क्राईम न्यूज

क्राईम न्यूज (74)

20 Feb 2017
एमपीसी न्यूज - काँग्रेसचे प्रभाग क्रमांक नऊचे उमेदवार किरण अर्जुन पवार (वय 31) यांना सोमवारी पहाटे अज्ञातांनी धारदार हत्यारांनी मारहाण केली. पहाटे तीनच्या सुमारास नेहरूनगर येथे ही घटना घडली. 


किरण पवार हे प्रभाग क्रमांक नऊमधून काँग्रेसच्या चिन्हांवर महापालिकेची निवडणूक लढवत आहेत. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास ते राहत्या घरी होते. त्यावेळी आलेल्या अज्ञात इसमांनी त्यांना धारदार हत्यारांनी मारहाण केली. 


याप्रकरणी किरण पवार यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
20 Feb 2017
एमपीसी न्यूज - वडगावशेरीत प्रचाराची पत्रके भिंतीवर चिकटवताना शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांनासह इतर दोन मुलांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यामुळे प्रचाराची मुदत संपल्यानंतरही काही ठिकाणी छुप्या पद्धतीने प्रचार सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.


महापालिका निवडणूक प्रचाराची मुदत काल रविवारी सायंकाळी साडेपाचनंतर संपली. त्यानुसार सर्वच पक्षांच्या प्रचाराची काल सांगता झाली. त्यानंतर छुप्या पद्धतीने प्रचार होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा कार्यन्वीत झाली होती. आज वडगाव शेरी भागात नगरसेवक सचिन भगत या शिवसेनेच्या उमेदवाराची प्रचार पत्रके भिंतीवर चिकटवताना शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांना तसेच इतर दोन मुलांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यामुळे छुप्या पद्धतीने प्रचार सुरूच असल्याचे चित्र समोर येत आहे. 


या पत्रकावर, आपल्या गणेशनगर भागातील नागरिकांनी धनुष्यबाणासमोरील चारही बटणे दाबावीत व आपल्याला बी.जे.पी., राष्ट्रवादी  व इतर पक्षातील लोक पैसे वाटतील.. ते पैसे घ्या.. पण फक्त शिवसेनेलाच मतदान करा. व यांचेवरील राग व्यक्त करावा, कारण आपली ताटातूट केली आहे.  येथील परिसरातील सर्व विकासकामे मी स्वतःच करणार आहे. याची कृपया नोंद घ्यावी. आपली हक्काची व्यक्ती.., असा मजकूर छापला आहे. हे पत्रक परिसरातील भिंतीवर चिकटवले आहे. ही पत्रके चिकटवताना पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले. 
पोलीस पुढील कारवाई करीत आहे.
20 Feb 2017
एमपीसी न्यूज -पुणे शहरातील विमाननगर आणि येरवडा परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या घटना काल (19 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास घडल्या. याप्रकरणी विमानतळ आणि येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


विमाननगर येथील अपघातात अजितकुमार जव्हेरी (वय-25, रा.विमाननगर) पुणे यांचा मृत्यू झाला. विमानतळ रोड ते सीसीडू चौक या दरम्यान असलेल्या रोडवर हा अपघात घडला. मयत अजितकुमार हा रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्याला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. वाहनचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला आहे. विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक बी. व्ही. गायकवाड अधिक तपास करीत आहेत.


तर दुस-या घटना येरवड्यातील न्याती युनिट बिल्डिंगसमोर घडली. भरधाव वेगाने आलेल्या एक अनोळखी वाहनाने पादचारी इसमाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका 50 वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे अधिक तपास करीत आहेत.
20 Feb 2017

एमपीसी न्यूज - आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे आणि निवडणुक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडण्याच्या उद्देशाने परिमंडळ 1 च्या हद्दीतील सुरज पिंपरे टोळीतील चौघांना पुणे पोलीस आयुक्तालय आणि नजिकच्या तालुक्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले.


सुरज चंद्रकांत पिंपरे (वय-20) हो टोळीप्रमुख, शुभम चंद्रकांत पिंपरे (वय-19), निहाल रविंद्र शिंदे )वय-18) आणि कुणाल किसन पवार (वय-19) अशी तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.


पिंपरे टोळीने 2016 मध्ये वारजे माळवाडी परिसरात नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली होती. या टोळीविरोधात बेकायदेशीर जमाव जमवणे, जिवे मारण्याची धमकी देणे, वाहनांची तोडफोड करणे, शस्त्र जवळ बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.{fcomment}

20 Feb 2017

एमपीसी न्यूज - उच्चशिक्षित नवदाम्पत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार काल (रविवारी) संध्याकाळी चिखलीच्या मोरेवस्ती भागात उघडकीस आला. आत्महत्येमागील नेमके कारण अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही.


अनिकेत विलास ढमाले (वय 25) व अश्विनी अनिकेत ढमाले (वय 22) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. अनिकेत हा मेकेनिकल इंजिनिअर तर अश्विनी ही फैशन डिझायनर होती. त्यांचे 13 महिन्यांपूर्वीच एक जानेवारी 2016 ला त्यांचे लग्न झाले होते. त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

 

अनिकेत हा चिखली मोरेवस्ती येथील साने चौकाजवळ सुदर्शननगरमध्ये आई, वडील आणि भावाबरोबर राहात होता. आई-वडील एका लग्न समारंभासाठी तर भाऊ बाहेर गेलेला असताना या दोघांनी आत्महत्या केली.

 

अनिकेतचा भाऊ घरी आल्यावर त्याने दार वाजवले. बराच वेळ काहीही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी हॉलमधील पंख्याच्या हुकला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन लटकलेला अनिकेतचा मृतदेह आढळला तर आत बेडरुममध्ये याच पद्धतीने गळफास घेतलेला अश्विनीचा मृतदेह आढळून आला.

 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णायलात पाठवले. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

{fcomment}

19 Feb 2017
मुदत संपल्यानंतरही फोनवरील प्रचाराचा ससेमिरा चालूच


एमपीसी न्यूज - राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रचाराची मुदत संपल्यानंतर सोशल मीडियावर प्रचार करण्यावरही बंदी आहे. तसे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचे आदेश आयोगाने दिले. मात्र, यामधील मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्टता नसल्याने नेमकी काय कारवाई करावी, हा प्रश्न अधिका-यांना पडला आहे. तसेच या प्रचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणताही प्रभावी उपाय नसल्याने, प्रशासन हतबल झाले असल्याचे चित्र दिसत आहे. 


पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुका 21 फेब्रुवारीला होत असून राज्य निवडणूक आयोगाने दिलेली प्रचाराची  मुदत आज सायंकाळी साडेपाच वाजता संपली. त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराची आज सांगता झाली. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मुदतीनंतर कोणत्याही प्रकारे उमेदवाराला प्रचार करता येणार नाही. यात फेसबुक, ट्विटर, टेलिफोनिक कॉल, संदेश, व्हॉट्स अॅप असा कोणत्याही प्रकारचा प्रचार करता येणार नाही, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले असून तसे निदर्शनास आल्यास दंड आकारण्यात यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार अधिका-यांकडून उमेदवारांना तशा प्रकारच्या नोटिसाही देण्यात आल्या होत्या. 


मात्र, असे असतानाही उमेदवारांचे टेलिफोनिक कॉल नागरिकांना येत आहेत. तसेच मतांसाठीचे संदेशही येत आहे. आपापल्या फेसबुक टाईमलाईनवर व व्हॉट्स अप संदेशाद्वारे उमेदवारांचा सर्रास प्रचार सुरू आहे. 


कारवाईबाबत अधिकारी संभ्रमात

फोन आणि सोशल मीडियावर अशा प्रकारे प्रचार सुरू असल्याची माहिती अधिका-यांना आहे. या प्रचारावर नेमकी कोणती कारवाई करावी, असा प्रश्न अधिका-यांना पडला आहे. कारण, याबाबत राज्य निवडणूक आयोगाने दिलेली मार्गदर्शक तत्वे अस्पष्ट आहेत. उदाहरणार्थ टेलिफोनिक कॉल वा संदेशात्मक रुपातील प्रचाराला किती दंड आकारावा, किंवा इतर सोशल मीडियावरील प्रचार निदर्शनास आल्यास कोणती कारवाई करावी, हे आयोगाने स्पष्ट केलेले नाही, असे एका निवडणूक निर्णय अधिका-यांनी सांगितले. त्यामुळे करावाईबाबत अधिका-यांचा गोंधळ उडाला आहे, हे स्पष्ट होत आहे. 

प्रभावी उपायांअभावी अधिकारी हतबल

कारवाई काय करावी हा प्रश्न तर आहेच. मात्र, आतापर्यंतच्या पारंपारिक पद्धतीच्या प्रचारावर नियंत्रण कसे मिळवावे याबाबत स्पष्ट योजना असल्याने पारंपारिक पद्धतीतील फ्लेक्स, बॅनर उतरवणे, प्रचारपत्रके आढळल्यास जप्त करणे, अशा प्रकारे प्रचार थांबवता येत होता. मात्र, उमेदवारांकडून अथवा त्यांच्या समर्थकांकडून फेसबुक अकाउंटवर टाकल्या जाणा-या पोस्ट, ट्विटर संदेश, त्यांच्या संपर्कात असणा-यांना पाठविले जाणारे व्हॉट्स अॅप संदेश, एसएमएस, फोनकरून करण्यात येत असलेला प्रचारावर कशा प्रकारे नियंत्रण मिळवावे यासाठी कोणताही प्रभावी उपाय प्रशासनाकडे नसल्याने याबाबत अधिकारी हतबल झाले आहेत. त्यामुळे 21 तारखेपर्यंत उमेदवारांचा हा प्रचार असाच सुरू राहील का निवडणूक आयोग काही तातडीची पावले उचलेल हे पाहणे महत्वाचे राहील. तोपर्यंत मतदारराजामागील प्रचाराचा ससेमिरा सुरूच राहणार आहे.
19 Feb 2017
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी. तसेच सर्वसामान्य नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, यासाठी परिमंडळ तीनच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यामधील पोलिसांनी हद्दीत सशस्त्र संचलन केले. 

परिमंडळ तीनमधील पिंपरी-चिंचवड, निगडी, भोसरी, एमआयडीसी, वाकड, सांगवी ठाण्याच्या हद्दीत हे सशस्त्र पोलीस संचलन करण्यात आले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून संचलनास सुरुवात झाली. 

पिंपरी ओव्हरब्रीज, शगुन चौक, गुरुद्वारा, गेलार्ड चौक, जमतानी चौक, डीलक्स चौक, मिलिंदनगर, झुलेलाल मंदिर, रिव्हर रोड, भाटनगर मार्गे संचलन करण्यात आले. यामध्ये परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पिंपरी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगाळीकर, मसाजी काळे आदींसह महिला व पुरुष पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

निवडणूक काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, शांतता अबाधित राहावी. त्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला.

police
police 2
police 1


19 Feb 2017
एमीपीसी न्यूज - मतदारांची यादी व मतदान ओळखपत्राच्या झेरॉक्स हातामध्ये घेऊन मतदारांना पैसे वाटणा-या चौघांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.18) सायंकाळी सातच्या सुमारास मोहननगर येथे करण्यात आली. 


भगवान सदाशिव नामदे (वय 38, मोहननगर, चिंचवड), दादा पाटील (वय 45, रा. रामनगर, चिंचवड) व आणखी यांच्या दोन साथीदारांवर कलम 171 (ब), 171 (ई) 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजू बापू वेताळ (वय 48, रा. वाकड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेताळ हे निवडणूक आयोगाचे कर्मचारी आहेत. प्रभाग क्रमांक 14 येथील मातृ-छाया निवासामध्ये शनिवारी सायंकाळी नामदे व पाटील पैसे वाटत असल्याची माहिती वेताळ यांना मिळाली. त्यानुसार वेताळ आणि पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी  घराची झडती घेतली. भांड्याच्या किचन ट्रॉलीमध्ये दोन हजार रुपयांच्या 72 नोटा, पाचशेची एक नोट असे एक लाख 44 हजार 500 रुपयांची रोकड सापडली. तसेच प्रभाग क्रमांक 10 मधील काही मतरांची यादी व मतदान ओळखपत्राच्या झेरॉक्स, प्रभाग 10 मधील राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे प्रचारपत्रक आणि प्रभाग 14 मधील भाजपच्या उमेदवाराची प्रचारपत्रके मिळून आली आहेत. पिंपरी ठाण्याचे फौजदार एच. एस. बोचरे तपास करत आहेत. 
19 Feb 2017
एमपीसी न्यूज - पैसे वाटण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंचवड येथे (शनिवारी) रात्री राडा झाला. याप्रकरणी भाजपच्या उमेदवाराविरोधात दंगल माजविल्याप्रकरणी तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


विजयनगर, आनंदनगर, एम्पायर इस्टेट, भाटनगर प्रभाग क्रमांक 19 भाजपचे उमेदवार शैलेश प्रकाश मोरे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार काळूराम मारुती पवार  हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. शनिवारी रात्री पैसे वाटण्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यातून त्यांच्यात भांडणे झाली. याप्रकणी चिंचवड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद देण्यात आली असून राष्ट्रवादीचे काळूराम पवार यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि भाजपचे उमेदवार शैलेश मोरे यांच्याविरोधात दंगल माजविल्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे, पोलिसांनी सांगितले. 


नगरसेविका मनिषा काळूराम पवार (वय 34, रा. चिंचवड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भाजपचे उमेदवार शैलेश मोरे याच्यासह त्याच्या 15 ते 20 साथीदारांविरोधात कलम 452, 337, 323, 504, 506, 143, 148, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


फिर्यादीत म्हटले आहे की,  आनंदनगर झोपटपट्टी येथे आमचे कार्यालय आहे. रात्री काही जणांनी कार्यालयावर दगडफेक केली. रविवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास शैलेश मोरे आणि त्याचे 15 ते 20 साथीदार आमच्या इमारतीतील सुरक्षारक्षकाला दमदाटी करून गेट उघडण्यास लावून आमच्या घरात घुसले. काळूराम पवार कोठे आहे. तुम्ही उद्या प्रचाराची रॅली कशी काढता बघतो. माझी मोठ्या लोकांशी ओळख आहे, अशी दमदाटी केली. तसेच जाताना कार्यकर्त्यांनी घरावर दगडफेक करून  दहशत माजिविली, असे फिर्यादीत म्हटले आहे.  


संजय हिरामण लंगोटे (वय 37, रा. गवळीचाळ, मोहननगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, काळुराम पवार, बाळू पवार, किरण तेलंग याच्यासह एकाविरोधात कलम 307, 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी रात्री काळूराम पवार हे आनंदनगर येथे मतदारांना पैसे वाटप करत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर आम्ही तिथे गेलो होतो. त्यावेळी काळूराम पवार, बाळू पवार, किरण तेलंगे यांनी फिर्यादी  लंगोटे हे शैलेश मोरे यांचे कार्यकर्ते असून त्याच्या प्रचारार्थ फिरत असल्याचे पाहून चिडून लंगोटे याला शिवीगाळ केली. तसेच लंगोटे याच्या डोक्यात दगडाने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असे, फिर्यादीत नमूद केले आहे. 
18 Feb 2017
एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पाच हजार पोलीस ताफ्यासह पुणे ग्रामीण पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी पत्रकार परिषदेत दिली.  


पुणे जिल्ह्यात तेरा तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद (75 गट) आणि पंचायत समितीसाठी (गण 150) येणार्‍या मंगळवारी (21 फेब्रुवारी) मतदान होत आहे. यासाठी एकूण मतदान केंद्र (बुथ) 3 हजार 444 असून, दोन हजार 189 इमारतींमध्ये हे मतदान होणार आहे. त्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. तर, संवेदनशील म्हणून पोलिसांनी 171 मतदान केंद्र काढली असून, त्यावर अतिरिक्त बंदोबस्त असणार असून, विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच, 150 गाड्यांमधून मतदानादिवशी पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. तसेच, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचीही मदत घेतली जाणार आहे. गुरुवारी (23 फेब्रुवारी) 12 ठिकाणी मतमोजणी होणार असून, मतमोजणीनंतर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तेथेही चोख बंदोबस्त असणार आहे.

बंदोबस्ताचा तपशील

एक पोलीस अधीक्षक, 2 अपर अधीक्षक, 13 उपअधीक्षक, 58 पोलीस निरीक्षक, 189सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, 3704 पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्या, 1250 होमगार्ड असा फौजफाटा बंदोबस्तासाठी लावण्यात आला आहे. वनविभागाकडून 71 वनरक्षकांनाही बंदोबस्तासाठी असतील. संपूर्ण जिल्ह्यात 1 क्यूआरटी पथक, 2 दंगाविरोधी पथके तयार नेमण्यात आली आहेत. तसेच बाहेर जिल्ह्यातूनही एक सहाय्यक अधीक्षक, 5 पोलीस उपअधीक्षक, 19 पोलीस निरीक्षक, 21 सहाय्यक निरीक्षक आणि 1605 पोलीस कर्मचार्‍यांचा ताफा मागवण्यात आला आहे.
Page 3 of 6