• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
20 Jun 2017

दहा हजार झाडांसाठी 61 लाख रुपये खर्च

एमपीसी न्यूज - पिंपरी -चिंचवड महापालिका यंदाच्या पावसाळ्यात सुमारे दहा हजार नवीन झाडांची लागवड करणार आहे. या झाडांची देखभाल आणि संरक्षण राज्य वनविकास महामंडळातर्फे केले जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील तळवडे - चिखली येथील गायरान, च-होली येथील वाघेश्वर मंदिर परिसर आणि पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्म या ठिकाणी सुमारे दहा हजार नवीन झाडांची लागवड करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे सन 2015 च्या मान्सुनपासून नागरी भागात हरीत शहर योजना राबविण्यासाठी आवश्यक कार्यवाही व उपाययोजना करण्याबाबत कळविण्यात आले आहे. राज्य वनविकास महामंडळ ही शासन अंगीकृत संस्था आहे. त्यामुळे 'हरित शहर योजना' कार्यान्वित करण्यासाठी वृक्ष लागवड, त्यांचे संरक्षण आणि देखभाल करण्याचे काम या महामंडळाकडून करून घेण्यात येणार आहे. 

वृक्ष लागवडीनंतर या महामंडळाकडून तीन वर्षांच्या कालावधीमध्ये या वृक्षांचे देखभाल व संरक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रति रोप 610 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे राज्य वनविकास महामंडळाला देण्यात येणा-या 61 लाख रुपये खर्चावर महापालिका स्थायी समिती सभेत शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

20 Jun 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लेखा विभागाची सुरक्षा अखेर पालिका प्रशासानाने हटविली आहे. याबाबत सर्वप्रथम एमपीसी न्यूजने पालिकेचा लेखा विभाग 35 वर्षाच्या इतिहासात चक्क सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात कामकाज करत असल्याचे वृत्त दिले होते. त्यानंतर सोमवारपासून लेखी विभागाची सुरक्षा हटविण्यात आली आहे.

महापालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर लेखा विभाग कार्यरत आहे. लेखा विभागाच्या प्रवेशद्वारासमोर गेल्या काही दिवसांपासून तीन ते चार सुरक्षा रक्षक तैनात ठेवले जात होते. नागरिकांना ओळख विचारुनच कार्यालयात सोडले जात होते. तर, ठेकेदारांना आतमध्ये सोडलेच जात नव्हते.

पालिकेच्या 35 वर्षाच्या इतिहासात प्रथमच एखादा विभागा सुरक्षा रक्षकाच्या बंदोबस्तात कामकाज करत, असल्याचे वृत्त एमपीसी न्यूजने दिले होते. त्यानंतर सोमवार (दि.19) पासून लेखा विभागाची सुरक्षा काढण्यात आली आहे.

19 Jun 2017


एमपीसी  न्यूज - पुणे महापालिकेच्या 24x7 पाणी पुरवठा योजनेसाठी २ हजार 264 कोंटीचे कर्जरोखे पुढील पाच वर्षात  उभारण्यात येणार आहेत. यातील पहिल्या टप्यातील 200 कोटीचे कर्जरोखे स्वरुपातील पैसे महापालिकेच्या तिजोरीत उद्या जमा होणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कर्ज रोखे उभरणारी पुणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे.  याबाबत केंद्रीय नगरविकास मंत्री वैंकय्या नायडू यांनी ट्विट करून महापालिकेचे अभिनंदन केले आहे. 22 जूनला नायडू यांच्या उपस्थितीत या कर्ज रोख्याची नोंदणी मुंबई शेअर बाजारात करण्यात येणार आहे.

पुणे महापालिकेच्या महत्वाकांक्षी 24 तास पाणी पुरवठा योजनेसाठी राज्य आणि केंद्र सरकारने निधी देण्यासाठी असमर्थता दर्शवल्यामुळे या प्रकल्पासाठी 2 हजार 264 कोटींचे कर्जरोखे उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने मंजूर केला असून कर्ज रोखे उभारण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. पुढील पाच वर्षात हे कर्ज रोखे उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्यातील 200 कोटीच्या कर्ज रोखे उभारण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.

महापालिकेला कर्ज रोखे तयार करण्यासाठी 21 कंपन्यांनी तयारी दर्शवली होती. त्यातील 2 कंपन्यांची निवड करण्यात आली असून प्रत्येकी 100 कोटी प्रमाणे उद्या महापालिकेच्या तिजोरीत 200 कोटी जमा होणार आहेत. यामुळे 24 तास पाणी पुरवठा योजनेला चालना मिळणार आहे. 22 जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरसिकास मंत्री वैंकय्या नायडू, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्त टिळक यांच्या उपस्थितीत या कर्ज रोख्याची मुंबई शेअर बाजारात नोंदणी करण्यात येणार आहे. 2007 नंतर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात कर्ज रोखे उभरणारी पुणे महापालिका ही पहिली महापालिका ठरली असून याबद्दल केंद्रीय मंत्री वैंकय्या नायडू यांनी अभिनंदन केले आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना आयुक्त कुणाल कुमार म्हणाले की, पुणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या 24 तास समान पाणीपुरवठ्यासाठी 2 हजार 264 कोटींचे कर्जरोखे उभारण्याचा निर्णय नुकताच पुणे महापालिकेने घेतला आहे. या निर्णयाला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. महापालिकेच्या वतीने सोमवारी 200 कोटींचे कर्जरोखे मुंबई शेअर बाजारात आणण्यात आले. ऑनलाईन बोलीमध्ये या कर्जरोख्यांना गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. प्रमुख बँका, विमा कंपन्या, पेन्शन फंड संस्था अशा 21 जणांनी या कर्जरोख्यांसाठी बोली लावत सहा पट ज्यादा गुंतवणुकीची तयारी दर्शविली. त्यापैकी 7.59 टक्के असा सर्वाधिक कमी व्याजदर आकारणार्‍या वित्तीय संस्थेने हे कर्जरोखे घेतल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.

महापालिकेच्या कर्जरोख्यांना गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळेच पुणेकरांना शुद्ध पाणी देण्यास मदत होणार आहे. यावेळी त्यांनी सर्व लोकप्रतिनिधी आणि वित्तीय विभागाच्या अधिकार्‍यांचे आभारही मानले.

19 Jun 2017


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांची सरकारी मोटार आज (सोमवारी) बंद पडली. त्यामुळे महापौर साहेब पालिकेत येऊ शकले नाहीत. तसेच अनेक वेळा सांगूनही मोटार व्यवस्थित दुरुस्त केली जात नसल्याबाबत महापौर काळजे यांनी नाराजी व्यक्त केली.

महापौर नितीन काळजे यांना सरकारी मोटार देण्यात आली आहे. सोमवारी दिघी येथील रामचंद्र गायकवाड महाविद्यालयाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला महापौर मोटार घेऊन गेले होते. कार्यक्रम संपून येत असताना रस्त्यामध्ये अचानक महापौरांची मोटार बंद पडली. आपल्या मोटारीची वारंवार दुरुस्ती करण्यात आली आहे. मोटार सारखीच नादुरुस्त होत आहे. याबाबत संबंधित विभागाला अनेकवेळा सांगूनही मोटार व्यवस्थित दुरुस्त केली जात नाही, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली. 

मोटार बंद पडल्यामुळे आपल्याला पालिका कार्यालयात येता आले नाही. शहरातील अनेक नागरिक कामासाठी आपल्याकडे कार्यलयात आले होते. पंरतु, मोटार नादुरुस्त झाल्याने आपण कार्यालयात येऊ शकलो नसल्याचे, महापौर काळजे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, च-होली भागात उंच रस्ता असल्यामुळे पालिकेची मोटार रस्त्यांना लागत असल्याची, तक्रार महापौर काळजे यांनी यापूर्वी केली होती. त्यामुळे महापौरांना नवी मोटार हवी असल्याची, चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.

19 Jun 2017


एमपीसी न्यूज - पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने पिंपरी-चिंचवड पालिकेच्या नगरसेवकांसाठी उद्या (मंगळवारी) ‘मेट्रो संवाद’चे आयोजन करण्यात आले आहे.

महापालिका मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी दुपारी एक वाजता मेट्रो संवाद होणार आहे.

या संवादाअंतर्गत हैद्राबादच्या एल अॅण्ड टी मेट्रो रेल लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक गाडगीळ, पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे रामनाथ सुब्रमण्यम्, महामेट्रोच्या सल्लागार समितीचे शशिकांत लिमये, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित राहणार आहेत.

19 Jun 2017


एमपीसी न्यूज - पुण्यात माउलींच्या पालखी सोहळ्यात काही गैरसमजुतीमुळे श्री शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि वारकरी यांच्यात गोंधळ झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात पोलीस आणि वारीचे चोपदार यांच्यात वाद झालेला असताना त्याला श्री शिवप्रतिष्ठानच्या धारकर्‍यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर काढणे आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची त्वरित दखल घेऊन भिडे गुरुजी आणि त्यांच्या सहकार्‍यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी हिंदू जनजागृती समिती या संघटनेने केली.


महाराष्ट्रात वारकरी आणि धारकरी हे एकाच परंपरेचे दोन अविभाज्य भाग आहेत. श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी आणि  संभाजी भिडे गुरूजी गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेनुसार वारीत सहभागी होत आहेत. त्यामुळे त्यांचे वारकर्‍यांशी स्नेहाचे संबंध असल्याचे स्पष्ट होते. तसेच वारकरी संप्रदायाची ओळख शांत, सहिष्णु, पांडुरंगाच्या भक्तीत लीन अशी आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेने हा गोंधळ मिटवण्याच्या ऐवजी वयोवृद्ध आणि तपोवृद्ध भिडे गुरुजी अन् श्री शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करणे म्हणजे अधिकाराचा अतिरेक आहे. त्याचप्रमाणे भिडे गुरुजी यांच्यासारख्या एका वयोवृद्ध व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखल करणार्‍या पोलीस अधिकार्‍याला त्वरित निलंबित करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

19 Jun 2017


एमपीसी न्यूज - पुणे शहराला 1685 पासून पालखीची परंपरा असून पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. या शहरात भिडे गुरुजीच्या समर्थकांनी पालखी सोहळ्या दरम्यान केलेला प्रकार हा निषेधार्थ आहे. तसेच पुढील काळात गणेश उत्सवासारखे आयोजन शहरात होणार असून यामध्ये भिडे गुरुजींमुळे अनुचित प्रकार घडू शकतात. त्यामुळे त्यांना पुणे शहरात येण्यास बंदी घालावी, अशी मागणी काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी केली.

भिडे गुरुजी व समर्थकांनी माउलींच्या पालखीच्या मध्येच घोषणा देत घुसण्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी पुणे महापालिका विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे, शिवसेना गटनेते संजय भोसले यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी ही मागणी करण्यात आली.

काल रात्री पुण्यात ज्ञानोबा माउली आणि तुकोबांच्या पालखी मार्गात वादावादी झाली होती. फर्ग्युसन रस्त्यावरून माउलींची पालखी मार्गक्रमण करीत असताना, संभाजी भिडे गुरुजींचे काही समर्थक दिंडीच्या पुढे येऊन मार्गक्रमण करू लागले. यावर दिंडीतील प्रमुखांनी आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला होता. त्यामुळे माउलींची पालखी गुडलक चौकात एकाच जागी थांबून राहिली. ही पालखी थांबल्यामुळे माउलींच्या पालखीला पुण्यातील मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला उशीर झाला. या विरोधात भिडे गुरुजी आणि समर्थकांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा झालेला प्रकार पुणे या संस्कृतिक शहराच्या वैभवला काळीमा फासणारा असल्याचे सांगत पुढील काळात, असा प्रकार घडू नये यासाठी भिडे गुरुजींना पुण्यात बंदी घालण्याची मागणी केली.

तसेच पोलिसांनीही या प्रकरणी हलगर्जीपणा केला आहे. पालखी सोहळ्यात मानाच्या दिंड्यांमध्ये संभाजी भिडेंचे कार्यकर्ते अचानक तलवारी घेऊन शिरताना पोलीस काय करत होते, असा सवालही काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी उपस्थित केला. 

19 Jun 2017


एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसने ठेकेदारांना पोसण्याचे काम केले आहे. परंतु, आम्ही ठेकेदारांना पोसणार नाहीत. पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न करत असून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी काम करत आहोत. आम्ही काय करायचे ते योगेश बहल यांनी आम्हाला सांगण्याची गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अद्यापही पराभवाच्या गर्तेतून सावरली नसल्याची, टीका सभागृह नेते एकनाथ पवार यांनी आज (सोमवारी) पत्रकारपरिषदेत केली. तसेच आम्ही कोणाच्याही रिमोट कंट्रोलनुसार काम करत नसल्याचेही, पवार म्हणाले.


राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषदेत घेऊन भाजप पदाधिका-यांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर लगेच पत्रकार परिषद घेऊन पवार यांनी राष्ट्रवादीच्या आरोपांना उत्तर देताना आपला बचाव करत राष्ट्रवादीवर टीकेचा सूर कायम ठेवला.

एकनाथ पवार म्हणाले की, राष्ट्रवादीने अर्थसंकल्प चांगल्या पद्धतीने मांडला असता तर सगळे खर्च झाला असता. अर्थसंकल्पाला मुळातच उशीर झाला होता. त्यामुळे कोणाच्याही उपसूचना न स्वीकारण्याचा निर्णय भाजपने घेतला होता. उपसूचना स्वीकारल्या असत्या तर त्यासाठी आणखी दोन दिवसांचा जास्त अवधी लागला असता.

अर्थसंकल्पामध्ये जे विषय होते. ते सर्व विषय सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर आहेत. सत्तेचा वापर चुकीच्या पद्धतीने करणार नाही, असेही पवार म्हणाले. तसेच ताडपत्री घोटाळ्यात जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचेही, त्यांनी ठामपणे सांगितले.

19 Jun 2017


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या भाजप पदाधिका-यांनी 1,59 कोटी रुपयांची 1 हजार 480 बिले रोखून धरली आहेत. या रकमेतून भाजप पदाधिका-यांना 'पठाणी' वसुली करायची असल्याचा घणाघाती आरोप, विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत केला. तसेच महापौर व सभागृह नेते कळसुत्री बाहुले असून पालिकेचा कारभार सत्ताबाह्य केंद्र चालवत असल्याचेही, ते म्हणाले.


यावेळी माजी महापौर व नगरसेविका मंगला कदम, वैशाली घोडेकर, नगरसेविका वैशाली काळभोर, सुलक्षणा शिलवंत, नगरसेवक नाना काटे, श्याम लांडे आदी उपस्थित होते.

योगेश बहल म्हणाले की, पिंपरी पालिकेचा तब्बल 5 हजार 150 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प भाजपने कायदे व नियमांना तिलांजली देऊन मंजूर केला आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियम 100 नुसार अर्थसंकल्पीय अंदाजाची अंतिम स्वीकृतीचा अधिकार महासभेच्या असताना देखील या अधिनियमाला वाटाण्याच्या अक्षता लावत अगोदर अर्थसंकल्प मंजूर करून घेतल्यानंतर चर्चा करण्याचा अजभ कारभार भाजपच्या सत्तेत सुरू झाला आहे.

आर्थिक वर्ष संपल्याचे कारण पुढे करत 31 मार्च 2017 नंतर ठेकेदारांची बिले स्वीकारली नाहीत. आजपर्यंत 31 मार्चनंतरही बिले स्वीकारली जात होती. परंतु, निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या भाजपने ठेकेदारांची 1,59 कोटी रुपयांची 1 हजार 480 बिले थांबविली आहेत. राष्ट्रवादीच्या काळात मंजूर झालेल्या कामाचा मलिदा भाजप पदाधिका-यांना लाटायचा असल्याचा, आरोप बहल यांनी केला आहे.

भाजपने दादागिरी करू नये. यापुढे विरोधाला विरोध न करता चुकीच्या कामांना विरोध करणार आहे. भाजपने राष्ट्रवादीने केलेल्या सर्व कामांची चौकशी करावी, असेही बहल म्हणाले.

भाजपचे आपल्याच नगरसेवकांना अज्ञान ठेवण्याचे डावपेच आहेत. स्थायी समितीकडे 500 उपसूचना आल्या होत्या. त्यापैकी 19 उपसूचना स्वीकारल्या आहेत. या उपसूचना नेमक्या कोणत्या आहेत, हे जाहीर का केले नाही. तसेच या उपसूचना कोणत्या आहेत हे स्थायी समितीच्या सदस्यांना देखील माहिती नसल्याचे, मंगला कदम म्हणाल्या.

19 Jun 2017


राष्ट्रपती पदासाठी रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पक्षाने राष्ट्रपती पदासाठी रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिल्याने दलित समाजाच्या व्यक्तीला पुन्हा एकदा सर्वोच्च पदावर जाण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे विरोधकांनी राष्ट्रपती पदासाठी उमेदवार उभा करू नये, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


यावेळी बोलताना आठवले म्हणाले, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी दलित व्यक्तीला राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देऊन भारतीय जनता पक्ष दलितांच्या आणि आरक्षणाच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केले आहे. हा निर्णय क्रांतिकारक असून  यामुळे भाजप सरकार दलित आणि मागासवर्गीय समाजाच्या उत्कर्षासाठी भूमिका मांडत असल्याचे सिद्ध झाले आहे.

विरोधकांचा समाचार घेताना ते म्हणाले, रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिल्याने विरोधकांची तोंडे बंद झाली आहेत. विरोधकांना भलत्याच नावाची अपेक्षा होती. जेणेकरून त्यांना सरकारला विरोध करण्याची संधी मिळाली असती. परंतु प्रत्यक्षात घडले भलतेच. त्यामुळे विरोधकांनी आता राष्ट्रपती पदासाठी उमेदवार न देता कोविंद यांना पाठिंबा द्यावा.

Page 10 of 184
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start