• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
23 Jun 2017


एमपीसी न्यूज - निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ व पतंजली योग समिती यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय योगासन स्पर्धेतील विजेत्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघ चालक डॉ. गिरीश आफळे व पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी वसंत पाटील यांच्या हस्ते उपस्थितीत पदक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

निगडी, प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदनात गुरुवारी (दि.22) रोजी झालेल्या कार्यक्रमाला सावरकर मंडळाचे उपाध्यक्ष सदाशिव रिकामे, स्पर्धा प्रमुख चंद्रकांत पांगारे, रत्नाकर देव,  डॉ. अजित जगताप आदी उपस्थित होते.

डॉ. गिरीश आफळे म्हणाले ‘नियमितपणे योग, प्राणायाम केल्याने शारीरिक आरोग्या-बरोबरच मानसिक आरोग्यही सुधारते. शरीर लवचिक बनते, शरीरातील रक्ताभिसरण, चेतासंस्था, मज्जासंस्था यांचे कार्य सुधारून रक्तदाब, मधुमेह, अस्थिविकारापासून दूर राहता येते. विद्यार्थ्यांची एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते.

यावेळी व्यक्तीगत तसेच सामुदायिक योगासनांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अजित जगताप यांनी केले. तर, भास्कर रिकामे यांनी आभार मानले.

जिल्हा स्तरीय योगासन स्पर्धा निकाल

6 ते 12 या वयोगटात  इशान देशमुख याला सुवर्ण पदक, संचित कुलकर्णी रजत पदक आणि स्पंदन पाटील याला कास्यपंदक मिळाले आहे. 13 ते 18 वयोगटात दत्तात्रय काळे याला सुवर्ण पदक, शुभम, जाधव याला रजत पदक, साहिल गुंड याला कांस्यपदक, 19 ते 25 वयोगटात जतिन आव्हाड, जितेश कुमार, मयूर कुलकर्णी यांना अनुक्रमे सुवर्ण, रजत आणि कांस्यपदक मिळाले आहे. 26 ते 35 वयोगटात सुकेत शहा, प्रदीप जाधव, विष्णु बनकर यांना अनुक्रमे सुवर्ण, रजत आणि कांस्यपदक मिळाले आहे. 36 ते 45 राजेश ननावरे, तानाजी चौघुले, बाबासाहेब यवले यांना अनुक्रमे सुवर्ण, रजत आणि कांस्यपदक मिळाले आहे.

46 ते 60 वयोगटात रमेश सरनोपंत, किरण घाटबांधे, मानसिंग मोहिते यांना अनुक्रमे सुवर्ण, रजत आणि कांस्यपदक मिळाले आहे. 61 वर्षापुढे अशोक साळी, साहेबराव गारगोटे, कृष्णराव देशमुख यांना अनुक्रमे सुवर्ण, रजत आणि कांस्यपदक मिळाले आहे.

वयोगट वर्ष महिला!

6 ते 12 वयोगटात आर्य गोगावले, गौरंगी चैतन्य, श्रीया दीक्षित यांना अनुक्रमे सुवर्ण, रजत आणि कांस्यपदक मिळाले आहे. 13 ते 18 समीक्षा महाले, स्वरदा देशपांडे, खुशी जिडगे अनुक्रमे सुवर्ण, रजत आणि कांस्यपदक मिळाले आहे. 19 ते 25 वयोगटात संचिता भोईर, सलोनी जाधव, अदिती सिंह अनुक्रमे सुवर्ण, रजत आणि कांस्यपदक मिळाले आहे. 26 ते 35 शर्मीला ननावरे, रुपाली जाधव, बिना सिंग अनुक्रमे सुवर्ण, रजत आणि कांस्यपदक मिळाले आहे.

36 ते 45 वयोगटात विद्या महाले, योगिनी देशमुख, शालिनी आव्हाड अनुक्रमे सुवर्ण, रजत आणि कांस्यपदक मिळाले आहे. 46 ते 60 वयोगटात धनश्री रणनवरे, मृणालिनी वेल्हाळ, नम्रता दळवी अनुक्रमे सुवर्ण, रजत आणि कांस्यपदक मिळाले आहे. 61 वर्षापुढील कादंबरी चटर्जी, पुष्पा चव्हाण आणि वंदना उंब्रजकर अनुक्रमे सुवर्ण, रजत आणि कांस्यपदक मिळाले आहे.

23 Jun 2017


एमपीसी न्यूज - प्रस्तावित उच्चक्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) रस्त्यावरील घरे पाडण्यास 'घरे वाचवा संघर्ष' समितीने ठाम विरोध केला आहे. या विरोधात रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्णय संघर्ष समितीने घेतला आहे. तसेच शहरातील अनधिकृत बांधकामे आणि शास्तीकराचा प्रश्न सुटण्यासाठीही आंदोलन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

घरे वाचवा संघर्ष समितीची गुरुवारी (दि.22) रात्री वाल्हेकरवाडी येथील बीआरटीएस रस्त्यावर बैठक झाली. नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, करूणा चिंचवडे, अभिषेक बारणे, माजी नगरसेवक रघुनाथ वाघ, अनंत को-हाळे, श्याम वाल्हेकर, सामाजिक कार्यकर्ते रणजित औटी, काशिनाथ नखाते, संदीप चिंचवडे, अमृत प-हाड, बाळासाहेब वाल्हेकर, आबा सोनवणे, शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे तसेच चिंचवड ग्रामस्थ मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते.

प्रस्तावित उच्चक्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) रस्त्यावरील आरक्षणामुळे वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, थेरगाव परिसरातील 850 पेक्षा जास्त घरे पाडली जाणार आहे. याला घरे वाचवा संघर्ष समितीने ठाम विरोध केला आहे. एचसीएमटीआर रस्त्यावरील थेरगाव, रहाटणी, वाल्हेकरवाडी, काळेवाडी येथील आरक्षणे हटविण्याचा ठराव एकमाताने या बैठकीत केला आहे. तसेच शहरातील अनधिकृत बांधकामे आणि शास्तीकराचा जटील प्रश्न सोडविण्याचा ठराव पारीत करण्यात आला आहे.

शहराच्या इतिहासात सार्वजनिक रस्त्यावर एखादी बैठक झाली आहे. नागरिकांनी एचसीएमटीआर रस्त्यावरील घरे पाडण्यास तीव्र विरोध केला आहे. प्रभागातील सर्व पक्षाचे नगरसेवक बैठकीला उपस्थित होते. त्यांनी आंदोलनास पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. प्रसंगीपद गेले तरी चालेल. परंतु, आम्ही आंदोलक नागरिकांच्या बाजुने उभे राहणार असल्याची ग्वाही, नगरसेवकांनी बैठकीत दिली आहे.

एचसीएमटीआर रस्त्यावरील घरे पाडण्यास आमचा ठाम विरोध आहे. याला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. काळेवाडी, रहाटणी, थेरगाव या भागात कोपरा सभा घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे, असे संघर्ष समितीचे निमंत्रक विजय पाटील यांनी सांगितले.

एचसीएमटीआर रस्त्यावरील आरक्षणात फेरबदल करण्याचा अधिकार नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला आहे. दोन्ही विभागाच्या सचिवांनी आमच्या बैठकीची नोंद घ्यावी. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये पुढाकार घेऊन आरक्षणामध्ये बदल करावा, अशी मागणीही संघर्ष पाटील यांनी केली आहे.

समितीचे समन्वयक विजय पाटील, आबा राजपूत, मोतीलाल पाटील, अमोल हेळवर, प्रशांत गळवे, भाऊसाहेब पाटील, रेखा भोळे, रजनी पाटील यांनी बैठकीचे आयोजन केले होते.

metting 1

23 Jun 2017


एमपीसी न्यूज - शहराच्या पूर्वभागासाठी खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे पूर्व भागातील असमान पाणी पुरवठ्याची समस्या सुटण्यास मदत मिळणार आहे. ‘भामा-आसखेड योजने’ला आता राज्य सरकारने निधी देण्यास मंजुरी दिली आहे. आता केंद्राकडून अपेक्षित असलेल्या निधीपैकी 80 टक्के रक्कम राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पूननिर्माण योजनेतून (जेएनएनयूआरएम) भामा-आसखेड आणि वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. मार्च 2017 पर्यंत प्रकल्प पूर्ण झाल्यास निधी देण्यात येईल, अशी अट केंद्राने घातली होती. पालिकेचा वडगाव प्रकल्प पूर्ण झाला, तरी शेतकरी आणि स्थानिक खासदार/आमदारांच्या विरोधामुळे भामा-आसखेड प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकला नाही. परिणामी, केंद्र-राज्याकडून अपेक्षित असलेल्या सुमारे शंभर कोटी रुपयांचा भुर्दंड पालिकेलाच सहन करावा लागण्याची शक्यता होती. मात्र, राज्य मंत्रिमंडळाने ‘जेएनएनयूआरएम’मधील अपूर्ण प्रकल्पांसाठी अनुदान स्वरूपात निधी देण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. त्यामुळे या प्रकल्पासमोरील निधीची अडचण आता दूर होणार आहे.

भामा-आसखेडचा संपूर्ण प्रकल्प 380 कोटी रुपयांचा आहे. यापैकी 256 कोटी रुपये केंद्र-राज्याच्या निधीतून मिळणे अपेक्षित होते. मार्च अखेरपर्यंत त्यापैकी 172 कोटी रुपये पालिकेला प्राप्त झाले आहेत. भामा-आसखेड प्रकल्पाचा केंद्राकडून मिळणारा 70 कोटी रुपयांचा अखेरचा हप्ता येण्याची शक्यता नसल्याने आता राज्याकडून या प्रकल्पाच्या उर्वरित खर्चासाठी अनुदान मिळणार आहे.

23 Jun 2017

एमपीसी न्यूज - नवीन बांधकांमांना परवानगी न देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पुणे महानगरपालिकेला दिले आहेत. त्यासोबतच भोगवटा प्रमाणपत्र न देण्याचेही निर्देश देण्यात मंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहे.

पुण्यातील बाणेर आणि बालेवाडी परिसरात सध्या पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यासंदर्भात पुणे महापालिकेतील विद्यमान नगरसेवक अमोल बालवडकर यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर हा निर्णय देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे पालिकेने दररोज प्रती व्यक्ती 150 लीटर पाणी पुरवठा करणे भाग आहे. मात्र, पुणे व ठाणे महानगरपालिका त्यात अपयशी ठरत असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.

या याचिकांवरील एकत्रित सुनावणीदरम्यान हायकोर्टाने दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या समस्येबाबत चिंता व्यक्त केली. काही ठोस उपाययोजना आजच केल्या गेल्या नाहीत, तर भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील गंभीर बनू शकतो. त्यामुळे महानगरातील वाढती लोकवस्ती पाहता, पाणी पुरवठा वाढवणे पालिकेला बंधनकारक आहे. अन्यथा तिथली लोकवस्ती मर्यादीत ठेवण्या व्यतिरीक्त पर्याय उरणार नाही, असे मत हायकोर्टने नोंदवले. यासंदर्भात पुणे आणि ठाणे महानगरपालिकेला 2 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

याबाबत 30 तारखेपर्यंत न्यायालयाला माहिती द्यायची आहे. तोपर्यंत भोगवटा पत्र देऊ नए, असे न्यायालयाने म्हटले आहे. प्रशासनाने तेथील सध्या काम सुरू असलेल्या कामांना भोगवटा पत्र देणे थांबविले आहे. येथील बांधकामांना वापरण्यात येणारे पाणी, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा याची माहिती न्यायालयात सादर करण्यात येणार आहे, मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले आहे.

23 Jun 2017


एमपीसी न्यूज - कर्जरोखे नंतर आता नालेसफाईवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी थेट बोट घेऊन पुणे महापालिकेत प्रवेश करत अनोखे आंदोलन केले. तसेच ऐन पावसाळ्यात नालेसफाईच्या अभावामुळे नागरिकांवर बोटीने प्रवास करायची वेळ आली आहे, अशी टीकाही यावेळी करण्यात आली.


नाले सफाईची कामे पावसाळ्यापूर्वीच होणे अपेक्षित होते. याची महापौर टिळकांकडून तपासणीही करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर आदेश देऊनही योग्य त्या प्रकारे नाले सफाई न झाल्याने पहिल्याच पावसात अनेक घरात पाणी शिरल्याच्याही घटना घडल्या होत्या. यावर अधिका-यांवर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले होते. तसेच महापौर टिळकांनी स्वतः देखील नाले सफाईच्या कामावर नाराजी दर्शविली होती. एवढ्या घडामोडी नंतर अद्यापही नाले सफाईचा प्रश्न न सुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आज या विरोधात आक्रमक होऊन अनोखे बोट आंदोलन केले.

यावेळी नगरसेवक योगेश ससाणे आणि सायली वांजळे यांनी बोटी घेऊन महापालिकेत प्रवेश केला. तसेच नाले सफाईच्या दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. यावेळी नाले सफाई न झाल्याने पुणेकरांना गाडी सोडून बोटीने प्रवास करावा लागत आहे, अशीही टीका करण्यात आली.
pmc 1

23 Jun 2017


एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेविरोधात आज पुणे शहर काँग्रेसच्या वतीने महापौर मुक्ता टिळक यांच्या घरापासून ते महापालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

स्मार्ट सिटी हे मृगजळ असल्याचा आरोप करत फक्त पुणे शहरातील काही भागातच ही योजना यशस्वी होऊ शकते. त्यासाठी संपूर्ण पुणेकरांना कर्जाच्या खाईत लोटने चुकीचे आहे, असे मत काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी केले. यावेळी काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय बालगुडे, रोहीत टिळक आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

23 Jun 2017
 
भाजपकडून गटबाजी नसल्याची सारवा-सारव
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका सत्ताकारणात भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप विरुद्ध आमदार महेश लांडगे यांच्यात वर्चस्ववादाची सुरुवात झाली आहे. त्याचे पडसाद आज (शुक्रवारी) केएसबी चौकातील ग्रेड सेपरेटर कार्यक्रमाच्या उद्‌घाटनात उमटले. महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे यांनी तासभर प्रतीक्षा करुनही जगताप गटाचे कोणीही कार्यक्रमाला फिरकले नाही. त्यामुळे अखेरीस महापौर काळजे यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. दरम्यान, पक्षात कोणतीही गटबाजी नसल्याची सारवा-सारव भाजपकडून करण्यात आली. 
 
पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीकपात, ड्रेसकोड, सभाशास्त्र, महापौरांसाठी नवीन मोटारीची खरेदी, विषय समिती सदस्य नियुक्त्या या विविध कारणांवरुन भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरु झाला आहे. त्याचे पडसाद महापालिका राजकारणात उमटत आहे. त्याची परिणीती दोन दिवसांपूर्वीच महापौर नितीन काळजे आणि स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्या खडाजंगीमध्ये झाली होती. या दोन सत्ताकेंद्रामध्ये 'वर्चस्व' वादाची लढाई सुरु आहे.
 
या पार्श्वभूमीवर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या समर्थक 23 नगरसेवकांची मोशीत स्वतंत्र बैठक घेत वेगळी चूल मांडली. या बैठकीत आमदार लांडगे यांनी समर्थक नगरसेवकांना आक्रमक होऊन कामे करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच बैठक घेऊन आमदार लक्ष्मण जगताप गटाला आव्हान निर्माण केले. भविष्यात हा वाद आणखीनच चिघळण्याची चिन्हे आहेत. त्याची झलक ग्रेड सेपरेटर उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात दिसली.
 
महापौर नितीन काळजे यांनी केएसबी चौक येथे बांधलेल्या पुलाच्या उजव्या बाजूकडील ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन कार्यक्रमाचे आज (शुक्रवारी) आयोजन केले होते. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार होते. परंतु, अपरिहार्य कारणास्तव बापट उपस्थित राहू शकले नाहीत.
 
महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, उपमहापौर शैलजा मोरे तसेच नगरसेवकांनी सुमारे तासभर आमदार लक्ष्मण जगताप यांची वाट पाहिली. सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे किमान हे तरी कार्यक्रमाला येतील अशी अपेक्षा होती. मात्र, आमदार जगतापांसह, पवार, सावळे हे देखील कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. त्यामुळे महापौर काळजे यांच्या हस्ते उद्‌घाटन उरकण्यात आले.
 
दरम्यान, जगताप गटाच्या अनुउपस्थितीबाबत महापौर नितीन काळजे यांना विचारले असता, उद्‌घाटनाचा कार्यक्रम ऐनवेळी ठरला होता. नियोजित कार्यक्रम असल्यामुळे काही पदाधिकारी येऊ शकले नाहीत. सभागृह नेते एकनाथ पवार यांनीच उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ते जेजुरीला असल्यामुळे येऊ शकले नाहीत. आमच्यात कोणत्याही प्रकारची गटबाजी नसल्याचे सांगत त्यांनी सारवा-सारव करण्याचा प्रयत्न केला.
 
खासदार साबळे म्हणाले, भाजपमध्ये कसलीही गटबाजी नाही. सगळ्यांनी एक दिलाने काम केल्यामुळेच पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली आहे. अचानक ठरलेल्या कार्यक्रमामुळे काही पदाधिकारी येऊ शकले नाहीत. पालकमंत्री गिरीश बापट यांनी मला कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे सांगितले होते. सर्वांच्या वतीने मी उपस्थित राहिलो आहे.
दरम्यान, आपण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या सोबत जेजुरीला असल्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही, असे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी सांगितले.
 
आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांचीही दांडी!
महापालिका मुख्यालयात उपस्थित असलेले आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे आणि शहर अभियंता अंबादास चव्हाण यांनीही या कार्यक्रमाला दांडी मारली. पुर्वनियोजीत बैठका, व्यग्रता यामुळे आयुक्त येऊ शकले नसल्याचे महापौर काळजे यांनी स्पष्ट केले. तर, आयुक्त हर्डीकर यांच्यावर आमदार लक्ष्मण जगताप गटाचा दबाव असल्यामुळे ते अनुउपस्थित राहल्याची चर्चा रंगली आहे.
23 Jun 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड परिसराला पाणीपुरवठा करणा-या  पवना धरण परिसरात 1 जून पासून 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यानुसार सध्या धरणात 20 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पवना धरणाला त्याची तहान भागवण्यासाठी अद्याप मुसळधार पावसाची प्रतिक्षा आहे.

पवना धरण परिसरात आज दुपारी 12 वाजेपर्यंत 6 मिली पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार 1 जून ते 23 जून या 22 दिवसाच्या कालावधीत धरण परिसरात 100 मिली पावसाची नोंद झाली आहे. मात्र हा पाऊस धरणाची तहान भागवणारा नसल्याने  धरणात सध्या 20.75 टक्के म्हणजे 1.77 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे धरण भरण्यासाठी किमान 1हजार 800 ते 1 हजार 900 मिमी पावसाची आवश्यकता आहे.

पावसाला सुरुवात झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड  शहराची 13 जूनपासून एक दिवसाड पाणी कपातही रद्द करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर धरण परिसरात जोरदार पाऊस होण्याची गरज आहे.

शहरात आज बरसणार पावसाच्या सरी

मान्सून काही दिवस थंडावला होता. मात्र काल सायंकाळपासून पुणे व पिंपरी-चिंचवड शहर परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज काही भागात मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आत्ता तरी पावसाने न थांबता बॅटींग सुरु करावी अशी अपेक्षा शहरवासीय करत आहेत.

23 Jun 2017
 
(स्मिता जोशी)
 
एमपीसी न्यूज - मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आई-वडील आणि मुलांमध्ये साधारणपणे नेहमी वेगवेगळी पैज लागत असते. तू अमुक केलेस तर तुला हे देऊ, तमुक केलेस तर ते देऊ असे त्याचे साधारण स्वरुप असते. अशाच प्रकारची एक वेगळी पैज मुलगा आणि वडिलांमध्ये लागली. चार-पाच वर्षांच्या कालावधीत मुलगा जिद्दीला पेटून परिश्रम घेत असल्याचे वडिलांना दिसत होते. मग काय? त्यांना देखील त्यांची पैज पूर्ण करण्याचे मनावर घ्यावे लागले आणि त्याचे फलस्वरुप म्हणून काही दिवसांपूर्वी दोघांनीही आपापला शब्द खरा करुन एकमेकांना दिलेले चॅलेंज पूर्ण केले.
 
ही पैज लागली होती, निगडीचे रहिवासी असलेले सुप्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. शैलेश देशपांडे आणि त्यांचा मुलगा पार्थ देशपांडे यांच्यात आणि चॅलेंज होते ते डॉ. देशपांडे यांनी सिव्हील एव्हिएशनमधील विमानोड्डाणाचे ठराविक तास पूर्ण करुन कॅप्टन (पायलट) व्हायचे आणि पार्थने नौदलातील आपला अभ्यासक्रम पूर्ण करुन सब लेफ्टनंट ही पदवी मिळवायची. नुकतेच काही दिवसांपूर्वी पार्थने आपला कन्नूर येथील अभ्यासक्रम पूर्ण करुन सब लेफ्टनंट ही नौदलातील पहिली पोस्ट मिळवताना इलेक्ट्रिक आणि कम्युनिकेशन मधील बी.टेक ही पदवी मिळवली. आणि डॉ. देशपांडे यांनी दोनशे तास विमान चालवून कॅप्टन (पायलट) ही पोस्ट मिळवली. अशा रितीने दोघांनीही एकाच वेळी आपापल्या क्षेत्रात नैपुण्य मिळवून पैज पूर्ण केली.
 
पार्थ सातवीत असतानाच त्याने त्याचे ध्येय ठरवले होते. मोठा होऊन त्याला आकाशभरारी घ्यायची होती. आणि डॉ. देशपांडे यांना देखील विमानोड्डाणाचे स्वप्न खुणावत होतेच. मग काय गमती गमतीतच एकमेकांची पैज लागली. जर पार्थने नौदलातील त्याचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला तर त्याचे बाबा देखील हौशी पायलट होतील आणि त्यानंतर मग पार्थ फायटर प्लेन चालवण्याचे शिक्षण घेईल आणि दोघेही जण आकाशभरारीचे आपले स्वप्न पूर्ण करतील.
 
त्यानुसार डॉ. शैलेश देशपांडे यांनी 2013 पासून  बारामती येथील कार्व्हर एव्हिएशनमध्ये विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी त्यासाठी दोनशे तास विमान चालवले. आणि मग त्यांना कॅप्टन (पायलट) ही पदवी मिळाली. याच कालावधीत पार्थने कन्नूर येथील नौदलाच्या प्रशिक्षण केंद्रात युपीएससीच्या माध्यमातून प्रवेश घेतला. आणि चार वर्षांचा आपला अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. आणि त्याला सब लेफ्टनंट ही नौदलातील पहिली पोस्ट मिळाली. आता त्याला नौदलाच्या पुढील अभ्यासक्रमानुसार सहा महिने नौदल अधिकारी म्हणून अनुभव घ्यावा लागेल. त्यानंतर त्याचे पुढील ध्येय आहे ते विमानवाहू युद्धनौकेवरून उड्डाण घेण्या-या फायटर विमानाचे सारथ्य करण्याची. म्हणजेच ज्याला अत्यंत अचूकतेची गरज असते अशा विमानवाहू युद्धनौकेवर उतरणा-या फायटर विमानाचे पायलट होण्याचे आणि डॉ. शैलेश देशपांडे यांच्या समोर ध्येय आहे ते स्वत:च्या विमानातून स्वत: विमान चालवत जगप्रवास करण्याचे. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः एक विमान देखील विकत घेतले आहे. डॉ. शैलेश देशपांडे यांनी स्वतःचे वैद्यकीय नैपुण्य कायम ठेवत ही अवकाश भरारी घेतली आहे.
23 Jun 2017


केंद्र सरकारकडून 'स्मार्ट सिटी'ची तिसरी यादी जाहीर

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या बहूचर्चित स्मार्ट सिटी या योजनेत पिंपरी-चिंचवड शहराचा तिस-या यादीत समावेश झाला आहे. या यादीमध्ये एकूण 30 शहरांची नावे जाहीर करण्यात आली. केंद्रीय शहर नागरी विकास मंत्रालयाने स्मार्ट सिटीची तिसरी यादी जाहीर केली. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे, असे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.


पुणे व पिंपरी-चिंचवड शहराचा केंद्र सरकारकडे एकत्रित प्रस्ताव गेल्याने शहराच्या गुणवत्ता यादीत 100 पैकी 98 गुण मिळवूनही पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटी योजनेतून डावलले गेले होते. शहराची पात्रता असतानाही डावलले होते. यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत होती. दरम्यानच्या काळात नवी मुंबई महापालिका स्वत:हून स्मार्ट सिटी योजनेतून बाहेर पडली. नवी मुंबईच्या ऐवजी पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत समावेश केल्याची घोषणा, केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी पुण्यामध्ये केली होती. त्यावर आज (शुक्रवारी) अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.

या तिस-या यादीमध्ये पिंपरी-चिंचवड या महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी देशभरातील 30 शहरांची तिसरी यादी जाहीर केली. 'स्मार्ट सिटी' अंतर्गत आता देशभरातील एकूण 90 शहरांचा कायापालट होणार आहे. स्मार्ट शहरांच्या योजनेंतर्गत तिस-या टप्प्यातील यादीत 30 शहरांची निवड करण्यात आली आहे. यादीत पिंपरी-चिंचवड 18 व्या स्थानी आहे.

ही शहरे विकसित करणार!

तिरुअनंतपुरम, नवा रायपूर, राजकोट, अमरावती, पाटणा, करीमनगर, मुजफ्फरपूर, पुद्दूचेरी, गांधीनगर, श्रीनगर, सागर, कर्नाल, सतना, बेंगळुरु, शिमला, त्रिपूर, पिंपरी-चिंचवड, बिलासपूर, पासिघाट, जम्मू, दाहोद, तिरुनेलवेल्ली, थूठकुडी, तिरुचिरापल्ली, झाशी, आयझॉल, अलाहाबाद, अलीगढ आणि गंगटोक.

पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्याने शहरवासीयांना आनंद झाला आहे. यामुळे शहराचा सुनियोजित विकास होणार आहे. स्मार्ट सिटीत शहराचा समावेश व्हावा, यासाठी भाजप पदाधिका-यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे, असे महापौर नितीन काळजे यांनी 'एमपीसी न्यूज'शी बोलताना सांगितले.

सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्याचा मनस्वी आनंद झाला आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यावर शहराचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. त्याला अखेर यश आले आहे. यामुळे शहराचा सर्वांगीण विकास होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहरवासीयांच्या वतीने आभार मानतो.

विरोध पक्षनेते योगेश बहल म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराचा पूर्वीच स्मार्ट सिटीमध्ये समावेश होणे गरजेचे होते. शहराचा सर्वांगीण विकास होऊनही डावलले गेले. परंतु, 'देर आये, दुरुस्त आये'' असे म्हणत शहराचा स्मार्ट सिटीत तिस-या यादीत समावेश केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार मानले. तसेच यामध्ये राजकारण न करता लोकहित डोळ्यासमोर ठेवून काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

याबाबत बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, स्मार्ट सिटी अभियान शहरात राबविण्यासाठी विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेइकल) कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. स्मार्ट सिटीच्या आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल. स्मार्ट सिटी अंतर्गत कामासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद देखील करण्यात आली असून स्मार्ट सिटीचे काम वेगात करण्यात येणार आहे.

Page 3 of 184
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start