क्राईम न्यूज

क्राईम न्यूज (74)

18 Feb 2017
एमपीसी न्यूज - 'मला 11 वर्षानंतर मुलगा झाला आहे. त्यासाठी मी पूजा मांडलेली असून 11 नंबरच्या दोन हजार रुपयांची नोट लागणार असल्याची बतावणी करून एकाने दोन हजार रुपयांच्या बंडलमधील नऊ नोटा चोरून एलआयडीसी कार्यालयातील रोखपालाची 18 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना शुक्रवारी (दि.17) दुपारी पावणे एकच्या सुमारास पिंपळे-सौदागर, रहाटणी चौक येथे घडली. 


याप्रकरणी ज्योती ओक (वय 44, रा. रहाटणी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे -सौदागर येथे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसीचे) कार्यालय आहे. ओक या तिथे रोखपाल म्हणून नोकरीस आहेत. शुक्रवारी दुपारी एक अनोळखी इसम तिथे आला. 


'मला 11 वर्षानंतर मुलगा झाला आहे. त्यासाठी मी पूजा मांडलेली असून 11 नंबरच्या दोन हजार रुपये किमतीची नोट लागणार असल्याची बतावणी केली. ज्योती ओक यांच्याकडून दोन हजार रुपयांच्या नोटांचा बंडल घेतला. त्यामध्ये 11 नंबरची नोट शोधत असल्यासारखे करून ओक यांना बोलण्यात गुंग केले आणि बंडलमधून दोन हजार रुपये किमतीच्या नऊ नोटा काढून 18 हजार रुपये हातचलाखीने चोरून नेले आहेत. 


सांगवी ठाण्याचे फौजदार एस. जी. पाटील तपास करत आहेत.
18 Feb 2017
एमपीसी न्यूज - मतदार यादी हातात घेऊन पैसे वाटणा-या एकाला चिंचवड पोलिसांनी पकडले आहे. ही कारवाई आज (शनिवारी) रात्री आठच्या सुमारास लिंक रोड येथे करण्यात आली आहे. त्याच्याकडून 1 लाख 34 हजार रुपये पोलिसांना मिळून आले आहेत.


सुनील शांताराम धोत्रे (वय 30, रा. लिंकरोड, चिंचवड) याच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात कलम 171 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड लिंक रोड येथे सुनील धोत्रे हा  मतदारांना पैसे वाटत असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना खब-यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मतदार याद्या हातामाध्ये घेऊन नागरिकांना पैसे वाटताना सुनील याला पकडले आहे. त्याच्याकडे 1 लाख 34 हजार रुपये मिळून आले. त्यामध्ये 2 हजाराच्या 67 नोटा आहेत. त्याच्या शेजारी स्विफ्ट मोटार घेऊन थांबलेल्या आणखी एकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुनील याच्यावर कलम 171 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


दरम्यान, महापालिका प्रचाराची सर्वत्र धामधूम सुरू असताना, काही भागात मतदारांना आमिष दाखविण्याचे प्रकार काही ठिकाणी घडू लागले आहेत. मोरवाडीत एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना मिक्सर वाटप केल्याची चर्चा होती. तसेच ताथवडेत, पुनावळेत पैसे वाटण्याचीही चर्चा जोरात रंगली होती.
18 Feb 2017
एमपीसी न्यूज - कौटुंबिक वादातून वडिलांनीच आपल्या दोन मुलींवर चाकुने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.17) रात्री साडेआठच्या सुमारास इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली. 

याप्रकरणी वडील विजय रामदास वायळ (वय 33, रा. इंद्रायणीनगर, भोसरी), याला अटक करण्यात आली आहे. याबाबत त्याची पत्नी शीतल विजय वायळ (वय 28) हिने भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विजय याने त्याच्या मुली शर्वरी (वय 6 वर्ष) आणि सई दीड वर्ष यांच्यावर गळ्यावर चाकूने वार केले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय याचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे. शुक्रवारी रात्री कौटुंबिक कारणातून पती-पत्नीची भांडणे झाली होती. त्या कारणावरून रागाच्या भरात विजय याने घरातील चाकूने मुलगी शर्वरी आणि सई हिच्या गळ्यावर वार केले आहेत. एमआयडीसी ठण्याचे फौजदार एच. बी. केकाणी तपास करत आहेत. 
18 Feb 2017
एमपीसी न्यूज - कौटुंबिक वादातून वडिलांनीच आपल्या दोन मुलींवर चाकुने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.17) रात्री साडेआठच्या सुमारास इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली. 

याप्रकरणी वडील विजय रामदास वायळ (वय 33, रा. इंद्रायणीनगर, भोसरी), याला अटक करण्यात आली आहे. याबाबत त्याची पत्नी शितल विजय वायळ (वय 28) हिने भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विजय याने त्याच्या मुली शर्वरी (वय 6 वर्ष) आणि सई दीड वर्ष यांच्यावर गळ्यावर चाकूने वार केले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय याचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे. शुक्रवारी रात्री कौटुंबिक कारणातून पती-पत्नीची भांडणे झाली होती. त्या कारणावरून रागाच्या भरात विजय याने घरातील चाकूने मुलगी शर्वरी आणि सई हिच्या गळ्यावर वार केले आहेत. एमआयडीसी ठण्याचे फौजदार एच. बी. केकाणी तपास करत आहेत. 
18 Feb 2017
पोलिसांनी गस्त वाढवावी; उद्योजकांची मागणी  

एमपीसी न्यूज - भोसरी, एमआयडीसी औद्योगिक परिसरातील कंपन्यामध्ये गेल्या काही दिवसांपून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. एका कंपनीमध्ये महिन्याभरात तीन वेळा चोरी झाली आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रारही करण्यात आली असून पोलिसांना मात्र चोरांचा बंदोबस्त करण्यात अपयश आले आहे. औद्योगिक पट्यात पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी लघुउद्योग संघटनेने केली आहे.  

लघुउद्योग संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सेक्टर नंबर 10 मधील कृष्णा इलेक्ट्रिकल या कंपनीमध्ये चोरी झाली. चोरट्यांनी कंपनीतील 10 लाख रुपये किमतीचा माल लंपास केला आहे.  पिंपरी -चिंचवड लघुउद्योग संघटनेचे ज्येष्ठ संचालक प्रमोद राणे यांच्या सेक्टर नंबर 7 पीसीएनटीडीए येथील सदगुरु इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये तर 31 जानेवारी, तीन फेब्रुवारी आणि 16 फेब्रुवारीला चो-या झाल्या आहेत. चोरट्यांनी कंपनीतील दोन लाखाचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत भोसरी, एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांना मात्र अद्यापर्यंत चोर सापडले नाहीत. 

औद्योगिक मंदीमुळे उद्योजक अडचणीत आले आहेत. वाढत्या चो-यांमुळे उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. उद्योग बंद करण्याच्या मनस्थितीत उद्योजक आले आहेत. 

पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष  संदीप बेलसरे म्हणाले की, पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही. त्यामुळे औद्योगिक पट्यात चो-या होत आहेत. चो-या रोखण्यासाठी पोलिसांनी रात्री गस्त वाढवली पाहिजे. सध्या एमआयडीसी पट्यात पोलिसांची गस्त बंद आहे. कंपनीच्या गेटवर नोंदवही ठेवली असून त्यात नोंद होत नाही.  पोलिसांच्या सूचनांवरून कंपन्यामध्ये 'सीसीटीवी' कॅमेरे बसवले असून त्याचे फुटेज पोलिसांना दिले आहे. तरीही चोर सापडत नाहीत. सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घ्यावे. अवैध भंगार विक्रेत्यावर कारवाई करावी, अशी मागणी बेलसरे यांनी केली आहे.
18 Feb 2017

एमपीसी न्यूज - तडीपार गुन्हेगाराला पिंपरी पोलिसांनी पिस्तूलासह जेरबंद केले. ही कारवाई आज (शनिवारी) मध्यरात्री दीडच्या सुमारास रामनगर, चिंचवड येथे करण्यात आली. पोलिसांनी आरोपीकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूसे जप्त केली आहेत.

 

रोहित दिलीप ढवळे (वय 25, रा. रामनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित ढवळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला पुणे शहर आणि जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. शनिवारी रात्री तो तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करुन रामनगर येथे आला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला गजाआड केले आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

17 Feb 2017
एमपीसी न्यूज  - श्री कसबा गणपती देवस्थान ट्रस्टच्या महिला प्रमुख विश्वस्तांवर एका तक्रार अर्जावर खोट्या स्वाक्षरी घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानाच्या पाच गणपतींपैकी पहिला गणपती म्हणजे कसबा गणपती होय. त्यामुळे या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. 


याप्रकरणी गणेश मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत शेटे (वय 48, रा. वडगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संगीता जठार (वय 42) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुण्यातील पहिला मानाचा गणपती श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. तर आरोपी महिला या ग्रामदैवत श्री कसबा गणपती देवस्थान ट्रस्टच्या प्रमुख महिला विश्वस्थ म्हणून काम पाहतात. देवस्थान ट्रस्टचे कसबा पेठेत मंदिर आहे. तर, गणेशोत्सव काळात गणेश मंडळाच्या वतीने मंदिरासमोर जाहिरात तसेच, पोस्टर लावले जातात. 


त्यामुळे मंदिर झाकून जाते आणि भाविकांना त्याची अडचण होते. याबाबत आरोपी संगीता यांनी देवस्थान ट्रस्टच्या कागदपत्रांवर तक्रार अर्ज केला होता. त्यावर नागरिकांच्या स्वाक्षर्‍या घेतल्या व तो अर्ज सहाय्यक आयुक्त विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय येथे दाखल केला. सहाय्यक आयुक्तांकडून या तक्रारीचा तपास करण्यात आला. त्यावेळी तक्रार अर्जामध्ये स्वाक्षर्‍या करण्यात आलेल्या एका नागरिकाची माहिती घेतल्यानंतर तो मयत असल्याचे निष्पन्न झाले. 


तसेच, इतर नागरिकांना याबाबत विचारले असता, नागरिकांकडून त्या स्वाक्षर्‍या तक्रार अर्जासाठी न घेता, इतर कारणासाठी घेण्यात आल्याचे समोर आले. संबंधित नागरिकांना तक्रार करण्यासाठी स्वाक्षर्‍या घेतल्याचे माहित नसल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर याप्रकरणी शेटे यांनी त्यांच्याविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गणेश मंडळाची व सहाय्यक आयुक्त विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाची फसवणूक केल्याची तक्रार दिली. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक निरीक्षक व्हि. के. सूर्यवंशी हे करत आहेत.
17 Feb 2017
एमपीसी न्यूज - लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने वाळूच्या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी दरमहा हप्त्याची मागणी करणार्‍या शिरूर येथील मंडल अधिकार्‍याला रंगेहात पकडले आहे. 

 

सतिश रामदास पंचरास (49, मंडल अधिकारी शिरूर) असे पकडलेल्या अधिका-याचे नाव आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. वाळूच्या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी शिरूर येथील मंडल अधिकारी दरमहा दहा हजार रुपयांचा हप्ता मागत आहेत, अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने केली होती. त्यानुसार तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचखोर सतिश पंचरास याला दहा हजार रुपये स्वीकारताना शासकीय तलाठी निवास कक्षात आज सकाळी रंगेहात पकडले. त्याच्याविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
17 Feb 2017
एमपीसी न्यूज - पोलिसांनी डोके तालीम भागातून साडेतीनशे लिटर गावठी दारू जप्त केली आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी गावठी दारूचा वाटप सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, आरोपी पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. 


प्रकाश कोबकर, असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी सोमवार पेठेतील डोके तालीम येथे प्रकाश कोबकर नावाचा व्यक्ती गावठी हातभट्टीची दारू वाटप करत असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सुरेश भोसले यांना बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवार पेठेतील डोके तालिमीच्या मागे असलेल्या सार्वजनिक संडासच्या गच्चीवर छापा  टाकून 8 हत्ती कॅन 100 पाऊच, अशी पंधरा हजार किमतीची 350 लिटर गावठी हातभट्टीची दारू हस्तगत केली. मात्र, त्यावेळी वाटप करणारा व्यक्ती पळून गेला असून याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुढील तपास सुरू असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. 
17 Feb 2017
कारवाईत 51 लाख रुपयांचे दागिने 1 पिस्टल, 11 काडतुसांसह महत्वाची कागदपत्रे जप्त

एमपीसी न्यूज - विश्वासाने सांभाळावयास दिलेल्या 79 लाख रपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये अपहार करून बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने एका माजी एनएसजी कमांडोला तसेच त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. त्यांच्यावर मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 51 लाख रुपये किमतीचे जवळपास 2 किलो सोन्याचे दागिने, पिस्तूल, काडतुसे व महत्वाच्या फाईली जप्त करण्यात आल्या आहेत. 


नवनाथ बाजीराव मोहिते व किसन जगन्नाथ मोहिते, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवनाथ मोहिते हा फिर्यादी बांधकाम व्यावसायिकाकडे सबकॉन्ट्रॅक्टर म्हणून 4 वर्षांपासून कामाला होता. त्याने या व्यावसायिकाचा विश्वास संपादन केल्याने व्यावसायिक वडिलोपार्जित तसेच नवीन घेतलेले सोने तसेच महत्वाची कागदपत्रे त्याच्याकडे ठेवण्यास देत असे. अशा प्रकारे या व्यावसायिकाने तब्बल 2700 ग्रॅमचे 79 लाख रुपये किमतीचे दागिने ठेवण्यास दिले होते. 

या दागिन्यांमध्ये आरोपी नवनाथ व रघुनाथ दोघांनी मिळून अपहार केला. तसेच व्यावसायिकाने हे दागिने मागितले असता   असता आरोपी नवनाथ याने आपल्याकडे नाहीत असे सांगत ते परत करण्यास नकार दिला. तसेच आरोपी नवनाथच्या सांगण्यावरून  व्यवहारासंबंधीची महत्वाची कागदपत्रे परत करण्यास किसान चव्हाण याने 25 लाख रुपये मागितले. तसेच आरोपी नवनाथ याने आपल्याकडे परवाना असलेले पिस्टूल असल्याचे सांगून पैसे न दिल्यास गोळ्या घालण्याची धमकी दिली.   

यामुळे अखेर या बांधकाम व्यावसायिकाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली. या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी नवनाथ मोहिते, याच्याकडून परवाना असलेले एक पिस्टल, 11 काडतुसे तसेच त्याच्या घरातून 24 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 17 महत्वाच्या फाईल्स तसेच आपल्या नातेवाईकाच्या घरात लपवून ठेवलेला 27 लाख, चार हजार, 050 रुपये किमतीचा 1 किलो 1 ग्रॅम 500 मिलीग्रॅम वजनाचा सोन्याची वीट, असा एकूण  51 लाख, चार हजार, 050 रुपये किमतीचे 1818 ग्रॅम व 500 मिलीग्रॅम सोन्याचे व सोन्याची वीट जप्त करण्यात आली आहे. 
 

आरोपी नवनाथ याने 2001 ते 2009 या कालावधीत सैन्यदलात शिपाई म्हणून नोकरी केली असून त्याने एन.एस.जी.कमांडो म्हणून सुमारे 4 वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2009 पासून तो फिर्यादी बांधकाम व्यावसायिकाकडे सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करीत होता. 
 
ही कारवाई, गुन्हे शाखेचे प्रभारी अप्पर पोलीस आयुक्त श्री दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त पी.आर.पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोराटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गवळी व पोलीस स्टाफ मंगेश पवार, धीरज भोर, कांता बनसुडे, किरण चोरगे, फिरोज बागवान, बबन बो-हाडे, व्ही.डी. पवार, रमेश गरूड, संदीप दळवी, निलेश देसाई यांनी केलेली आहे. Page 4 of 6