23 Mar 2017

एमपीसी न्यूज - पोलिसात तक्रार दिल्यास कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केल्याप्रकरणी एकाविरूद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

तात्या सुवरे (रा. पडवळनगर, थेरगाव), असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रमेश गुप्ता (वय 30, रा. जगतापनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

रमेश हे त्यांचे मेहुणे अभिषेक गुप्ता, शेजारी रहणारे गौतम गुप्ता यांच्यासह साडू नारायण गुप्ता (रा. क्रांतीवीरनगर, थेरगाव) यांच्याकडे गेले होते. नारायण यांच्या दुकानासमोर ते थांबले असता आरोपी सुवरे त्याठिकाणी आला. 'माझ्याकडे रागाने का पाहतोस, असे म्हणत माझ्या भावाला तडीपार केले असून मलाही येथे राहण्याची इच्छा नाही. तू माझ्या विरोधात पोलिसात तक्रार दिल्यास तुझ्या कुटुंबाला जीवे मारील, अशी धमकी देत रमेशला मारहाण केली.

 

पोलीस हवालदार एच. जी. पानसरे तपास करत आहेत.

23 Mar 2017

एमपीसी न्यूज - गुन्हे शाखा युनिट पाचने केलेल्या कारवाईत हडपसर परिसरातील गोंधळेनगर येथून एका सराईत चोरट्यास जेरबंद केले आहे. त्याच्याकडून आठ घरफोडी आणि पाच वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले असून त्याच्या ताब्यातून चार लाख अडतीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही चोरीचे 25 गुन्हे दाखल आहेत.

 

रफिक हुसेन शेख (वय-22, सय्यदनगर, हडपसर, पुणे) असे जेरबंद केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखा युनिट पाचचे कर्मचारी भेकराई येथे 18 मार्च रोजी झालेल्या घरफोडीचा तपास करत असताना पोलीस हवालार लक्ष्मण शिंदे आणि माणिक पवार यांना संबंधित आरोपी गोंधळेनगर परिसरात चोरी करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याजवळ असलेल्या बॅगमधून लोखंडी कटावणी, सायकल स्टँड, दोन स्क्रू ड्रायव्हर आणि तीन तुटलेली कुलुपे आढळली.

 

पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने पुणे शहरातील हडपसर, वानवडी, मुंढवा, कोंढवा, सहकारनगर, भारती विद्यापीठ, लष्कर, फरासखाना, येरवडा या भागात घरफोड्या आणि वाहनचो-या केल्याचे कबूल केले. दिवसा टेहळणी करून त्यानंतर तो घरफोडी करत असे. त्याच्याकडून आतापर्यंत 13 गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यातील सोन्याचे गंठण, नेकलेस, चैन, कानातील झुमके, टॉप्स, लेडीज अंगठ्या असा एकूण 4 लाख 38 हजार 645 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास गुन्हे शाखा युनिट पाचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे करीत आहेत.

23 Mar 2017
एमपीसी न्यूज - पोलीस हवालदाराची पत्नी मुलांसाठी बिस्कीट आणण्यासाठी दरवाजाला कडी लावून गेली असता अवघ्या पंधरा मिनिटात चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने आणि 50 हजाराची रोकड, असा सव्वालाख रुपये किमतीचा ऐवज लांबविला.  ही घटना वाकड येथील कावेरीनगर पोलीस वसाहतीत मंगळवारी (दि.21) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. 

कैलास केंगले (वय 30, रा. कावेरीनगर वसाहत, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 
केंगले हे सांगवी पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. 21 मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास केंगले यांच्या पत्नी दरवाजाला कडी लावून मुलांसाठी बिस्किट आणण्याकरिता जवळच्या दुकानात गेल्या होत्या. पंधरा मिनिटात बिस्कीट घेऊन त्या घरी आल्या असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. 

चोरट्याने दरवाजाची कडी उघडून शयनगृहातील कपाटामधील पावणेदोन लाखाचे सोन्याचे दागिने आणि 50 हजाराची रोकड असा सव्वादोन लाख रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. वाकड ठाण्याचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव तपास करत आहेत.

23 Mar 2017

एमपीसी न्यूज - पिंपळेगुरव, देवकर पार्क येथील साई अंगण या इमारतीच्या तिस-या मजल्यावरील जिन्यावर (गुरुवारी) 10 ते 15 दिवसांची मुलगी सापडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

 

याप्रकरणी इमारतीमधील रहिवाशी भानुदास रामभाऊ वैद्यकर (वय 48) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पिंपळेगुरव येथे साई अंगण या नावाने इमारत आहे. दुपारी दोनच्या सुमारास इमारतीच्या तिस-या मजल्यावरील पाय-यांवर एक लहान बाळ रडत असल्याचे वैद्यकर यांच्या लक्षात आले. याबाबत सांगवी पोलिसांना कल्पना दिली. पोलीस त्वरीत घटनास्थळी गेले. त्यांनी 10 ते 15 वर्षाच्या मुलीला पोलीस ठाण्यात नेले आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

23 Mar 2017

एमपीसी न्यूज - 'तू माझ्या मुलीचे वाटोळे केले आहे', असे म्हणत सासरच्या मंडळींनी घरात घुसून जावयाला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि.20) दुपारी साडेतीनच्या सुमारास यमुनानगर, निगडी येथे घडली.

 

याप्रकरणी सासरे कैलास खंडेराव ठोंबरे, मेव्हुणा अनंत कैलास ठोंबरे, मामा सासरे संभाजी मारुती लांडगे, अतुल भाऊसाहेब बोटे, विकास भाऊसाहेब बोटे आणि सरस्वती बोटे (सर्व रा. चिंचोडी, जिल्हा अहमदनगर) यांच्याविरोधात दंगल माजविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वंसत कोल्हे (वय 55, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

कोल्हे यांचा मुलगा प्रदीप आणि किर्ती यांचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले आहे. लग्नानंतर प्रदीप आणि  किर्ती यांची नेहमी किरकोळ कारणावरून भांडणे होत होती. सोमवारी किर्ती यांच्या वडिलांसह माहेरची मंडळी निगडीत आली.

 

'तू माझ्या मुलीचे वाटोळे केले आहे', असे म्हणत कैलास ठोंबरे व सरस्वती बोटे यांनी प्रदीप यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यावेळी प्रदीपची आई भांडणे सोडविण्यासाठी आल्या असता त्यांनाही मारहाण केल्याचे, पोलिसांनी सांगितले. तसेच किर्तीला आपल्यासोबत घेऊन गेले आहेत. निगडी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप साबळे तपास करत आहेत.

 

दरम्यान, यापूर्वी किर्ती यांनी पती प्रदीप हे मारहाण करत असल्याची तक्रार, यमुनानगर पोलीस चौकीत दिल्याचे, पोलिसांनी सांगितले.

23 Mar 2017

एमपीसी न्यूज - भर दिवसा रस्त्यावर पार्क केलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी  लॅपटॉप आणि रोकड चोरून नेल्याच्या दोन घटना पिंपरी ठाण्याच्या हद्दीत आज (गुरुवारी) दुपारी घडल्या आहेत.  

 

मोरवाडी येथे दुपारी एकच्या सुमारास मोटारीची काच फोडून लॅपटॉप आणि रोकड लंपास केल्याची माहिती मिळत आहे. पिंपरी महापालिका भवनासमोर पार्क केलेल्या मोटारीतील बॅगमध्ये ठेवलेल्या पॉकेटमधील 18 हजार रुपये चोरून नेले आहेत.

 

चोरट्यांनी बॅग रस्त्यावरच फेकून दिली आहे. दिवसा-ढवळ्या मोटारीची काच फोडून लॅपटॉप आणि रोकड चोरून नेल्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाला असून तपास करत आहेत.

 

परराज्यातील टोळी पिंपरी-चिंचवड शहरात आली आहे. मोटारीची काच फोडून रोकड आणि साहित्य चोरून नेत असल्याचे, पिंपरी पोलिसांनी सांगितले.  

23 Mar 2017
 
एमपीसी न्यूज - एका सराईत तडीपार गुन्हेगाराला निगडी पोलिसांनी दोन पिस्तुलांसह जेरबंद केले. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा 70 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आकुर्डी रेल्वेलाईन जवळ करण्यात आली
 
दत्ता गोवर्धन कटारे (वय 23, रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. 
 
निगडी पोलीस हद्दीत गस्त घालत होते. आरोपी दत्ता याच्याकडे पिस्तूल असून तो आकुर्डी रेल्वे लाईनजवळ आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केले. 
 
दत्ता कटारे हा सराईत गुन्हेगार आहे. चिंचवड पोलीस ठाण्यात त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला तडीपार देखील करण्यात आले आहे. तडीपार असूनही तो शहरात फिरत होता, असे पोलिसांनी सांगितले. निगडी पोलीस तपास करत आहेत.
23 Mar 2017

एमपीसी न्यूज - पुणे लष्कर भागातील सेंटर स्ट्रीटवर उत्कर्ष जेम्स अॅण्ड ज्वेलर्स या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी साडेचार लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. ही घटना 20 मार्चला सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास घडली.

 

याप्रकरणी दुकानाचे मालक उत्कर्ष श्रॉफ यांनी तक्रार दिली असून लष्कर पोलीस ठाण्यात दोघा अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला.

 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्या उत्कर्ष जेम्स अॅण्ड ज्वेलर्स या दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने दोघे इसम आले होते.  त्यापैकी एकाने दुकानातील कामगाराची नजर चुकवून बारीक हि-याचे खडे असलेल्या आणि नक्षीकाम असलेल्या साडेचार लाख रुपये किमतीच्या दोन बांगड्या चोरून नेल्या.


पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. गाडे अधिक तपास करीत आहेत.

22 Mar 2017

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेली भांडणे मिटविण्यासाठी आलेल्या एकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. ही घटना 20 मार्च रोजी रात्री 10 वाजता कुदळे चाळ, कोंढवा खूर्द येथे घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांना अटक केली.

 

माणिक आश्रू तायडे (वय-35,  कुदळे वस्ती, शिवनेरीनगर, कोंढवा-खुर्द, पुणे), सुधाकर श्रीकृष्ण ताठे (वय-33, रा.सदर) आणि संतोष प्रभाकर बाभुळकर (वय-25, रा.सदर) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. तर अन्य एक राजू वानखेडे (रा.सदर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गोरू इमाम शेख (वय-55, रा. शिवनेरीनगर, कोंढवा-खुर्द,पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा मुलगा शोहेब गोरु शेख (वय-27) याचे मोन्या व माणिक यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. ते मिटवण्यासाठी तो मित्र मोन्या व दाऊद यांच्यासह माणिक तायडे यांच्या घरी गेले होते. परंतू चिडलेल्या माणिक तायडे याने मोन्या व दाऊद यांना शिवीगाळ करून शोहेब याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

 

सहाय्यक पोलीस निरीक्षक व्हि.पी.वळवी अधिक तपास करीत आहेत.

22 Mar 2017

एमपीसी न्यूज - कासारवाडी येथील रेल्वे सिग्नलजवळील ट्रॅकवर आज (बुधवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास एका 35 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. रेल्वेच्या धक्का लागून मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

 

कासारवाडी येथील रेल्वे सिग्नलच्या जवळ मुंबईकडे जाणा-या ट्रकवर एक मृतदेह पडला असल्याची माहिती बुधवारी सायंकाळी पोलिसांना मिळाली. लोहमार्ग पोलीस आणि पिंपरी पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून मृताचे वय अंदाजे 35 ते 40 असून अद्यापर्यंत ओळख पटली नाही.

 

रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झाला असल्याची शक्यता लोहमार्ग पोलिसांनी वर्तविली आहे. मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. पिंपरी लोहमार्ग पोलीस पुढील तपास करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरीतील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेण्यात येणार आहे.

22 Mar 2017

एमपीसी न्यूज - हॉटेल व्यवसायातून मतभेद झाल्याने भागीदाराने हॉटेलमध्ये घुसून तोडफोड करत कॅश काऊंटरवरील मधील 65 हजाराची रोकड चोरून नेली. तसेच एका मोटारीची काचही फोडली. ही घटना मंगळवारी (दि. 21) मध्यरात्री तीनच्या सुमारास हिंजवडी येथे घडली.

 

याप्रकरणी बोनी सुरकर, अनुज सुरकर यांच्यासह त्यांच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ललितकुमार साळुंखे (वय 31, वीर भद्रनगर, बाणेर) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

ललितकुमार आणि बोनी या दोघांनी हिंजवडीतील बॉटम्स अप हे हॉटेल भागीदारीत चालविण्यासाठी घेतले होते. त्यांच्यामध्ये व्यवसायतून मतभेद झाले. त्यानंतर बोनी हा हॉटेलच्या भागीदारीतून बाहेर पडला होता, असे पोलिसांनी सांगितले.

 

मंगळवारी मध्यरात्री अडीच-तीनच्या सुमारास बोनी, अनुज आणि त्यांचा साथीदार ललितकुमार यांच्या हॉटेलवर आले. हॉटेलमधील कामगारांना दमदाटी केली. साहित्याची तोडफोड करत सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. कॅश काऊंटरवरील 65 हजाराची रोकड चोरून नेली.

 

हॉटेलमध्ये तोडफोड झाल्याचे समजताच ललितकुमार हॉटेलमध्ये आले. त्यांनी मोटार बाहेर पार्क केली होती. त्यानंतर आरोपी पाठीमागून पुन्हा हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी ललितकुमार यांच्या (एमएच 31, एझेड 3333) मोटारीवर दगडफेक करून पाठीमागील काच फोडल्याचे, पोलिसांनी सांगितले. हिंजवडी ठाण्याचे फौजदार पवन पाटील तपास करत आहेत.

22 Mar 2017
एमपीसी न्यूज - तलवारी, हॉकीस्टिक, कोयते अशी धारदार हत्यारे हातामध्ये घेऊन देहूरोडमध्ये दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. याप्रकरणी पसस्परविरोधी फिर्याद देण्यात आली असून दोन गटातील काही जणांना अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.21) दुपारी चारच्या सुमारास देहूरोड येथील आबुशेट रोडवर घडली. 


राहुल कैलास विश्वकर्मा (वय 20, रा. मामुर्डीगाव, देहूरोड) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, कालिदास शिलुराज आयगाप्री (वय 26), अमिर उर्फ वाडी समीर शेख (वय 24, दोघे रा. गांधीनगर, देहूरोड) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे साथीदार सोनु उर्फ डुंगा, महादेव ठेस, हमीद, विनोद उर्फ चुहा, शे-या व इतर पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 
आरोपींनी हातामध्ये धारदार हत्यारे घेऊन दुचाकीवरुन आबुशेट रोडवर  फिरत दहशत माजविली. आरोपी महादेव, वाडी व हमिद यांनी फिर्यादी राहुल याला मोठ्याने ओरडून ''याला पकडा असे म्हणत  शिवीगाळ केली. याला आता जिवंत सोडायचा नाही, याचे दुकान फोडा'' असे म्हणत त्याच्या दिशेने धावत गेले. फिर्यादी पळून जात असताना आरोपी हमिद याने त्याला जोरात लाथ मारली, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. 

 
विकी शिवाजी गणेशन (वय 20, रा. गांधीनगर, देहूरोड) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, राहुल कैलाश विश्वकर्मा (वय 20), रईस मुनीर शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे.  नबी (पूर्ण नाव समजू शकले नाही) याच्यासह त्यांच्या 10 ते 15 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी मंगळवारी दुपारी तलवार, कोयते, लोखंडी पाईप, लाकडी दांडके घेऊन देहूरोड येथील अबूशेट रोडवर आले. फिर्यादी विकी याला ''तुम गांधीनगर के लोगो के बहोत मस्ती आई है'' असे म्हणत लोखंडी रॉडने कपाळावर मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. देहूरोड पोलीस तपास करत आहेत. 


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देहूरोडमध्ये मारामारीचे मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

22 Mar 2017
एमपीसी न्यूज - पुण्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये जळीतकांड सुरु झाले आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञातांनी चिंचवड, पाग्याची तालीम येथील दोन मोटारी जाळल्या आहेत.


चिंचवड येथील पाग्याची तालीम समोरील रस्त्यावर वाहने पार्क केली होती. बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञातांनी दोन मोटारी जाळल्या आहेत. वाहन जाळण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.


चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
22 Mar 2017
सराईत गुन्हेगाराविरोधात गुन्हा 
 

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवत प्रेमसंबंध ठेऊन प्रियकराने विवाहास नकार दिल्याने एका 18 वर्षीय तरुणीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी (दि.5) रोजी दुपारी एकच्या सुमारास महात्मा फुलेनगर, चिंचवड येथे घडला. प्रियकर सराईत गुन्हेगार आहे. 


याप्रकरणी विशाल विष्णु लष्करे (वय 19, रा. रामनगर, चिंचवड) याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पसार आहे. महात्मा फुलेनगर, चिंचवड येथे राहणा-या 18 वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केली आहे. याबाबत तिच्या 45 वर्षीय आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहत होते. आरोपी विशाल हा सराईत गुन्हेगार आहे. पीडित मुलीचे आणि आरोपीचे गेल्या सहा महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. विशाल याने तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर पीडिताने त्याच्याकडे लग्न करण्याची मागणी केली. आरोपीने तुझ्याशी लग्न करणार नाही असे तिला सांगितले आणि  तिचा मानिसक छळ केला. त्यामुळे तिला नैराश्य आले होते. 
 

5 मार्च रोजी तीने नैराश्यातून राहत्या घरी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला उपचारासाठी चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. 10 मार्च रोजी उपचारदम्यान तिचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत. 
 

आरोपी विशाल लष्करे याच्यावर मारामारीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यावेळी तो अल्पवयीन असल्यामुळे बाल न्यायालयातून सुटत होता, असे पोलिसांनी सांगितले.

22 Mar 2017

एमपीसी न्यूज - घरात घुसून खंडणी मागणा-या तिघांना वारजे पोलिसांनी अटक केली. 19 मार्च रोजी सायंकाळी सव्वासहा वाजता ही घटना घडली होती. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


गणेश गुलाबराव मारणे (वय-31, रा.मारणेवाडी, पुणे) याला अटक करण्यात आली तर त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी रवींद्र साळेकर (वय-38, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.


वर नमुद केलेल्या आरोपींनी 19 मार्च रोजी सायंकाळी सव्वासहा वाजता फिर्यादींच्या घरात घुसून त्यांच्याकडे 50 हजाराची खंडणी मागितली. फिर्यादींना पैसे देण्यास नकार देताच त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांची आई भांडणे सोडण्यास गेली असता तिला ढकलून दिले.


याप्रकरणी पोलीस उप निरीक्षक ताथवडे अधिक तपास करत आहेत.

22 Mar 2017

अलका टॉकीज चौकात मंगळवारी लागला होता बॅनर

एमपीसी न्यूज - वाहतूक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्यावर घोळक्याने पैसे गोळा करत असल्याचा बॅनर लावणा-याच्या विरोधात विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अलका टॉकीज चौकात मंगळवारी (21 मार्च) हा बॅनर झळकला होता. याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


अलका टॉकीज चौकातील दर्शनीय ठिकाणी हा बॅनर मोठ्या दिमाखाने झळकत येणा-या जाणा-यांचे लक्ष वेधून घेत होता. या बॅनरवर कायदा सुव्यवस्थेचे वाजले बारा...वाहतूक पोलीस करत आहे चौकाचौकात घोळक्याने पैसे गोळा!!!, वाहतूक सुरळीत करा...लोकांना मोकळा श्वास घेऊ द्या!!!, टार्गेट पूर्ण करण्यासाठी वाहन चालकांचा बळी! यासारखा मजकूर झळकत होता.


विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात इसमावर शहराचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी आणि पोलिसांविषयी खोट्या अफवा पसरवण्याच्या हेतूने बॅनर लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार एस. बी. वाकसे अधिक तपास करीत आहेत.

22 Mar 2017

एमपीसी न्यूज - कोंढवा येथील लुल्लानगर परिसरातील यशश्री रेसिडन्सीच्या पार्किंगमधील 4 दुचाकींना एका गाडीतील शोर्ट सर्किटमुळ मंगळवारी (दि. 21) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. अशी माहिती कोंढवा पोलिसांनी दिली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशश्री रेसीडेंन्सीमधील पार्किंगच्या जागेत 4 दुचाकी होत्या. त्यापैकी एका एक्टिवा गाडीला आग लागण्याची घटना घडली. त्यानंतर पार्किंग मधील इतर 3 दुचाकीनाला आग लागली. हे समजताच सोसायटीमधील नागरिकांनी आग विझवली. मात्र या घटनेत 1 बुलेट आणि 3 एक्टिवा जळाल्या आहेत.


शोर्ट सर्किटमुळे आग लागण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून या घटनेत 4 दुचाकीचे मिळून 2 लाख 10 हजाराचे नुकसान झाले असल्याची माहिती देण्यात आली.

22 Mar 2017

एमपीसी न्यूज - पुणे शहर गुन्हे शाखेने शहरातील केईएम हाॅस्पिटल समोरील एक्सेल लाॅज मधून पाच किलो अफीमसह तिघांना जेरबंद केले. ही कारवाई आज पहाटे एक वाजण्याच्या सुमारास केली.


राणा सोनाराम पटेल (वय 23 रा. गाव जवेर, पटेल अवास, तहसील लोणी, जिल्हा जोधपुर), रुपाराम बहेराम पटेल (वय 25, रा. सदर) आणि सरवण केवलराम पटेल (वय 24 रा. सदर) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. आरोपी एक्सेल लाॅजच्या रुम नंबर 103 मध्ये होते.


आरोपींकडे 5 किलो ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ अफिम (किंमत 12 लाख 50 हजार) होते. त्यांनी ते विक्रीसाठी आणले होते. त्यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करून मुद्देमालासह समर्थ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.


ही कारवाई पोलीस उपायुक्त पी.आर. पाटील, सहाय्यक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाने केली.
Page 1 of 13