• 1.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • punenews.jpg
13 May 2017
मंचर येथील घटना, मृतदेहाचे शीर गायब
 
एमपीसी न्यूज - एका तरुणाची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते पिशवीत भरून मंचर येथील घोडनदीत टाकून दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. या मृतदेहाचे फक्त धड सापडले असून शीर गायब आहे. ही घटना काल (13 मे) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलीस पाटील लहू इंदोरे यांनी फिर्याद दिली असून मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
या घटनेची अधिक माहिती अशी की, लहू गजानन इंदोरे (वय-40, रा.चांडोळी खुर्द, इंदोरेमळा, ता. आंबेगाव, जी. पुणे) हे पोलीस पाटील आहेत. त्यांच्या एका नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने काल गावतील घोडनदी किनारी असलेल्या स्मशानभूमीत सावडण्याचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यांच्यासह उपस्थित नागरिक नदीपात्रात हातपाय धुण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान त्यांना नदीपात्रात एक पांढऱ्या रंगाची दोरीने बांधलेली पिशवी दिसली. याविषयी त्यांना संशय आल्याने त्यांनी याची माहिती मंचर पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पिशवी बाहेर काढून उघडली असता, त्यामध्ये आणखी तीन पिशव्या होत्या. त्या उघडल्या असत्या त्यात 25 ते 30 वर्षीय तरुणाच्या मृतदेहाच्या धडाचे तुकडे होते. त्याचे शीर गायब होते. अज्ञात आरोपीनी हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाचे तुकडे केले आणि शीर व धड अन्यत्र टाकून दिले असावे.
12 May 2017

एमपीसी न्यूज - अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस जन्मठेप व  पुरावा नष्ट केल्याप्रकरणी 2 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सोबतच दोन्ही गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी 500 रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले. पी. वाय. लाडेकर यांच्या कोर्टाने हा आदेश दिला. ही घटना  20 जानेवारी 2015 रोजी  वडगाव खुर्द भागात घडली होती.

अर्जुन बाबूराव नाटेकर उर्फ नाचेकर (वय 25, रा. गुलबर्गा, कर्नाटक), असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी अर्जुन याचे खून झालेल्या व्यक्तीच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. आरोपी व खून झालेली व्यक्ती एकाच ठिकाणी काम करत होते. 20 जानेवारी 2015 रोजी दुपारच्या सुमारास आरोपीने प्रेयसीच्या पतीला वडगाव खुर्द भागात मुळा नदी किनारी दारू पिण्यास घेऊन जात धारदार चाकूने भोसकून व डोक्यात दगड घालून खून केला. तसेच खून झालेल्या व्यक्तीचे व स्वतःचे कपडे नदीत फेकून पुरावा नष्ट केला.

याप्रकरणी सरकारी वकील सुरेश गवळी यांनी 9 साक्षीदार तपासले. यात खून झालेल्या व्यक्तीच्या पत्नीची व डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. या गुन्ह्याचा तपास अधिकारी म्हणून जे.सी.मुजावर यांनी काम पाहिले. त्यांना वरिष्ठ पोलीस शिपाई ज्ञानदेव महानवर यांनी मदत केली.   

12 May 2017

एमपीसी न्यूज - कर्जाचे हप्ते भरण्यासाठी दिलेले पैसे परस्पर लाटून 66 हजार 725 रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी एकास न्यायालयाने 15 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हा प्रकार स्वारगेट येथील जनलक्ष्मी फायनान्स कंपनीत  17 नोव्हेंबर 2016 रोजी घडला होता.

ज्ञानेश्वर बालाजी भुसे ( वय 26, रा.कवा नाका टॉवर लाइन जवळ, बालाजी नगर, लातूर ), असे कोठडी सूनावलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी परेश नंदकुमार पाटील ( वय 30, आश्लेषा अपार्टमेंट, चांद्रलोक नगरी, धायरी) यांनी स्वारगेट पोलिसात फिर्याद दिली होती.

आरोपीने जनलक्ष्मी फायनान्समध्ये महिलांनी दिलेले हप्त्याचे पैसे परस्पर लाटले. आरोपी हा या कंपनीत कर्मचारी असून त्याच्याकडे महिला ग्राहकांचे हप्त्याचे पैसे जमा करण्याची जबाबदारी होती. त्याने ते पैसे कंपनीत न भारता एकूण 66 हजार 725 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला.

आरोपीने किती महिलांचे पैसे घेतले, त्याचा कोठे वापर केला, आणखी कोणी साथीदार आहे का याबाबत तपास करण्यासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील योगेश कदम यांनी न्यायालयात केली, न्यायालयाने ती ग्राह्य धरत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

12 May 2017

धनकवडी येथील घटना, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - लग्नात मानपान केला नाही, लग्नात काही दिले नाही म्हणून महिलेला मारहाण करून तिचा गळा आावळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना धनकवडी येथे 10 मे रोजी घडली. या प्रकरणी महिलेच्या पतीसह पाच जणांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी एका विवाहित महिलेने फिर्याद दिली असून त्यावरून तिचा पती प्रतिक अशोकवार वाघोलीकर (वय-29), प्रसाद अशोक वाघोलीकर यांच्यासह अन्य तिघे (सर्व रा. वाघोलीकर बंगला, नटराज रेसिडेन्सी, धनकवडी, पुणे), अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी महिलेचे 23 डिसेंबर 2012 रोजी आरोपी प्रतीकशी लग्न झाले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत फिर्यादीच्या माहेरच्यांनी लग्नात काहीच दिले नाही, मानपान केला नाही. या कारणावरून तिचा वारंवार अपमान करत व शिवीगाळ करून शारीरिक आणि मानसिक छळ करत असत. 10 मे रोजी फिर्यादी महिलेने वाय-फाय बंद केल्याच्या कारणावरून आरोपी प्रतीक याने तिच्या तोंडावर उशी दाबून आणि गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी पोलीस उप निरीक्षक एस.एस.थोरात अधिक तपास करीत आहेत.

12 May 2017

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून तिचे फोटो फेसबुकवर टाकण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला सहकारनगर पोलिसांनी 28 एप्रिल रोजी अटक केली. त्याने आज (12 मे) जामीनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला.

आकाश बारीकराव जाधव (वय 23, रा. लुंकड शाळेजवळ, तळजाई वसाहत, पद्मावती), असे आरोपीचे नाव आहे. हा प्रकार ऑगस्ट 2016 ते 25 एप्रिल 2017 या दरम्यान बालाजीनगर येथे घडला होता. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने सहकारनगर पोलिसात फिर्याद दिली आहे.

आरोपीने पीडित मुलीचे अश्लील फोटो काढले होते. ते फोटो घरच्यांना दाखवण्याची आणि फेसबुकवर अपलोड करण्याची धमकी देत तिला शिवीगाळ व मारहाण करून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी पीडित मुलगी ही अल्पवयीन असून हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. तिच्या शरीरावरील जखमांवरून तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट होते. तसेच आरोपी फिर्यादी तसेच पीडित मुलीला धमकावण्याची शक्यता आहे, तो फरार होण्याची शक्यता असल्याने त्याचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ती ग्राह्य धरत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.

12 May 2017

एमपीसी न्यूज - क्रिकेट खेळताना प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू बाद असल्याच्या कारणावरून दोन अल्पवयीन मुलांच्या गटात झालेल्या वादानंतर तलवार आणि कोयत्याने मारहाण केल्यामुळे एक जण जखमी झाला आहे. ही घटना गुरुवार (11 मे) रोजी दुपारी दोन वाजता येरवड्यातील भाजी मंडई जवळ घडली.

याप्रकरणी गौरव माचरे (वय-16, रा. येरवडा, पुणे) यांनी फिर्याद दिली असून अनुशा प्रभाकर भालेराव (वय-20, रा.कसबा पेठ, विश्रामबाग, पुणे) याला अटक केली. तर सहा अल्पवयीन आरोपी निष्पन्न झाले आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती असी की, फिर्यादी हे लहान भावांसोबत भाटनगर येथील मैदानावर क्रिकेट खेळत होते. यावेळी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू बाद असल्याच्या कारणावरून त्यांच्यात भांडणे झाली. यावेळी दुस-या संघातील खेळाडूंनी फिर्यादीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. दरम्यान, त्याचवेळी फिर्यादी यांच्या चुलत्याने घटनास्थळी येत मध्यस्थी केली आणि भांडणे मिटवली.

त्यानंतर आऊट झालेल्या खेळाडूने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मित्रांना बोलावून फिर्यादीच्या घरी जाऊन विरसिंग माचरे यांच्यावर तलवारीने हल्ला केला. यावेळी संगीता माचरे या भांडण सोडवण्यास गेल्या असता त्यांना गॅसच्या पाईपने मारहाण केली. आलेल्या मुलांपैकी कोणातरी विरसिंग माचरे यांच्या पाठीवर कोयत्याने वार केले. यामध्ये ते जखमी झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक लोहार अधिक तपास करीत आहेत.   

12 May 2017

एमपीसी न्यूज - बनावट चावीच्या सहाय्याने बालकनीचा दरवाजा उघडून घरातील 5 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना कस्पटेवस्ती येथे घडली.


अंकेत गर्ग (वय - 31 रा, कल्पतरू हार्मनी अपार्टमेंट, कस्पटेवस्ती, वाकड) यांचे घर 17 मार्च रात्री 9.00 ते 3.00 मे सकाळी 8 पर्यंत घरबंद  होते. या कालावधीत घराच्या बालकनीचा स्लायडिंगचा दरवाचा बनावट चावीने उघडले व घरातील सोने व रोख रक्कम, असा एकूण 5 लाख 3 हजार 77 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

याबाबत वाकड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.आर. लोढे अधिक तपास करत आहेत.

12 May 2017

एमपीसी न्यूज - धनकवडी गावठाणात ग्रामदैवत जानुबाई देवीचा उत्सव नुकताच पार पडला. या यात्रेत उत्सवादरम्यान या यात्रेतील मिरवणुकीचे स्वागत अनेक मंडळे स्पीकर लाऊन करतात. पोलिसांनी सदर साऊंडच्या आवाजाची पातळी मोजली असता ती मर्यादेपेक्षा जास्त आढळली. त्यामुळे  ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 11 मंडळांवर ध्वनी प्रदूषण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


वैभव माधवराव धनकवडे (रुद्र प्रतिष्ठाण मित्र मंडळ), अमित प्रदीप संचेती (वीर सावरकर प्रतिष्ठाण), हृषीकेश राजेंद्र भोसले (अलिशान मित्र मंडळ), सचिन उत्तमराव पोटे (फाईव्ह स्टार मित्र मंडळ), रवींद्र काळूराम ढमाले (लव्हर्स ग्रुप), अमेय राजेंद्र पासलकर (मीट युवक मित्र मंडळ), राजेंद्र बापूसाहेब गोगावले (श्रीनाथ मित्र मंडळ), सूरज बापूसाहेब धनकवडे (आईसाहेब ग्रुप), प्रेम प्रशांत ठकुरे (छत्रपती शिवराय ग्रुप), पवन यशवंत धनकवडे (दोस्ती ग्रुप) आणि उपेंद्र प्रेमकुमार यादव ( राजे ग्रुप) अशी गुन्हा दाखल केलेल्या मंडळ आणि अध्यक्षांची नावे आहेत.

12 May 2017

एमपीसी न्यूज-  नकली चावीच्या मदतीने घराचे कुलुप उघडून घरातील सुमारे 3 लाख 31 हजारांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना मोशी प्राधिकरणातील नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचे बंधु शिलरत्न शिलवंत यांच्या घरी घरफोडी झालेली आहे. हा प्रकार काल (दि.11) रात्री उघडकीस आला.

शिलरत्न अशोक शिलवंत ( रा. सुकवाणी, ओयासीस बिल्डींग, मोशी प्राधिकरण) यांचे घर 10 मे ते 11 मे दुपारी अडीच पर्यंत बंद होते. या कालावधीत घराचे कुलुप नकली चावीच्या मदतीने उघडून त्यातील दागीने, रोख पैसे असा एकूण 3 लाख 3 हजार रुपयांचा एवज चोरटयांनी लंपास केला आहे.

याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

शहरातली ही पहिलीच घटना नसून गेल्या दोन महिन्यात घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये घराचे कुलुप कटर किंवा इतर शस्त्राच्या सहाय्याने तोडणे, नकली चावीचा वापर करणे किंवा ग्रील तोडून घरात प्रवेश करणे अशा प्रकारे घरफोड्या केल्या जात आहेत. या घटना केवळ रात्रीच नाही तर भर दिवसाही होत आहेत. सुट्टी किंवा लग्न सराईमुळे घर बंद राहणे यामुळे अगदी काही मिनीटांच्याआत चोरटे आपलाहातसाफ करुन जात आहेत.याला प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना त्यांचे दागीने किंवा किंमती ऐवजबँकेच्या लडकरमध्ये ठेवणे, परिसरात सीसीटीव्ही बसवणे  किंवा सुरक्षा रक्षक नेमणे अशा काही गोष्टी आवर्जून करण्याचे आवाहन केले

12 May 2017

एमपीसी न्यूज- चिंचवड येथील डांगे चौकातील पंडित पेट्रोल पंपाजवळ युवकाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली.

 

श्रीनिवास महादेव पडवळ,  (वय 25 रा. पडवळ चाळ थेरगाव), असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

 

चिंचवड येथील डांगे चौकातील पंडित पेट्रोलपंपाच्या मागे श्रीनिवास याचा मृतदेह आज सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकाच्या नजरेस पडला. ही बाब लक्षात येताच त्यांनी वाकड पोलिसांना याबाबत माहिती दिली.

इसमाच्या चेह-यावर दगड घालून खून करण्यात आल्यामुळे चेहरा स्पष्ट दिसत नाही. मात्र, त्याच्या उजव्या हातावर श्रीनिवास असे नाव गोंदले असल्यामुळे त्याचे नाव श्रीनिवास असावे, असा अंदाज परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना व्यक्त केला होता.

तसेच खुनाचे कारण अद्याप कळू शकले नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, या युवकाचा खून प्रेम प्रकरणातून झाल्याची चर्चा परिसरात आहे. या प्रकरणी वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

11 May 2017

एमपीसी न्यूज - पुणे पोलीस आयुक्तालयातील 66 पोलीस निरीक्षकांच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आज (गुरूवारी) अंतर्गत बदल्या केल्या आहेत.राज्याच्या पोलिस दलातील बदल्या झाल्यानंतर इतर ठिकाणाहून हजर झालेल्या पोलिस निरीक्षकांच्या नियुक्तीसह या बदल्या करण्यात आल्या आहेत.

 पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात नियुक्तीचे ठिकाण

सुनिल कलगुटकर (वाहतुक शाखा), फारूख काझी (वरिष्ठ पो.नि. स्वारगेट), प्रभाकर शिंदे (वाहतुक शाखा), अप्पासाहेब शेवाळे (वरिष्ठ पो.नि. विश्रामबाग), अतुलकुमार नवगिरे (नियंत्रण कक्ष), सतिश दत्तात्रय माने (गुन्हे शाखा़), अजित लकडे (खडकी-गुन्हे), राजकुमार वाघचवरे (भारती विद्यापीठ-गुन्हे), जगन्नाथ कळसकर (वाहतुक शाखा), उमेश पावसकर (वानवडी-गुन्हे), बापू शिंदे (नियंत्रण कक्ष), गजानन पवार (गुन्हे शाखा), संगिता यादव (हडपसर पो.नि.-३), चंद्रकांत ठाकुर (वाचक-दक्षिण प्रादेशिक विभाग), रेखा साळुंके (वरिष्ठ पो.नि. फरासखाना ते व.पो.नि. शिवाजीनगर), रघुनाथ जाधव (वरिष्ठ पो.नि. खडक ते गुन्हे शाखा), मदन बहादरपुरे (व.पो.नि. बंडगार्डन ते विशेष शाखा), सुपेकर पोपट (व.पो.नि. विश्रांतवाडी ते गुन्हे शाखा), घोगरे नवनाथ (व.पो.नि. दिघी ते वाहतुक), पात्रुडकर अनिल (व.पो.नि. चंदननगर ते गुन्हे शाखा), पठाण जानमोहम्मद (व.पो.नि. मुंढवा ते वाहतुक शाखा), खोकले सुचेता (डेक्कन गुन्हे ते वाहतुक), देशमुख विजय (उत्तमनगर-गुन्हे ते मार्केटयार्ड-गुन्हे), पिंजन सुनिल (विश्रामबाग-गुन्हे ते वाकड-गुन्हे), शिंदे श्रीकांत (भारती विद्यापीठ-गुन्हे ते उत्तमनगर गुन्हे), पाचोरकर सुदाम (मार्केटयार्ड-गुन्हे ते वाहतुक), राजमाने राम (स्वारगेट-गुन्हे ते गुन्हे शाखा), मराठे अमृत (वाकड-गुन्हे ते विश्रामबाग-गुन्हे), शिंदे दिलीप (एमआयडीसी भोसरी -अ ते वाहतुक), विभांडीक राजेंद्रकुमार (खडकी गुन्हे - एमआयडीसी भोसरी-गुन्हे), पंडित मच्छिंद्र (वानवडी-गुन्हे ते स्वारगेट-गुन्हे),देशमुख राजेंद्र (वाहतुक ते वाचक, उत्तर प्रादेशिक विभाग), जाधव कल्पना (वाहतुक ते विशेष शाखा-१), आव्हाड अरूण (वाहतुक ते डेक्कन -गुन्हे), मोळे बाजीराव (वाहतुक ते व.पो.नि. वारजे माळवाडी), पवार क्रांती (वाहतुक ते विशेष शाखा-२), कारंडे विजया (वाहतुक ते विशेष शाखा-१), विधाते कल्याणराव (गुन्हे शाखा ते व.पो.नि. उत्तमनगर), मुजावर मोहम्मद हनीफ (गुन्हे शाखा ते वपोनि बंडगार्डन), जोशी प्रतिभा (गुन्हे शाखा ते वाहतुक), गवारे सयाजी (विशेष शाखा ते वपोनि वानवडी), बाजारे विजय (विशेष शाखा ते वाहतुक), दोरगे गिता (विशेष शाखा ते नियंत्रण कक्ष), गलांडे वैशाली (विशेष शाखा ते बंडगार्डन-३), खुळे विश्‍वजीत (नियंत्रण कक्ष ते हडपसर-गुन्हे),देवरे माया (पुणे मनपा अतिक्रमण ते वाहतुक), राजेंद्र मुळीक (आर्थिक गुन्हे ते वपोनि चंदननगर), राजेंद्र मोकाशी (वपोनि शिवाजीनगर ते वपोनि खडक), मिलींद गायकवाड (गुन्हे शाखा ते वपोनि अलंकार), संजय नाईक-पाटील (वपोनि विमानतळ ते वपोनि विश्रांतवाडी), मोहन शिंदे (विशेष शाखा ते वपोनि मार्केटयार्ड), खंडेराव खैरे (वपोनि मार्केटयार्ड ते वपोनि दिघी), प्रमोद पत्की (विशेष शाखा ते वपोनि विमानतळ),संजय कुरूंदकर (आर्थिक गुन्हे शाखा ते वपोनि मुंढवा), ब्रम्हानंद नाईकवाडी (चंदनगर-गुन्हे ते गुन्हे शाखा), दत्तात्रय चव्हाण (हडपसर-३ ते गुन्हे शाखा), अनुजा देशमाने (वपोनि वारजे माळवाडी ते विशेष शाखा-१), सर्जेराव बाबर (वपोनि स्वारगेट ते विशेष शाखा-१), दिवाकर पेडगावकर (गुन्हे शाखा ते वाहतुक), भागवत मिसाळ (वपोनि अलंकार ते वाहतुक), स्वाती देसाई (आर्थिक गुन्हे शाखा), बाळकृष्ण अंबुरे (वाहतुक ते वपोनि फरासखाना), संगिता पाटील (विशेष शाखा ते गुन्हे शाखा), राजेंद्र जरग (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा-१), वैशाली चांदगुडे (लष्कर-गुन्हे ते विशेष शाखा) आणि गौतम पातारे (अलंकार-गुन्हे ते लष्कर-गुन्हे).

11 May 2017

एमपीसी न्यूज - तीक्ष्ण हत्यार बाळगल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी  एका अल्पवयीन सह दोघांना अटक केली. त्यातील तरुणाला न्यायालयात हजर केले त्याला 13 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहे.

सागर प्रकाश काळभोर (वय 19, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. ही घटना 10 मे रोजी रात्री 10.15 च्या सुमारास लोहगाव, संतनगर येथे घडली होती. याप्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक सारंग दळे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांना नमूद केलेला आरोपी, एक अल्पवयीन मुलगा आणि अन्य एक फरार आरोपी शुभम कामठे (वय 20, रा. काळेपडळ, हडपसर)  हे तीघे 8 लोखंडी कोयते, 1 चॉपर अशी नऊ तीक्ष्ण हत्यारासह पोलिसांना आढळली होती. त्यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली,तर एक जण फरार झाला असून एक अल्पवयीन आहे.

यातील आरोपी सागर प्रकाश काळभोर याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्याने ही घातक शस्त्रे कोठून आणली आणि फरार साथीदार शुभम कामठे याच्या शोधासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

11 May 2017

एमपीसी न्यूज -  देहुरोड येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 20 वर्षीय तरुणाने लैंगीक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.10) घडली. यातील आरोपीस देहुरोड पोलीसांनी अटक केले असून त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलीच्या शेजारी रहात होता. यावेळी त्याने मुलीला आपल्या  घरात नेऊन तिच्यावर लैंगीक अत्याचार केले. घडलेल्या प्रकार घऱच्यांना सांगितला. यावेळी घरच्यांनी पोलीसांमध्ये धाव घेत, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.

याबाबत देहुरोड पोलीसांनी  12 तासाच्या आत आज (गुरुवारी) दुपारी आरोपीस अटक केले व त्याला वडगाव मावळ न्यायालयात हजर केले. आरोपीस न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

11 May 2017

एमपीसी न्यूज - पुणे शहर आणि परिसरात प्रवाशांची बेकायदेशीर वाहतूक करणा-या 226 वाहनांवर पुणे महानगर परिवहनच्या विशेष भरारी पथक. वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी गेल्या 15 दिवसात संयुक्त कारवाई करत 42 हजार 500 रुपये रक्कम वसूल केली तर 76 वाहने जप्त करण्यात आली.  

यावेळी इन्फोसिस कंपनीसाठी कर्मचा-यांची वाहतूक करणारी एक बस प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जप्त केली आहे. एकाच वेळी 50 प्रवाशी बेकायदेशीर वाहतूक करताना संबंधीत गाडीच्या चालकाला पकडले होते. त्याच्यावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने खटला दाखल केला आहे.

या मोहिमेअंतर्गत गेल्या पंधरा दिवसात जीप, बलेरो, तव्हेरा, मारूती व्हॅन, टाटा मॅजीक यासारखी तब्बल 76 वाहने जप्त केली आहेत. ही कारवाई स्वारगेट, कात्रज, वारजे, डेक्कन, नगर रोड सिहगड रोड, कर्वेनगर वाकड, हिंजवडी या मार्गावर करण्यात आली.

11 May 2017

एमपीसी न्यूज - फुलव्यापा-याला फायटरने मारहाण करूत जखमी केल्याप्रकरणी एकास सहा महिने सक्तमजुरी आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास 1 महिना अतिरिक्त सक्तमजुरी  भोगावी लागणार असल्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे. मोटार वाहन न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी महेश सराफ यांनी हा आदेश दिला.

प्रशांत जनार्दन कोळी (वय 46, रा. गवळीवाडा, खडकी) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राजु मेहबुब शेख यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.  1 एप्रिल 2013 रोजी फिर्यादी शंकरशेठ रस्त्यावरील पोर्णिमा टॉवर येथे सकाळी साडे सहाच्या सुमारास खरेदी केलेला फुलांचा माल टेम्पोमधून उतरवत होते. यावेळी, प्रशांत कोळी याने गाडीच्या टेम्पो चालकास नवीन हमाल ठेवला आहे का अशी विचारणा केली. यावेळी राजु शेख यांनी प्रशांत यास हमाल कोणाला म्हंटलास असा जाब विचारला. त्यानंतर प्रशांत कोळी याने त्याच्या हातातील फायटर सारख्या वस्तून त्यांना मारहाण केली. तसेच त्यांना जमिनीवर पाडून शिवीगाळ करत लाथाबुक्कयांनी मारहाण केली.

याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यात सरकारी वकील के. एम. बाबर यांनी पाच साक्षीदार तपासले. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक वाय ऐ शेख यांनी केला.

11 May 2017

एमपीसी न्यूज - पहिले लग्न झाल्याचे लपवून चोवीस वर्षीय तरूणीसोबत दुसरे लग्न केले. त्यानंतर तीला लग्न झाल्याचे माहित झाल्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून तीला त्याच्यासोबत राहण्यास भाग पाडले आणि वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला येरवडा पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 13 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश गजानन नंदनवार यांनी दिला आहे.

सचिन शिवाजी धिवार (वय 40, रा. वडगावशेरी) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. ही घटना डिसेंबर 2013 ते 10 मे 2017 या कालावधीत घडली. याप्रकरणी 24 वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे.

आरोपी सचिन याचे लग्न झाले असून.त्याला दोन मुले आहेत.  ही माहिती लपवून त्याने फिर्यादीशी विवाह केला. कालांतराने संबंधीत तरूणीला सचिनचे लग्न झाल्याचे आणि त्याला दोन मुले असल्याचे समजले.त्यावेळी आरोपीने बंदुकीचा धाक दाखवून त्या तरूणीला राहण्यास भाग पाडत वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी धिवार याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी सचिन याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तसेच त्याच्याकडे असलेले पिस्तुल जप्त करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील वामन कोळी यांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने सचिन याला पोलीस कोठडी सुनावली.

11 May 2017

3 लाख रुपयांचे 30 मोबाईल हॅन्डसेट जप्त


एमपीसी न्यूज - माण, हिंजवडी, मारुंजी,कासारसाई या परिसरात केवळ मौजमजेसाठी मोबाईलची चोरी करणारा 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला आज (गुरुवारी) हिंजवडी पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. यावेळी त्याच्याकडून सुमारे 3 लाखांचे 30 मोबाईल हॅन्डसेट जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश तुकाराम माळी (वय.25, रा. मारुंजी, हिंजवडी) यांनी आज पहाटे त्यांच्या घरातील त्यांचा व त्यांच्या मित्राचा मोबाईल चोरीला गेल्याची फिर्याद हिंजवडी पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान पोलिसांना हद्दीत गस्त घालत असताना एक जण मोबाईलची विक्री करण्यासाठी संत तुकाराम साखर कारखान्या समोर येणार असल्याची बातमी मिळाली.

यावेळी पोलीसांना कारखाना परिसरात सकाळी साडे नऊच्या सुमारास एक मुलगा काळी सॅक घेऊन येताना दिसला. यावेळी पोलीसांनी त्याला विश्वासात घेवून त्याची बॅग बघीतली असता त्यात मोबाईल हॅन्डसेट सापडले. मुलाची चौकशी केली असता त्याने चोरी केल्याचे कबुल केले आहे. यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी 3 लाख रुपयांचे 30 मोबाईल हॅन्डसेट जप्त केले आहेत. 

11 May 2017

एमपीसी न्यूज - क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी करणा-या चौघांविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना आज (11 मे) पहाटे साडेबारा वाजण्याच्या सुमारास भवानी पेठेत घडली.


या मारहाणीत गौरव वायदडे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सचिन देवकुळे, सोहील उर्फ मुन्ना शेख, भाव्या उर्फ भावेश कांबळे आणि बारक्या उर्फ अमित अवचरे (सर्व रा. कासेवाडी, भवानी पेठ, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. वृषभ गायकवाड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.


याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात 9 मे रोजी क्रिकेट खेळण्यावरून भांडण झाले होते. याचाच राग मनात धरत आरोपींनी फिर्यादीला मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी गौरव वायदंडे हा मध्यस्ती करण्यासाठी गेला असता आरोपी सचिन देवकुळे याने त्याच्या डोक्यात कोयत्याचे वार केले. यामध्ये गौरवगंभीर जखमी झाला आहे.


सहायक पोलीस निरीक्षक व्हि.डी.केसरकर अदिक तपास करीत आहेत.     

Page 4 of 33
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start