• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
23 Jun 2017


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने चिखली येथील सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर आज (शुक्रवारी) कारवाई करण्यात आली.

'फ' क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक 3 चिखली येथील राजगड पार्क, नारायण हाऊसिंग सोसायटी आणि पाटीलनगर येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू होती. शुक्रवारी अतिक्रमण विभागाने या बांधकामार धडक कारवाई केली. यामध्ये चालू असलेल्या एकूण 15 आरसीसी बांधकामवर कारवाई करण्यात आली.

कार्यकारी अभियंता पी.पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता देसले, दोन जेसीबी, दोन डंपर आणि महापालिकेचे पोलीस, स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.

23 Jun 2017


एमपीसी न्यूज - पुणे लष्कर भागातील कॉन्व्हेंट स्ट्रीटवरील सेंट जॉन शाळेमध्ये संगणक कक्षाचे उद्घाटन विधान परिषदेचे आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या आमदार निधीतून दहा लक्ष रुपयांचा निधी संगणक कक्षास देण्यात आला. या निधीमधून गुरुवार पेठमधील सेंट हिल्डास शाळा, पुणे लष्कर भागातील कॉन्व्हेंट स्ट्रीटवरील सेंट जॉन शाळा व रास्ता पेठमधील एथेल गार्डन अध्यापिका विद्यालयास संगणक कक्ष उभारण्यात आले, अशी माहिती विल्सन मॅसी यांनी दिली.

या कार्यक्रमास माजी गृहराज्यमंत्री व पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अर्जुन खुरपे, राजाभाऊ चव्हाण, सेंट जॉन शाळेच्या मुख्याध्यापिका कविता शेरे, अनिल गडकरी, मारिया देठे, गोपाळ पायगुडे, पराग गोडबोले, संजय देशमुख, अशोक गुजर, विशाल मोरे, साहिल राऊत, विनय ढेरे आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार अनंतराव गाडगीळ यांनी सांगितले की, संगणक कृतीच्या प्रवास आपल्या देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सुरुवात केली. त्यानंतर भारतात माहिती तंत्रज्ञानाचे युग सुरू झाले. त्यामुळे देशाची प्रगती झपाट्याने झाली. आपण विद्यार्थ्यांनी देखील संगणकाचे ज्ञान आत्मसात करून साक्षर झाले पाहिजे. तरच तुम्ही करिअरमध्ये यशस्वी होऊ शकता. यावेळी रमेश बागवे यांनी देखील संगणकाचे महत्व पटवून सांगितले.

या कार्यक्रमामध्ये उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गडकरी यांनी केले तर आभार सेंट जॉन शाळेच्या मुख्याध्यापिका कविता शेरे यांनी मानले.

23 Jun 2017


एमपीसी न्यूज - दहशातवाद विरोधी दिनानिमित्त शिया मुस्लिम समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर शांतता रॅली काढण्यात आली. ही रॅली पुणे लष्कर भागातील लाल देवळापासून सोमजी पेट्रोल पंपमार्गे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आली.

या रॅलीमध्ये शिया मुस्लिम आणि अन्य सामाजिक संघटना देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी शिया मुस्लिम समाजबांधवानी हातामध्ये दहशतवाद विरोधी फलक आणि बॅनर्स धरले होते. दहशतवाद आणि अत्याचाराचा निषेध करण्यासाठी या शांतता रॅली काढण्यात आली होती, अशी माहिती विलायत युथ काऊंसिलचे अध्यक्ष खिसाल जाफरी यांनी दिली.

23 Jun 2017


एमपीसी न्यूज - बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉ. के. एम. सुर्वे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

चतुरचंद महाविद्यालयात डॉ. सुर्वे यांनी 37 वर्ष हिंदी विषयाचे अध्यापन केले.  सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत शैक्षणिक, समाजकार्यात उल्लेखनीय योगदान दिले.

23 Jun 2017


आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, पुणे शहर पोलीस अमलीपदार्थ विरोधी पथक, सायबेज आशा ट्रस्टचा उपक्रम

एमपीसी न्यूज - तरुणाईमधील वाढती व्यसनाधिनता आणि अमली पदार्थांची अवैध वाहतूक याला प्रतिबंध घालण्यासोबतच याविषयी युवावर्गामध्ये जनजागृती व्हावी, याकरीता आनंदवन व्यसनमुक्ती व पुर्नवसन केंद्र, पुणे शहर पोलीस अमलीपदार्थ विरोधी पथक, सायबेज आशा ट्रस्टतर्फे जागतिक अमलीपदार्थ सेवन व अवैध वाहतूक विरोधी दिनानिमित्त जनजागरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार (दि. 25) ते शुक्रवार (दि. 30) पर्यंत विविध महाविद्यालयांसह चौका-चौकात उपक्रम होणार आहेत, अशी माहिती आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ.अजय दुधाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सायबेज आशा ट्रस्टचे मंदार पोफळे, समुपदेशक प्रसाद ओक आदी उपस्थित होते. सप्ताहाची सुरुवात रविवार, (दि. 25) दुपारी 5.00 वाजता गुडलक चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता येथे पथनाटयाने होणार आहे. स्वतंत्र थिएटरचे विद्यार्थी अमलीपदार्थाविषयी पथनाटय सादर करणार आहेत.

डॉ. अजय दुधाणे म्हणाले, युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अॅन्ड क्राईम यांच्याकडून ह्यलिसन फर्स्ट हे घोषवाक्य यावर्षी देण्यात आले आहे. यावर आधारित सर्व उपक्रम होणार आहे. (दि 26) सायबेज सॉफ्टवेअर सोल्युशन कंपनी, कोरेगाव पार्क येथे जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहे. तर फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयात 277 जूनला सकाळी 11.00 वाजता अमलीपदार्थांविषयी- सर्वप्रथम ऐका याविषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांना प्रश्नावली देऊन त्यावरून तरुणाईमधील व्यसनाधिनतेचे सर्वेक्षण देखील करण्यात येणार आहे.

दिनांक 28 ते 30 जून दरम्यान मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स, बृहन् महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स आणि पूना कॉलेज येथे तरुणाईसोबत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. तरुणांमध्ये अमलीपदार्थांविषयी जनजागृती करण्यासाठी सप्ताहात अनेक उपक्रम होणार असून त्यामध्ये युवावर्गाला मोठया संख्येने सहभागी करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.

23 Jun 2017


एमपीसी न्यूज - जागतिक योग दिनानिमित्त चिंचवड स्टेशन उद्योगनगर येथील क्विन्स टाऊन सोसायटीमध्ये योगासने व सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. त्यात 200 हुन अधिक रहिवाशी नागरिकांनी सहभाग घेतला होता.

यावेळी संजना गारगोटे यांनी योगासनाचे विविध प्रात्यक्षिके करून दाखवली. देवीदास कुलथे, राजेंद्र केंदे यांनी सहकार्य केले. अनुपमा प्रभुणे व सरनोबत यांनी उपस्थितांना योगासनांचे फायदे व योग करण्याची शास्त्रोक्त पद्धत याबद्दल मार्गदर्शन केले. सुजित पाटील व शिरीष पोरेड्डी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले.

योग दिनाचे औचित्य साधून नुकतेच हिमालयात यशस्वी ट्रेकिंग केल्याबद्दल सोसायटीमधील संस्कार सोशल फाऊंडेशनचे बाळकृष्ण खंडागळे, महानगरपालिकेचे अभियंता शिरीष पोरेड्डी, रवींद्र सोनावणे, तुषार देशपांडे, सुरेश गारगोटे, सचिन देशमुख, राजेश कर्णावट, आत्माराम गोरे, विजेंद्र बन्सल, शिवासर्वानन शेषाद्री, शिवप्रसाद ढाकणे, मंगेश कोल्हे या गिर्यारोहकांचा  सन्मान करण्यात आला. ट्रेकिंग ग्रुपतर्फे 100 गरीब व अनाथ मुलांसाठी वह्या व पेन यतिश भट यांच्याकडे देण्यात आले. तसेच 600 किमी अखंड सायकलिंग करणे पोहणे व धावणे यात विशेष नैपुण्य मिळवल्याबद्दल विश्वकांत उपाध्याय यांचाही सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचा समारोप पसायदान घेऊन करण्यात आला. डॉ. राजीव पटवर्धन यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रा. सदानंद बोगमी यांनी सूत्रसंचालन केले. योग गुरु कै. हेमलता लड्ढा यांना यावेळी श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

23 Jun 2017


एमपीसी न्यूज - कोथरूड परिसरातील सुतारदरा येथील मुख्य रस्त्यावरील ड्रेनेजची पाईपलाईन फुटली आहे. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मैलापाणी वाहत आहे.  यामुळे या रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. सकाळ व संध्याकाळी वर्दळीच्या काळात या चौकात वाहतूक कोंडी होते.

या रस्त्यावरील ड्रेनेजच्या पाईपलाईनच्या दुरस्तीकडे नागरिकांनी वारंवार सांगूनही लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी लोकप्रतिनिधींनी प्रभागातील सर्व समस्या सोडवणार असल्याचे अनेक जाहीर भाषणांमध्ये सांगितले होते. परंतू आता दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यातून मार्ग काढत लोकांना जावे लागत आहे. याविषयी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे अधिकारी याप्रश्नाकडे लक्ष देत नाहीत. या प्रभागात 4 नगरसेवक आहेत. परिसरातील स्थानिक नागरिकांनी याविषयी नगरसेवकांना वेळोवेळी सांगितल्यानंतरही हा प्रश्न अजून सुटला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. याच भागात शाळा असल्याने लहान मुलांना ड्रेनेज लाईनच्या वाहणाऱ्या घाण पाण्यातून जावे लागत आहे.

drenage 1

drenage 2

22 Jun 2017

पालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड ठाणे, मुंबई, नागपूर, या महापालिका विभागाकडील सेवकांना लाड आणि पागे समितीच्या अहवाला प्रमाणे घाणभत्ता, धुलाई भत्ता, वारसहक्क लागू आहे. मात्र, याच हुद्द्याच्या पुणे महापालिकेतील सेवकांनावरील सवलतीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करत पुणे महानगरपालिका कामगार संघटनांनी 21 जूनपासून महापालिकेच्या मुख्य दरवाज्यासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

या मागण्या मान्य करण्यासाठी महापालिकेने मुख्यसभा, स्थायी समिती यांनी ठराव मान्य केले असून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने सुद्धा महापालिकेला त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने महापालिकेतील वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांचे संपावर जाणे शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. नदीपात्रातील जलपर्णी, शहरातील नालेसफाई यामुळे शहरात डेंग्यू , मलेरिया, चिकणगुण्या यांसारख्या रोगाचा प्रादुर्भाव उद्भवू शकतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

22 Jun 2017


एमपीसी न्यूज - ज्येष्ठत्व ही एक देणगी आहे. आपल्या अनुभवाचा उपयोग समाजासाठी केला पाहिजे. दैनंदिन विवंचनेतून बाहेर पडून चांगले विचार ऐकले आणि एकमेकांच्या अनुभवातून समन्वय साधता आला तर ज्येष्ठत्व आनंददायी होते. उर्वरित आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदात घालवता आला पाहिजे, असे मत ज्येष्ठ प्रवचनकार किसान महाराज चौधरी यांनी व्यक्त केले.


संभाजीनगर चिंचवड येथे स्वा. सावरकर प्रतिष्ठान व मित्र मंडळ यांच्या सिद्धिविनायक मंदिर जागतिक योग दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना करण्यात आली. या संघाचे उद्घाटन ज्येष्ठ प्रवचनकार किसान महाराज चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी किसान महाराज चौधरी यांचे 'जेष्ठत्व - एक आनंदानुभव' या विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी परबती वाडकर, दिलीप जाधव, प्रभाकर शेवते, शांताराम पवार या ज्येष्ठ नागरिकांनी अपेक्षित कार्याची माहिती देत, ज्येष्ठ नागरिक संघाच्या स्थापनेमागची भूमिका सांगितली. प्रास्ताविक राजेंद्र घावटे यांनी केले. या प्रसंगी नगरसेवक तुषार हिंगे, नगरसेविका अनुराधा गोरखे, राजाभाऊ म्हस्के, संजय ढेंबरे, संजय ढमढेरे, अरविंद वाडकर आदी उपस्थित होते.

ह.भ.प. किसनमहाराज चौधरी पुढे म्हणाले की, निवृत्तीनंतर आनंदी जीवनाचे ख-या अर्थाने स्वातंत्र्य मिळते. या भूमीमध्ये जन्म हीच मोठी भाग्याची गोष्ट आहे. प्रबोधनाच्या उपक्रमातून चांगले विचार ऐकल्यास त्यातून मनशांती मिळते. योग दिनच्या निमित्ताने योगाचे महत्व ओळखले पाहिजे. त्यातून शरीर आणि मन सुदृढ व्हायला मदत होते. घरामध्ये आणि नातेसंबंधांमध्ये उतारवयात जास्त लुडबुड योग्य नाही. घरात, समाजात होणाऱ्या परिवर्तनाचे साक्षीदार होताना आपण आनंदाने त्याचा स्वीकार केला पाहिजे. भौतिक सुखापेक्षा आत्मिक सुखशांतीला प्राधान्य देता आले पाहिजे.

आयुष्यात राहून गेलेल्या आवडी निवडी आवर्जून जोपासल्यास आयुष्याची अनुभूती मिळू शकेल. चिंता दूर करून चिंतनाला महत्व दिल्यास ज्येष्ठ नागरिकाचे उर्वरित आयुष्य संपन्न होते, असे सांगताना त्यांनी अनेक उदाहरणे आणि दृष्टांत सांगितले. सूत्रसंचालन अरविंद वाडकर यांनी केले. संयोजन राजेंद्र हरेल, संदीपान बोराडे, शिवलिंग स्वामी, प्रह्लाद गायकवाड, परबती वाडकर, प्रभाकर शेवते, राहुल गावडे, विनोद रामाने, संजय कुरबेटी यांनी केले. आभार दिलीप जाधव यांनी मानले.

22 Jun 2017


एमपीसी न्यूज - भोसरी येथील समता समाज सेवा केंद्राच्या वतीने वेल्हा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी केळदचे केंद्रप्रमुख राजेंद्र अद्वेत, सरपंच येना शिंदे, पोलीस पाटील भाऊ राघू शिंदे व मुख्याध्यापक सत्यवान कदम, स्वस्तिक आवटे, काशीनाथ शिंदे, लक्ष्मण आदुले, सखाराम मटकर, अतुल पाटे, प्रतिष्ठानचे मार्गदर्शक लहू सुतार, वसंत जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश लोंढे म्हणाले, पर्यावरण व आरोग्याबाबत समाजातील सर्व घटकांनी जागरूक राहून, पुढील पिढीने निरोगी आरोग्य व मानसिक ताण तणावमुक्त जीवन जगावे.

22 Jun 2017


एमपीसी न्यूज - आमदार महेश लांडगे युवा मंचच्या वतीने चिखली आणि कुदळवाडी परिसरात पदवीधर मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.


चिखली आणि कुदळवाडी परिसरातील सर्व पदवीधरांनी या मोहिमेत सहभागी होऊन पदवीधर मतदार बना, असे आवाहन मंचचे अध्यक्ष दिनेश यादव यांनी केले आहे. पदवीधर मतदार नोंदणीसाठी पदवी प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड किंवा वाहन परवाना ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

चिखली व कुदळवाडी परिसरातील पदवीधर तरुण-तरुणींनी कुदळवाडीतील श्री शिवसाई नागरी पतसंस्थेच्या कार्यालयात कागदपत्रे जमा करून पदवीधर मतदार नोंदणी करावी, असे आवाहन दिनेश यादव यांनी केले आहे. अधिक माहितीसीठी 9881245572 या क्रमांकावर संपर्क साधावा.

22 Jun 2017


एमपीसी न्यूज - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चिंचवड मुकबधिर विद्यालयातील 'विशेष' मुलांनी सुंदर योगासने केली. विशेष मुलांची योगासने पाहून उपस्थितही भारावून गेले होते. चिंचवड, प्राधिकरण येथे योग प्रात्यक्षिके आयोजित केली होती.

यावेळी प्राचार्य विकास पाटोळे, उपप्राचार्य अरुण शिंदे, शारीरिक शिक्षक जीवन देशमुख, मुख्य शिक्षिका सुजाता कांबळे, समाजिक कार्यकर्ते गणेश टिळेकर उपस्थितीत होते.

चिंचवड मुकबधिर विद्यालयातील विशेष मुलांकडून शारदा रिकामे यांनी योगाची प्रात्यक्षिके करून घेतली. मोठ्या मुलांसोबत अगदी लहान मुलांनी देखील खूप सुंदर योगासने केली. अतिशय शिस्तबद्ध व अविस्मरणीय योग पाहून उपस्थित देखील भारावून गेले होते.  शरीराला रोग मुक्त ठेवण्यासाठी योगा फायदेशीर आहे. विकलांग मुलांना सदृढ आरोग्य, बुद्धी चांगली मिळावी. अपंग शरीर असले तरी त्यांचे शरीर पोलादासारखे व्हावे. यासाठी योगाचे धडे देण्यात आले.

22 Jun 2017


पालखी मुक्कामाच्या ठिकाणी उपलब्ध करून दिले स्वच्छतागृह

एमपीसी न्यूज - पालखी मुक्कामाच्या ठिकाणी होत असलेली घाण, पसरणारी दुर्गंधी आणि यामुळे निर्माण होणा-या विविध समस्यांचे मूळ असलेल्या शौचालयाच्या समस्येवर गतवर्षापासून उपाययोजनेला सुरुवात केली होती. या वर्षी मोठ्या प्रमाणात जनजागृती करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा संयोग संस्थेतर्फे निर्मलवारी यशस्वी करण्यास मोठ्या प्रमाणात कार्य करण्यात येत आहे. पालखी मार्गावर स्वच्छतागृह उपलब्ध करून दिले आहेत. तसेच पालखी मुक्कामी उघड्यावर शौचास बसू नये याबाबत 4 ते 5 हजार स्वयंसेवक प्रबोधन करत आहेत.


पालखी मुक्कामाच्या ठिकाणी होत असलेल्या घाणीमुळे नारिकांच्या आरोग्यांचा प्रश्न निर्माण होत असून पालखी सोहळा बंद करावा, अशी याचिका एका व्यक्तीने न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयानेही स्वच्छतेबाबत काळजी घेण्याचे निर्देश सरकारला दिले होते. स्वच्छतेच्या उपाययोजना कराव्यात, अन्यथा पालखी मार्गावर निर्बंध घालण्यात येतील, अशी सक्त ताकीद न्यायालयाने दिली होती.

महाराष्ट्राची पालखीची पंरपरा बंद पडू नये, धर्माला गालबोट लागू नये, यासाठी तळेगाव-दाभाडे भाजपचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी पुढाकार घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रचारक अतुल लिमये, संदीप जाधव, पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत,  देहू देवस्थानचे अध्यक्ष शिवाजी महाराज मोरे यांच्यासोबत बैठक घेण्यात आली.

व्यवस्थेबाबत संतोष दाभाडे यांनी सांगितले की, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोर्टेबल स्वच्छतागृह ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सन 2015 साली यवत आणि लोणीकाळभोर येथे स्वत: खर्च करुन 200 स्वच्छतागृह उपलब्ध करून दिली. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. संत ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीतील वारकरी कुठे राहतात, त्या गावाची माहिती घेतली. त्याचा सूक्ष्म अभ्यास करून स्वच्छतागृह उपलब्ध करून दिली. 2015 साली 37 हजार लीटर मैला 200 स्वच्छतागृहामध्ये जमा झाला होता. वारक-यांचे प्रबोधन करण्यासाठी पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वयंस्वेक तैनात केले होते, असे दाभाडे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पालखी मार्गावरील स्वच्छतागृहांसाठी यंदा 2 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. माउलींच्या पालखी मार्गावर 500 आणि तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर 300 स्वच्छतागृह गेल्यावर्षी उपलब्ध करून दिले होते. आळंदी ते सासवडपर्यंत 500 स्वच्छतागृह आणि जेजुरी ते बंडेशेगाव 700 स्वच्छतागृह ठेवले जातात. तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर 500 स्वच्छतागृह ठेवले जातात. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी 200 ते 250 स्वयंसेवक कार्यरत असतात. तर, पंढरपूरमध्ये 1 हजार 500 स्वच्छतागृह ठेवले असून 3 हजार स्वयंसेवक कार्यरत आहेत.

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन कुठे स्वच्छतागृह बसविण्यात येतील, याची सविस्तर माहिती घेतली. लोकवस्ती नाही, पाण्याची सोय नाही, अशा ठिकाणी शोषखड्डे खणले. जमा झालेला मैला शोषखड्यात टाकला. त्याचे खत निर्माण झाले असून त्याचा शेतक-यांना फायदा झाला. तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणच्या गावामधील आजारी पडणा-यांचे प्रमाण 80 ते 90 टक्यांनी कमी झाले आहे.

माउलींच्या मार्गाची आळंदी ते पंढरपूर मी जबाबदारी सांभाळत आहे. तुकाराम महाराजांच्या पालखीची देहू ते पंढरपूरपर्यंत माउली कुदले जबाबदारी पाहतात. अतुल लिमये, प्रदीप रावत, संदीप जाधव, शिवाजी महाराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे काम सुरू आहे, असेही दाभाडे यांनी सांगितले.

22 Jun 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा गुनसान शहर, दक्षिण कोरिया यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने गुनसान महापालिका तसेच गुनसान शहरामधील कारखानदार यांनी बुधवारी (दि.21) महापालिकेस भेट देवून शहरातील चालु प्रकल्पांची माहिती घेतली.

महापौर नितीन काळजे व सभागृह नेते एकनाथ पवार यांनी दक्षिण कोरियामधील कारखानदार को मिनसंग, ली सिक, अभिषेक श्रीवास्तव यांचे पुष्प गुच्छ व शाल देवून स्वागत केले.

दोन्ही शहरांमधील देवाण-घेवाण वाढविणेच्या दृष्टीने दक्षिण कोरियामधील कारखानदार को मिनसंग यांनी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये विविध उद्योग सुरु करण्यासंदर्भात महापौर काळजे यांच्याशी चर्चा केली. शहरामध्ये उद्योग सुरु करण्यास महापालिमार्फत आवश्यक सहकार्य करण्यात येईल असे, आश्वासन महापौर काळजे यांनी दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळाला दिले.

22 Jun 2017

एमपीसी न्यूज - डॉ. डी.वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बुधवारी (दि.21) आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

पिंपरी, संत तुकारामनगर येथील महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला प्राचार्या डॉ. स्नेहल अग्निहोत्री, आर्ट ऑफ लिव्हिंगचे सचिन नाईक, उपप्राचार्य डॉ. रणजित पाटील, कार्यालयीन अधिक्षक डी.डी.गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी जयवंत बाबर, शारिरीक शिक्षक चंद्रशेखर बारडोल तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सचिन नाईक यांनी योग, ध्यान, धारणा आणि प्रणायम याविषयी मार्गदर्शन केले. तसेच योगासने व ध्यानधारणेचे महत्व सर्वांना पटवून सांगितले. प्राचार्या डॉ. स्नेहल अग्निहोत्री यांनी योग साधनेचे महत्व उपस्थितांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रंसचालन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी मिनल क्षीरसागर यांनी केले.

22 Jun 2017

एमपीसी न्यूज - सकाळचे सहयोगी संपादक, ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांचे वडील माधवराव धर्माजी चिलेकर (वय 73) यांचे आज सकाळी दिर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

माधवराव चिलेकर यांच्यावर दुपारी 4 वाजता मोहननगर, चिंचवड येथील ऑटोक्लस्टर शेजारील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

21 Jun 2017


एमपीसी न्यूज - योगाने मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहते. स्मरणशक्ती देखील वाढते. याकरिता दिवसातील थोडा वेळ तरी योगा करावा, असे मत पिंपरी-चिंचवड पालिकेच्या उपमहापौर शैलजा मोरे यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड पालिका व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी प्राधिकरण येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी खासदार अमर साबळे, सभागृह नेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेविका अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, सहाय्यक आयुक्त योगेश कडूसकर, क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुरगुडे, प्रशासन अधिकारी रेखा गाडेकर, सहाय्यक आरोग्य अधिकारी एम.एम.शिंदे, योग मंडळाचे प्रभारी अतुल आर्य, जिल्हा संघटक तानाजी चौगुले, रवींद्र कुरवडे, दीपक पाटील, विनोद कोचरे, भारत स्वाभिमान संस्थेचे सभासद रमेश चौधरी, योग शिक्षक ज्योती चैतन्य, प्रताप शेटे, तसेच ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाचे मनोज देवळेकर आदी होते.

अभ्यासात प्रगती करण्यासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी विद्यार्थ्यांनी योगसाधना करावी, असे आवाहन मोरे यांनी केले. शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासाकरिता योगा सारखे दुसरे साधन नाही, असेही त्या म्हणाल्या.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, अनेक राष्ट्रांनी योगाला मान्यता देऊन त्याचा जीवनात समावेश करून घेतलेला आहे. निरोगी जीवन जगण्यासाठी नित्यनेमाने योगासने करीत रहावीत.

खासदार अमर साबळे म्हणाले की, योगविद्या ही आपली जीवनशैली आहे. या शैलीतून आपले जीवन सुखी व निरामय होऊ शकते हा संदेश फार वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी दिला आहे. योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्याचा अवलंब प्रत्येकाने करायला हवा, असेही ते म्हणाले.

21 Jun 2017


एमपीसी न्यूज - विठुरायाच्या दर्शनासाठी राज्य भरातील वारकरी पायी पंढरपूरला जातो. त्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडच्या 25 सायकलवीरांची सायकल वारीही पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाला गेली होती. या सायकलवीरांनी दोन दिवसात 235 किमीचा प्रवास करत पंढरपूर गाठले. ही वारी आळंदी येथून 17 जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता ही वारी निघाली होती.

यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी निसर्गमित्र विजय सातपुते, नगरसेवक विलास मडिगेरी, तसेच राहुल दिवटीया, संतोष होळी, संजय मते, विनायक पवार, पिंपरी-चिंचवड लायन्स क्लबचे अध्यक्ष आण्णा मटोल आदी उपस्थित होते. ती मजल दरमजल करत 18 तारखेला पंढरपूर येथे पोहोचली. यामध्ये चिमुकल्यांपासून ते प्रौढांपर्यंत एकूण 25 सायकलवीरांचा सहभाग होता. यामध्ये केवळ दोन तास झोप घेत हा प्रवास पूर्ण करण्यात आला.

याविषयी एमपीसी न्यूजशी बोलताना सुनील ननवरे म्हणाले की, दिघी येथील दत्तगड डोंगरावर श्रमदानासाठी येणा-या वृक्षमित्रांच्या एकत्र येण्यातून आमचा गट तयार झाला. त्यातून ही सायकलवारीची कल्पना सुचली. गेल्या वर्षीही आम्ही सायकलवरून पंढरपूरला गेलो होतो. त्यावर्षी केवळ 6 जण होतो. मात्र, यावेळी 25 जण होते. यामध्ये चिमुकल्यांचाही समावेश होता. त्यामुळे अननुभवी व नवखे अशी जोडगोळ करून आम्ही ही वारी पूर्ण केली. यामध्ये आम्ही केवळ सायकल चालवली नाही तर यावेळी आम्ही सायकलवारी-हरीतवारी-वृक्षलावा दारो-दारी हा संदेश नागरिकांना या वारीच्या माध्यमातून दिला.

या वारीसाठी जे सायकल चालवणारे मित्र एकत्र आले होते. ते स्वतःची नोकरी उद्योग सांभाळून रोज  30 ते 40 किमीचा सायकल सराव करत होते. नवीन सामील झालेल्या सदस्यांनाही त्यांनीच मदत केली. या वारीसाठी खास फलटणवरून अगदी साधी सायकल घेऊन पंकज शिंदे हे आवर्जून सहभागी झाले होते. तसेच या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे अर्नव व अश्मिरा या चिमुकल्यांनी पंढरपूरची वेस ते वाळवंट, असा सायकल प्रवास करून पंढरपूरकरांनाही थक्क केले.

वारीच्या निमित्ताने एकत्र येऊन सायकलिंग करणे त्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश देत सायकलवारीचीही संख्या वाढावी, अशी अपेक्षा ननवरे यांनी व्यक्त केली.

Page 1 of 43
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start