• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
03 Apr 2017
एमपीसी न्यूज - लोणावळ्याजवळ असणा-या अँबी व्हॅली सहारा सिटीमध्ये अजगराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. गोळ्या झाडूनही अजगराचा मृत्यू न झाल्याने त्याचे शीर धडावेगळे करुन पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला अर्धवट जाळून पुरण्यात आले. 
 
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळचे अध्यक्ष निलेश गराडे यांनी याबाबत वनखात्याला माहिती दिली. यानंतर निलम उपाध्याय, हार्दिक मालवाडीया, वनरक्षक सविता चंद्रशेखर रेड्डी पाटील, यांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळ शोधून काढत अर्धवट जळालेला, डोके धडावेगळे केलेला व दोन गोळ्या झाडून हत्या केलेल्या अजगर आढळून आला. 
 
याबाबत संबंधित अधिकारी कॅप्टन कबीर सुभेदार, सहारा अग्निशमन खात्यात काम करणारे ज्ञानेश्वर तोडले, के. पी. रामचंद्रा यांची चौकशी केली असता त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. स्वतःच्या समाधानासाठी असे केल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी वापरलेली बंदूक, कुऱ्हाड व काठ्या जप्त करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास वनविभागाकडे सोपवण्यात आला आहे.
03 Apr 2017
एमपीसी न्यूज - आई एकविरेचे माहेरघर असलेल्या लोणावळ्याजवळील देवघर या आईच्या माहेरघरात आज पालखी मिरवणुकीचा सोहळा पारंपारिक नृत्य व वाद्याच्या निनादात मोठ्या उत्साहात पार पडला. दरवर्षीपेक्षा यावर्षी भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती.
 
श्री काळभैरवनाथ ट्रस्ट व काळभैरवनाथ बांधकाम समिती देवघर यांच्या वतीने पहाटे सहा वाजता काळभैरवांचा अभिषेक करत मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी बांधकाम समितीचे अध्यक्ष मारुती देशमुख, सचिव अशोक कौदरे, सल्लागार महादु देशमुख, उपाध्यक्ष किसन आहेर, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गोविंद कौदरे, रवीराज कौदरे, शंकर ढाकोळ, अनंता शिंदे आदी उपस्थित होते. 
 
श्री काळभैरवनाथ ट्रस्ट देवघर व काळभैरवनाथ बांधकाम समिती देवघर यांच्या वतीने सोहळ्यांचे नियोजन करण्यात आले होते. दरवर्षी चैत्र षष्ठीला देवघरात आई एकविरेचा भाऊ काळभैरवनाथ महाराज यांचा पालखी सोहळा पार पडतो. कोकण भागातून येणार्‍या आई एकविरेच्या चैत्री यात्रेकरिता येणार्‍या पालख्या या षष्ठीच्या दिवशी आईच्या माहेरघरात देवीचा भाऊ काळभैरवनाथ महाराज यांच्या भेटीला येतात. या मंदिरात आई एकविरा व काळभैरवानाथांची भेट घडवत पालख्यांची मंदिर प्रदषणा व मिरवणूक होते.
 
कोकण भागातून येणार्‍या पायी पालख्या व भाविकांच्या गर्दीने आज मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग गजबजला होता. लोणावळा ग्रामीण पोलीसांनी वाकसई फाटा व मंदिर परिसरात बंदोबस्त तैनात केला होता.
01 Apr 2017

एमपीसी न्यूज - राजमाची किल्ल्यांच्या पायथ्याजवळील दुर्गम आदिवासी ग्रामपंचायत असलेल्या उधेवाडी ग्रामपंचायतीने 1 एप्रिल रोजी गावाची शंभर टक्के कर वसुली करण्याचा पायंडा सलग नवव्या वर्षी कायम ठेवत महाराष्ट्रासमोर एक आदर्श घालून दिला आहे. मागील 9 वर्षापासून या ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी गावाची शंभर टक्के कर वसुली केली जाते.

 

ग्रामपंचायतीने शासन निर्देशानुसार सुधारित पद्धतीने कर वसुली केली. गावातील बहुतांश नागरिक हे गरिब व आदिवासी असताना देखील ते कसलेही आढेवेडे न घेता उत्स्फुर्तपणे 1 एप्रिलला शंभर टक्के कर भरणा केला. याकामी मावळचे गट विकास अधिकारी निलेश काळे, सहाय्यक गट विकास अधिकारी गुजर, विकास अधिकारी बाळासाहेब दरवडे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

01 Apr 2017

एमपीसी न्यूज - दुर्गसंवर्धनासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लोहगड विसापूर विकास मंचाला शंभूसेवा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.  

 

छत्रपती संभाजी महाराजांच्या 328 व्या बलिदान दिनानिमित्त वढु बु. येथे मृत्युंजय दिनाचे आयोजन करण्यात आले होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीचे कार्यवाह मिलिंद एकबोटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. गेली 17 वर्षे मंच मावळ तालुक्यातील लोहगड व विसापूर किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे.

 

लोहगडावरील शिवमंदिर व पायथ्याला साकारलेले शिवस्मारक आदी कामे मंचाने पूर्ण केली आहेत. तसेच पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करून लोहगडाच्या पाय-या, तटबंदी व बुरुजांची दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे गडावर मद्यपान व अनैतिक प्रकार पूर्णपणे बंद झाले. पर्यटन वाढले व पर्यायाने स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला. 

 

पुरातत्व विभागाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे विसापूर किल्ल्यावरील पडलेल्या शिवमंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच दरवर्षी प्रमाणे यावेळी देखील मावळ तालुक्यातून शेकडो शिवभक्त शिवपुण्यतिथीनिमित्त 11 एप्रिल 2017 ला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी जाणार असल्याची माहिती मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी दिली.

01 Apr 2017


एमपीसी न्यूज - श्रीराम मंदिर भांगरवाडी येथील मंदिराचा शतक महोत्सवी वाटचाल कार्यक्रम उत्साहात पार पडला. 1901 साली भांगरवाडी येथे पुरुषोत्तम दास दामोदरे व भगिनी बाई जमनाबाई, मावजी हरिदास बाई मोघींबाई, वसनजी शामजी यांनी हे मंदिर बांधले, सुमारे 17 वर्ष या मंदिराचे काम सुरु होते. 1 एप्रिल ‍1917 रोजी रामनवमीच्या मुर्हतावर सदर मंदिर भाविक‍ांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.


संतकवी दासगणु महाराज यांच्या वास्तव्याने हा परिसर पावन झाला आहे. शिर्डी येथील रामनवमीचा उत्सव साजरा करुन ते मुक्कामासाठी भांगरवाडी येथील श्रीराम मंदिरात येत असे. कै. विश्वनाथ जोशी यांनी स्थापनेपासून या मंदिरात सेवा केली, त्यांच्या पश्च्यात त्यांचे चिरंजीव मनोहर जोशी हे सेवा करत आहे. अशा या मंदिराच्या शतक महोत्सवी वाटचाली निमित्त आज मंदिराचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

01 Apr 2017
एमपीसी न्यूज  - लोणावळा नगरपरिषद हद्दीमधील नगरपरिषदेच्या विद्युत विभागातील दैनंदिन कामांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी खासगी ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यापुढील काळात सदर ठेकेदाराच्या माध्यमातून नगरपरिषद शहरातील विद्युत वितरणशी संबंधित दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे.
 
दरम्यान, नगराध्यक्षा सुरेखा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या हस्ते सदर कामाचे उद्घाटन शुक्रवारी तुंगार्ली चौकात करण्यात आले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष बाबा शेट्टी, ठेकेदार सुनील तावरे, माजी नगरसेविका सिंधू मालपोटे, नगरसेवक भरत हारपुडे, बाळासाहेब जाधव, देविदास कडू, आरोही तळेगावकर, रचना सिनकर, अपर्णा बुटाला, पूजा गायकवाड, बिंद्रा गणात्रा, जयश्री आहेर, मंदा सोनवणे, अंजना कडू, सुर्वणा अकोलकर, गौरी मावकर, हर्षल होगले, आकाश कुटे, विजय इंगूळकर, गणेश मावकर हे उपस्थित होते.
01 Apr 2017
एमपीसी न्यूज -  लोणावळा नगरपरिषद व लोणावळा हॉटेल असोशिएशनच्या वतीने पुष्प प्रदर्शन भरविण्यात आले आहे. भांगरवाडी येथील इंद्रायणी गार्डनमध्ये हे प्रदर्शन दोन दिवस भरविण्यात आले आहे. 
 
या प्रदर्शनाचे उद्घाटन नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सभापती विनय विद्वांस, भाजपा शहराध्यक्ष बाबा शेट्टी, टाटा कंपनीचे अधिकारी विश्वासराव, व्हि.एस. नारकर, नगरसेवक राजु बच्चे, भरत हारपुडे, बाळासाहेब जाधव, निखिल कविश्वर, दिलीप दामोदरे, देविदास कडू, माणिक मराठे,संध्या खंडेलवाल, आरोही तळेगावकर, रचना सिनकर, अपर्णा बुटाला, पुजा गायकवाड, बिंद्रा गणात्रा, जयश्री आहेर, मंदा सोनवणे, अंजना कडू, सुर्वणा अकोलकर, गौरी मावकर उपस्थित होते.
 
नगराध्यक्षा जाधव म्हणाल्या की, लोणावळा शहराची जगभरात थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख आहे. शहराचा हा नावलौकिक कायम राखण्यासाठी प्रत्येकांने झाडे लावण्याचा व जगविण्याचा संकल्प करायला हवा. मागील वर्षी नगरपरिषदेने 10 हजार झाडे लावली होती. यावेळी देखील ले आँईटची जागा तसेच मोकळ्या जागांवर झाडे लावण्यात येणार आहे. सध्या वातावरणात बदल होऊ लागला असून इतर शहरांप्रमाणे लोणावळ्याचा पारा देखील वाढू लागला आहे.  
 
शहराचा थंड हवेचे ठिकाण हा नावलौकिक कायम राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. नगरपरिषदेच्या वतीने मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गालगत आरपीटीएस शेजारच्या गार्डनच्या जागेचे सुशोभिकरण करुन त्या ठिकाणी लेजर शो सारखे प्रकल्प राबवून अत्याधुनिक गार्डन बनविण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.  
 
शहरातील इतर गार्डन देखील विकसित करण्यात येणार आहे. शहरा सध्या विकासकामे वेगात सुरु आहे. शहरातील प्रत्येक भागात स्वच्छ पिण्याचे पाणी देण्यासाठी नविन पाणी योजन राबविण्यात येणार आहे. जुनी योजना देखील पुनर्जिवित करण्यात आली आहे. शहरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्ग व पुलांची कामे सुरु करण्यात येणार असून नगरपरिषद शहरात शाश्वत विकासाची कामे करत असताना नागरिकांनी देखील या कामात सहकार्य करावे असे आवाहन जाधव यांनी केले. आमदार व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 3 महिन्यात 50 कोटी रुपयांचा विकास निधी शहरात आला आहे. त्या निधीच्या माध्यमातून वरील विकासकामे सुरु आहेत.  
 
पुष्प प्रदर्शन कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी सचिन पवार यांनी केले तर सूत्रसंचालन राजेंद्र दिवेकर यांनी व आभार प्रदर्शन स्वच्छता निरीक्षक दिगंबर वाघमारे यांनी केले.
30 Mar 2017

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाने पनवेल येथे एका समारंभासाठी निघालेली पिकअप जीपला अमृतांजन पुलाच्या खाली चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात 7 प्रवासी जखमी झाले. आज दुपारी अडीच  वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.


गवाजी तवाजी मेदगे, लक्ष्मण खंडू सावंत, रंगनाथ तुकाराम मेदगे, लक्ष्मण रामभाऊ आढाव, कचरू धोंडू आढाव, शंकर बोरकर, विश्वनाथ मेदगे (सर्व राहणार औधर गाव राजगुरूनगर) अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत. 


अपघाताची माहिती समजताच खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीला या ग्रुपचे सदस्य गुरुनाथ साठेलकर व त्यांच्या सहकार्यांनी तसेच बोरघाट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना गाडीतून बाहेर काढत उपचाराकरिता खोपोली नगरपालिकेच्या दवाखान्यात दाखल करत पुढील उपचाराकरिता कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमीपैकी 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले.

28 Mar 2017

एमपीसी न्यूज - गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण परिसर यांच्या वतीने दुचाकीची भव्य शोभायात्रा लोणावळा, खंडाळा ते वेहेरगाव दरम्यान काढण्यात आली होती.


हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेल्या या भव्य शोभायात्रेत हजारो दुचाकी वाहनांवरून हिंदू बांधव, महिला व अबाल वृद्ध सहभागी झाले होते. पुरंदरे ग्राऊंड लोणावळा ते खंडाळा, गवळीवाडा, तुंगार्ली, वलवण, वरसोली, वाकसई चाळ, वाकसई फाटा, कार्ला फाटा येथून ही शोभयात्रा जाऊन कुलस्वामीनी एकविरा देवीच्या वेहेरगाव येथील पायथा मंदिराजवळ रॅलीचा समारोप झाला. तब्बल 3 तास अतिशय शिस्तबद्धपणे ही शोभायात्रा सुरू होती. शोभायात्रेमध्ये सहभागी दुचाकी वाहनांमुळे तब्बल साडेतीन किमी अंतराचा मार्ग व्यापला गेला होता.


गुढीपाडवा व नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे जिल्हयात निघणारी ही सर्वात मोठी दुचाकी शोभायात्रा असते. विशेष म्हणजे या हिंदू समितीला कोणीही पदाधिकारी नसतात. सर्वच स्तरांतील मंडळी स्वंयस्फूर्तीने या रॅलीचे नियोजन करतात. तसेच हिंदू बांधव सर्व राजकीय मतभेद व हेवेदावे बाजूला ठेवत या रॅलीत मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.


रॅलीमधील महिला व युवकांचा नेहमीप्रमाणे यावर्षी उत्साह वाखणण्याजोगा होता.

पुरंदरे ग्राऊंड येथे सकाळी 11 वाजता नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय गवळी, माजी नगरसेविका जयश्री काळे यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीच्या पुढे प्रभू रामचंद्राची प्रतिमा असलेला रथ, त्यामागे महिला, युवक व पुरुष रॅलीमध्ये भारतमाता व छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमा असलेली वाहने, प्रत्येक वाहनांना हिंदू ध्वज, सहभागी प्रत्येकांच्या डोक्यावर भगवा फेटा अशा या अभूतपूर्व रॅलीमुळे लोणावळा शहर व ग्रामीण परिसर भगवामय झाला होता. जागोजागी नागरिकांनी रॅलीवर फुलांची उधळण व फटाक्यांची आतीषबाजी केली, काही ठिकाणी नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.

चैत्र पाडव्याच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी लंकेवर विजय मिळवून ते आयोद्धेत दाखल झाले. तेव्हापासून तमाम हिंदू बांधव हा दिवस घरावर गुढया उभारून विजयदिन म्हणून साजरा करतात. तसेच गुढी पाडव्याच्या दिवशी संवत्सर बदलते व हिंदू नववर्षाची सुरुवात होते. म्हणून हा दिवस लोणावळा शहर व परिसरात हिंदू समितीच्या वतीने मोठया उत्साहात साजरा केला जातो.

Advt Mahapour New 3

27 Mar 2017

एमपीसी न्यूज - शांती, समता व बंधुत्वाचा संदेश देणार्‍या बौद्ध धर्माचा भिक्खू संघाने जगभरात प्रचार व प्रसार करावा असे मत केंद्रिय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. ऑल इंडिया भिक्खू संघ यांच्या वतीने लोणावळ्यात आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय बौद्धधम्म महाअधिवेशनात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


यावेळी महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री र‍ाजकुमार बडोले, मावळचे आमदार बाळा भेगडे, भदंत महाबोधी डॉ. राहुल बोधी महाथेरो, भदंत पघ्यादीपजी, भदंत विरत्न थेरो, भदंत विनय बोधी थेरो, रिपाईचे प्रदेश महामंत्री अविनाश म्हातेकर, पुणे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, लोणावळा नगराध्यक्षा सुरेखा जाधव, तळेगावच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, सुनील शेळके, नगरसेवक दिलीप दामोदरे आदी उपस्थित होते. तसेच या महाअधिवेशनात 22 देशातील धर्मगुरु व प्रतिनिधी सहभागी झाले होते.


यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले मला माझ्या धर्माचा अभिमान आहे मात्र मी सर्व जाती धर्माचा आदर करतो, कोणी कोणता धर्म स्विकारायचा व कोणाचे पालन करायचे यांचे प्रत्येकाला स्वातंत्र आहे. भारत हा हिंदु देश असला तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने या देशात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र नांदत आहेत. ऑल इंडिया भिक्खू संघाचे मुख्यालय असलेल्या गया येथे 25 कोटी रुपयांचे अद्यावत बुद्धविहार उभारण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.मावळ तालुक्यातील देहूरोड येथिल दिक्षाभूमी व तळेगाव येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाच्या विकासासाठी कालच महाराष्ट्र शासनाने दीड कोटी रुपयांचा निधी मंजुर केला असल्याचे मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी यावेळी सांगितले.


महाअधिवेशनाचे आयोजक भदंत डॉ. राहुल बोधी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले

Page 10 of 14
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start