• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
17 Apr 2017

राजमाची पॉईंट येथे टपरी हातगाडी व पथारी व्यावसायिकांचे धरणे आंदोलन

 

एमपीसी न्यूज - राजमाची पाईंट परिसरात वर्षानुवर्षे टपरी व हातगाडी व्यवसाय करत जीवन जगणार्‍या व्यावसायिकांना धनशक्तीच्या जोरावर धमकावत तसेच शासकीय अधिकारी यांना हाताशी धरत धाक दडपशाहीचा वापर करून त्रास देत त्यांचा व्यवसाय बंद करायला लावणारे अभिनेते राकेश रोशन व हॉटेल व्यावसायिक जी.एस. बावा यांच्यावर कारवाई करा, राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार टपरी हातगाडी व्यावसायिकांना परवाने व जागा मोजून द्या या मागणीसाठी आज टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अमृतांजन पॉईंट जवळ धरणे आंदोलन करण्यात आले.

 

यावेळी आरपीआयचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भागवत, संघटनेचे जिल्हाध्यक्ष मल्हार कांबळे, महाराष्ट्र सचिव प्रल्हाद कांबळे, लोणावळा अध्यक्ष गणेश चव्हाण, तळेगाव अध्यक्ष किरण साळवे, शाखा अध्यक्ष संदीप रोकडे, महिला अध्यक्ष लक्ष्मीबाई सूर्यवंशी यांच्यासह व्यावसायिक या आंदोलनात सहभागी झाले होते.

 

राजमाची पॉईंट समोरील जागा अभिनेते राकेश रोशन यांनी विकत घेतली आहे. या जागेच्या समोर व जुन्या राष्ट्रीय महामार्गाच्या विरुद्ध बाजुला मागील काही वर्षापासून स्थानिक नागरिक टपरी व हातगाडी व्यवसाय करतात. मात्र आपल्या जागेसमोर हातगाड्या व टपर्‍या उभ्या राहत असल्याने राकेश रोशन व जी.एस.बावा यांनी आयआरबीचे व एमएसआरडीसीचे अधिकारी यांना हाताशी धरून आम्हाला दमदाटी करत आमच्या टपर्‍या व हातगाड्यांचे नुकसान केले. बावा हे लाल दिव्याच्या गाडीतून येऊन आम्हाला दमदाटी करतात असा या व्यावसायिकांचा आरोप आहे. राजमाची पॉईंट हा उंच भिंत बांधत बंद करण्याचा कुटिल डाव अधिकारी व गोरगरिबांना त्रास देणार्‍यांनी आखला असल्याने सदरहू भिंतीचे काम तातडीने बंद करा, अशी मागणी देखील संघटनेने यावेळी केली.

 

अतिक्रमणांच्या नावाखाली टपरी व हातगाडी व्यावसायिकांवर कारवाई करणारे अधिकारी धनिकांच्या अतिक्रमणाकडे कानाडोळा करत आहेत. लाल दिव्याच्या गाडीतून येऊन टपरी व्यावसायिकांना धमकाविणारे जी.एस.बावा यांच्या बंगल्याचे मोठ्या प्रमाणात रस्त्यात अतिक्रमण आहे. राकेश रोशन यांची संरक्षण भिंत हे रस्त्यात अतिक्रमण आहे. लोणावळा व खंडाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणांचा विळखा वाढत असताना अधिकारी मात्र गोरगरिबांचे संसार उद्धवस्त करण्यात धन्यता मानत आहेत, असा आरोप हातगाडी, पथारी व टपरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मल्हार कांबळे यांनी केला.

 

लोकशाही मार्गाने राजमाची पॉईंट समोर टपरी, हातगाडी व पथारी व्यावसायकांनी सुरू केलेले धरणे आंदोलन लोणावळा शहर पोलिसांनी तुमच्याकडे आंदोलनाची परवानगी आहे का? येथे आंदोलन करायचे नाही, असे धमकावत बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनकर्त्यांनी आम्हाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करू देणार नसाल तर आम्ही रास्ता रोको करतो, आम्हाला अटक करा अशी भूमिका घेतल्याने अखेर पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणाहून माघारी गेले.

16 Apr 2017

मृत्यूची तारीख, वेळ, ठिकाण आणि कारण निश्चित

 

एमपीसी न्यूज - लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या मृत्यूचा काळ, वेळ, ठिकण आणि कारण निश्चित करून तसेच मृत्यू यंत्र आणि काळ्या बाहुलीची बांधलेली तिरडी याचा उतारा खुद्द त्यांच्याच घराच्या दरावाजापुढे आढळून आला. आज (रविवार) सकाळी ही घटना उघडकीस आली. अंधश्रद्धेचा कळस गाठणारी सदरची घटना असून संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनली आहे.

 

नगराध्यक्षा सुरेखा जाधव या त्यांच्या सहकारी नगरसेवकाच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी सध्या केरळ या ठिकाणी गेल्या आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या घरासमोर असा घृणास्पद आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार घडला आहे. सदर उताऱ्यात एका कागदावर सुरेखा जाधव यांच्या नावाचा उल्लेख असणारे एक मृत्यू यंत्र रेखाटण्यात आलेले आहे. त्यावर जाधव यांच्या मृत्यूची दिनांक, वेळ, ठिकाण आणि कारण या सर्वांचा उल्लेख करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. 25 एप्रिल 2017) सकाळी 11 वाजून 8 मिनिट या वेळेवर तुंगारली येथील नगरपरिषद कार्यालयात जाधव यांचा अटॅकने मृत्यू होणार असल्याचे स्पष्टपणे लिहिण्यात आले आहे.

 

लोणावळा पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी हा उतारा त्याठिकाणावरून हटवला आहे. याबाबत जाधव यांच्यासोबत भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी आपला या असल्या अंधश्रद्धांवर अजिबात विश्वास नसल्याचे सांगितले. परंतु असल्या अंधश्रद्धा पसरविणाऱ्या आणि समाजात वाईट गोष्टींचा पायंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात कडक पोलीस कारवाई करण्यात यावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 

नुकत्याच डिसेंबर महिन्यात झालेल्या नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत सुरेखा जाधव यांनी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून बाजी मारली आहे. सुरेखा जाधव या शहरात सर्व स्तराच्या जनसामान्यामध्ये लोकप्रिय असे व्यक्तिमत्व आहे. निवडून आल्यानंतर नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू केलेल्या कामाच्या धडाक्यामुळे तसेच अडचणीत सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मदतीला काळ वेळ न बघता धावून जाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांची लोकप्रियता दिवसागणिक वाढत आहे. अशामध्ये त्यांच्या मृत्यूची स्वप्ने बघून गणित मांडणाऱ्या समाजकंटकांना पकडून त्यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्वत्र होत आहे.

13 Apr 2017

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर हॉटेल एनएच 4 जवळ भरधाव ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाल्या तर त्यांचा मुलगा जखमी झाला आहे. आज गुरुवारी रात्री साडेआठ वाजता हा अपघात झाला.


कल्पना सुभाष खराडे (वय 48, रा. तुंगार्ली लोणावळा) यांचा अपघातात मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा विजय सुभाष खराडे (वय 20) हा जखमी झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, विजय व कल्पना खराडे या त्यांची दुचाकी गाडी क्र. (MH 14 AX 3973) वरुन तुंगार्ली लोणावळ्याच्या दिशेने जात असताना मागून भरधाव वेगात आलेल्या ट्रक क्र. (MH 46 F 5067) ने दुचाकीला जोरात धडक देऊन तो एक्सप्रेस वेवर दुचाकीला घेऊन चढल्याने चाकाखाली येऊन कल्पना खराडे यांचा जागीच मृत्यू झाला तर गाडीवरून दूर फेकल्यामुळे विजय बचावला आहे. अपघातानंतर पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या ट्रक चालकाला महामार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी जमलेल्या स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला.

13 Apr 2017

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र शासनाच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत लोणावळा शहराला मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा बंगल्यातील सभागृहात ई भूमिपूजन पद्धतीने करण्यात आला. 33.49 कोटी रुपयांची ही योजना आहे.


महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज राज्यातील 28 महानगरपालिका व नगरपालिकांच्या तब्बल 1622 कोटी रुपयांच्या विकासकामांचे ई भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नागरिकांशी संवाद साधला. नगरपरिषदेच्या वतीने कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण तसेच कार्यक्रम स्थळांवर प्रोजेक्टरच्या माध्यमातून कार्यक्रमांचे नियोजन केले होते.


यावेळी मावळचे आमदार संजय तथा बाळा भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी सचिन पवार, पाणी पुरवठा समिती सभापती भरत हारपुडे, शिवसेनेच्या गटनेत्या शादान चौधरी, नगरसेवक राजू बच्चे, बाळासाहेब जाधव, निखिल कविश्वर, पूजा गायकवाड, बिंद्रा गणात्रा आदीसह सर्व आजी माजी नगरसेवक नगरसेविका व शहरातील मान्यवर उपस्थित होते.


सदर प्रकल्प हा 10 एमएलडी क्षमतेचा असून तो पांगोळी येथे उंच डोंगरावर उभारण्यात येणार असल्याने शहराला ग्रॅव्हिटीने पाणी मिळणार आहे. तसेच सध्याचा शहरातील प्रकल्प हा देखील 12 एमएलडीचा असल्याने शहराला दैनंदिन 22 एमएलडी शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे. 2040 सालची लोकसंख्या गृहित धरून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.

13 Apr 2017
एमपीसी न्यूज - आयुष्याची संध्याकाळ सर्वांनाच आहे, तिचा विचार न करता चांगले जीवन जगा, संवादाचे नाते जोपासा, असा मोलाचा सल्ला आखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनिस यांनी ज्येष्ठ नागरिकांना दिला. लोणावळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या हॉटेल चंद्रलोक येथे आयोजित 24 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. 
 
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाबुलाल अगरवाल, उपाध्यक्ष रामचंद्र जोशी, संघाचे शंभरीत पदार्पण केलेले सदस्य रघुनाथ होनंगी, कार्यवाहक शांता डिसले, शंकरराव गुंड, पांडूरंग हार्डे, शाम बोरकर, दिलीप समेळ, सोपान भंगाळे, मृदला पाटील, संध्या गव्हले, नामदेव डफळ, अरविंद मेहता, माजी नगराध्यक्षा रेखा जोशी, नंदकुमार वाळंज, डाँ. हेमंत आगरवाल, नगरसेवक सुधिर शिर्के, सुर्वणा अकोलकर, भाऊ देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
सबनिस म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांकडे अनुभव व शहाणपनाची शिदोरी असली तरी आजच्या नव्या पिडीच्या विचारांना ते पटत नाही. याकरिता ज्येष्ठांनी जमेल, पचेल व रुचेल ऐवढेच कार्य करावे. आरोग्य साक्षर होऊन स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. वृध्दाश्रमांची वाढती संख्या ही समाजमनाच्या संवेदना कमी होत असल्याचे धोतक आहे. ज्यांच्यामुळे आपण या जगात आलो त्यांना वृध्दाश्रमात ठेवणार्‍यांनी त्यांना कितीजरी पैसे दिले तरी ज्येष्ठांचा आनंद हा आपल्या तिसर्‍या पिडीत रमण्यात आहे याचा विचार करावा, असा सल्ला त्यांनी आजच्या युवकांना दिला. 
 
 
ज्येष्ठांनी तणावमुक्त जीवन जगावे, संत साहित्यामध्ये रमावे व आयुष्याची सायंकाळ गोड करावी असे सांगत शरिराने म्हातारे झाले तरी जाणीवांनी म्हातारे होऊ नका, म्हणजे जीवन आनंदी होईल असा लाख मोलांचा सल्ला दिला. कार्यक्रमा दरम्यान ज्येष्ठ नागरिक संघाच्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संध्या गव्हले यांनी केले तर रामचंद्र जोशी यांनी आभार मानले.

13 Apr 2017
एमपीसी न्यूज -  वसंत व्याख्यानमाला समिती लोणावळा यांच्या वतीने शनिवार दि. 15 एप्रिल पासून अॅड. बापुसाहेब भोंडे हायस्कूल भांगरवाडी येथे वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. आठ दिवस चालणार्‍या या व्याख्यानमालेत राज्यभरातील नामवंत वक्ते लोणावलकेकरांना बौध्दिक ज्ञानाची शिदोरी बहाल करणार असल्याची माहिती समितीच्या अध्यक्षा वसुधा पाटील यांनी दिली. 
 
 
वसंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प शनिवारी सायंकाळी ६ वाजता माजी माहिती आयुक्त विजय कुवळेकर यांच्या गुण गाईन आवडी या विषयाने गुंफले जाणार आहे. त्यानंतर रविवारी दुर्ग संवर्धक समिती सदस्य प्रफुल्ल माटेगावकर (सह्याद्रीतील सात रत्ने), सुप्रसिध्द लेखक प्रविण दवणे (सावर रे), यर्जुवेंद्र महाजन (शिक्षण व करियरवर बोलू काही), एमकेसीएलचे एमडी सीईओ विवेक सावंत (भागीदारी मानवी व कृत्रिम बुध्दिमत्तांची), प्राध्यापिका संध्या देशपांडे (बहिणाबाई), शुक्रवार दि. 21 रोजी डॉ. ताई पाटील संचलित सुरनेत्र या त्रिनेत्री फाऊंडेशन मुंबई प्रस्तुत अंध कलाकारांच्या सूरमयी मैफिलीने व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे.
 
 
वसुधा पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी वसंत व्याख्यानमाला समितीचे सचिव आनंद गावडे, श्रीकृष्ण वर्तक, कोषाध्यक्षा संपदा पेठे, सहकोषाध्यक्षा चारुलता कमलवार उपस्थित होते.
11 Apr 2017

एमपीसी न्यूज - संकटमोचन हनुमंतराया यांच्या जयंतीनिमित्त गावोगावी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात सर्व गावांमध्ये हनुमान जयंतीचा उत्सव आज पार पडला.


वाकसई चाळ येथे हनुमान जयंतीनिमित्त सोमवारी हभप दत्तात्रय महाराज धुमाळ यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. धुमाळ महाराज यांच्या वाक्यचातुर्यांच्या जोरावर अतिशय विस्तृतपणे हनुमंतरायांचे जिवनकार्य श्रोत्यांसमोर मांडले. हनुमंताची मातृभक्ती, श्रीराम चंद्रावरील अफाट प्रेम व भक्ती, कार्य, मनावर व तनावर ताबा ठेवण्याची अफाट ताकद या सर्व गोष्टींना स्पर्श करुन संत तुकारामांच्या अभंगातील शरण शरण हनुमंता या चरणावर किर्तनरुपी सेवा केली. यावेळी परिसरातील नागरिक व वारकरी मंडळी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.


मंगळवारी चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या पहाटे सव्वासहा वाजता वाकसई चाळ येथील हनुमान मंदिरात श्रींचा महाअभिषेक, सत्यनारायण महापुजा, महिलांसाठी हळदीकुंकु व सांस्कृतिक कार्यक्रम, महाप्रसाद व हरीजागर हे कार्यक्रम झाले. वरसोली गावात देखिल हनुमान जयंतीनिमित्त देवीचा जागर गोंधळ, रांगोळी स्पर्धा, पालखीची भव्य मिरवणुक, महिलांसाठी खास खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम, हभप सुप्रियाताई साठे यांचे किर्तन व श्रीराम कलापथक मंडळे पवळेवाडी यांचे भारुड आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


वलवण गावात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व ग्रामस्तांच्या वतीने हनुमंतरायांचा अभिषेक व धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन केले होते. यासह कुसगाव, देवघर, सदापुर, देवले, खंडाळा, भांगरवाडी, गावठाण सह सर्वच गावांमध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली.

11 Apr 2017

एमपीसी न्यूज - सुप्रसिद्ध कार्ला लेणी पाहण्यासाठी व कुलस्वामीनी आई एकविरेच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक व पर्यटक वेहेरगावात येत असतात. यामुळे परिसरात कचरा निर्माण होत असतो, असे असले तरी परिसराची स्वच्छता राखल्यास येणार्‍या भाविकांना व पर्यटकांना गावात प्रसन्न वाटेल या हेतूने वेहेरगावातील काही तरुणांनी सोशल मीडियांच्या माध्यमातून सोमवारी एकत्र येत कार्ला लेणी व मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवत एक वेगळा आदर्श गावासमोर घालून दिला.


वेहेरगावात एकविरा देवीच्या यात्रा झाल्यानंतर सर्वत्र पसरलेला प्लास्टिकचा कचरा दोन दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांनी येऊन स्वच्छता मोहीम राबवत गोळा केला. बाहेरून लोक येऊन आपल्या गावात स्वच्छता मोहीम राबवतात व आपण ग्रामस्थ शांत कसे राहायचे या विचाराने पेटून उठलेले येथील रहिवाशी व मनविसेचे मावळ तालुकाध्यक्ष अशोक कुटे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गावातील तरुणांना सोमवारी गडावर स्वच्छता मोहिमेसाठी येण्याचे आवाहन केले. याला साथ देत सोमवारी भाऊसाहेब माने, साईनाथ देवकर, सुनील भिवाजी देवकर, गणेश माने, आकाश माने, तानाजी पडवळ, ऋषिनाथ गायकवाड, गणेश देवकर आदी तरुणांनी मंदिर परिसरात उपस्थित राहून स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

 

दर सोमवारी लेणी व मंदिर परिसरात स्वच्छत‍ा मोहीम राबविण्याचा संकल्प या तरुणांनी केला आहे. गावातील इतर मंडळींनी देखील आठवड्यातील काही वेळ गावासाठी व गावाच्या स्वच्छतेसाठी द्यावा, असे आवाहन या तरुणांनी केले आहे. सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावाच्या विकासाचे काम केल्यास राज्यात वेहेरगावची एक वेगळी ओळख निर्माण होईल, असा विश्वास या तरुणांनी व्यक्त केला.

11 Apr 2017

एमपीसी न्यूज - लोणावळा रिक्षा फेडरेशनच्या वतीने येथील रेल्वे ग्राऊंडवर आयोजित राज्यस्तरीय रिक्षा फॅशन शोमध्ये विविध जिल्ह्यांमधून आलेल्या लावण्यवती रिक्षांनी आपल्या सौंदर्याने उपस्थितांची वाहवा मिळाली. रिक्षा फॅशन शो प्रमाणे येथे विविध स्टंट देखिल करण्यात आले. पुणे, मुंबई, कोल्हापूर-सातारा, औेंगाबाद-नाशिक व लोणावळा अशा पाच विभागात ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पुणे विभागात विवेक खराडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

 

मावळचे आमदार संजय तथा बाळा भेगडे, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, शिवसेना गटनेत्या शादान चौधरी यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी नगरसेवक बाळासाहेब जाधव, दिलीप दामोदरे, रमेश पाळेकर, निखिल कविश्वर, बाळासाहेब फाटक, सुनील इंगूळकर, शिवदास पिल्ले, विजय मोरे, संजय घोणे, सुधिर शिर्के, सेजल परमार आदी उपस्थित होते.


यामध्ये पुणे विभागात विवेक खराडे यांनी प्रथम व सुधाकर गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. मुंबई विभागातून दीपक ठाकूर यांनी प्रथम व नितेश आठवले यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. कोल्हापूर व सातारा  विभागात उच्यत जाधव यांनी प्रथम व रियाज शेख यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. औरंगाबाद व नाशिक विभागात महंमद शेख याने प्रथम व वसीम खान यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. लोणावळा विभागात भाऊ शिवेकर यांनी प्रथम व दत्तात्रय बच्चे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. 
   
लोणावळा रिक्षा फेडरेशनचे कैलास ढोरे, राजेश तेजी, आनंद सदावर्ते, सुभाष शिंगे, डँमनीक जेसिफ व त्यांच्या सहकार्‍यांनी या स्पर्धेचे आयोजन व संयोजन केले होते.

11 Apr 2017

एमपीसी न्यूज - शिवक्रांती एज्युकेशन सोसायटीच्या वतीने भाजे गावातील संपर्क बालग्राम संस्थेला खुर्च्या भेट देण्यात आल्या. तसेच सोमवारची रम्य सायंकाळ बालग्रामच्या मुलींसोबत घालवत त्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

 

शिवक्रांती एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रतिक पाळेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. संपर्क संस्थेमध्ये 120 अनाथ मुली असून त्यांचे संगोपन व शिक्षणाचे कार्य संपर्क संस्था करत आहे. संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, त्यांच्या पत्नी रत्ना बॅनर्जी व इतर मंडळी या मुलांचा पोटच्या पाल्यांप्रमाणे त्यांचे पालनपोषण करत आहेत.

 

येथील मुलींना संपर्कमध्ये काही कार्यक्रम असल्यास जमीनीवर बसावे लागत असे त्यांची ही समस्या ओळखत प्रतिक व त्याच्या सहका-यांनी हनुमान जयंतीच्या पुर्वसंध्येला संस्थेला खुर्च्या भेट दिल्या. तसेच सर्वांना खाऊ वाटप केला. अनाथ आश्रमात शिकणारी मुले मुली हे 18 वर्षाचे झाल्यानंतर त्यांना संस्थेत ठेऊ नये असा अद्यादेश शासनाने काढल्याने यामुलांचे पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे 18 वर्षानंतर सदर मुलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी शिवक्रांती एज्युकेशन सोसायटीच्या माध्यामातून त्यांचे पुढील शिक्षण, व्यावसाय प्रशिक्षण, नोकरी आदींच्या माध्यमातून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी काय करता येईल यावर यापुढिल काळात काम करण्याचा प्रयत्न सोसायटीच्या माध्यमातून करु असे आश्वासन यावेळी शिवक्रांती कामगार संघटनेचे सचिव व शिवक्रांती एज्यकेशन सोसायटीचे संस्थापक विजय पाळेकर यांनी दिली.

 

यावेळी संपर्क संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, शिवक्रांती कामगार संघटनेचे खजिनदार रविंद्र साठे, एज्यकेशन सोसायटीचे सदस्य महेश पवार, विशाल पाडाळे, विशाल विकारी, उल्हास भांगरे, प्रथमेश पाळेकर, सुमित मावकर, आकाश मावकर, प्रणव जाधव, खंडू बालगुडे, मिहिर कडू, आशिष मावकर, अनिकेत कुंभारे, निशांत गवळी, ज्ञानेश्वर बोर्‍हाडे आदी उपस्थित होते.

Page 8 of 14
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start