला त्यांचे लग्न झाले होते. अश्विनीला तीचा दीर अभिजीत आणि सासू घरगुती कारणावरून छळ करून तिला आणि नवरा अनिकेत याला मानसिक त्रास देत होते. 17 फेब्रुवारी रोजी दीर अभिजीत याने अश्विनीला मारहाण केली होती. 19 फेब्रुवारी रोजी घर झाडण्याच्या कारणावरून सासूने अश्विनीला शिवीगाळ केली होती. तसेच घरातून बाहेर काढण्याची धमकी दिली होती. 

 

अश्विनी आणि अनिकेत यांना हे सहन न झाल्याने त्यांनी राहत्या घरात फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या करत असल्याबाबतचे पत्र लिहून गायकवाड यांच्या मुलाच्या मोबाईल व्हॉट्सअॅपवर पाठविले होते. दीर अभिजीत आणि सासूने आत्महत्या पत्र घटनास्थळावरून नष्ट केले आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे. निगडी ठाण्याचे फौजदार ए. एम. आठरे तपास करत आहेत.

25 Feb 2017

एमपीसी न्यूज - कार आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर, मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 23) रात्री अकराच्या सुमारास बालाजीनगर, भोसरी येथे घडली.

 

सुनील कृष्णाजी सोमण, असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर, त्यांचा मुलगा केयूर सोमण हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी कार चालक युवराज मडोळा आप्पा चिंद्रे (वय 40, रा. रहाटणी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सुनील यांच्या पत्नी माधुरी सोमण (वय 44, रा. भोसरी) यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील सोमण आणि त्यांचा मुलगा केयूर गुरुवारी रात्री भोसरी येथून दुचाकीवरून जात होते. बालाजीनगर येथून जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामध्ये सुनील यांचा मृत्यू झाला आहे. तर, त्यांचा मुलगा केयूर हा गंभीर जखमी झाला आहे. एमआयडीसी ठाण्याचे पोलीस हवालदार एस. जे. पांडगळे तपास करत आहेत.

25 Feb 2017
एमपीसी न्यूज - ट्रकला ओव्हरटेक करत असताना पाठीमागून आलेल्या मोटारीने धडक दिल्याने ट्रकच्या चाकाखाली अडकून  फोर्स मोटार्समध्ये काम करणा-या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 24) रात्री आठच्या सुमारास देहूरोड येथील केंद्रीय शाळेसमोर घडला. 
 

विजय धनाजीराव देशमुख (वय 22, रा. तळेगाव दाभाडे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरकणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय हा मूळचा साता-याचा रहिवाशी आहे. तळेगाव दाभाडे येथे तो बहिणीकडे राहत होत. फोर्स मोटार्स कंपनीत तो नोकरी करत होता. शुक्रवारी रात्री विजय पुणे-मुंबई महामार्गावरुन तळेगावरुन पुण्याच्या दिशेने दुचाकीवरुन जात होता.
 

देहूरोड येथील केंद्रीय शाळेसमोरुन जात असताना विजय ट्रकला ओव्हरटेक करत होता. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या एका मोटारीने त्याच्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने विजय ट्रकच्या चाकाखाली जाऊन पडला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

25 Feb 2017
एमपीसी न्यूज - चाकण येथील महाराजा गृपचे अध्यक्ष गणेश नाणेकर यांच्यावर चाकणजवळ धारदार हत्याराने अज्ञातांनी वार केले. या घटनेत नाणेकर यांच्या डोक्यात आणि पोटात चॉपरने वार करण्यात आले असून ते गंभीर जखमी झाले आहेत.
 
शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. हल्लाखोर कोण आहेत तसेच या हल्ल्यामागील कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.  नाणेकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
25 Feb 2017

एमपीसी न्यूज - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल रात्री स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि अखिल भारतीय परिषदेचे (अभाविप) विद्यार्थी या दोन विद्यार्थी संघटनांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात दोन्ही संघटनांनी परस्पराविरोधी तक्रार दिली असून दोन्ही संघटनेच्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली असून आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

 

याप्रकरणी अभाविपच्या राम सातपुते, राहुल चंदल, ऋषीकेश सरगर, आणि करण शिर्के यांना अटक केली तर  एसएफआयच्या नाशिर शेख, सतीश पडवलेकर, सतीश दुबडे आणि संदीप अशी अटक केलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

 

दिल्लीतील जेएनयूचा वादग्रस्त विद्यार्थी उमर खालीदला बोलावण्यास अभाविपने विरोध केला आहे. याच्याच निषेधार्थ पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातही काल अभाविपने निदर्शने केली होती. त्यानंतर संध्याकाळी एसएफआयचे कार्यकर्ते अभाविपच्या निषेधाची पोस्टर्स लावत असताना ही हाणामारी झाली. तर सोलापूरच्या विद्यार्थ्यांना विनोद तावडेंनी दिलेली कथित धमकी, सोलापूरचे आमदार सुधाकर परिचारक यांचे जवानांचा अवमान करणारे विधान याचा निषेध करण्यासाठी  एसएफआय आंदोलन करणार आहे. त्याची तयारी म्हणून पोस्टर लावली जात असताना अचानक अभाविपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप एसएफआयने केला आहे.

Page 1 of 6