क्राईम न्यूज

क्राईम न्यूज (74)

17 Feb 2017

 तर शहरात  88 केंद्र व 373 मतदान बूथ संवेदनशील

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत यावर्षी  774 उमेदवारांपैकी 214 उमेदवारांवर वेगवेगळ्या स्वरुपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. तर  443 केंद्रापैकी 88 मतदानकेंद्रेही संवेदनशील आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे यांनी आज (शुक्रवारी) परिषदेत दिली.


कासारवाडी येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस पोलीस उपाआयुक्त गणेश शिंदे, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे,पिंपरी विभागाचे सहायक पोलीस उपायुक्त राम मांडूरके, चतुःश्रृंगी विभागाच्या  सहायक पोलीस उपायुक्त  वैशाली जाधव, महापालिका अतिरीक्त आयुक्त तानाजी शिंदे, निवडणूक सहायक आयुक्त यशवंत माने, सहायक आयुक्त आण्णा बोदडे आदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, यावेळी  संवेदनशील असा कोणताही एक प्रभाग नसून 32 प्रभागातील एकूण 443 केंद्रापैकी 88 मतदान केंद्रे व त्या मतदान केंद्रातील 1 हजार 510 बूथ पैकी 373 बूथ हे संवेदनशील आहेत. यामध्ये  5 पेक्षा जास्त बूथ असणारी मतदानकेंद्रे आहेत जिथे विशेष अधिकारी नेमले गेले आहेत.  या ठिकाणी उभारलेले मतदार, त्यांच्या कार्यकर्त्यांची पार्श्वभूमी, मतदारवर्ग यासा-या गोष्टींचा विचार करुन कायदा व सुव्यवस्थेसाठी आम्ही  ही केंद्रे निवडली आहेत. 


या काळात सुमारे अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार आहे.  अगदी 5 ते 7 मिनिटात आमची यंत्रणा तक्रारीच्या ठिकाणी पोहचेल अशी आमची तयारी आहे. तसेच आचारसंहितेच्या काळात आज अखेर 270 पैकी 260 जणांनी त्यांची हत्यारे जप्त झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

17 Feb 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी पोलिसांनी एक वर्षासाठी तडीपार केले आहे.


विशाल उर्फ सॅम्युअल डेडली अॅर्नाल्ड (रा. कामगारनगर, पिंपरी) असे तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल हा पिंपरी ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आहे. पिंपरी पोलिसांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी मंजुरी देताच विशाल याला पुणे शहर आणि जिल्ह्याच्या हद्दीतून मुंबई पोलीस अॅक्ट कलम 56 (1) (अ) (ब) अन्वये एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

17 Feb 2017
एमपीसी न्यूज - कष्टक-यांचे नेते बाबा कांबळे यांच्या पुतण्यावर दोघांनी काचेच्या बाटलीने तोंडावर आणि डोक्यावर वार केले. ही घटना काल (गुरुवारी) रात्री दहाच्या सुमारास लोखंडे कामगार भवनसमोर घडली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवा प्रल्हाद कांबळे असे वार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश बोचकुरे (वय 24 रा. गांधीनगर, पिंपरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गोकुळ उर्फ विकास कांबळे (वय 27) आणि सेलमन गायकवाड (वय 21 दोघेही रा. पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवा कांबळे आणि त्याचा मित्र सुरेश बोचकुरे हे दोघे काल रात्रीच्या सुमारास पिंपरीतील कामगार भवनासमोर गप्पा मारत उभे होते. त्यावेळी आलेल्या आरोपींची शिवा कांबळे याच्यासोबत शाब्दिक चकामक झाली. यानंतर आरोपींनी शिवाच्या तोंडावर आणि डोक्यावर काचेच्या बाटलीने वार केले. यामध्ये शिवा जखमी झाला त्याला तात्काळ वायसीएम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.  
 

16 Feb 2017

पाठोपाठ जीपमधून येणारा दारू मालकही ताब्यात


एमपीसी न्यूज - राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने अवैध दारू घेऊन येणारा ट्रक सापळा रचून ताब्यात घेतला. हा ट्रक नगरहून पुण्याच्या दिशेने येत होता. कारवाईत ट्रकमधून 750 मिलीचे तब्बल 285 बॉक्स ताब्यात घेतले आहेत. तसेच जीपच्या मागे येणार्‍या दारू मालकाला त्याच्या जीपसह ताब्यात घेण्यात आले आहे.


राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकार्‍यांना खबर्‍याकडून वाघोली परिसरात नगररस्त्याने  एमएच-13 एएक्स 2001 हा ट्रक अवैध दारू घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार केसनंद फाटा वाघोली येथे सापळा रचून ट्रक अडवून त्याची तपासणी केली. ट्रकमध्ये दारू साठवण्यासाठी करण्यात आलेल्या कप्प्यात गोवा निर्मित रिअल सेव्हन कंपनीची अवैध 750 मिलीचे 285 बॉक्स सापडले. ट्रकचालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सूत्रधार मागून येणार असल्याचे सांगितले.

16 Feb 2017

एमपीसी न्यूज - तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून परिसरातील नागरिकांना कोयत्याचा  धाक दाखवून धमकाविणा-या एकाला पिंपरी पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई आज (गुरुवारी) मध्यरात्री मोरवाडी येथे करण्यात आली.


विश्वजीत रमेश जोशी (वय 28, रा. मोरवाडी झोपडपट्टी, पिंपरी), असे अटक केलेल्या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वजीत हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला पुणे शहर आणि जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार केले होते. गुरुवारी पिंपरी पोलीस हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी विश्वजीत हा तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून परिसरात आला आहे. रस्त्यावरून येणा-या -जाणा-या नागरिकांना हातामध्ये कोयता घेऊन धमकावित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केले.


पिंपरी ठाण्याचे फौजदार श्रीनिवास कामुनी तपास करत आहेत.

16 Feb 2017

पोलीस आणि निवडणूक आयोगाची कारवाई


एमपीसी न्यूज - पुनावळे चौकात काही कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा फोन पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. त्यानंतर  वाकड पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत मोटार ताब्यात घेतली असून मोटारीतील तीन लाख 20 हजार रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.  पोलीस आणि निवडणूक आयोगाने आज (गुरुवारी) सायंकाळी सातच्या सुमारास ही कारवाई केली आहे. 


याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.


पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची सर्वत्र धामधूम सुरू असताना, काही भागात मतदारांना आमिष दाखविण्याचे प्रकार घडू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वीच ताथवडे येथे एका मोटारीत पैसे सापडले असल्याची चर्चा झाली होती. मोरवाडीत एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना मिक्सर वाटप केल्याची चर्चा होती. त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना गुरुवारी वाकड येथे पैसे वाटप करत असल्याचा प्रकार घडला आहे.


पुनावळे येथे काही कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटत असल्याचा दूरध्वनी नियंत्रण कक्षाला आला. त्यानंतर वाकड पोलीस घटनास्थळी गेले. त्यांनी एक मोटार ताब्यात घेतली असून मोटारीतील तीन लाख 20 हजार रुपयांची रोकड हस्तगत केली असल्याचे, वाकड पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
16 Feb 2017

एमपीसी न्यूज - पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दत्तवाडी, भारती विद्यापीठ, मार्केटयार्ड, बंडगार्डन, समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहा सराईत गुन्हेगारांना शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्यावर विविध स्वरुपातील गंभीर गुन्हे दाखल आहेत.


महेश उर्फ अजिंक्य शिवाजी पवार (24, पवार चाळ, कात्रज) याला एक वर्षासाठी, अर्जून दगडू लंबाडे (19, दांडेकर पूल) व सागर पोपट सोनवणे (20, दांडेकर पूल) या दोघांना शहर व जिल्ह्यातून एक वर्षासाठी, कुणाल सुधीर पिसाळ (21, नाना पेठ), किरण धर्मराज खरात (22, ताडीवाला रोड) याला शहर व जिल्ह्यातून एक वर्षासाठी तर अब्बास सुल्तान खान (21, आंबेडकर नगर मार्केट यार्ड) याला शहर व जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.


हद्दपार करण्यात आलेल्या सहा जणांविरोधात शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर जखमी करणे, दंगा करणे प्राणघातक हत्यारासह हल्ला करणे, घातक शस्त्रे  बाळगणे, शिवीगाळ करणे, असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सहा जणांची पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दहशत आहे. तसेच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या सहा जणांना शहर व जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश परिमंडळ दोनचे उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिले आहेत. हद्दपार केलेल्या कालावधीत या पाचपैकी कुणीही शहर किंवा जिल्ह्यात दिसून आल्यास त्याबाबत नजिकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

सराईत गुन्हेगार लॉली माने दोन वर्षासाठी तडीपार

 

शिवाजीनगर परिसरात दहशत असणारा सराईत गुन्हेगार लॉली माने यास दोन वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिले आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल उर्फ लॉली सुनील माने (23, कामगार पुतळा)  याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत आहे. त्याच्या विरोधात सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला तडीपार करण्याचा प्रस्ताव शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी पाठविला होता.

त्यानुसार अतुल उर्फ लॉली माने याच्या विरोधात दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा प्रस्ताव परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिला आहे.

16 Feb 2017

एमपीसी न्यूज - शो-रुम मध्ये सर्व्हिसिंग केलेल्या गाड्यांच्या बिलांच्या रकमेची नोंद न करता रोखपालानेच 9 लाख 86 हजार 255 रुपयांचा अपहार केला. हा प्रकार नुकताच वाकड  येथे उघडकीस आला.

याप्रकरणी संतोष गोविंद साळुंखे (रा. यमुनानगर, निगडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजीव अगरवाल (वय 53, रा. बाणेर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अगरवाल यांचे वाकड येथे मारुती सुझुकीचे शो-रुम आहे. संतोष साळुंखे हा शोरुमध्ये रोखपाल म्हणून नोकरी करत आहे. सप्टेंबर ते डिसेंबर 2016 दरम्यान संतोष याने शोरुम मध्ये सर्व्हिसिंग करिता आलेल्या वाहनांच्या बिलांचा रकमेची नोंद न करता 9 लाख 86 हजार 255 रुपयांचा अपहार केला आहे. पैशांची अफरातफर झाल्याचे लक्षात आल्यानंतर अगरवाल यांनी पोलिसात धाव घेतली. हिंजवडी ठाण्याचे फौजदार वाय. जे. रामेकर तपास करत आहेत.

16 Feb 2017

एमपीसी न्यूज - रसिलाच्या खुनाचा तपास कसा सुरू आहे तसेच केस संदर्भात रसिलाचे वडिल, भाऊ व इतर नातेवाईक तसेच महाराष्ट्र कामगार युनियनचे सरचिटणीस व इंटक संघटनेचे कार्याध्यक्ष राजन नायर यांनी आज पुणे पोलिसांची आयुक्तालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी रसिलाचा खून करणा-या आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

रसिलाच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी आणि 1 कोटी रुपये देण्याची मागणी कंपनीकडे केली आहे. तसेच इशुरन्स व इतर असे 25 लाख रुपये मिळतील, असे नातेवाईकांनी सांगितले आहे. तर यावेळी कंपनीची सुरक्षा चांगली असावी. कंपनीतून घरापर्यंत सुरक्षा द्यावी आणि आरोपीला फाशी व्हावी, अशी अपेक्षा रसिलाच्या वडिलांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे रसिलाला काही वरिष्ठ अधिकारी त्रास देत होते, याबाबत विचारले असता, त्याची काही कागदपत्रे पोलिसांना दिली आहेत. पोलीस व आमच्यात चांगले संबंध आहेत, असेही स्पष्ट केले.

यावेळी रसिलाचे वडील आणि भाऊ यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची विनंती केली होती. ती पोलिसांनी मान्य केली आहे. रसिलाच्या केबिनमध्ये इतरही काही लोक असण्याच्या शक्यता आहेत, असा आम्हाला संशय होता. यासाठी आम्हाला  सीसीटीव्ही फुटेज पाहायचे होते, अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष राजन नायर व रसिलाचा भाऊ लेझीम ओ पी. यांनी दिली.             
    

16 Feb 2017
एमपीसी न्यूज - तडीपार गुन्हेगाराला चिंचवड पोलिसांनी पिस्तूलासह जेरबंद केले. ही कारवाई मंगळवारी (दि.14) दुपारी साडेचारच्या सुमारास चिंचवड, वेताळनगर येथे करण्यात आली. 

 
रंजीत बापू चव्हाण (वय 24, रा. वेताळनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजीत चव्हाण हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर परिमंडळ तीनमधील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. वडगाव-मावळ पोलिस ठाण्यातील दाखल असलेल्या एका गुन्ह्यात तो पसार होता. त्याला चिंचवड पोलिसांनी पुणे शहर आणि जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. 

चिंचवड पोलीस मंगळवारी हद्दीत गस्त घालत होते. रंजीत हा चिंचवड येथे येणार असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला गजाआड केले. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

Page 5 of 6