24 Apr 2017

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तीन ते चार जणांच्या टोळक्याने दोन तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 23) रात्री साडेआठच्या सुमारास रहाटणी येथील कुणाल हॉटेलच्या मागे सुरू असलेल्या मेळ्यात घडली. जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून वाकड पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

राहुल सावंत (वय-21, रा. थेरगाव) आणि भरत पालमपल्ले (वय-23, रा. पिंपळे सौदागर), अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर दीपक धोत्रे, आकाश (संपूर्ण नाव माहित नाही), अक्षय शिंदे व त्यांच्या इतर साथीदरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल सावंत याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल आणि दीपक यांच्यामध्ये पूर्वी भांडण झाले होते. राहुल हा काल रात्री रहाटणी येथे सुरू असलेला मेळा पाहण्यासाठी गेला होता. मेळ्याच्या गेटवर राहूल आणि भरत थांबले होते. त्यावेळी आरोपींनी पूर्वीच्या भांडणवरून राहुल आणि भरत वर कोयत्याने वार केले. यामध्ये दोघांच्याही हातावर गंभीर वार झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

24 Apr 2017

एमपीसी न्यूज - घरगुती कारणावरून पती आणि सासरच्या लोकांकडून होणारा त्रास सहन न झाल्याने रेल्वेखाली आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी (दि.19) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विवाहित महिलेने आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली होती.

 

रुपाली शैलेश मोकल (वय-37, रा. लोटस प्लस बिल्डींग, आकुर्डी), असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर पती शैलेश दत्तात्रय मोकल (वय-40), अशिष दत्तात्रय मोकल, राजेंद्र काशीनाथ मोकल (सर्व रा. लोटस प्लस बिल्डींग, आकुर्डी) यांच्यासह कार्लेखिंड ता. अलिबाग येथील तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रुपालीचे वडील रवींद्र पाटील (वय-66, रा. खिडकी कामारले, ता. अलिबाग) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली आणि शैलेश यांचा विवाह पंधरा वर्षापूर्वी झाला असून त्यांना 14 वर्षांचा एक मुलगा आहे. सासरच्या मंडळींनी घरगुती कारणावरून रुपालीचा छळ करत होते. वेळोवेळी माहेराहून पैसे आणण्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात येत होता. या छळाला कंटाळून रुपालीने बुधवारी सायंकाळी आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वे खाली आत्महत्या केली. रुपाली हिच्या आत्महत्येस सासरची मंडळी आणि तिचा पती जबाबदार असल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिली आहे. वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

 

निगडी पोलीस तपास करत आहेत.

24 Apr 2017

एमपीसी न्यूज - भिशीच्या पैशांची वारंवार मागणी करूनही पैसे देत नसल्याने एका इसमाला भिशीच्या कार्यालयात डांबून ठेवून मारहाण केली. तसेच त्याच्या बँक खात्यामधून आरटीजीएसद्वारे 80 हजार रुपयांची रक्कम आपल्या खात्यात जमा केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.21) सकाळी साडेअकराच्या सुमारास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आऊटगेट जवळ घडला.


राजू शिंदे (वय- 45, रा. भागवत गीता मंदिराजवळ, खराळवाडी), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर या प्रकरणी रामेश्वर बाळकृष्ण मोहाडीकर (वय-53, रा. विशालनगर, पिंपळे निलख) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कडाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही पिंपरी-चिंचवड महापालिकेत काम करतात. मोहाडीकर यांनी शिंदे यांच्याकडे भिशी लावली होती. मोहाडीकर यांच्याकडून भिशीची काही रक्कम येणे असल्याने शिंदे याने त्यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली. परंतु पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने शिंदे याने शुक्रवारी पालिकेच्या आऊटगेट जवळून त्यांना गाडीत बसवून भिशीच्या कार्यालयात घेऊन गेला. या ठिकाणी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. मोहाडीकर यांच्या बँकेच्या आरटीजीएस फॉर्मवर सही घेऊन त्यांच्या खात्यामधील 80 हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा करून घेतले. त्यानंतरही शिंदे याने मोहाडीकर यांना सोडून न देता सायंकाळी पाच वाजेपर्यंत डांबून ठेवले.


पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

24 Apr 2017

एमपीसी न्यूज - अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातातील जखमींचा मृत्यू झाला आहे. या गुन्ह्यामध्ये अद्याप कोणालाही अटक झाली नाही. या अपघातांमध्ये एका कामगाराचा आणि पेस्ट कंट्रोलचे काम करणा-यांचा समावेश आहे.

 

पनावळे येथे झालेल्या अपघातात राजू डे (वय-45, रा. कोयतेवस्ती, पुनावळे) या कामगाराचा मृत्यू झाला. तर डांगे चौकामध्ये झालेल्या अपघातात विठ्ठल गुलाब राठोड (वय-23, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) या पेस्ट कंट्रोलचे काम करणा-या तरुणाचा मृत्यू झाला.

 

राजू डे हे शुक्रवारी (दि.14) बेंगलोर महामार्गावर रात्री बाराच्या सुमारास रस्ता ओलांडत होते. त्यावेळी त्यांना अज्ञात वाहनाची धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शुक्रवारी (दि. 21) पहाटे तीनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून शहाजी मोहन मातंग (वय-25, रा. पुनावळे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

दुस-या घटनेत विठ्ठल राठोड हा पेस्ट कंट्रोलचे काम करतो. शनिवारी (दि.22) रात्री साडेअकरा ते पावणेबाराच्या सुमारास तो काम संपवून घरी जात होता. डांगे चौकाजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहन चालकाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने राठोडला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु रविवारी (दि.23) रात्री साडेअकराच्या सुमरास त्याचा मृत्यू झाला.

 

हिंजवडी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, विठ्ठलचा मामेभाऊ आशिष चव्हाण (वय-27, रा. चिंचवडेनगर, चिंचवडगाव) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

24 Apr 2017

चिंचवड पोलिसांची कारवाई

 

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर पिस्टल बाळगणा-या दोन सराईत गुन्हेगारांना चिंचवड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक लाख रुपयांची दोन पिस्तूल आणि तीन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई काल (रविवार) रात्री साडेनऊच्या सुमारास प्रेमलोक पार्क येथे करण्यात आली. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न या प्रकारचे गुन्हे असून खुनाच्या गुन्ह्यात फरार होते.

 

दिनेश पुखराज रेणवा (वय 21, रा.मोरेवस्ती, साने चौक, चिखल) आणि अक्षय प्रभाकर साबळे (वय-23, रा. शितळा देवी चौक, आकुर्डी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री गस्त सुरू असताना तपास पथकातील पोलीस नाईक जयवंत राऊत यांना दोनजण प्रेमलोक पार्क येथे उभे असल्याची माहिती मिळाली. हे दोघेजण काहीतरी विक्री करण्यासाठी आले असल्याचे समजले. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांची अंगझडती घेतली असता दिनेश रेणवा याच्या जवळ एक गावठी बनावटी पिस्टल आणि पॅन्टचे खिशात दोन जीवंत काडतुसे मिळून आले. तर अक्षय साबळे याच्याकडे असेलेल्या कॅरीबॅगमध्ये एक लोखंडी गावठी कट्टा व एक जीवंत काडतूस मिळून आले.

 

पोलिसांनी या दोघांकडून एक लाख 20 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एक महिन्यापूर्वी वाल्हेकर वाडीमध्ये तरुणाला बेदम मारहाण करून लुटल्याची घटना घडली होती. तर अशाच प्रकारची आणखी एक घटना वाल्हेकरवाडी येथे घडली होती. चौकशी दरम्यान हे दोन्ही गुन्हे अटक करण्यात आलेल्या आरोपींनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

अक्षय साबळे हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा आहे तर निगडी पोलीस ठाण्यात गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये तो फरार होता.

 

चिचंवड पोलीस तपास करीत आहेत.

 

bekaya pistul

24 Apr 2017
एमपीसी न्यूज - पती पत्नीच्या भांडणानंतर पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. माऊली गार्डन, बाणेर येथे ही घटना काल (रविवारी) सकाळच्या सुमारास घडली. 
 
शोभा शेरबहाद्दुर थापा (वय 40 रा. उज्वल शिरीन, बी बिल्डिंग, माऊली गार्डन, बाणेर ) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून शेरबहाद्दुर थापा (रा.उज्वल शिरीन, बी बिल्डिंग, माऊली गार्डन, बाणेर  मुळ रा. नेपाळ) असे खून करणा-या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पुजा किसन राठोड  (वय 25, रा. खराबवाडी,  चाकण, मुळ रा. औसा, लातूर ) यांनी चतुश्रंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
 
 
शोभा थापा आणि शेरबहाद्दु यांच्यामध्ये काही कारणावरुन भांडणे झाली. यानंतर रागाच्या भरात शेरबहाद्दुर याने दोरीच्या सहाय्याने पत्नी शोभा हिचा गळा आवळून खून केला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. तपास सहायक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे करीत आहेत.
24 Apr 2017

एमपीसी न्यूज - भोसरी येथील गावजत्रा मैदानाजवळ 35 ते 40 वर्षीय तरुणाचा डोक्यात दगड मारून खून करण्यात आला. हा प्रकार आज सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आला असून मृतदेहाची ओळख पटली नाही. दरम्यान, तो बाहेरगावचा असून, मजूर काम करणार असण्याची शक्‍यता आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडुरके यांनी दिली.

 

भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे सभागृहाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत एक पत्रावजा शेड आहे. त्या पत्र्याजवळ संबंधित व्यक्तीला मारले. त्यानंतर त्याला फरफटत पुढे नेले. दगडाने त्याला मारहाण करून त्याचा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच्याजवळ त्याची ओळख पटेल, अशी कोणतीच वस्तू आढळून आली नाही. त्याच्याकडे एक तंबाखूची पूडी आणि मोबाईल चार्जर मिळून आला आहे.

 

वय अंदाजे 35 ते वर्षे, अंगात पांढरा शर्ट आणि ग्रे रंगाची मळकट पॅन्ट असे त्या मृतदेहाचे वर्णन आहे. त्या वर्णनावरून तो मजूर काम करीत असल्यामुळे परिसरातील काही जणांकडे चौकशी केली. मात्र, त्याला पसिरात कोणी ओळख नसल्याचे मजुरांनी सांगितले. सर्व पोलीस ठाण्यामध्ये कुठे बेपत्ता नोंद आहे का, याचा शोध पोलिसांनी सुरू केला असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक दिलीप कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच, त्याच्या हाताचा अंगठा घेऊन त्याची आधार कार्डवरून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

23 Apr 2017

एमपीसी न्यूज - विषारी औषध पिलेल्या तरुणीचा आज (रविवार) दुपारी अडीचच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 15) रात्री नऊच्या सुमारास साईसागर कॉलनी रहाटणी येथे घडली होती.

 

सुश्मा श्याम कांबळे (वय-16, रा. साईसागर कॉलनी, रहाटणी), असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. मंगल श्याम कांबळे (वय-36, रा. साईसागर कॉलनी, रहाटणी) यांनी पोलिसांत खबर दिली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुश्माला शनिवारी (दि.15) रात्री अचानक चक्कर आल्याने तिला वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आठ दिवस तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान तिने विषारी औषध प्राशन केल्याचे समजले. आज दुपारी उपचार सुरू असताना अडीच वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

23 Apr 2017

एमपीसी न्यूज - बांधकाम साईटच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू झाला. ही घटना आज (रविवारी) दुपारी साडेतीन वाजता चिखली येथे घडली.

 

विजय ज्ञानोबा मोरे (वय 49, रा. पाटीलनगर, चिखली), असे मृत्यू झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

 

मोरे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. आज दुपारी ते पाणी मारण्यासाठी साईटच्या तिसऱ्या मजल्यावर गेले. तेथे पाणी मारत असताना, तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांनी तातडीने निगडीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, मुलगी आणि लहान भाऊ असा परिवार आहे.

 

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

23 Apr 2017

एमपीसी न्यूज - बनावट कागदपत्रे सादर करून घरकुल लाटल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. पिंपरी महापालिकेच्या जवाहर नेहरू घरकुल योजनेमध्ये बनावट कागदपत्र सादर करून गोरगरीबांसाठी असलेली घरे अटक करण्यात आलेल्या आरोपींनी लाटली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींना सोमवार (दि.24) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


शिवपुत्र शरणाप्पा नाटेकर (वय-45), सलीम मोहमद हुसेन बागवान (वय -46), इजहारअली शेख (वय-42), उत्तम गिरमा मंडलीक (वय-40), नजमुनिसा रशीद खान (वय-55, सर्व रा. ओटास्कीम, निगडी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पालिकेचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त सुभाष सावन माछरे (वय-58, रा. थेरगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील गोरगरीब लोकांसाठी स्वस्त घर घरकुल योजना राबवण्यात आली होती. सेक्टर नंबर 22 मध्ये ही योजना राबवण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी बनावट कागदपत्र सादर करून घरकुल मिळवले होते. दरम्यान, काही लाभार्थ्यांनी बनावट कागदपत्र सादर करून घरकुल घेतले असल्याचे समोर आले. माछरे यांनी खातरजमा करून बनावट कागदपत्र सादर करून घरकुल लाटणा-यांविरुद्ध फिर्याद दिली होती. बनावट कागदपत्र सादर करून घरकुल लाटल्यापैकी पिंपरी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.


पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

23 Apr 2017

'द्या' नामक मुख्य साठेबाजाचा शोध सुरू; एफडीआय व चाकण पोलिसांची कारवाई

 

एमपीसी न्यूज -  गुटखा, तंबाखूसह सुगंधी सुपारी व पानमसाला विक्रीवर बंदी असताना चाकण परिसरात याचा साठा होत असल्याने चाकण पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीआय) मदतीने खालुंब्रे येथे शनिवारी (दि. 22) दुपारी टाकलेल्या छाप्यातून तब्बल दोन लाख सहा हजारांचा गुटखा, तंबाखू, सुंगधी सुपारी व पानमसाला जप्त करण्यात आला आहे. कारवाईत एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत या भागातील विविध ठिकाणी छापे मारण्यात येत होते.

 

गौरीशंकर भुलचंद दुबे ( वय 19, सध्या रा. खालुंब्रे ता.खेड)

 

वाढत्या व्यसनाधिनतेला आळा घालण्यासाठी सरकारतर्फे गुटखा, तंबाखूसह पानमसाला व सुगंधित सुपारी विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र, अनेक ठिकाणी या पदार्थांची विक्री होत असल्याचे चित्र सातत्याने समोर येत असल्याने चाकण पोलिसांच्या विशेष पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीने याविरोधात मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत शनिवारी दुपारपासून परिसरात केलेल्या तपासणी मोहिमेत 'द्या' नामक ( पूर्ण नाव निष्पन्न नाही) इसमाने खालुंब्रे येथे खूप मोठा अवैध गुटख्याचा साठा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

 

खालुंब्रे येथे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखालील उपनिरीक्षक महेश मुंडे, अजय भापकर, सुदाम हरगुडे , संजय जरे, रमेश नाळे, मुश्ताक शेख आदींच्या पथकाने अचानक छापा मारला. यावेळी आरोपी गौरीशंकर याने हा गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी, स्वादयुक्त तंबाखू व तत्सम पदार्थ, असा दोन लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल अवैधरित्या साठवणूक करीत असतानाचे आढळून आले. पोलिसांनी गौरीशंकर दुबे यास ताब्यात घेऊन छाप्यात पकडलेला सर्व अवैध गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीआय) ताब्यात कायदेशीररित्या दिला आहे. औषध प्रशासन विभागाकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

 

चोरीचा मामला हळूहळू ...

 

संपूर्ण राज्यात गुटखा बंदी असली तरी त्याचा फायदा मात्र, काही बड्या तस्करांनी उचलला असून दुप्पट चौपट किमती आकारून आणि बनावट गुटखा विक्री करून गेल्या काही वर्षात हे पुरवठादार 'मालामाल' झाले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने शनिवारी खालुंब्रे मध्ये 2 लाख सहा हजार रुपयांचा गुटखा जप्त केला असला तरी हे हिमनगाचे केवळ टोक आहे. संपूर्ण जिल्हाभर छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर गुटखा येत असतानाही त्यावर अंकूश ठेवणे अशक्यप्राय बनले आहे.  बनावट गुटखा विक्री करण्याचा गोरखधंदा करणारी मंडळी मालामाल होत आहेत. 'चोरीचा मामला आणि हळूहळू बोंबला' .... प्रमाणे एकूणच स्थिती झाली असून ही गुटखा बंदी लोकांच्या 'भल्या' साठी की तस्करांच्या 'लाभा' साठी, असा प्रश्न निर्माण उपस्थित केला जात आहे.

23 Apr 2017

एमपीसी न्यूज - बहिणीची छेड कढल्याचा जाब विचारल्यामुळे चिडलेल्या सात ते आठ जणांनी भावाला आणि बहिणीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती.  ही घटना बुधवार (दि.19) सायंकाळी पावणेआठच्या सुमारास च-होली येथील डी.वाय. पाटील गेटजवळ घडली होती. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मयुर खेसे आणि त्याच्या इतर सहा ते सात जणांवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर मयुर खोसे हा फरार होता.दिघी पोलीस त्याचा तपास घेत होते. परंतु तो मिळून आला नाही. काल मयुर खेसे हा खडकी न्यायालयात हजर झाला होता. त्याने खडकी कोर्टातून जामीन मिळवला होता. काल (शनिवार) शिवराज तापकीर (वय-19, रा. च-होली बुद्रुक) याने त्याच्या साथीदारांसह मयुरच्या घरावर दगडफेक करुन घरातील महिलांचा विनयभंग केला. विमानतळ पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर विनयभंग आणि दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.


शिवराज हा त्याच्या बहिणीला कॉलेजमधून घरी घेऊ जात होता. त्यावेळी मयुर खेसे आणि त्याच्या इतर साथिदारांनी शिवराजच्या बहिणीची छेड काढली. यावरुन दोघांमध्ये मारहाण झाली होती. शिवराजने दिघी पोलीस  ठाण्यात तक्रर दिली होती. दिघी पोलिसांनी मयुर खेसे आणि त्याच्या इतर साथिदारांना अटक केली होती. काल मयुर खेसे याने कोर्टातून जामिन घेतल्याची माहिती शिवराजला मिळाली.


काल (शनिवार) रात्री सातच्या सुमारास शिवराज आणि त्याच्या इतर साथिदारांनी मयुर खेसे याच्या घरावर हल्ला करुन दगडफेक केली. घरावर दगडफेक करुन घराच्या काचा फोडून घराच्या पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या पाच गाड्यांचे नुकसान केले. तसेच घराच्या बाजूला उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान केले. शिवराज आणि त्याच्या साथिदारांनी मयुर खेसे याच्या घरात घुसुन घरातल्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी करुन महिलांचा विनयभंग केला. हल्लेखोरांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र आणि इतर सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख 83 हजार रुपयांचे दागिने हिसकावून नेले.

घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शिवराज बाबासाहेब तापकीर, कुंडलीक तापकीर, गोट्या अरुण तापकीर, प्रणव ताम्हणे, सुमित तापकीर, शशीकांत तापकीर, रजणजित तापकीर, बाबासाहेब तापकीर आणि त्यांच्या इतर 20 ते 25 जणांवर विनयभंग आणि दंगल माजवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रात्री उशीरा दहा जणांना ताब्यात घेतले आहे.

विमानतळ पोलीस तपास करीत आहेत.

23 Apr 2017


एमपीसी न्यूज -  अंगावरुन डंपर गेल्याने इंद्रायणीनगर येथील औषध विक्रेत्याचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि.22) दुपारी दोनच्या सुमारास एमसीबी कार्यालयासमोरील रोडवर झाला.

चेतन चंद्रकांत वरडीया (वय-31, रा. मोशी प्राधिकरण) असे मृत्यू झालेल्या औषध विक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी डंपर चालक धनराज पांडरुंग सावंत (रा. बालाजी नगर, भोसरी)  याला अटक करण्यात आली आहे. तर उमेश वरडीया (वय-21 रा. मोशी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन यांचे मोशी प्राधीकरणमध्ये औषध विक्रीचा व्यवसाय आहे. काल दुपारी चेतन दुचाकीवरु जात होते. पुणे- नाशिक महामार्गावर भोसरीजवळ रस्ता दुभाजकला त्यांची दुचाकी धडकली. ते काही अंतर रस्त्याने फरफटत गेले. त्याचवेळी पाठिमागून एक वाळूचा डंपर येत होता. चेतन हे दुचाकीसह फरफटत जाऊन डंपरच्या चाकाखाली आले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

22 Apr 2017

कोरेगावपार्क यथील एका मुलीचे खंडणीसाठी अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांकडे शुक्रवारी दाखल झाली होती. त्यानुसार तपास करून पोलिसांनी शनिवारी मुलीची सुटका केली.

याबाबत मुलीच्या वडिलांनी कोरेगावपार्क पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एका विवाह समारंभासाठी बाहेरगावी गेले होते. त्या ठिकाणी त्यांची २४ वर्षीय मुलगी येणार होती. पण, ती त्या विवाह समारंभाला आली नाही. तक्रादार यांनी फोन केल्यानंतर तिचा मोबाईल लागत नव्हता.

 

त्यामुळे तक्रारदार हे रात्री घरी आल्यानंतर त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यवस्थ पडल्याचे दिसले. तसेच, त्यांची मुलगी घरी नसल्याचे आढळले. तसेच, घरात त्यांना एक चिठ्ठी मिळाली. त्यामध्ये ५० लाखांची जुळवा-जुळव कर, मुलीचे अपहरण केले असून पोलिसांना कळवू नको असे म्हटले होते. याप्रकरणी कोरेगावपार्क पोलिसांकडे तक्रार दिली होती. पोलिसांनी तरुणीचा माग काढून तिची बंगळुरु-मुंबई मार्गावरुन सुटका केली.

22 Apr 2017

भांडणे पहात असलेल्या व्यक्तीला हाकालल्यामुळे त्याचा राग मनात धरून लाडकी दांडक्याने मारहाण करून एका व्यक्तीचा खून केला. गंज पेठेत शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी खडक पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

साजीद अब्दुलकरीम कुरेशी (रा. गंज पेठ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचा खून केल्याच्या आरोपावरून समीर अहमद इनामदार (वय ३०) व अमीर अहमद इनामदार (वय २७, रा. चाँद तारा चौक, गंज पेठ) याना अटक केली आहे. याप्रकरणी मयताचे चुलत भाऊ जमीर कुरेशी (वय ३१, रा. गंज पेठ) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साजीद कुरेशी व त्यांच्या पत्नीची भांडणे सुरु होती. त्यावेळी ही भांडणे आरोपी समीर इनामदार हा पहात उभा होता. तो सतत महिलांकडे वाईट नजरेने पाहतो, याची माहिती असल्यामुळे साजीद यांनी त्याला घरासमोरून हाकलून दिले. या गोष्टीचा समीर याला राग आला. त्यामुळे शुक्रवारी रात्री समीर व त्याचा भाऊ अमीर हे साजीद यांच्या घरासमोर आले. त्यांनी साजीद यांना लाथा-बुक्या व लाकडी दांडक्याने छाती, पाठीवर जबर मारहाण केली. यामध्ये साजीद हे गंभीर जखमी झाले. त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी खडक पोलिसांनी तत्काळ दोन आरोपीला अटक केली आहे. 

22 Apr 2017
लिफ्ट देवून चाकूचा धाक दाखव प्रवाशांना लुटणा-या टोळीतील तिघांना हडपसर पोलिसांनी शनिवार अटक केली. आरोपींकडून चोरीची आंगठी, मोबाईल व गुन्हयात वापरलेली इंडिका मोटार पोलिसांनी जप्त केली आहे.
 
संतोष गेनु तापकीर (वय 41, रा, च-होली बुद्रूक, ता. हवेली), गिरीराज चुंबकलाल चौधरी (वय 27, रा. आळंदी देवाची), ज्ञानेश्र्वर आश्रोबा देवकाते (वय 21, रा. परळी वैजनाथ, बीड) या तिघांचा समावेश आहे. बंटी ठाकूर (वय 20, रा. आळंदी, ता. हवेली) हा फरार आहे. याबाबत वेदराज हिरालाल रावल (वय 32, रा, ससाणेनगर हडपसर) यांनी तक्रार दिली आहे.
 
पोलिस दिलेल्या माहितीनुसार, सातववाडी येथे आरोपींनी रावल यांना निरेला जाण्यासाठी पहाटे पाच वाजता लिफ्ट दिली. आरोपींनी मद्य प्राशन केले होते. दिवेघाटात गेल्यानंतर आरोपींनी चाकूचा धाक दाखवून रावल यांची सोन्याची आंगठी, मोबाईल व दोनशे वीस रूपये लूटले. त्यानंतर दिवेघाटात त्यांना सोडून चोरटे फरार झाले. निळ्या रंगाची इंटीका गाडी एवढया एकाच धाग्यावरून तपास करून सहाय्यक पोलिस निरिक्षक संदीप देशमाने अमित कांबळे, नितीन मुंडे यांनी सापळा रचून आरोपींना अटक केली व त्यांच्याकडील चोरीचा माल जप्त केला. चोरलेले मोबाईल विविध भागातील असून, त्यांच्याकडून प्रवाशां
​​
ना लूटल्याचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
22 Apr 2017

मंगेश शेलारला तीन दिवसाची कस्टडी


लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या घराच्या बाहेर तिरडीचा उतारा व मृत्युयंत्र ठेवल्याच्या आरोपाखाली पोलीसाच्या कस्टडीत असलेला संतोष पिंजण यांने गुरुवारी मध्यरात्री पोलीस कस्टडीत असताना टाँवेलने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

 

मात्र गार्डाच्या कर्मचार्‍याच्या सतर्कतेमुळे ही दुघर्टना ठळली. याप्रकारणी शुक्रवारी दि. 21 रोजी वडगाव पोलीस ठाण्यात पिंजण याच्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कस्टडीतील चौकशीत भांगरवाडी येथिल मंगेश शेलार या व्यक्तीने मला वरील कृत्य करायला लावले असल्याचे पिंजण याने सांगितल्याने लोणावळ शहर पोलीसांनी शेलारला अटक केली असून आज त्याला वडगाव न्यायालयाने तिन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.तर पिंजणला आज जामिन झाला.


दरम्यान पिंजण व शेलार यांच्यात मागील काही वर्षापासून वाद असून ते एकमेकाशी बोलत देखिल नाही. यामुळे जाणिवपुर्वक पिंजण याने शेलार याचे नाव या प्रकरणात गोवले असून खर्‍या मुख्य आरोपीला बगल देण्य‍ाचा हा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप याप्रकरणातील फिर्यादी नगराध्यक्षा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी करत पोलीसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

22 Apr 2017
 
एमपीसी न्यूज - प्रेमप्रकरणातून सांगलीच्या एका तरुणीने चिंचवड स्टेशन येथील लॉजमध्ये फॅनला स्कार्पच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 21) रात्री साडेदहाच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथील कोहिनुर लॉजमध्ये उघडकीस आला.
 
आत्महत्या केलेल्या तरुणीचे वय 30 आहे. ती मूळची सांगलीची असून पिंपरी-चिंचवडमध्ये राहत होती. शुक्रवारी ती चिंचवड स्टेशन येथील कोहिनूर लॉजमध्ये आली होती. तिने खोलीमधील फॅनला स्कार्पच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती बराच वेळ झाला तरी दरवाजा उघडत नव्हती.
 
बाहेरुन दरवाजा ठोठावला असता आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे पोलिसांना बोलाविण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडला असता तरुणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रेमप्रकरणातून तिने आत्महत्या केली असल्याचे, पोलीस सूत्रांनी सांगितले.
Page 2 of 24