• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
19 Feb 2017
एमपीसी न्यूज - लोणावळा पोलिसांनी गावठाण लोणावळा येथे एका दुचाकी चोरट्यास रंगेहाथ पकडले. त्याला आज वडगाव न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

समीर सत्तार शेख (वय 23, रा. वेताळनगर, डोंगरगाव, लोणावळा), असे या पकडलेल्या दुचाकी चोराचे नाव आहे. 

शहरात वाढत्या चोर्‍यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या आदेशान्वये शहर पोलिसांची काल शनिवारी सायंकाळी पेट्रोलिंग सुरू असताना सात वाजण्याच्या सुमारास गावठाण लोणावळा येथे पल्सर ही दुचाकी गाडी चोरताना समीरला शेखला लोणावळा शहर गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस नाईक अभिजित मोहिते व श्रीशैल कंटोळी यांनी रंगेहाथ पकडले.
18 Feb 2017
एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात काँग्रेस आय पक्षाने अधिकृत पत्रक काढत शिवसेनेच्या कुसगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सत्यभामा शांताराम गाडे, कुसगाव पंचायत समितीच्या उमेदवार उषा संजय घोंगे, वाकसई पंचायत समितीचे सदस्य बाबू शेळके, चांदखेड पंचायत समितीच्या उमेदवार मनिषा आनंदा मालेकर (केदारी) यांना जाहीर पाठिंबा दिला असल्याचे काँग्रेस आयचे मावळ तालुका कार्याध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी सांगितले. 


पुणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, संभाजी राक्षे व भरत दळवी यांच्या सदर पाठिंबा पत्रकावर स्वाक्षर्‍या आहेत. काँग्रेस  पक्षाची कुसगाव जिल्हा परिषद गटात व चांदखेड पंचायत समिती गणात चांगली ताकद आहे. ही ताकद शिवसेनेच्या मागे पुर्ण क्षमतेने उभी करून शिवसेना उमेदवार निवडून देण्याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले आहे. या बदल्यात काही जागांवर शिवसेना काँग्रेसच्या उमेदवारांना मदत करणार असल्याचा अंतर्गत समझोता झाला आहे. 


दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडखोरांची मोट बांधत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माऊलीभाऊ दाभाडे यांनी समांतर राष्ट्रवादी पक्ष तयार करत राष्ट्रवादी समोर आव्हान निर्माण केले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा देत भाजपाची कोंडी करण्याची तयारी केली आहे. मतदानाकरिता अवघ्या काही दिवसांचा अवधी राहिला असताना मावळात राष्ट्रवादी व भाजपा या दोन्ही पक्षांना रोखण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
18 Feb 2017
एमपीसी न्यूज - लोणावळ्यामधील कार्ला गावातील एका 25 वर्षीय युवकाचा पवनानगर जवळील कडधे गावात डोक्यावर जबर मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच या घटनेतील पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही समोर आले आहे. पवनानगर परिसरातील पवना रेस्ट हाऊस जवळ या युवकाचा मृतदेह मिळून आल्यावर काल शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घटना उघडकीस आली.  

दिनेश बाळू हुलावळे (वय 25, रा. कार्ला, ता. मावळ), असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी विशाल राम हुलावळे (रा. कडदे, पवनानगर) यांच्या फिर्यादीवरुन लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश हा शनिवारी (दि. 11) त्यांच्या कुटुंबियासह कडदे, पवनानगर येथे मामाच्या गावाला ऊरुसाला गेला होता. तेथून तो बेपत्ता झाला असल्याची तक्रार त्यांच्या वडिलांनी कामशेत पोलीस ठाण्यात (दि. 14) दिली होती. त्याचा सर्वत्र शोध सुरू असताना काल शुक्रवारी सायंकाळी पवनानगर रेस्ट हाऊस येथे दिनेशचा मृतदेह मिळून आला. कोणीतरी अज्ञात इसमाने त्याच्या डोक्यात डाव्या भुवईच्या वर गंभीर दुखापत करून खून केला आहे. तसेच त्याची गाडी पुरून ठेवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अज्ञात इसमाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी गायकवाड हे करत आहेत.
18 Feb 2017
एमपीसी न्यूज - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी परिसरातील दहा जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याची माहिती वरिष्ठ सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येडे पाटील यांनी दिली. 

किरण येवले (वाकसई), मंगेश देशमुख व रवींद्र देशमुख (देवघर), शुभम गाडे, जयराम भोसले व किरण साळवी (कुसगाव), भाऊ गायकवाड, अनंता घुले व वैभव गायकवाड (ओळकाईवाडी), अशोक ठुले (डोंगरगाव), अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

ग्रामीण परिसरातील कुसगाव व पवनानगर ही दोन गावे संवेदनशील घोषित करण्यात आली आहे. निवडणुकीच्या दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने कारवाई करण्यात आली आहे.
17 Feb 2017
एमपीसी न्यूज -  येथील रेल्वे मैदानावर मोठ्या चुरशीने खेळल्या गेलेल्या लोणावळा टेनिस प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात स्थानिक बाबा इलेव्हन या संघाने सुनिल नाना भोंगाडे स्पोर्ट्स इलेव्हन संघाचा 4 गडी राखून पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले.


लोणावळा टेनिस प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण 16 संघ सहभागी झाले होते. आठवडाभर सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यासह एकूण 32 लीग सामने खेळविले गेले. स्पर्धेची अंतिम लढत लोणावळ्यातील बाबा इलेव्हन आणि तळेगाव येथील सुनीलनाना भोंगाडे स्पोर्ट्स इलेव्हन या दोन संघात झाली. बाबा इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 


निर्धारित षटकात सुनीलनाना भोंगाडे स्पोर्ट्स इलेव्हन या संघाला केवळ 54 या धावसंख्येवर रोखत बाबा इलेव्हन संघाने वर्चास्व मिळविले. परंतु या कमी धावसंख्येची सुरक्षा करताना सुनीलनाना भोंगाडे स्पोर्ट्स इलेव्हनने बाबा इलेव्हन संघाला चांगलीच लढत दिली. अखेर 4 गाडी राखून बाबा इलेव्हन संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. स्पर्धेचे उपविजेतेपद सुनिलनाना भोंगाडे स्पोर्ट्स इलेव्हन या संघ, तृतीय स्थान रॉयल इलेव्हन या संघाने तर चतुर्थ स्थान संतोष वाघावले इलेव्हन संघाने पटकाविले.


लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते विजेत्यांना विजेतेपदाचा चषक आणि रोख पारितोषिक देण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक निखील कवीश्वर, सुधीर शिर्के, बाळासाहेब जाधव, माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय गवळी, प्रमोद गायकवाड, रेल्वेचे मयूर पाडाळे, आयोजक सुरज गायखे, बंटी कदम आदींसह मान्यवर आणि क्रिकेटप्रेमी मोठ्यान संख्येने उपस्थित होते. 


स्पर्धेतील मालिकावीर हा किताब रॉयल इलेव्हनच्या रवी पंडित याला देण्यात आला. तर अंतिम सामन्यातील सामनावीर हा किताब बाबा इलेव्हनच्या संतोष सातकर याला देण्यात आला. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार सुनीलनाना भोंगाडे स्पोर्ट्स इलेव्हनच्या विकास कुमार याला तर उत्कृष्ट फलंदाजाचे पारितोषिक याच संघाच्या दत्ता पवार याला देण्यात आले.


16 Feb 2017

एमपीसी न्यूज - मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगूल वाजले असून प्रचाराला केवळ सहा दिवसाचा अवधी राहिला असल्याने उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून नात्यागोत्यातील मंडळी प्रचार कामात सक्रिय झाली आहेत. घरातील कामे सकाळी लवकरच उरकून ही मंडळी प्रचारासाठी गळ्यात पट्टया अडकवत सज्ज होत आहे.मावळ तालुका हा भौगोलिक दृष्ट्या वाड्या वस्त्यांचा व दुर्गम भागाचा असल्याने मतदार संघ दूरवर पसरलेले आहे. मतदार संघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे उमेदवाराला शक्य नसल्याने नात्यागोत्यातील मंडळींनी राजकारण बाजूला ठेवत प्रचारकार्यात उडी घेतली आहे. घरोघरी जाऊन प्रचारपत्रके वाटप करणे, भिंतीपत्रके चिटकवणे ही कामे बालचमू मोठ्या उत्साहात करत आहेत. आमूकतमूक हा आपला नातेवाईक आहे. यावेळी पक्ष व राजकारण बाजूला ठेवत नात्यातील मंडळीला मदत करा शेवटी आपलं ते आपलं असतं अस सांगायला देखील नातेवाईक विसरत नसल्याने नात्यागोत्यातील राजकारणाला मावळात मोठे महत्व प्राप्त झाले आहे.


नातेवाईकांप्रमाणेच गावकी व भावकी देखील प्रचारात सहभागी झाली असल्याचे चित्र दिसत आहे. पक्ष कोणता का असेना उमेदवार आपल्या गावातील आहे. आपल्या हाकेला तो केव्हाही धावू शकतो हा विचार मनात धरत सध्या गावकीचा प्रचार सुरू आहे. याकरिता अनेक राजकीय पक्षांनी देखील उमेदवार निवडताना मोठ्या गावांना तसेच मोठी भावकी असलेल्या उमेदवारांना प्राधान्यक्रम दिला आहे.


सोशल मीडिया हे प्रचाराचा सर्वात वेगवान साधन


डिजिटायझेशनच्या जमान्यात सोशल मीडिया हे प्रचाराचे सर्वात मोठे साधन बनले असून या मीडियावरील प्रचारावर निवडणूक आयोगाचे देखील कसलेही बंधन नसल्याने या मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत उमेदवार घराघरात पोहोचले आहे. सोशल मीडियावर सातत्याने उमेदवार व त्यांचे विचार किती महान आहेत याची माहिती देणारे बॅनर कार्यकर्ते पाठवत आहेत. सध्या सर्वच उमेदवारांनी स्वतःचा सोशल मीडिया सेल तयार केला असून ज्या भागात प्रचार सुरू आहे. तेथील प्रचाराची छायाचित्र व गर्दीचे फोटो तातडीने सोशल मीडियावर पाठवत आपल्या उमेदवाराला किती जनाधार आहे. हे देखील दाखविले जात आहे. कालच सर्व उमेदवारांना चिन्ह मिळाल्याने उमेदवाराचे चिन्ह घरोघरी पोहोचविण्याचे महत्वाचे कार्य सोशल मीडिया सेल पार पाडत आहे.


फ्लेक्सची जागा घेतली स्क्रिनने

प्रचारासाठी सध्या एलईडी स्क्रिनचा वापर वाढला असून स्क्रिनने फ्लेक्सची जागा घेतली आहे. शिवाय स्क्रिनवर दृक व श्राव्य दोन्ही प्रकाचे प्रचार करता येत असल्याने उमेदवारांचा जाहीरनामा, त्यांचे समाजकार्य व भविष्यात मतदार संघ स्मार्ट बनविण्याच्या कल्पना यांची माहिती स्क्रिनवर चित्रफितीच्या माध्यमातून गावांमधील मंदिरे व चौकाचौकात वाहने उभी करून दिली जात आहे.

16 Feb 2017

एमपीसी न्यूज - लोणावळा शहराच्या मध्यभागी भागात असलेले नगरपरिषदेचे प्रियदर्शनी संकुल मागील काही काळापासून दारुडे व गर्दुले यांचा अड्डा बनले आहे. संकुलाच्या पायऱ्या व कोपरे हे दारुच्या बाटल्या व व्हाईटनरने भरलेल्या असल्याचे विदारक चित्र नुकतेच मनविसेचे मावळ तालुका अध्यक्ष अशोक कुटे यांनी मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. मात्र, नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे कायम या संकुलाकडे दुलर्क्ष झाले असल्याने लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या या संकुलाची पूर्णपणे वाताहात झाली आहे.


शहराच्या मध्यवर्ती गावठाण भागात लोणावळा नगरपरिषदेने प्रियदर्शनी नावाने व्यापारी संकुलाची उभारणी 1995 साली केली आहे. व्यापारी गाळे, विविध कार्यालये, सांस्कृतिक सभागृह, नगरपरिषद प्राथमिक शाळा, शिक्षण मंडळाचे कार्यालय, पतसंस्था या संकुलात आहेत. या  संकुलाचे बांधकाम करताना योग्य खबरदारी घेतली न गेल्याने इमारतीच्या हॉलमध्ये आवाजाची समस्या निर्माण झाल्याने हे हॉल वापराविना बंद अवस्थेत होते. मागील सहा महिन्यांपूर्वी शिवदुर्ग मित्र संस्थेने येथील बंद अवस्थेत असलेल्या सदरच्या हॉलमधून 4 ट्रॉल्या कचरा बाहेर  काढत शहरातील मुलांच्या करिता इनडोर गेम्स सुरू केल्या आहेत.


मात्र, या संकुलाची सुरक्षा आजही रामभरोसे असल्याने सर्व कार्यालये बंद झाल्यानंतर संकुलाच्या परिसरात दारुडे, गर्दुले व अपप्रवृत्ती धारकांचा अड्डा भरतो. संकुलाच्या मोकळ्या जागा, पॅसेज, पायऱ्यांवर सर्रासपणे ही मंडळी नशा करतात, मोकळ्या दारुच्या बाटल्या व इतर वस्तू तेथेच टाकतात, पायऱ्यांवर लघुशंका करत असल्याने परिसर बकाल झाला आहे. पायऱ्यांवरून संकुलात जाताना लघुशंकेच्या वासाने जीव नकोसा होतो. नगरपरिषदेच्या वतीने संकुलाच्या सुरक्षिततेकरिता सुरक्षारक्षक नेमले आहेत. मात्र, हे सुरक्षारक्षक दिवसा एक ठिकाणी व रात्री एक ठिकाणी काम  करत असल्याने ते बहुधा झोपलेले असल्याचे केलेल्या पाहणीत आढळून आले आहेत.


नगरपरिषदेच्या मालमत्तेची दुलर्क्षितपणामुळे झालेली ही दुरावस्था सध्या चर्चेचा विषय आहे. संकुलाच्या परिसरात चुकीचे उद्योग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिले आहे. नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी देखील मागील काळात अनेक वेळा या संकुलाच्या दुरावस्थेबाबत सभागृहात संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत जाधव या जनतेमधून नगराध्यक्ष झाल्या असल्याने त्यांनी पुढाकार घेत या संकुलाच्या दुरावस्थेबाबत ठोस पाऊलं उचलत संकुलाची डागडुजी, स्वच्छता व सुरक्षितता यावर लक्ष केंद्रित करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

16 Feb 2017

राष्ट्रवादीला बंडखोरीची लागण


एमपीसी न्यूज - पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार व पुणे - मुंबई हमरस्त्यावरील मध्यवर्ती तालुका अशी ओळख असलेल्या मावळ तालुक्याचा गड जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रतिष्ठापणाला लावली आहे. त्यांच्या बरोबरीने शिवसेना व काँग्रेस पक्षाने देखील तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरविले असल्याने मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषदांच्या  बहुतांश गण व गटात तिरंगी व चौरंगी सामना पहायला मिळणार आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारल्याने काही मातब्बर मंडळींनी बंडखोरी करत उमेदवारी कायम ठेवलेल्या गण व गटात मात्र हा सामना पंचरंगी व बहुरंगी पहायला मिळणार आहे. माघारीची मुदत संपल्याने व चिन्हवाटप देखील झाल्याने मावळात प्रचाराला रंगत आली असून सर्वच राजकीय पक्षांनी विविध जागृत देवस्थानांच्या साक्षीने प्रचार नारळ वाढवत प्रचारफेर्‍या व गावभेटींना सुरुवात केली आहे. मावळ तालुक्याचे राजकारण हे गावकी भावकी व नात्यागात्यांवर चालत असल्याने ही मंडळी उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षभेद बाजूला सारत पुढे सरसावलेली पहायला मिळत आहे.


मावळ तालुक्यात राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून घड्याळाची ताकद आहे. मात्र नेत्यांमधील अंतर्गत गटबाजीमुळे मावळ आजपर्यंत कायम भाजपची सरशी झाली आहे. मागील 20 वर्षापासून मावळ पंचायत समितीवर भाजपची सत्ता असून आमदार देखील 25 वर्षापासून भाजपचा आहे. एवढी वर्ष सत्ता भोगल्यानंतर देखील मावळाचा अपेक्षित विकास झालेला नाही. आजही अनेक गावांना जोडणार्‍या रस्त्यांची चाळण झाली आहे. राजमाची उधेवाडी सारखी गावे रस्ता वीज व पाणी या मुलभूत समस्यांपासून कोसो दूर अंधकारमय जीवन जगत आहेत. मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेल्या या तालुक्यात आजही रोजगारांची मोठी समस्या आहे. निर्सगसंपदेने नटलेला मावळ तालुका आजही पर्यटन विकासाच्या बाबतीत मागासलेला आहे.


हे सर्व मुद्दे घेऊन राष्ट्रवादीने खरे तर या निवडणुकीला सामोरे जायला हवे होते. मात्र, अंतर्गत गटबाजी व उमेदवारी देताना निष्ठावंतांना डावलून नात्यागोत्यात उमेदवार्‍या दिल्याने झालेली बंडखोरी मावळात पुन्हा राष्ट्रवादीला मारक व भाजपला पोषक ठरणार असल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार आहे. मावळात भाजप व राष्ट्रवादीने पंचायत समितीच्या प्रत्येकी दहा व जिल्हा परिषदेच्या पाचही जागांवर उमेदवार दिले आहे. शिवसेनेने जिल्हा परिषदेकरिता 3 व पंचायत समितीकरिता 9 उमेदवार दिले आहेत तर काँग्रेसने जिल्हा परिषदेकरिता 2 उमेदवार व पंचायत समितीसाठी 6 उमेदवार रिंगणात उतरविले असून 14 अपक्ष उमेदवार या निवडणुकीत उभे राहिले आहेत.

16 Feb 2017

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व सहकारमहर्षी म्हणून ओळख असणार्‍या एका नेत्याने मावळात असहकाराची भूमिका घेत राष्ट्रवादी पक्षालाच समांतर असा पक्ष काढण्याची तयारी सुरू केली आहे. बंडखोरांची मोट बांधत राष्ट्रवादीलाच चारीमुंड्या चित करण्याचा चंग बांधला आहे. त्यांचा हा निर्णय पुन्हा भाजपाच्या पथ्यावर पडणार असून मावळ तालुका घड्याळमुक्त करण्याच्या त्यांच्या संकल्पनेला हा निर्णय पोषक ठरणार आहे.


मावळ तालुका हा पूर्वीपासून काँग्रेसचा व नंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे मावळात कायम भाजपला पोषक वातावरण राहिले आहे. मागील 20 वर्षापासून मावळ पंचायत समितीवर भाजपची सत्ता असून आमदार देखील भाजपचे आहेत. प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर गटतट मुक्त राष्ट्रवादी अशी हाक देऊन बंडखोरी होत असल्याने मावळात राष्ट्रवादीला अच्छे दिन कधी येणार हा चर्चेचा विषय आहे.


पक्षातील काही ज्येष्ठ मंडळी व कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादीची ही अवस्था पाहून पक्षांच्या वरिष्ठांनी योग्य वेळ साधत राष्ट्रवादी पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनिकरण करायला हवे असे सांगितले. गटतट व कुरघोडीच्या राजकारणामुळे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या लोणावळा नगरपरिषदेत राष्ट्रवादीचा एकही सदस्य निवडून आला नाही. तळेगाव नगरपरिषदेत भाजपाने एकहाती सत्ता मिळवत राष्ट्रवादी नामशेष केली. मावळात सहकार क्षेत्रात देखील भाजपाने शिरकाव केला आहे.


एका पाठोपाट एक सत्ताकेंद्र राष्ट्रवादीच्या हातातून जात असताना कुरघोडीच्या राजकारणात गुंतलेल्या मावळातील राष्ट्रवादीच्या नेत्यांमुळे पक्ष रसातळाला जाऊ लागला आहे. पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेल्या मावळ तालुक्यात राष्ट्रवादीला वारंवार पराभवाला सामोरे जावे लागत असल्याचे शल्य दस्तूरखुद्द अजित पवार यांनी अनेक वेळा बोलून दाखवले आहे. मावळातील उमेदवारांच्या प्रचारा शुभारंभ नुकताच अजित पवार यांच्या हस्ते झाला. त्या सभेत त्यांनी वैतागून उपस्थित कार्यकर्त्यांना स्वतःचा मोबाईल नंबर देत कोणी बंडखोरी केल्यास मला फोन करा असे सांगितले. या घटनेला जेमतेम आठवडा होता ना होतो तोच पुन्हा राष्ट्रवादीत ही बंडखोरी उफाळून आली आहे. त्यामुळे घड्याळातील हा बिघाड कमळासाठी पोषक ठरणार असल्याचे चित्र आहे.


मावळ राष्ट्रवादीच्या 4 बंडखोरांना कपबशीचे चिन्ह

निवडून येण्याची क्षमता असून देखील पक्षाने उमेदवारी नाकारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरांना कपबशी हे निवडणूक चिन्ह मिळाले असून एकाला बॅट हे चिन्ह मिळाले आहे. मावळात बंडखोरी रोखण्याचा मानस घेऊन राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणी उमेदवार जाहीर केले मात्र हे करत असताना निवडून येण्याच्या क्षमतेऐवजी नात्यागोत्यात उमेदवारी दिल्याने वडगाव खडकाळा, वडेश्वर व टाकवे या तिन ठिकाणी राष्ट्रवादीला बंडखोरीचे ग्रहण लागले. बंडखोरी करणार्‍यांना अद्दल घडविण्यासाठी त्यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले असून त्यांच्या सोबत प्रचार राष्ट्रवादीचा कार्यकर्ता फिरकल्यास त्यांचे देखील मतदानानंतर निलंबन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे.

16 Feb 2017

एमपीसी न्यूज - अवघ्या महाराष्ट्राला हेलावून सोडलेल्या लोणावळा कुमार रिसॉर्ट येथील अल्पवयीन बालिका अपहरण, बलात्कार व खून प्रकरणाला आज दोन वर्ष पूर्ण झाली. मात्र, या घटनेचा मुख्य आरोपी अजूनही मोकाटच असल्याने या बालिकेचे आई-वडील आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.


संतोष रॉय, असे या घटनेतील मुख्य आरोपीचे नाव आहे.


लोणावळा येथील कुमार रिसॉर्ट या हॉटेलमध्ये 15 फेब्रुवारी 2015 रोजी एका लग्नासाठी आपल्या वडिलांसह आलेल्या सात वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले होते. पुढे तपासात दोन दिवसांनी 17 फेब्रुवारी रोजी कुमार रिसॉर्टच्या टेरेसवर सोलर पॅनलजवळ तिचा मृतदेह मिळून आला. तिच्यावर बलात्कार करून नंतर गळा चिरत खून करण्यात आला असल्याचे वैद्यकीय तपासणीमध्ये स्पष्ट झाले होते.


मानवतेला काळिमा फासणार्‍या या घटनेनंतर संतप्त झालेले मुलीचे नातेवाईक व लोणावळ्यातील ग्रामस्थ यांनी लोणावळात बंद पुकारत तीव्र आंदोलन केले होते. यावेळी मोर्चाला हिंसक वळण लागल्याने कुमार रिसॉर्टची आंदोलनकर्त्यांनी तोडफोड केली होती. सदर घटना माध्यमांमधून वार्‍या सारखी  सर्वत्र  पसरल्याने राज्यभरात सर्वत्र या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. पर्यटननगरी लोणावळा शहर या घटनेमुळे काही काळ अस्थिर झाले होते. त्याचे गंभीर परिणाम येथील अर्थव्यवस्थेला सहन करावे लागले. याप्रकरणातील मुख्य आरोपी संतोष रॉय हा वेश बदलून लोणावळ्यातून फरार झाल्याने तो पोलिसांच्या हाती न लागल्याने शहरात मोर्चे, आंदोलने, निषेध महिनाभर सुरुच होते. अखेर राज्याचे तत्कालीन गृहराज्यमंत्री राम शिंदे, आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोर्‍हे, पालकमंत्री गिरिश बापट आदी नेत्यांनी लोणावळ्यात येत नागरिकांना शांत राहण्याचे आव्हान त्यावेळी केले. मात्र, लोणावळा शांत होण्याचे नाव घेत नव्हते.


याप्रकरणी मुख्य आरोपी रॉय याला मदत करणारा सह आरोपी अजय दोदाड याला अटक करत त्याची लाय डिटेक्टर टेस्ट घेण्यात आली होती. तसेच महिनाभरानंतर लोणावळा पोलिसांनी घटनेतील मुख्य आरोपी व कुमार हॉटेलचा कर्मचारी संतोष कमला रॉय (वय 32, रा. धरमपूर, जिल्हा भोजपूर, बिहार) याचे छायाचित्र प्रसिद्ध करत त्याला पकडण्यासाठी मुंबई, पुणे, बिहार, झारखंड, दिल्ली या भागात पथके रवाना केली असून लवकरच आरोपी गजाआड करू, असे आश्वासन नागरिकांना दिले होते. मात्र या घटनेला आज दोन वर्ष पूर्ण झाले. मात्र, अद्यापही पोलिसांचे हात कोरडेच आहेत. अवघ्या महाराष्ट्रातून या घटनेचा निषेध झाला. विधीमंडळात चर्चा झाली मात्र, दोन वर्षानंतरही आरोपी मोकाटच असल्याने अजून किती दिवस तिच्या माता पित्यांनी न्यायाची प्रतिक्षा करायची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Page 14 of 14
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start