19 Apr 2017

एमपीसी न्यूज - कात्रजमध्ये मंतरवाडी येथे एका भंगार मालाच्या गोडाऊनला आग लागली होती. अग्निशामक दलाला माहिती मिळताच तातडीने कार्यवाही करत हडपसर अग्निशामक केंद्राच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.


मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज रोडवरील मंतरवाडी येथे भारत वजन काट्याच्या पाठीमागे अगरवाल यांचे प्लास्टिक मटेरियल व जुन्या टाकाऊ वस्तुंच्या भंगार मालाचे गोडाऊन आहे. हे गोडाऊन अजिम शमुद्दीन शेख चालवतो. या ठिकाणी काही वेळापूर्वी अचानक आग लागली होती. अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच दोन गाड्या व जवानांनी आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठे नुकसान टळले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.


कारवाईत हडपसर अग्नीशामक केंद्राचे शिवाजी चव्हाण, चौरे, टकले, टिळेकर, केदारे, जगताप आदींनी सहभाग घेतला.

19 Apr 2017

एमपीसी न्यूज - ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या मालकाला शिवीगाळ करून त्याच्या खिशातील पैसे हिसकावून घेणा-या एका अल्पवयीन मुलाला वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार रविवारी (दि.16) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काळेवाडी येथील धनगर बाबा मंदिराजवळ घडला होता.

 

वाकड पोलिसांनी काळेवाडी येथे राहणा-या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विकास कांबळे (वय-28, रा. हिंजवडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे यांचे काळेवाडीत जेके ऑनलाईन लॉटरी सेंटर आहे. ताब्यात घेण्यात आलेला अल्पवयीन मुलगा आणि त्याचे आणखी दोन साथीदार रविवारी लॉटरी सेंटरमध्ये आले. त्यावेळी दुकानात काम करणारा अमोल वंगवाड याच्या हातातील आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेतला. हा प्रकार सुरू असताना कांबळे यांनी कामगाराचा मोबाईल का घेतला अशी विचारणा करून तो परत देण्यास सांगितले. यामुळे चिडलेल्या अल्पवयीन मुलाने कांबळे यांच्या डोक्याला बिअरची बाटली लावून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळ करून त्यांच्या खिशातील दोन हजार रुपये आणि महत्वाची कागपत्रे घेऊन पळून गेला.

 

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

19 Apr 2017

एमपीसी न्यूज - जमिनीचे बनावट दस्त तयार करून ते खरे असल्याचे सांगून बँक ऑफ महाराष्ट्रच्या वाकड शाखेतून 70 लाखांचे कर्ज घेणा-या इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2013 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या वाकड शाखेत घडला.


श्रीरंग बाबुराव झोपे (रा. चिखली प्राधिकरण), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संजय मणियार (वय-58 रा. हडपसर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झोपे याने मेनील कमल प्रिसीजन वर्क्सच्या नावाने बँकेत 70 लाख रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. झोपे याने त्याच्या मालकीची असलेली चिखली प्राधिकरणमधील जमिनीचे बनावट दस्त तयार करून बँकेत सादर केले. हे कर्ज घेत असताना त्याने खोटे दस्त तयार केले तसेच पिंपरी-चिंचवड नगर विकास प्राधिकरणाचा बनावट ना हरकत दाखला तयार करून बँकेत सादर केला. बँकेने झोपे याला कॅश क्रेडिट लोन तसेच 38 लाखांचे टर्म लोन असे एकूण 70 लाख रुपये कर्ज मंजूर करून दिले. बँकेने त्याने दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली असता ते खोटे असल्याचे सिद्ध झाले. झोपे याने ही जमीन इतर बँकांना तारण ठेऊन कर्ज घेतल्याचे तपासात आढळून आले आहे.


वाकड पोलीस तपास करीत आहेत.

19 Apr 2017

तीन तोळे सोने आणि एक लाख रुपये केले लंपास


एमपीसी न्यूज - नवी मुंबई येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर काम करणाऱ्या अधिका-याच्या घरातील दागिन्यांवर सुरक्षा रक्षकानेच डल्ला मारल्याची घटना  आज (बुधवार) पहाटे उघडकीस आली. पिंपळे सौदागर येथील यशदा नक्षत्र या उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये पहाटे चारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. चोरट्याने कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली तर कपाटात ठेवलेली पिस्तूल इतर ठिकाणी फेकण्यात आले.

 

विलास सहादू पुजारी (वय-46, रा. यशदा नक्षत्र अपार्टमेंट, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सोसायटीचा सुरक्षारक्षक महेंद्रसिंग (पूर्ण नाव माहिती नाही अंदाजे वय -25) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजारी हे नवी मुंबई येथील बेलापूर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. कुटुंबासमवेत ते लग्नासाठी बाहेर गावी गेले होते. या संधीचा फायदा घेत सोसायटीचा सुरक्षा रक्षक महेंद्रसिंग याने घराच्या बेडरुमच्या खिडकीचे ग्रील उचकटून घरात प्रवेश केला. बेडरुममधील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोकड, असा एकूण दोन लाख 14 हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

 

पुजारी यांचा भाचा त्यांच्यासोबत राहतो. तो काल सायंकाळी सहा वाजता कामावर गेला होता. त्यामुळे घरात कोणीच नव्हते. हीच संधी साधून सुरक्षारक्षकाने त्यांचे घर साफ केले. पुजारी यांचा भाचा पहाटेच्या सुमारास कामावरून परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे ज्या लॉकरमधून दागिने आणि पैसे चोरीला गेले, त्याच लॉकरमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पुजारी यांचे पिस्तूल होते. ते इतर ठिकाणी फेकून दिले होते. घरात तपासणी करताना ते पिस्तूल पोलिसांना सापडले. घटनेनंतर सुरक्षारक्षक महेंद्रसिंग पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

19 Apr 2017
एमपीसी न्यूज -  कोंढवा कमेला फायरब्रिगेडच्या पाठीमागील बाजूस  एका 40 ते 45 वयाच्या अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. 
 
 
दरम्यान, मृतदेहाची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नसून मृदेहाच्या अंगावर मारहाण केल्याची कोणतीच खूण नाही त्यामुळे त्याने आत्महत्या केली की ? त्याचा तोल जाऊन मृत्यू झाला याचा तपास पोलीस करीत आहेत. या भागात रोज रात्री मद्यपान करुन अनेकजण बसलेले असतात त्यामुळे त्या अनुशंगाने देखील पोलीस तपास करीत आहेत.
19 Apr 2017

एमपीसी न्यूज - मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर भातण बोगदा किमी 15/900 जवळ आज (बुधवारी)सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास इको व्हॅन गाडीला झालेल्या अपघातात 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर 7 जण जखमी झाले यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.

 

रुकसाना शाबुद्दिन शेख (वय 30) व ललाबी मोईद्दिन मुजावर (वय 40 रा. दोघेही बाणडोंगरी, मुंबई) असे मयत महिलांची नावे आहेत. जखमी 7 जणांमध्ये 4 बालकांचा समावेश आहे. ते सर्वजण बाणडोंगरीचे रहिवासी आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जात असलेली इको व्हॅन क्र. (MH 02 NA 825) च्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्यालगतच्या झाडाला धडकल्याने हा अपघात झाला. सर्व जखमींना पनवेल येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

19 Apr 2017

एमपीसी न्यूज - कात्रज परिसरातील जांभूळवाडी रस्त्यावरील टेल्को कॉलनीमधील पावडर कोटिंगच्या कंपनीला मध्यरात्री दोनच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये कंपनीतील पाच सिलेंडरचे स्फोट झाले. त्यात अग्निशमन दलाचा शिवदास खुटवड हा जवान जखमी झाला.

 

कात्रज परिसरातील आर.एस. इंडस्ट्रियल या पावडर कोटिंग निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाडी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. कंपनी बंद असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाला अडचण येत होती. त्यामुळे आत जाऊन आग विझवत असताना आतील सिलिंडरचा स्फोट झाला आणि दरवाजाचा पत्रा खुटवड यांच्या छातीला लागला. यात खुटवड हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

 

दरम्यान, आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप कळू शकलेले नसून यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

19 Apr 2017

खडकी डेपोच्या अधिकाऱ्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल

 

एमपीसी न्यूज - पिस्तुल विक्रेत्यांना काडतुस देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या खडकी अॅम्युनिशन डेपोच्या ज्युनिअर वर्क मॅनेजरवर सीबीआय-एसीबी पुणे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा वर्षात हा अधिकारी स्वतःसह नातेवाईक आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात लाच स्वरूपातील रक्कम भरण्यास सांगत होता. पुणे, गुजरात येथे गेल्या पंधरा दिवसांपासून सीबीआय-एसीबीकडून ही कारवाई सुरू होती.

 

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पुणे (सीबीआय-एसीबी) शाखेचे प्रमुख एम. आर. कडोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी दारूगोळा फॅक्टरीत मार्केटिंग आणि एक्सपोर्ट विभागाचा ज्युनिअर वर्क मॅनेजर निरंजन सी. शाह याच्यावर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानाधारक पिस्तुल बाळगणाऱ्यांना काडतुस देखील परवानाधारक खासगी डिलरकडून विकत घ्यावी लागतात. खडकी दारूगोळा फॅक्टरीमधून हे नोंदणीकृत डिलर काडतुस विकत घेत असतात.

 

गेल्या सहा वर्षात काडतुस विकत देताना नियमांमध्ये शिथिलता आणण्यासाठी शाह लाच स्वीकारत होते. डिलरकडून लाच घेण्यासाठी शाह यांनी २०१० ते २०१६ या कालावधीत स्वतःच्या आणि कुटुंबासह काही कर्मचाऱ्यांच्या नावाने बँकेत जॉइंट अकाऊंट उघडली होती. त्यामध्ये डिलरकडून ३२ लाख ६७ हजार ६०० रुपयांची लाच लाच घेण्यात आली आहे. याबाबत एका डिलरने सीबीआय-एसीबीकडे तक्रार केली. तसेच काही माहिती सीबीआय-एसीबीच्या अधिकाऱ्यांनी मिळविली. त्यानंतर शाह यांच्यासह त्याला मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सीबीआय-एसीबीने शाह याच्या पुणे, वडोदरा, गुजरात येथील घरांवर सर्च ऑपरेशन देखील राबविली आहे. सीबीआय-एसीबी तपास करीत आहे.

18 Apr 2017
एमपीसी न्यूज -चिखलीतील कुदळवाडी येथे काल (मंगळवार) रात्री पुन्हा एकदा मोठी आग भडकली. कुदळवाडीत भंगारची दुकाने व गोडाऊनला आग लागली. या दुकानात थरमाकॉल व पुठ्ठ्यांचे प्रमाण जास्त असल्याने आगीने अल्पावधीत रौद्ररुप धारण केले. अग्निशामक दलाच्या गाड्यांनी पाणी मारुन पहाटे तीनच्या सुमारास आग विझवली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही.
 
कुदळवाडी चिखली येथील पारस वजन काट्या समोर असलेल्या थरमाकॉल व पुठ्ठ्यांच्या गोडाऊनला रात्री आग लागली. गोडाऊनमध्ये प्लास्टीक, थरमाकॉल आणि पुठ्ठ्यांचे प्रमाण जास्त असल्याने आगीने पटकन पेट घेतला. तसेच आग भडकून गॅस सिलेंडरचा स्फोट झाला व इतर वस्तूंचा देखील स्फोट होऊन त्याचे मोठे आवाज ऐकू आले. परिसरात अरुंद रस्ते असल्याने अग्निशामक दलाच्या गाड्यांना यायला वेळ लागला. तो पर्यंत भीषण आग भडकली होती. नागरिकांची व बघ्यांची गर्दी झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. अग्निशामक दलाच्या एकूण वीस फायर गाड्या व आठ ते दहा पाण्याचे टँकरने ही आग विझवण्यात आली. तसेच  एक टाटा मोटर्सची गाडी आणि चार खासगी गाड्यांची मदत यावेळी घेण्यात आली.
 
आग विझवण्यासाठी पिंपरी, रहाटणी, प्राधिकरण, भोसरी येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात आग भडकल्याने धुराचे मोठे लोट निघत होते. या घटनेत पंचेवीस गोडाऊन जळाले आहेत.  
 
आगीची घटना समजताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.  गर्दीवर नियंत्रण मिळवून पोलिसांनी अग्निशन दलाच्या गाड्यांना रस्ता मोकळा करुन दिला. घटनेत कोणाचे किती नुकसान झाले हे अद्याप समजू शकले नसले तरी लाखोंचे नुकासान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या भागात यापूर्वीही अनेक वेळा आग लागली आहे. आग लागण्याची ही जवळपास दहावी घटना असल्याचे अग्निशमन अधिका-यांनी सांगितले.
 
काही महिन्यांपूर्वी याच भागातील एका लाकडाच्या गोडाऊनला आग लागली होती. याठिकाणी असलेली गोडाऊन एकमेकांना चिटकून असल्याने एखाद्या गोडाऊनमध्ये आग लागल्यानंतर इतर दुकानेही आगीत भस्मसात होतात. उन्हाळ्यात या ठिकाणी आग लागण्याचे प्रमाण जास्त असल्याने या ठिकाणी अग्निशमन दल सुरु करण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे. या ठिकाणी लागणा-या आगीमुळे इतरांचे आणि या ठिकाणी राहणा-यांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे. शहरामध्ये अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला जातो. परंतु कुदळवाडी परिसरात असलेल्या अनेक अनधिकृत गोडाऊनवर मात्र कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणची गोडाऊन कोणाच्या आशीर्वादाने सुरु आहेत अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

aag 3

 

aag 2

aag 4

aag 6

aag 5

aag 7

aag 8

aag 9

 

18 Apr 2017

एमपीसी न्यूज - वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत आलेला गायक सोनू निगम याच्या विरोधात पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशन अंतर्गत  गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अजानमुळे झोपमोड होते, असे ट्विट सोनू निगम यांनी केले आहे.  


सामाजिक कार्यकर्ते अन्वर शेख यांनी आपल्या तक्रार अर्जात अजानमुळे गुंडागर्दी होते, असे बालिश व्यक्तव्य करून धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप करीत यापूर्वी निगम याने काली मातेबद्दल अभद्र टिप्पणी केल्यामुळे मुंबईतील समता नगर पोलीस स्टेशन येथे 16।8।2015 रोजी गुन्हा नोंद असल्याचे निदर्शनास आणले असून सोनू निगम वर कडक कारवाई करण्याची मागणी व तक्रार शेख यांनी अॅडव्होकेट वाजीद खान (बिडकर) यांच्या मार्फत लष्कर पोलीस स्टेशन येथे केली आहे.

18 Apr 2017

पिंपरी पोलिसांची कारवाई


एमपीसी न्यूज - पान टपरीमध्ये चोरी करून एका तरुणाला मरहाण करून लुटणा-या तीन आरोपींना पिंपरी पोलिसांनी पाठलाग करून रंगेहाथ पकडले. हा प्रकार आज (मंगळवार) पहाटे साडेचारच्या सुमारास घडला.

 

संदीप भिमा यादव (वय- 25, रा. सुदर्शन बुक स्टॉल शेजारी, शास्त्रीनगर, पिंपरी), आकाश विजय जगदाळे (वय-21, रा. एचए कॉलोनी, पिंपरी), सिद्धार्थ अनुप केदारी (रा. डिलक्स टॉकीज मागे, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ असलेली एक पान टपरी फोडून त्यामधील पैसे या तिघांनी चोरले. तसेच रेल्वे स्थानकाजवळून जात असलेल्या एका तरुणाला शिवीगाळ करून मारहण करत त्याच्याकडील मोबाईल आणि पैसे हिसकावून घेतले. त्यावेळी गस्तीवर असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आगावणे, पोलीस हवालदार संतोष झेंडे, नितीन सूर्यवंशी यांना तीनजण पळून जात असल्याचे दिसले. त्यांनी तिघांचा पाठलाग करून पिंपरीतील आसवानी पुलाखाली पकडून ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून यामध्ये किती रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याची महिती मिळू शकली नाही.

 

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

18 Apr 2017

एमपीसी न्यूज- थेरगाव येथील एका रिक्षा चालकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी त्याच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे तो नैराश्येत होता. यातूनच त्याने आज (मंगळवार) सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.


अनिल साळुंखे (वय-22, रा. धनगरबाबा मंदिराजवळ, थेरगाव), असे आत्महत्या केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.


अनिल याच्या आईचे पंधरा दिवसांपूर्वी निधन झाले होते. आईच्या निधनानंतर त्याला नैराश्य आले होते. आज अनिलने घरात कोणी नसताना छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. शेजा-यांना खिडकीतून पाहिले असता त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. शेजा-यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्याला खाली उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.


वाकड पोलीस तपास करीत आहेत.

18 Apr 2017

एमपीसी न्यूज - वाकड येथील साईराज ऑफ्टीकल्स या चश्म्याच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने तीन लाखांचे सामान चोरून नेले. ही घटना सोमवार (दि.17) पहाटे तीन ते चारच्या सुमारास घडली.

 

संतोष जाधव (वय-34, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव यांचे वाकडमध्ये साईराज ऑप्टीकल्स नावाचे चश्म्याचे दुकान आहे. या ठिकाणी डोळे तपासणी करुन चेष्मे तयार करुन दिले जातात. पहाटे तीन ते चारच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानात असलेल्या चश्म्यांचे फ्रेम आणि डोळे तपासणीचा संगणक असा एकूण तीन लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

 

सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.बी. सागडे तपास करीत आहेत.

18 Apr 2017

एमपीसी न्यूज - दिघी येथील टेकडी परिसरात सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना सात बॉम्ब आढळले. नागरिकांनी ते लष्कराच्या ताब्यात दिल्याने मोठा अनर्थ टळला. सदर बॉम्ब हे लष्कराच्या दारुगोळा कारखान्याचे असून चाचणीवेळी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ते तिथेच राहिले होते. सापडलेल्या वस्तू बॉम्ब नसल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात येत आहे.

 

सदर परिसर हा प्रतिबंधित असला तरी येथे सकाळी फिरायला लोकांची वर्दळ असते. प्रत्यक्ष चाचणीवेळी हा परिसर रिकामा केला जातो. मात्र चाचणी झाल्यानंतर धोकादायक साहित्य जमा करणे गरजेचे असते. मात्र, नागरीवस्ती जवळ असल्याने लोकांकडून ते धोकादायकरीत्या हाताळले जाऊन त्यानंतर ते लष्कराच्या ताब्यात देण्यात आले.

 

काही दिवसांपूर्वी देहूरोड येथे अशाच प्रकारची घटना घडली होती. लष्कराच्या निष्काळजीपणामुळे एकाच कुटुंबातील तीनजण जखमी झाले होते.

di1

17 Apr 2017

एमपीसी न्यूज - धानोरीतील किलबील सोसायटीसमोर ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (16 एप्रिल) रात्री साडेबारा वाजता घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रॅक्टर चालकाला अटक करण्यात आली.


श्रीकांत मुकूंद भालेराव (वय-29, रा.चौधरी मगर, धानोरी, पुणे), असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी टॅक्टरचालक आश्रम रमेश काळे (वय-30, रा.साठे वस्ती, लोहगाव, पुणे) याला अटक केली. तर मयताचा भाऊ अजय भालेराव याने फिर्याद दिली आहे.


अधिक माहिती अशी की, धानोरीतील किलबील सोसायटी समोरून श्रीकांत दुचाकीने जात असताना लोखंडी रॉड वाहून नेणा-या ट्रॅक्टरने त्याला जोराची धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या श्रीकांतचा मृत्यू झाला.


पोलीस उपनिरीक्षक ए.एस.चौगुले अधिक तपास करीत आहेत.

17 Apr 2017

एमपीसी न्यूज - पतीच्या त्रासाला कंटाळलेल्या पत्नीने आणि तिच्या आई-वडिलांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला. निगडी यमुनानगर येथे कौंतेय  सोसायटी समोरील रस्त्यावर शनिवारी (दि. 15) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी निगडी पोलिसांनी पत्नी, सासू आणि सास-याला अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

पेत्रस जॉन मनतोडे (वय 29, रा. स्कीम नं. 10, रुम नं. 2, कौंतेय सोसायटी, यमुनानगर, ओटा स्कीम, निगडी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी क्रिस्टीना पेत्रस मनतोडे (वय 28), सासू लुसीया सूर्यकांत बोर्डे (वय 55), सासरा सुर्यकांत संतोष बोर्डे (वय 58) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून अमोल भादु साळुंके यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेत्रस आणि क्रिस्टीना यांचा पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर पेत्रसला दारुचे व्यसन लागल्याने क्रस्टीना तीन वर्षांपासून विभक्त राहत होती. तेव्हे पासून तो क्रिस्टीना आणि तिच्या आई-वडलांना जिवे मारण्याची धमकी देत होता. त्याच्या रोजच्या त्रासाला कंटाळून शनिवारी (दि.15) रात्री त्याचा खुन करण्यात आला. निगडी पोलिसांनी तिघांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.


निगडी पोलीस तपास करीत आहेत.

17 Apr 2017

एमपीसी न्यूज - दापोडी-बोपोडीला जोडणाऱ्या विनियर्ड चर्चजवळील पुलाखाली झोपलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीच्या अंगावरून डंपर गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना आज (सोमवार) दुपारी अडीचच्या सुमारास घडली.

 

आसाराम तुकाराम कांबळे (वय ६७, ओंकार नगर, काटे वस्ती दापोडी) असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रमेश शिनवडे घाडगे (वय 64, रा. ओटा स्किम, निगडी), असे डंपर चालकाचे नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, या पुलाखालील जागेचा वाहनतळ म्हणून उपयोग केला जात आहे. पुलाखालील रस्ता खराब झाल्याने तेथे महापालिकेतर्फे डांबरीकरणाचे काम चालू आहे. त्यासाठी येथे खडी आणून टाकली जात आहे. पार्किंगच्या जागेत सावली असल्याने दुपारी अडीचच्या सुमारास आसाराम येथे झोपले होते. ते याच परिसरात राहत असल्याने दररोज दुपारी या ठिकाणी झोपण्यासाठी येत होते. डंपर चालक डंपर मागे घेत असताना त्याला आसाराम दिसले नाही. त्यामुळे त्याच्या अंगावरून खडी वाहून नेणारा डंबर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर डंपरचा चालकाने  डंपर बाजूला घेऊन स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला असून घडलेला प्रकार त्याने पोलिसांना सांगितला.

 

सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे तपास करीत आहेत.

17 Apr 2017

काळेवाडीतील उच्चभ्रू सोसायटीत क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणारे अटकेत


एमपीसी न्यूज -  सध्या आयपीएल सुरू असून पिंपरी- चिंचवडमध्ये बेटिंगचा धंदा जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी पोलिसांनी पिंपरीत सुरु असलेल्या अड्ड्यावर छापा टाकून तिघांना अटक केली होती. शनिवारी (दि.15) काळेवाडी येथील साई श्रद्धा गार्डन फेज 2 या उच्चभ्रू सोसायटीतील एका घरामध्ये सुरू असलेल्या अड्डयावर युनिट चारच्या पोलिसांनी छापा टाकून पाच जणांवर कारवई केली.

 


रोमी सुरेश मेनानी (वय-29, रा. दिप मोटर्स समोर, वैष्णवी मंदिराजवळ, पिंपरी), रोहित महेशकुमार विरवाणी (वय-25, रा. नवमहाराष्ट्र हायस्कूलसमोर, पिंपरी), महेश घनशामदास रामनानी (वय -34, रा. साई श्रध्दा अपार्टमेंट, काळेवाडी), मनिष उर्फ कालू (रा. पिंपरी), बाला (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) या पाच जणांवर कारवाई केली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अमित पोपट गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथील साई श्रद्धा गार्डन फेज दोनमध्ये आयपीएल मॅचवर बेटिंग सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार निरीक्षक राजेंद्र तोडकर, सहाय्यक निरीक्षक नितीन भोईर, गणेश पाटील, अमित गायकवाड, प्रमोद वेताळ, सचिन काळे, राजेंद्र शेटे व त्यांच्या पथकाने छापा मारला. हेंद्रराबाद विरुद्ध कलकत्ता सामन्यावर बेटिंग घेताना श्रध्दा अपार्टमेंट, काळेवाडी या ठिकाणी सदनिकामध्ये बेटिंग घेताना आढळून आले. या ठिकाणी एलसीडी टीव्ही, 1 लॅपटॉप, 9 मोबाईल, रोख रक्कम, वही यासारखे एकूण दोन लाख 28 हजार 60 रुपयांचा ऐवज आढळून आला. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पिंपरी, काळेवाडी आणि आजू बाजूच्या परिसरात सदनिका भाड्याने घेऊन बेटिंग सुरू आहे. आयपीएलच्या सुरुवातीलाच दोन बेटिंगच्या कारवाई झालेली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये बेटींगचा धंदा जोरात सुरु असल्याची चर्चा सुरु आहे.

Page 4 of 24