• 1.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • punenews.jpg
10 Mar 2017

एमपीसी न्यूज - दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दोघांनी हातचलाखीने 75 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. ही घटना गुरुवारी (दि.9) दुपारी सव्वादोनच्या सुमारास कासारवाडी येथे घडली.


याप्रकरणी कोयल कटारीया (वय 27, रा. कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोयल कटारीया गुरुवारी एकट्याच घरी होत्या. दुपारी दोघे जण त्यांच्या घरी आले. भामट्यांनी दागिने पॉलिश करून देतो, असे कटारीया यांना सांगितले. त्यांच्याकडून सोन्याच्या बांगड्या पॉलिश करण्यासाठी घेतल्या. हातचलाखी करून 75 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. भोसरी ठाण्याच्या फौजदार एन. ए. डावरे तपास करत आहेत.

10 Mar 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड आणि देहूरोड परिसरात लहान मुलांना पळवून नेणारी महिलांची टोळी सक्रिय असल्याच्या अफवांनी जोर धरला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, या सगळ्या अफवा असून अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन, पोलिसांनी केले आहे. 


पिंपरी-चिंचवड आणि देहूरोड परिसरात लहान मुलांना पळवून नेणारी महिलांची टोळी सक्रिय झाल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. घराबाहेर थांबून लहान मुलं रडण्याचा आवाज काढून ही टोळी चोरी करत असल्याची अफवा पसरली आहे. याबाबत काही चोरट्यांचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या टोळीपासून बचाव करण्यासाठी लहान मूल रडण्याचा आवाज आला, तरी देखील खात्री पटल्याशिवाय रात्री-अपरात्री दरवाजा उघडू नका, अशा खबरदारीचे उपायदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.


लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय झाल्याने नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. यामुळे विशेषत: महिला वर्गात कमालीचे घबराटीचे वातावरण आहे. याबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता, असा कोणताही प्रकार परिमंडळ तीनच्या हद्दीत घडला नसल्याचे पोलीस सांगत आहेत. 


देहूरोड, विकासनगर परिसरातील एका महिलेने मुल चोरून नेल्याची मंगळवारी सायंकाळी अफवा पसरली. महिला मुलाला रेल्वेतून घेऊन जात असल्याचे नागरिकांना समजले. रेल्वे स्थानक येथे नागरिकांनी धाव घेतली. पुण्याच्या दिशेने जाणारी लोणावळा-पुणे रेल्वे लोकल थांबविली आणि संशयित महिलेला बेदम मारहाण केली. रेल्वे पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. महिलेची चौकशी केली असता ते मुले तिचेच असल्याचे तपासात निष्पन्न झाले. 


चिखलीतून शुक्रवारी (दि.3) तीन अल्पवयीन मुले बेपत्ता झाली होती. या मुलांना पळवून नेल्याची अफवा पसरली होती. ती मुले मुंबई येथील सीएसटी रेल्वे स्थानकावर शनिवारी (दि.4) सापडली. बेपत्ता झालेल्या एका मुलाने दोघांना रेल्वे दाखविण्यासाठी म्हणून चिंचवड रेल्वेस्थानक येथे आणले होते. त्यांनतर ते तिघेही रेल्वेत बसून मुंबईला गेले होते, असे पोलिसांनी सांगितले. त्यांचे कोणीही अपहरण केले नव्हते, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.


याबाबत बोलताना परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले की, ''लहान मुले चोरून नेणारी महिलांची टोळी सक्रिय असल्याच्या केवळ अफवा आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. शहरात अशाप्रकारचे कोणतेही गुन्हे घडलेले नाहीत. तसेच असे गुन्हे उडू नयेत यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मुलांना शाळेत सोडताना काळजी घ्यावी. आपली मुले कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीकडे देऊ नयेत, याची शाळेला कल्पना द्यावी'', असेही शिंदे म्हणाले.  


''मुले चोरून नेत असल्याच्या सगळ्या अफवा आहेत. नागरिकांनी खोट्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. कोणीही खोटी माहिती सोशल मीडियावर फिरवू नये. कायदा हातात घेऊन विनाकारण मुले चोरणारी महिला म्हणून कोणालाही मारहाण करू नये. कोणावर संशय असल्यास खात्री करावी. पोलिसांना माहिती द्यावी'', असे आवाहन देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण मोरे यांनी केले आहे. 

10 Mar 2017

अटक आणि जामीनावर सुटका

एमपीसी न्यूज - निवडणुकीपुर्वी प्रतिस्पर्धी उमेदवारावर दहशत निर्माण करण्यासाठी दंगल घडवून आणणारा भाजपचा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक शैलेश मोरे गुरुवारी (दि.9) पोलिसांना शरण आला. मोरवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामीनावर सुटका केली.


पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतदानाला काही तासांचा अवधी बाकी असताना मतदारांना पैसे वाटण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंचवड येथे 18 फेब्रुवारी रोजी रात्री राडा झाला होता. याप्रकरणी भाजपच्या उमेदवाराविरोधात दंगल माजविल्याप्रकरणी तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.


विजयनगर, आनंदनगर, एम्पायर इस्टेट, भाटनगर प्रभाग क्रमांक 19 भाजपचे उमेदवार शैलेश प्रकाश मोरे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार काळूराम मारुती पवार हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत होते. 18 फेब्रुवारी रोजी रात्री पैसे वाटण्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यातून त्यांच्यात भांडणे झाली.


याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद देण्यात आली होती. राष्ट्रवादीचे काळूराम पवार यांच्याविरोधात खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि भाजपचे उमेदवार शैलेश मोरे यांच्याविरोधात दंगल माजविल्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


गुन्हा घडल्यापासून दोघेही पसार होते. पोलीस त्यांच्या मागावर होते. गेल्या 20 दिवसांपासून शैलेश मोरे पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर गुरुवारी (दि.9) शैलेश मोरे याने शरणागती पत्करली. गुरुवारी सकाळी मोरे आपल्या साथीदारांसह चिंचवड पोलिसांना शरण आला. पोलिसांनी मोरे यांच्यासह त्यांच्या पाच साथीदारांना अटक केली. मोरवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली. 


दरम्यान, राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक काळूराम पवार हा पसार आहे. त्याने अटक पूर्व जामीनासाठी शिवाजीनगर न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत.

10 Mar 2017
एमपीसी न्यूज - भरधाव पीएपीएमएल बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (शुक्रवारी) सकाळी नऊच्या सुमारास जगताप डेअरी चौकातील वाय जंक्शन येथे झाला. याप्रकरणी बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. 
विजयकुमार विरपक्ष स्वामी (वय 24, रा.थेरगाव, मूळगाव उस्मानाबाद) असे मृत्यू झालेल्या सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीएमपीएमएल चालक रवि संभाजी चव्हाण (वय 30, रा. थेरगाव) याच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे...
 

विजयकुमार हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. बावधन येथील एका खासगी कंपनीत तो नोकरी करत होता. विजयकुमार शुक्रवारी दुचाकीवरुन कंपनीत जात होता. जगताप डेअरी चौकातून जात असताना पीएमपीएम बस आणि त्याच्या दुचाकीची समोरा-समोर धडक झाली, असे सांगवी पोलिसांनी सांगितले. 
 

विजयकुमार याला उपचारासाठी त्वरीत औंध येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी उपचारापुर्वीच त्याला मृत घोषित केले. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

 

10 Mar 2017

एमपीसी न्यूज - पुण्यातील नारायण पेठ येथील सीताराम अपार्टमेंटच्या पार्किंगमधील चारचाकी गाडी मागे घेताना दीड वर्षाची चिमुरडी कार खाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 9) दुपारी दोन वाजता घटना घडली.


सुप्रिया वेंकट वालिका असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी मनोज एकनाथ जांभळे (वय- 42, रा. जांभूळकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रियाचे वडील वेंकट वालिका हे सीताराम अपार्टमेंटमध्येच वॉचमन म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांचे घरही त्यांचे याच पार्किंगमध्ये घर आहे. दूपारी सुप्रिया पार्किंगमध्ये खेळत असताना मागे घेत असलेल्या चारचाकीच्या शेवटच्या चाकाखाली आली. ते चाक तिच्या पोटावरून गेल्यामुळे ती गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

09 Mar 2017

एमपीसी न्यूज - सहकारनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत फरार असलेल्या आरोपीस जेरबंद केले असून त्याच्या ताब्यातून 6 दुचाकी जप्त केल्या आहेत. यावेळी पोलिसांनी एका अल्पवयीन विद्यार्थ्यालाही ताब्यात घेतले. रोहित कांबळे असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याच्या 14 वर्षीय सहका-याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले.


याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सहकारनगर पोलीस ठाण्याचे तपास पथकातील कर्मचा-यांना के. के. मार्केट येथील पार्किंगमध्ये संबंधित आरोपी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणून त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4 आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून  3 होंडा अॅक्टिव्ह,1 टीव्हीएस ज्युपिटर, 2 मोटर बाईक अशा दुचाकी जप्त केल्या आहेत.


ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. एम. मोरे, पोलीस हवालदार मोरे, सोनावणे, पोलीस शिपाई पिंगळे, कोंडे, इंगळे, चव्हाण, येवले, कोकणे यांनी केली.

09 Mar 2017

एमपीसी न्यूज - पुणे शहर आणि जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या 23 शाखांमधील 50 महिला खातेदारांनी मोबाईल अॅप्लीकेशन आणि युपीआयचा गैरवापर करत खात्यांमधून 6 कोटी 14 लाख रुपये काढून बँकेची फसवणूक केली.


याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राचे डेप्युटी झोनल मॅनेजर निरंजन श्रीपाद पुरोहित (वय-59) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून 50 महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


हा प्रकार 1 डिसेंबर 2016 ते 18 जानेवारी 2017 या कालावधीत घडला. बँक ऑफ महाराष्ट्राच्या पुणे शहरातील बाजीराव रोड, सोमवार पेठ, कात्रज, हडपसरगाव, फुरसुंगी, चाकण, तळेगाव ढमढेरे यासह तब्बल 23 शाखांतून युपीआय आणि मोबाईल अॅप्लीकेशनचा गैरवापर करत ही फसवणूक करण्यात आली.


शिवाजीनगर पोलिसांनी हे प्रकरण सायबर पोलिसांकडे वर्ग केले असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

09 Mar 2017

एमपीसी न्यूज - पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या निवासस्थानाच्या आवारात असलेले चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी तोडून नेले आहे. ही घटना काल (8 मार्च) रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी सुरक्षारक्षक शिवाजी लेडघर (वय-49, रा. खेड, जि.पुणे) यांनी फिर्याद दिली असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस उपनिरीक्षक एस.पी.पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुक्त कुणाल कुमार राहत असलेल्या बंगल्याच्या परिसरात हे चंदनाचे झाड होते. अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करत हे झाड तोडून झाडाच्या खोडाचा मुख्य गाभा (5 हजार रुपये किमतीचा) कापून नेला. दोन ते तीन चोरट्यांचे हे काम असण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

09 Mar 2017

एमपीसी न्यूज - पोलीस उपायुक्त बी.व्ही. शिर्के असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणा-याला त्याच्या साथीदारांसह प्रॉपर्टी सेलच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर त्याचे इतर 6 साथीदार नवले ब्रीज येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना प्रॉपर्टी सेलच्या गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. कारवाईत त्यांच्याकडून आठ लाख रुपये किमतीच्या दोन स्विफ्ट डिझायर गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.


भास्कर विजय शिर्के, असे मुख्य आरोपीचे नाव आहे. (पोलीस उपायुक्त असल्याची तो बतावणी करत होता.) सोहेब महंमद शेख (वय 22, रा. दत्तमंदिराजवळ पर्वती), आकाश नवनाथ जठार (वय 23, रा. बिबवेवाडी), शंकर गुलाब मुजूमले (वय 29, रा. न-हे गाव, मूळ ता. हवेली), गणेश दत्तात्रय मुजूमले (वय 27, रा. ता. हवेली) विकास विलास गव्हाणे (वय 23, ता. हवेली) रवींद्र सोनबा खाटपे (वय 22 रा. ता. हवेली), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.


प्रॉपर्टी सेल शाखेच्या अधिका-यांना, पोलीस उपायुक्त असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणा-या टोळीचा म्होरक्या भास्कर शिर्के याचे सर्व साथीदार नवले ब्रीज येथून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, नवले ब्रीज येथे सापळा रचून प्रॉपर्टी सेलच्या अधिका-यांनी या 6 आरोपींना अटक केली.


या सर्व आरोपींनी विशेष अधिकारी असल्याचे भासवण्यासाठी एकसारखा पोशाख परिधान केला होता. ते सर्व व्हि. डी आय गाडी क्रमांक एमएच 12 केई4187 किंमत रुपये तीन लाख, तर स्विफ्ट डिझायर क्रमांक एमएच 12/ एनजे 8296 किंमत 5 लाख या गाड्यांमधून पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, त्यांना त्याचवेळी सापळा रचून अटक करण्यात आली. आमचा मुख्य साथीदार भास्कर विजय शिर्केला पोलिसांनी अटक केल्याने आम्ही पळून जात असल्याची त्यांनी कबुली दिली.


या सर्व आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहे.

09 Mar 2017

एमपीसी न्यूज - भरधाव वेगातील कार थांबविण्यास सांगितल्याने चिडलेल्या चालकाने वाहतूक पोलिसाला अपशब्द वापरत धक्काबुक्की केली. ही घटना बुधवारी (दि.8) दुपारी साडेबाराच्या सुमारास भूमकर चौक येथे घडली.


भास्कर देवदास भट्टाचार्य (वय 44, रा. वाकड), असे अटक करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजलाल भालेराव यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


तेजलाल भालेराव हिंजवडी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. बुधवारी ते भूमकर चौकातील सिग्नलवर वाहतूक नियंत्रण करत होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास भास्कर भट्टाचार्य भरधाव वेगात कार घेऊन जात होता. त्यावेळी भालेराव यांनी त्याला कार थांबविण्यास सांगितले. चिडलेल्या भास्कर भट्टाचार्य याने भालेराव यांना अपशब्द वापरत धक्का-बुक्की केली आणि ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला.


हिंजवडी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश आबनावे तपास करत आहेत.

09 Mar 2017

एमपीसी न्यूज - कोथरूडमध्ये करिश्मा सोसायटीतील 7 व्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटच्या बाल्कनीतून पडून चिमुकलीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान घडली.

निकिता अभिजीत पाटील (वय 3), असे मृत्यूमुखी पडलेल्या या चिमुकलीचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूड कर्वे रोडवरील करिश्मा सोसायटीत 7 व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये अभिजीत पाटील आपल्या पत्नी व दोन मुलीसह राहतात. निकिता ही त्यांची लहान मुलगी. अभिजीत व त्यांची पत्नी दोघेही आयटी कंपनीत कामाला आहे. आज सकाळी अभिजीत यांची पत्नी कामावर गेली होती. त्यानंतर मोठ्या मुलीच्या शाळेची वेळ झाल्याने अभिजीत हे तिला स्कूल बसमध्ये सोडवायला गेले होते. यावेळी निकिता घरात एकटी होती.

घरात स्वतः एकटीच आहे असल्याचे निकिताला जाणवल्याने आई-बाबांना शोधत ती घराच्या बाल्कनीत आली. यावेळी बाल्कनीतून पडून तिचा मृत्यू झाला. मोठ्या मुलीला स्कूल बसमध्ये सोडून  घरी परतल्यानंतर त्यांना निकिताचा बाल्कनीतून पडून मृत्यू झाल्याचे समजले.

निकिताच्या या दुर्दैवी मृत्यूने सोसायटी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

09 Mar 2017

एमपीसी न्यूज - ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून एका तरुणीची 26 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना एक मार्चला दुपारी तीनच्या सुमारास घडली.


याप्रकरणी मंजिरी पानसरे (वय 24, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


मंजिरी पानसरे यांच्या बँक खात्यातून अनोळखी व्यक्तीने 26 हजार रुपये काढून घेतले. एक मार्चला दुपारी बँक खात्यातून पैसे काढल्याचा पानसरे यांच्या मोबाईलवर संदेश आला. त्यावेळी बँक खात्यातून अज्ञाताने पैसे काढल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसात तक्रार दिली. पिंपरी ठाण्याचे फौजदार बोचरे तपास करत आहेत.

09 Mar 2017

एमपीसी न्यूज - इमारतीच्या सहाव्या मजल्यावर काम करत असताना पाय घसरून तोल जाऊन खाली पडल्याने मजुराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.4) दुपारी एकच्या सुमारास वाकड, कस्पटे वस्ती येथे घडली.


उमेश कोदू ध्रुव (वय 28, रा. लेबर कॅम्प, वाकड), असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी ठेकेदार दीपक मल्लेश यलाफुल्ला यादव आणि जे.के. असोसिएट्स कन्स्ट्रक्शन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उमेश याची पत्नी लक्ष्मी उमेश ध्रुव (वय 23) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


वाकड, कस्पटे वस्ती येथे बांधकाम साईटचे काम सुरू आहे. दीपक यादव यांनी या कामाचा ठेका घेतला आहे. उमेश हा त्यांच्याकडे मजूर म्हणून काम करत होता. शुक्रवारी दुपारी उमेश इमारतीच्या सहाव्या मजल्यावर डस्टचे काम करत होता. त्यावेळी पाय घसरल्याने तोल जाऊन तो खाली पडला. त्यात गंभीर जखमी झाल्याने उमेश याचा मृत्यू झाला.


ठेकेदार दीपक यादव आणि जे.के. असोसिएट्स कन्स्ट्रक्शन  यांनी कामगारांच्या सुरक्षिततेची कोणतीच काळजी घेतली नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड ठाण्याचे फौजदार टी.एम. फड तपास करत आहेत.

09 Mar 2017

एमपीसी न्यूज - 'ओएलएक्स' या संकेतस्थळावर मोटार विक्रीची जाहिरात देऊन सहा जणांनी एका तरुणाची पाच लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 18 डिसेंबर रोजी घडला.


याप्रकरणी निरज मेहरा (वय 27, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार या प्रकरणी त्यांनी वाकड पोलिसांत संतोष कुमार सिंग (उत्तर प्रदेश), खोरा पुई (दिल्ली), कृष्णाप्पा पी याच्यासह इतर तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नीरज मेहरा यांना नवीन मोटार खरेदी करायची होती. आरोपींनी मोटार विक्रीची जाहिरात ‘ओएलएक्स’वर दिली होती. निरज मेहरा यांनी आरोपींशी संपर्क साधला. समोरील व्यक्ती आणि निरज यांच्यामध्ये साडेपाच लाख रुपयांमध्ये व्यवहार झाला. 


आरोपींनी मोटार पुणे, विमानतळावर असून सीमा शुल्क विभागाच्या अधिका-यांच्या ताब्यात आहे. त्यांना 32 हजार रुपये देऊन ती सोडवून घ्या, असे दूरध्वनीवरून नीरज यांना सांगितले. नीरज यांनी बोगस सीमा शुल्क अधिकारी संतोष कुमार सिंग यांच्या खात्यावर 20 सप्टेंबरला 32 हजार रुपये जमा केले.


ओएलएक्सवर जाहिरात देणा-यांनी पुन्हा नीरज यांच्याशी संपर्क साधला आणि पैशांची मागणी केली. नीरज यांनी खोरो पुई याच्या बँक खात्यात 21 सप्टेंबर 2016 रोजी तब्बल पाच लाख 15  हजार रुपये जमा केले. त्यानंतर विमानतळावर गाडी घेण्यासाठी नीरज तेथे गेले. मात्र, विमानतळावर अशा नावाचे कुणी सीमा शुल्क अधिकारी नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.


 त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निरज यांनी पोलिसांत धाव घेतली आणि आरोपींविरोधात फिर्याद दिली. वाकड ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम. के. आदलिंग तपास करत आहेत.

09 Mar 2017

एमपीसी न्यूज - आईच्या मृत्यूच्या विरहाने नव्हे तर काम करत असलेल्या कंपनीतील एका वरिष्ठाने लैंगिक छळ केल्यामुळेच मोनिका शर्माने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे मोनिका शर्मा आत्महत्या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


बावधन येथे 28 वर्षीय मोनिका शर्माने 22 फेब्रुवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने तिने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. परंतु ती काम करत असलेल्या कंपनीतील एका वरिष्ठाने तिचा लैंगिक छळ केल्याने तिने आत्महत्या केली आहे, असा आरोप केल्याने तपासाच्या सुया आता वेगळ्या पद्धतीने फिरतील.


याप्रकरणी तिच्या नातेवाईकांनी ती काम करत असलेल्या कंपनीतील वरिष्ठ अधिकारी रणजीत मिश्रा याच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितल्यानुसार मयत मोनिका आणि रणजित मिश्रा एकत्र राहत होते. मिश्रा हा आपल्या बायकोला घटस्फोट देऊन हे दोघे लग्न करणार होते. दरम्यान, या दोघांमध्येच काहीतरी बिनसले आणि मोनिकाने या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.


तिच्या या निर्णयाला रणजित मिश्रा याने विरोध करत तो तिला रिलेशनशिपमध्ये राहण्याची जबरदस्ती करत राहिला आणि त्याने तिचा मानसीक आणि लैंगिक छळ सुरू केला. या त्रासाला कंटाळून अखेरीस मोनिका शर्माने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तिच्या नातेवाईकांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

09 Mar 2017
एमपीसी न्यूज - लुटून पेट्रोल अंगावर टाकून पेटवून दिलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा आज (गुरुवारी) उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पत्नी, जावयासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.7) भरदुपारी अडीचच्या सुमारास नाशिक फाटा येथे घडली होती. 


उद्धव आसाराम उनवणे (वय 65, रा. आळंदी, मूळ रा. नाशिक) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी सुमन उद्धव उनवने आणि जावाई ज्ञानेश्वर जयंत महाले यांच्याहसह इतर तिघांविरोधात भोसरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


उद्धव उनवणे हे बुधवारी नाशिकवरुन पैसे घेऊन वल्लभनगर बस स्थानकात आले होते. वल्लभनगर स्थानकातून ते नाशिक फाट्याकडे जात होते. त्यावेळी पाठलाग करत आलेल्या तिघांनी त्यांना तुम्ही उनवनेच काय असे विचारले आणि मारहाण केली.

त्यांच्याकडील 20 हजार रुपयांची रोकड काढून घेतली आणि डोक्यावर पेट्रोल टाकून पेटवून देऊन पोबारा केला. पत्नी सुमन आणि जावाई ज्ञानेश्वर यांनीच मारहाण करायला लावले असल्याचे  फिर्यादीत नमूद केले आहे.  यामध्ये उनवने गंभीर भाजले होते. त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
08 Mar 2017

एमपीसी न्यूज - पुण्यातील फुरसुंगी येथे चार महिन्याच्या मुलीचे संगोपन करण्यास असमर्थ ठरत असल्याच्या कारणारून एका उच्चशिक्षित आईने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.


प्रीती सूरज लांडगे (वय 23, रा. जयहिंदनगर, फुरसुंगी), असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस उपनिरीक्षक बी. एस. डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत प्रीतीचे बी. ई. कॉम्प्युटरपर्यंत शिक्षण झाले होते. एका कंपनीत ती सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरीस होती. 2015 मध्ये व्यावसायिक असलेल्या सूरज यांच्याशी तिचा विवाह झाला होता. सध्या ती बाळंतपणासाठी फुरसुंगी येथे माहेरी आली होती व नोव्हेंबर 2016 मध्येच तिने मुलीला जन्म दिला होता.


रविवारी (5 मार्च) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कपड्यांना इस्त्री करण्यासाठी जाणार असल्याचे सांगत ती घराबाहेर पडली परंतू रात्र झाली तरी ती परतली नाही. म्हणून आई-वडिलांनी तिचा शोधा घेतला, परंतु ती आढळली नाही. अखेरीस आई-वडिलांनी याबाबत हडपसर पोलिसात तक्रार दाखल केली.


त्यानंतर सोमवारी (6 मार्च) सकाळी अकरा वाजता घरापासून जवळच असलेल्या विहिरीत प्रीतीचा मृतदेह आढळला. पोलिसांना तिने मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट आढळून आली असून त्यात तिने मी चार महिन्यांच्या मुलीचे संगोपन करू शकत नाही, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. तसेच माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे नमूद केले आहे.


याविषयी मानसोपचारतज्ज्ञ डॉ.मुंदडा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बहुतांश वेळा प्रसुतीनंतर महिलांमध्ये (पोस्टपार्टम डिप्रेशन) हार्मोन्स बदलतात. त्यामुळे अशावेळी त्या महिलेमध्ये नकारात्मक विचार येतात आणि आपण नेमके काय करत आहोत याचे भान राहत नाही. हा कदाचित त्यातलाच प्रकार असू  शकेल. परंतू याविषयी ठोस निर्णय सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले.

08 Mar 2017

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील गजा मारणे टोळीतील तडीपार गुंडास गुन्हे शाखेच्या अॅन्टी गुंडा स्कॉड पथकाने जेरबंद केले. ही कारवाई 7 मार्चला कोथरूड येथे करण्यात आली.

अविनाश उर्फ पप्पू वसंत कडू (वय-34, रा. म्हातोबानगर, गल्ली क्रमांक 4, कोथरूड), असे आरोपीचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या विरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी अशा प्रकारचे 10 गुन्हे दाखल आहेत. त्याला पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपार करण्यात आले असतानाही तो कोथरुड येथे आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला जेरबंद केले.

Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start