• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
01 Jun 2017


शिवसेना गटनेत्यांचा संतप्त सवाल

एमपीसी न्यूज - लोणावळा नगरपरिषदेच्या इमारतीचे उद्घाटनप्रसंगी शिवसेनेच्या गटनेत्या व नगरसेवक यांना व्यासपीठावर जाण्यापासून रोखण्यात आले तसेच व्यासपीठावर शिवसेनेचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे व खासदार श्रीरंग बारणे उपस्थित असताना देखील त्यांना बोलू दिले नाही यावरून आजचे झालेले उद्घाटन हे नगरपरिषदेच्या इमारतीचे होते की भाजपच्या कार्यालयाचे, असा संतप्त सवाल शिवसेनेच्या गटनेत्या शादान चौधरी यांनी केला आहे.


चौधरी म्हणाल्या की आजच्या शासकीय कार्यक्रमाला भाजपच्या खासगी कार्यक्रमाचे स्वरुप देण्यात आले होते. व्यासपीठावर सर्व भाजपचे पदाधिकारी बसले होते. नगरसेवकांना बसण्यास देखील जागा नव्हती. वास्तविक सर्व नगरसेवकांसाठी राखीव खुर्च्या ठेवण्याचे ठरले असताना ऐनवेळी नगरसेवकांना व्यासपीठावर जाऊ दिले नाही. यामुळे शिवसेनेच्या गोटात नाराजीचा सूर असून यापुढील काळात शिवसेना सभागृहात अधिक आक्रमकपणे वागणार असल्याचा इशारा शादान चौधरी यांनी दिला आहे.


bhiku waghere advt

01 Jun 2017

लोणावळा नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज - पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या लोणावळा शहराला पर्यावरणपुरक शहर बनवत येणार्‍या पर्यटकांना चांगल्या सुविधा द्या, असा सल्ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.


लोणावळा नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लोणावळ्यात आले होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांचा संप व कर्जमाफी या प्रश्नांबाबत चकार शब्दही न काढता लोणावळा शहराला पर्यावरणपुरक शहर करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले. मुख्यमंत्री म्हणाले मागील आठ वर्षांपासून रखडलेली नगरपरिषदेची इमारत ज्या गतीमानतेने पूर्ण केली त्याच गतीमानतेने प्रशासन चालवून सामान्य नागरिकांना मदत होईल असे काम करा, असा सल्ला दिला.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय तथा बाळा भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, माजी आमदार दिगंबर भेगडे, मावळचे सभापती गुलाब म्हाळसकर, तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके आदी मान्यवरांसह सर्व नगरसेवक, नगरसेविका, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

लोणावळा शहर हे महाराष्ट्रातील पर्यटनात्मकदृष्ट्या महत्वाचे शहर आहे व ते पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून असल्याने या शहराला पर्यावरणपुरक शहर बनवत येणार्‍या पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी मदत करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. ते म्हणाले लोणावळ्याच्या पाणीपुरवठा योजनेकरिता 34 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. येथील नगरपरिषद रुग्णालय, बहुमजली पार्किंग, तलाव, रोप वे आदी कामांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी मदत दिली जाईल. पर्यावरणपुरक शहरे ही पर्यटकांचे नंदनवन आहे ते सौंर्दय न राहिल्यास पर्यटक दुसर्‍या जागेचा शोध घेतील. याकरिता लोणावळा शहराचे महत्व वाढवत शहराला स्वच्छ व सुंदर बनवा याकरिता राज्य सरकार तुमच्या पाठिशी आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले तर उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी आभार मानले. नगरपरिषदेच्या वतीने सर्व मान्यवरांचे मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.


cm 1


bhiku waghere advt

30 May 2017

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षाचा आँनलाईन निकाल आज जाहिर झाला. यामध्ये लोणावळा शहराचा निकाल 83.93 टक्के लागला आहे. शहरातील 4 काँजेलांमधून 1195 विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली होती त्यापैकी 1003 विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहेत.

डाँन बाँस्को व आँल सेंट चर्च या दोन काँजेलांचा निकाल शंभर टक्के लागला असून त्याखालोखाल डी.पी.मेहता ज्युनियर काँजेलचा निकाल 92.24 टक्के व सर्वाधिक कमी निकाल लोणावळा कनिष्ठ महाविद्यालयाचा अवघा 42.22 टक्के लागला आहे.

डाँन बाँस्को काँजेलमधून 167 विद्यार्थी परिक्षेला बसले होते ते सर्वजण उत्तिर्ण झाले. आँल सेंट काँजेलमधून अवघ्या 4 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली व उत्तिर्ण झाले. डी.पी.मेहता काँलेजमधून 799 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली पैकी 737 विद्यार्थी उत्तिर्ण झाले. लोणावळा महाविद्यालयातून 225 विद्यार्थी परिक्षेला बसले होते त्यापैकी 95 विद्यार्थी उत्तिर्ण झाले.

29 May 2017

एमपीसी न्यूज - महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी शनिवारी (दि. 27) हिंगोली येथे शिवार संवाद यात्रे दरम्यान पत्रकारांना बुटाने मारण्याची असंविधानिक भाषेचा वापर केला तर शनिवारी (दि.28) दुपारी घोडेगाव येथे आयबीएन लोकमतचे पत्रकार रायचंद शिंदे यांना त्या ठिकाणचे पोलीस उपनिरीक्षक के.के.भालेकर यांनी मारहाण केली. या दोन्ही घटना निंदनिय व लोकशाहीची मुस्कटदाबी करणार्‍या असल्याने त्यांचा लोणावळा शहर पत्रकार संघाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. 

 

पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या या दोन्ही मगरुर महाशयावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे लोणावळा शहर पोलीस ठाण्यात देण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष निखिल कविश्वर, विशाल विकारी, प्रशांत पुराणिक, बंडू येवले, विशाल पाडाळे आदी उपस्थित होते.

28 May 2017

एमपीसी न्यूज - वाकसई, देवघर, करंडोली व जेवरेवाडी या चार गावांचे प्रवेशद्वार असलेल्या वाकसई फाट्यावर वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने गावाच्या प्रवेशद्वारावर आता कायम स्वरुपी कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.

वाढत्या चोऱ्यांच्या घटना व गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सुवेज हक यांनी एक गाव एक सीसीटीव्ही अशी संकल्पना मांडली होती. या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद देत वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीच्या 30 हजार रुपये निधीतून हे कॅमेरे बसविले असल्याचे सरपंच सोनाली जगताप व उपसरपंच बाळासाहेब येवले यांनी सांगितले.

 

ग्रामपंचायतीच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे गावात घडणाऱ्या चोऱ्यांच्या घटनांना पायबंद बसणार असून गावाच्या मुख्य प्रवेशद्वारातून कोण गावात आले व बाहेर गेले हे देखील कळणार आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील इतर ग्रामपंचायतींनी देखील गावात हा उपक्रम राबवावा, अशी अपेक्षा पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे.

28 May 2017

एमपीसी न्यूज - महावितरणच्या खंडाळा शाखेतील तंत्रज्ञ उमेश मोरे या कर्मचार्‍याचा नुकताच लाईन दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. विद्युत प्रवाह बंद असल्याची खात्री न करताच मोरे यांना लाईनवर काम करण्याची सूचना देणार्‍या सहाय्यक अभियंता यांच्या हलगर्जीपणामुळे मोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण वीज कर्मचारी जनाधिकार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष विकास गायकवाड यांनी दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.


महावितरणचे कनिष्ठ अभियंता प्रशांत मोडक हे मोरे यांना सोबत घेऊन 20 मे रोजी हिलटॉप खंडाळा या ठिकाणी लाईन दुरुस्तीचे काम करत होते. मोरे यांना विद्युत पोलवर दुरुस्तीसाठी चढवत मोडक हे त्यांना कामाचे आदेश देत होते. यावेळी विद्युत प्रवाह सुरूच असल्याने खांबावर चढलेल्या मोरे यांना शॉक लागून ते खाली कोसळले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विद्युत प्रवाह बंद असल्याची खात्री न करताच मोडक यांनी मोरेंना पोलवर चढण्याचे निर्देश दिल्याने हा अपघात झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर तसेच संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी वीज जनाधिकार सेनेच्या वतीने लोणावळा शहर पोलिसांकडे करण्यात आली आहे.

28 May 2017

एमपीसी न्यूज - कष्टकरी कामगार पंचायत, लोणावळा शहर आणि नारायणी धाम यांच्या वतीने लोणावळा परिसरातील गरीब कष्टकरी आदिवासी महिलांना धान्य आणि कपड्यांचे नुकतेच वाटप करण्यात आले.

 

कष्टकरी कामगार पंचायत संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या हस्ते महिलांना धान्य आणि साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे लोणावळा शहराध्यक्ष गणेश चव्हाण, लोणावळा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष शिरीधार पुजारी, किसण गुप्ता, माजी नगरसेविका संजवणी गुप्ता, बाळकृष्ण कुमठेकर, कल्पना चव्हाण आदी उपस्थित होते.

 

आदिवासी समाजाने देशाची संस्कृती जीवंत ठेवली आहे. आदिवासी समाज देशात राजा आहे. परंतु, सरकारच्या गरिबीविरोधी धोरणामुळे आणि आदिवासी समाज असंघटीत असल्यामुळे विकासापासून वंचित राहिला आहे. आदिवासी समाजाने संघटित होऊन आपल्या हक्कासाठी संघर्ष करावा, असे बाबा कांबळे म्हणाले.

 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक लक्ष्मी सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन मनीषा बांबोरे यांनी केले. तर, योगीता पोखर यांनी आभार यांनी मानले. महिला आघाडीच्या अध्यक्षा लक्ष्मी सूर्यवंशी, लक्ष्मी शिंत्रे, मोहिते काकू, योगिता पोखरे, मनीषा बबोरे, शांताबाई सूर्यवंशी, शुष्मा आल्हाट, शांताबाई धोत्रे, शशिकला कुलकर्णी यांनी संयोजनात पुढाकार घेतला.

27 May 2017

कब्रस्तानच्या जागेतही अफरातफर

 

एमपीसी न्यूज - खंडाळा (ता. मावळ) येथील बहुचर्चित एका सिने अभिनेत्याच्या सुंदरभवन हॉलिडे होम प्रा. लि. यांनी सर्व्हे नं. 19 मधील बांधकाम ले आऊट मंजुर करताना सर्व्हे नं. 18/1/ब मधील सरकारी पड ही 510 चौरस मिटर जागाच गायब केलेली आहे. तसेच सर्व्हे नं. 18/2 मधील कब्रस्तानसाठी आरक्षित असलेल्या 704 चौरस मिटर जागेपैकी केवळ 500 चौरस मिटर जागाच दाखवत त्यापैकी देखील 200 चौरस मीटर जागा हडप करण्यात आली असल्याचा आरोप काँग्रेस आयचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. किरण गायकवाड यांनी केला आहे. लोणावळा नगरपरिषदेतून याबाबतची सर्व कागदपत्रे गायकवाड यांनी माहिती अधिकारात मिळवली आहेत.

 

बॉलिवूडमधील एका बड्या अभिनेत्याने खंडाळ्यातील सर्व्हे नं. 19अ1, प्लॉट नं. 1,2,3,4,7,8,10,16,17,18 ही जागा सुंदर भवन हॉलिडे होम प्रा.लि. च्या नावे घेतली आहे. या जागेच्या पोटातच सर्व्हे नं. 18/2 असून त्यामध्ये 704 चौरस मीटर जागा क्रबस्तान व 18/1/ब ही 510 चौरस मीटर जागा सरकारी पड आहे. सातबारावर 1953 पासून व सिटी सर्व्हे झाल्यानंतर 1974 पासून रेकॉर्डवर तशी नोंद असताना सुंदर भवनच्या वतीने ले आऊट मंजुर करत असताना ही जागाच गायब केली आहे. तसेच येथील सर्व्हे नं. 18/1/ब या महाराष्ट्र सरकारच्या जागेवर मागील 25 ते 30 वर्षापासून दहा कुटुंब रहात होती. तसेच वाघजई ट्रस्टची बालवाडी, गणेश मंदिर, दुर्गा मंदिर असताना रात्रोरात्र ही बांधकामे जमिनदोस्त करण्यात आली आहेत.

 

शासनाची सुध्द फसवणूक करत कोट्यावधी रुपयांची सरकारी जागा हडप करण्याचे हे षडयंत्र असल्याने मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांनी याप्रकरणात लक्ष घालून मंजूर करण्यात आलेला ले आऊट तातडीने रद्द करत सरकारी जागा ताब्यात घ्यावी व दोषीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

सुंदरभवनच्या जागेमधून रेल्वे विभाग, टाटा कंपनी व महाराष्ट्र राज्य विज वितरण मंडळाची उच्च दाब विद्युत वाहिन्या जात आहेत तसेच पुर्वीच्या द्रुतगती महामार्ग याच जागेतून दाखविण्यात आला असून आजही नकाशावर ते दाखविण्यात आलेले असताना सर्व नियम धाब्यावर बसवत शासकिय यंत्रणा सिने अभिनेत्याच्या पुढे पायघड्या घालत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. याच अभिनेत्याच्या विरोधात मागील महिन्यात टपरी संघटनेने आंदोलन केले होते. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गा लगतच्या टपर्‍या व हातगाड्यांवर कारवाई करणार्‍या रस्ते विकास महामंडळाने या अभिनेत्यावर मेहरनजर होत आरओडब्लुच्या दहा मीटर अंतरात सुरक्षा भिंत बांधण्यासाठी एका दिवसात ना हरकत दाखला दिला आहे.

 

धनशक्तीच्या जोरात शासकिय अधिकारी यांना हाताशी धरत कायदा व नियम पायदळी तुडविणार्‍या सुंदर भवनच्या संबंधित मालकांवर कारवाई करावी तसेच त्यांना पाठिशी घालणार्‍या अधिकार्‍यांना कडक शासन करण्याची मागणी निवेदनाद्वारे गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यासह, उच्च न्यायालयाने गठित केलेली समिती, मावळचे आमदार, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. येत्या आठवड्यात मुख्यमंत्री लोणावळ्यात एका उद्घाटन समारंभासाठी येणार आहेत तेव्हा प्रत्यक्ष भेटून देखील त्यांना याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

 

राजमाची पॉईट बंद करण्याचे कारस्थान

 

सुंदरभवन हॉलिडे होम या जागेच्या समोर रस्त्याच्या विरुध्द बाजुला निर्सगाचा ठेवा असलेला राजमाची पॉईट हा नेचर झोन आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक काचळदरीतून वाहणारा धबधबा व राजमाची किल्ला परिसराचे विर्हगंम दृष्य पाहण्यासाठी गर्दी करतात. परिसरात राहणारे काही स्थानिक या परिसरात चहा, वडापाव, भजी आदी पदार्थ विक्री करुन उपजिविका करतात. मात्र, हा पॉईटच बंद करण्याचा घाट या सिने अभिनेत्याने घातला असून शासकिय यंत्रणांना हाताशी धरुन परिसराती टपर्‍यांवर कारवाई करायला लावली. तसेच राजमाची पॉईटची भिंत उंच करत ती बंद करण्याचे कारस्थान केले. मात्र, सुजाण नागरिकांमुळे तो कट फसला असला तरी भविष्यात हा पॉईट बंद करण्याचे कारस्थान सुरु असल्याची सर्वत्र चर्चा आहे.

26 May 2017

एमपीसी न्यूज - शिवसेनेचे कुरवंडे गावचे माजी सरपंच संजय दिलीप भोईर यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसेनेचे लोणावळा शहरप्रमुख राहुल शेट्टी यांच्यासह तीन जणांवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास टाटा धरणासमोरच्या सहारापुलाजवळ ही घटना घडली.

याप्रकरणी संजय भोईर यांच्या फिर्यादीवरून शिवसेना शहरप्रमुख राहुल उमेश शेट्टी (रा. जयचंद चौक, लोणावळा), माजी नगरसेवक गणेश इरले (रा. जुना खंडाळा, लोणावळा) व गणेश नारायण हुंडारे (रा. रायवुड, लोणावळा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय भोईर हे मागील अनेक वर्षापासून शिवसेनेत काम करत आहेत. त्यांना शहरप्रमुख बनविण्याची कार्यकर्त्यांची इच्छा असल्याने शेट्टी व भोईर यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यामधून शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी दमदाटी केली असल्याचे भोईर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. तसेच गुरुवारी दुपारी शेट्टी यांचे समर्थक असलेल्या गणेश हुंडारे यांनी त्यांना फोन करून धमकी दिली होती. सायंकाळी ते चारचाकी गाडी वॉश करण्यासाठी भुशी गावात गेले असताना पुन्हा हुंडारे याने फोन करून भेटायचे आहे, असे सांगितले.

यावेळी जयचंद चौकात भेटण्याचे ठरलेले असताना हुंडारे व इरले यांनी भुशी गावाच्या काही अंतरापासून भोईर यांच्या गाडीचा दुचाकीवरून पाठलाग करत सहारा पुलावर गाडी अडवली व तुला आज संपवतो म्हणत गाडीतून ओढत पुलाच्या खाली घेऊन गेले. तेथे इरले याने हात पाठीमागे पकडले व हुंडारे याने पाठीला खोचलेल्या चॉपरसारख्या हत्याराने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भोईर हे इरलेच्या हाताला हिसका देऊन पळाल्याने त्यांचा जीव वाचला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी तिनही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आय.जे.शेख तपास करत आहेत.

24 May 2017

एमपीसी न्यूज - शेतकर्‍यांची शेती तोट्यात करून त्यांना बेदखल करण्याचा डाव आखणार्‍या लबाडांना गुडघे टेकायला लावणार असल्याचा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी भाजप सरकारवर केला. खासदार शेट्टी यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या आत्मक्लेश यात्रेदरम्यान लोणावळ्याजवळील कार्ला फाटा येथे शेट्टी यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना खासदार शेट्टी म्हणाले की, निवडणुकीच्या काळात मोदींनी व भाजपने अच्छे दिन हवे असतील तर भाजपला बहुमत द्या, असे खोटे आश्वासन दिले होते. त्याला आम्ही देखील बळी पडलो. मात्र, याची जाणीव झाल्यामुळेच ही आत्मक्लेश यात्रा काढली आहे. या राज्यातील शेतकर्‍यांची शेती तोट्यात करून शेतकरी हद्दपार करायचा त्यांना बेदखल करून त्यांची जमीन अकृषक कारणांसाठी घेऊन ती इंचात विकण्याचा या सरकारचा डाव आहे. या लबाडांना गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात खासदार शेट्टी यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले.

मागील वर्षभरात राज्यभरातील साडेसहा लाख शेतकर्‍यांनी कर्जमाफीचे अर्ज जमा केले असून येत्या 30 मे रोजी राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे देण्यात येणार आहे. मावळातील शेतकर्‍यांनी देखील त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढा उभा करावा. वेगवेगळ्या करणासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी काढून घेण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई नागपूर हा समृद्धी हायवे होऊ देणार नाही, अशा शब्दात खासदार राजू शेट्टी यांनी समृद्धी हायवेला विरोध दर्शविला आहे.

Page 4 of 14
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start