• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
23 Jun 2017

शिक्षिकांची वरिष्ठांकडे तक्रार केल्याने माझ्याविरुद्ध षडयंत्र असल्याचे मुख्याध्यापकाचा दावा

एमपीसी न्यूज - मावळातील उर्से गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने सहा शिक्षिकांचा वारंवार विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित शिक्षिकेने गुरुवारी (दि.22) दिलेल्या फिर्यादीनुसार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बाळासाहेब आनंदा लबडे (वय 45, रा. तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे), असे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या  मुख्याध्यापकाचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक एम. बी. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुख्याध्यापक बाळू लबडे हे शाळेतील सहा शिक्षिकांना मागील चार वर्षापासून अश्लील भाषेत बोलून अंगाशी लगट करणे, मोबाईलवर अश्लील संदेश पाठविणे, शिकवण्यासाठी वर्ग न देणे तसेच रजा मागण्यास गेल्यास अपमानास्पद वागणूक देत आहेत. पीडित महिला शिक्षिकेने या आरोपी मुख्याध्यापकाविरुद्ध मावळ पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी व जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून त्या आरोपींवर काहीच कारवाई झाली नाही. यामुळे या मुख्याध्यापकाची मजल वाढल्याने या पीडित महिला शिक्षिकांनी अखेर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.22) रोजी गुन्हा दाखल केला.

दरम्यान, ज्या शाळेत विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविले जाते त्याच शाळेत अशी घटना घडल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर मुख्याध्यापक बाळासाहेब लबडे म्हणाले की या महिला शिक्षिका शासकीय नियमानुसार काम करत नसल्याने त्यांची तक्रार वरिष्ठांना केल्याने माझ्याविरुद्ध षडयंत्र रचले आहे.

मावळ पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी संजय तांबे म्हणाले की, लबडे यांची जिल्हा निरंतर शिक्षण विभागाकडून चौकशी केली आहे.

मावळ गटविकास अधिकारी निलेश काळे म्हणाले की, मुख्याध्यापक बाळासाहेब लबडे यांनी प्रशासकीय चौकशी केली असून आता तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

23 Jun 2017


एमपीसी न्यूज - तळेगाव चाकण रोड येथील भंडारा डोंगर पायथ्याला प्रवाशांसाठी निवारा शेड नसल्याने प्रवाशांचे, भाविकांचे तसेच विद्यार्थ्यांचे कडाक्याच्या उन्हामुळे आणि पावसाळ्यात प्रचंड हाल होत असून येथे निवारा शेडची मागणी होत आहे. भंडारा डोंगरावर येणाऱ्या पर्यटक व भाविकांची वर्दळ वर्षभर मोठ्या प्रमाणात असते परंतु सर्वांकडे खासगी वाहनांची सोय नसल्याने बरेचसे भाविक हे सार्वजनिक वाहनाने प्रवास करत असतात. त्यामुळे बऱ्याच प्रवाशांना कडक उन्हात ताटकळत उभे राहून वाहनांची वाट पाहावी लागते. उन्हाळ्यासह पावसाळ्यात प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असतात, अशी माहिती स्थानिक नागरिक सोपान कराळे, राजेंद्र टिळेकर, अरुण कराळे, शैलेंद्र चव्हाण यांनी दिली.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी हजारो अभंगांची गाथा निर्माण केली, असा भंडारा डोंगर  हा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचलित आहे. तसेच या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातून भाविक व पर्यटक भेट देत असतात.

माघ शुद्ध दशमी सोहळा, तुकाराम बीज, पालखी प्रस्थान सोहळा, एकादशी व इतर यात्रा काळात भंडारा डोंगर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ असते तसेच तळेगाव चाकण परिसरातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे व शैक्षणिक संस्थांमुळे परिसरातील कामगार वर्ग, विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी कडक उन्हात ताटकळत वाहनांची वाट पाहत उभे असतात ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणी निवारा शेडची गरज निर्माण झाली आहे.

23 Jun 2017

एमपीसी न्यूज - मावळातील आंबी येथील वारकरी संप्रदायातील व शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि हभप गोरखनाथ घोजगे यांच्या मातोश्री श्रीमती सोनाबाई शंकरराव घोजगे (वय 86) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पाच मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. वडगाव मावळ बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड मच्छिंद्रनाथ घोजगे व भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष रामनाथ घोजगे यांच्या त्या मातोश्री होत.

22 Jun 2017


एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील स्वर्गिय मोहम्म्द रफी फॅन्स क्लबच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते भास्कर  भेगडे पाटील यांची सलग तिस-यांदा  फेरनिवड करण्यात आली आहे.

क्लबचे संस्थापक, माजी नगरसेवक सूर्यकांत काळोखे यांच्या अध्यक्षतेखाली सन 2017-18 साठी नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली.

कार्यकारिणी- अध्यक्ष-भास्कर भेगडे पाटील, उपाध्यक्ष-अनिल धर्माधिकारी, सरचिटणीस- नितीन खळदे, खजिनदार-सतिश देशपांडे, कार्यकारिणी सदस्य-ब्रिजेंद्र किल्लावाला, बाळासाहेब लोणकर, किरण मोकाशी, राजेंद्र जगताप, बाबा चौरे, दिलीप व्यास, वैशल शाह, सुभाष वाळुंज सूर्यकांत काळोखे यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.

22 Jun 2017


एमपीसी न्यूज -  नवी दिल्ली तसेच राज्यभरात जबरी चोरी, खंडणी मागणे, दरोडा, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या सात जणांच्या टोळीला तळेगाव पोलिसांनी आज (गुरुवारी) पहाटे दोनच्या सुमारास अटक केली आहे.

अविनाश अरुण खंडागळे (वय. 22), कैलास लक्ष्मण चांदणे (वय 23), संतोष सुंदर घुणे (वय 23), संदीप कचरू भालेराव (वय 27), सचिन रतन कांबळे (वय 20), बाळकृष्ण ज्ञानेश्वर मंडलीक (वय 25), प्रदीप ज्ञानेश्वर मंडलीक (वय 22), सर्व रा. ता. नेवासा, जिल्हा अहमदनगर) सर्वांवर संवेदनशील खून, अपहरणासह दरोडा व खंडणी, बलात्कार, असे गंभीर गुन्हे दाखल  असल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलसिंग हे लोणवळ्याहून पुण्याकडे त्यांच्या कारने कुटुंबासह येत असताना पहाटे दोनच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावर झोप येत असल्यामुळे चेहऱ्यावर पाणी मारण्यासाठी थांबले. यावेळी 5 ते 7 आरोपींनी येऊन कोयता व चाकूचा धाक दाखवून धमकावून त्यांच्याकडून 5 हजार रुपये रोख व सोने, असा सुमारे 50 हजारांचा ऐवज चोरी केला. याबाबत उर्से टोल नाका येथे असलेल्या पोलीस कर्मचा-याला फिर्यादींनी माहिती दिली. व त्यांची मुलगी आजारी असल्यामुळे ते दवाखान्यात निघून गेले.

अवघ्या 3 तासात सातही दरोडेखोरांना केले अटक

अगदी नाट्यमयरित्या तळेगाव पोलिसांनी अवघ्या तीन तासात सलग पाठलाग करत या सातही आरोपींना अटक केले आहे. फिर्यादींनी सांगितलेल्या वर्णनानुसार पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे व कर्मचारी यांच्यासह खासगी वाहनांनी शोध घ्यायला सुरुवात केली. यावेळी आरोपी पळून गेले होते. मात्र, त्यापैकी एक आरोपी गाडीत बसू न शकल्याने तो रस्त्याच्या बाहेर डोंगरात पळून गेला.

पोलिसांनी शोध थांबविल्याचे नाटक करून ते माघारी फिरले. त्यावेळी रचलेल्या सापळ्यानुसार राहिलेल्या आरोपीस घेण्यासाठी त्याचे साथीदार आले. यावेळी आयआरबीच्या क्रेनमध्ये बसून पेट्रोलिंग चालू ठेवली. त्या दरम्यान तो आरोपी रस्त्यावर दिसून आला त्यास ताब्यात घेतला व त्याच्या मोबाइलवरून त्याच्या साथीदारांना घेण्यास बोलाविले. दरम्यान, या टोळीचा प्रमुख प्रदीप मंडलिक हा पळून जाताना पुलावरून उडी मारल्याने त्याचे दोन्ही पाय फॅक्चर झाले. त्यानेही त्याच्या साथीदारांना फोन करून बोलावले. त्यामुळे पोलिसांनी आयआरबीच्या अॅम्ब्युलन्समध्ये पकडलेल्या साथीदारासह पळून गेलेल्या दरोडेखोरांचा शोध घेत असताना एक दरोडेखोर त्यांच्या सेन्ट्रो कारने राहिलेल्या आरोपीस घेण्यासाठी आला. यावेळी त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.  त्याच्या सांगण्यावरून उरलेल्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी त्यांच्याच सॅन्ट्रो कारमध्ये बसून त्यांनाही ताब्यात घेतले अवघ्या 3 तासात सातही दरोडेखोरांना गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार व हत्यारानिशी जेरबंद केले आहे.

गेल्या आठवड्यात याच ठिकाणी अशाच एका कुटुंबाला याच दरोडेखोरांनी लुटले होते. वरील आरोपींपैकी काही आरोपींवर नवी दिल्ली, अहमदनगर, बुलढाणा, पुणे ग्रामीण येथे दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी भारतीय हत्यार कायदा बलात्कार यांसारखे गुन्हे दाखल असून सरविस्तर माहिती घेऊन मोकाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे करत आहेत.

22 Jun 2017


एमपीसी न्यूज - आयुष्यात एकदा तरी चार धामचा प्रवास करावा, असे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे. त्यानुसार मावळातील तीन मित्रांनी हा खडतर प्रवास मोटारसायकलवरून हा प्रवास 15 दिवसात केला. वडगाव मावळ येथील भारत भ्रमण या मोटारसायकल ग्रुपच्या गणेश तांबे, मनोज जाधव व अश्रफ शेख या तीन मित्रांनी हा प्रवास केला.

दुर्गम बर्फाच्छादित निसर्ग आविष्काराचे लोभस दर्शन घडविणाऱ्या भारतातील सर्वाधिक खडतर यात्रा मोटारसायकलने प्रवास करण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीतून या तिघा मित्रांनी 5 हजार 200 किमीचा प्रवास यशस्वी व सुरक्षितरित्या पार केला. या प्रवासात त्यांनी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश लोकांपर्यंत पोहोचविला.

वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज व जोगेश्वरी माताचे दर्शन  घेऊन प्रवासाला सुरुवात केली पुढे मुंबई-अहमदाबाद -जयपूर -दिल्ली, हरिद्वार-गंगोत्री-यमुनोत्री-केदारनाथ-बद्रीनाथ-अशा या खडतर मार्गाने चारधाम यात्रा पूर्ण करून पार्टीच्या मार्गाने नैनिताल-आग्रा -इंदोर -धुळे या मार्गाने वडगाव मावळमध्ये सुरक्षितरित्या पोहोचले  या प्रवासात चारधाम म्हणजे देवभूमी असलेल्या संपूर्ण उत्तराखंड हा खरोखरच देव भूमी असल्याचा अनुभव आला त्या ठिकाणी लोक खरोखरच खूप प्रेमळ व सहकार्य करणारी असल्याचा अनुभव वेळोवेळी आल्याचे तिघांनी सांगितले.

निसर्गातील विविधता त्यातील आनंद, पाण्याचे महत्व तसेच लोकांच्या राहणीमानात विविधता, भाषा बदल देवाने निसर्गातून आपल्याला काय, किती आणि कसे दिले आहे. याचे महत्व जाणून आपण निसर्गाची काळजी घ्यायला हवी, असा संदेश ही त्यांनी या प्रवासातून नागरिकांना दिला.

भारत भ्रमण या मोटारसायकल ग्रुपने यापूर्वी वडगाव मावळ ते कन्याकुमारी, असा संपूर्ण भारतभ्रमण प्रवास मोटारसायकलने पूर्ण केला आहे. तसेच वेळोवेळी झाडे लावा झाडे जगवा व स्वच्छतेचे महत्व, असा संदेश त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे भारत भ्रमण करत असताना भेटणाऱ्या प्रत्येक लोकांची मदत व कौतुकाची थाप त्यांना मिळाल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

21 Jun 2017


इंदोरीतील अतुल राऊत यांचा उपक्रम

एमपीसी न्यूज- वाढदिवस म्हटले की केक, पार्टी, फिरायला जाणे, असे आजच्या तरुणाईचे समीकरणच बनलेले असते. मात्र, या सा-या अनावश्यक गोष्टींना फाटा देत  वडगाव मावळ येथील स्मित कला रंजन या संस्थेचे अध्यक्ष आणि युवा सामाजिक कार्यकर्ते अतुल चंद्रकांत राऊत यांनी मात्र त्यांच्या जन्मदिनी 20 अनाथ बालकांना किराणा मालाची  भेट दिली आहे.

याप्रसंगी अतुल राऊत, संस्थेचे संस्थापक संजय चव्हाण, विजय बलदोटा, भूषण मुथा, शंकर साकोरे, गिरीश गुजराणी, प्रसाद बिराजदार, प्रसाद देवघरे, स्वराज चव्हाण, हर्षल ढोरे, पिंटू कोकाटे, श्रीकांत महामुनी आदी उपस्थित होते.

मावळ येथील कै. दादू इंदोरीकर, इंद्रायणी अंध अनाथ कल्याण केंद्रातील 20 बालकांना ही भेट देण्यात आली. त्यामुळे अनाथालयाने व त्या चिमुकल्यांनीही राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचे आभार मानले. कारण जन्मदिनी वायफळ खर्च न करता त्या पैशातून या अनाथ मुलांना राऊत व त्यांच्या सहकार्यांनी आनंद देऊ केला.

20 Jun 2017


तळेगाव स्टेशनचा पाणी प्रश्न सोडविल्याचा भाजप-जनसेवा विकास आघाडीचा दावा

एमपीसी न्यूज - इंद्रायणी पाणी योजनेची सर्व विकासकामे पूर्ण झाली असून आजपासून (मंगळवार) तळेगाव स्टेशन विभागात दररोज पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा सुरू झाला आहे. या योजनेच्या सक्षमीकरणामुळे मुबलक पाणी मिळणार असले तरी नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहन पाणी समितीचे सभापती तथा उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी केले आहे.

बहुप्रतिक्षेत असलेली इंद्रायणी पाणी योजना सक्षमीकरणानंतर आज कार्यान्वित झाली, त्यावेळी झालेल्या समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे होत्या.

दरम्यान, सकाळी इंद्रायणी पंपहाऊसवर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेविका, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचा-यांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात आले. माजी नगराध्यक्षा व नगरसेविका सुलोचना आवारे आणि विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे यांनी नवीन एक्स्प्रेस फीडरशी संलग्न मोटारचे बटन दाबून पाणी उपश्याचा शुभारंभ केला.

त्यानंतर इंद्रायणी जलशुध्दीकरण केंद्रावर झालेल्या समारंभात बोलताना उपनगराध्यक्ष तथा पाणी-पुरवठा समितीचे अध्यक्ष सुनील शेळके यांनी या नूतनीकृत योजनेची माहिती दिली. इंद्रायणी योजनेच्या नूतनीकरणासाठी पाच कोटी खर्च प्रस्तावित असताना ठेकेदार विजय राक्षे यांनी ते केवळ दोन कोटी रुपये खर्चात पूर्णत्वास नेल्याबद्दल त्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. शेळके म्हणाले की, ही योजना कार्यान्वित झाल्याने भाजपा, जनसेवा विकास समिती, आरपीआय महायुतीने निवडणुकीदरम्यान पाणी प्रश्नाबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली आहे. याचे श्रेय एकजुटीने सर्वांनी मिळून केलेल्या प्रयत्नांना त्यांनी दिले.

नूतन योजनेमुळे आता स्टेशन भागात दररोज 11 एमएलडी पाणी साठविता येणार आहे. एक्स्प्रेस फीडरमुळे अखंड वीजपुरवठा सुरू राहणार असून इंद्रायणी उपसा केंद्रावरून विनाव्यत्यय पाणी उपसा करता येणार आहे. पर्यायी पाईपलाईनसाठी माई नीलिमा खांडगे आणि दिलीप खांडगे परिवाराने जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल उपनगराध्यक्षांनी त्यांचे विशेष आभार मानले.

नगरसेवक गणेश खांडगे म्हणाले की, निवडणुकीतील वचनांची पूर्तता वेळेत केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जनसेवा विकास समितीने चांगले काम करण्यासाठी घेतलेल्या कठोर भूमिकेस सुनील शेळके यांनी चांगला प्रतिसाद देत इंद्रायणी योजनेचे काम केवळ पाच महिन्यात पूर्णत्वास नेले. स्टेशनचा पाणीप्रश्न एक वर्षात सोडविण्याचा शब्द आम्ही पूर्ण करू शकलो, याचा विशेष आनंद आहे.

सभागृहनेते सुशील सैंदाणे यांनी महायुतीने केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. ते म्हणाले की, सर्वभागात समाधानकारक पाणीपुरवठा झाल्यानंतर दोनवेळा मीटर पध्दतीने पाणी देण्यास प्राधान्य द्यावे. मुख्याधिकारी यांनी देखील ठाम भूमिका घेत सुसंवादातून ही योजना वेळेत पूर्ण करण्याचे काम केले आहे. उपनगराध्यक्ष शेळके यांचे खास अभिनंदनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, उद्योजक बाळासाहेब शेळके, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, विरोधीपक्ष नेत्या हेमलता खळदे, नगरसेविका सुलोचनाताई आवारे, अनिता पवार, शोभा भेगडे, मंगल भेगडे, वैशाली दाभाडे, नीता काळोखे, कल्पना भोपळे, संध्या भेगडे, प्राची हेंद्रे, काजोल गटे, भाजपा शहराध्यक्ष संतोष दाभाडे, नगरसेवक संग्राम काकडे, संदीप शेळके, अमोल शेटे, सचिन टकले, इंदरमल ओसवाल, संतोष शिंदे, अरूण भेगडे, माजी नगरसेवक गणेश भेगडे तसेच वैशाली जामखेडकर, चारूशीला काटे, आशुतोष हेन्द्रे, सुधाकर शेळके, अतुल मराठे, मुख्याधिकारी वैभव आवारे, अभियंता प्रसाद जगताप, विजय राक्षे, आर. डी. शिंदे, हिरामण लांडे, विनोद धुमाळ, अनिल टकले, राजू तुमकर, एम.डी.सोनपावले आदी उपस्थित होते. माजी नगराध्यक्षा सुलोचनाताई आवारे यांनी आभार मानले.

विशेष सहकार्याबद्दल कृतज्ञता

इंद्रायणी पाणी योजनेच्या पाईपलाईनसाठी जागेचा बिकट प्रश्न सोडविताना थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे-पाटील यांच्या कन्या निलिमा(माई) खांडगे आणि दिलीप खांडगे परिवाराने स्वत:ची जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल उपनगराध्यक्षानी त्यांचे खास आभार मानले. नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, सुशील सैंदाणे, गणेश खांडगे आणि संतोष दाभाडे यांनी पाणी समितीच्या सभापतीपदाला न्याय देण्याचे काम सुनील शेळके यांनी सक्षमपणे केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

16 Jun 2017


वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यपदी गराडे यांची निवड

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील निसर्गप्रेमी निलेश गराडे यांच्या वृक्ष लागवड, संवर्धन आणि संगोपनाची तळेगाव नगरपरिषदेने दखल घेत त्यांची नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये निवड करण्यात आली आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने पर्यावरणाची निगा राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन केली आहे. ही समिती झाडे लावणे, वाढवणे आणि त्यांचे संरक्षण करण्याचे काम करते. तळेगाव परिसरात निलेश गराडे यांनी वृक्ष लागवडीचे तसेच पर्यावरणाची योग्य निगा राखण्याचे उत्तम काम केले आहे. त्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे, असे नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी सांगितले.

गराडे यांनी यापुढेही वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे काम करत राहावे यासाठी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

16 Jun 2017


एमपीसी न्यूज - जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर सर्व काही शक्य असते, याची प्रचिती मावळ तालुक्यातील इंदोरी मधील श्री साई फ्रेन्डस् सर्कल संचलित वगसम्राट कै. दादू इंदोरीकर इंद्रायणी अंध-अनाथ कल्याण केंद्रातील चार विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशावरून दिसून येते. डोळस विद्यार्थ्यांनाही लाजवेल अशा पद्धतीचे यश दहावीच्या परीक्षेत मिळविले आहे. रोहित वाघमारे या विद्यार्थ्याने 81 टक्के, नरसिंग भोईनवाड याने 80 टक्के, योगेश तुपलोंढे याने 80 टक्के तर गणेश बजबळकर याने 79 टक्के, असे गुण मिळविले आहेत.

इंद्रायणी अंध-अनाथ केंद्रातील चार विद्यार्थी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित इंदोरी येथील प्रगती विद्या मंदिर या शाळेत शिकत होते. चांगले गुण मिळविण्याची जिद्द मनात ठेवून या चौघांनीही शाळेत आणि केंद्रात प्रारंभापासूनच अभ्यासात सातत्य ठेवले व घवघवीत यश संपादन केले. हे विद्यार्थी मूळचे लातूर, नाशिक व पुणे जिल्ह्यातील आहेत.

मुख्याध्यापक दशरथ ढमढेरे, पर्यवेक्षक बलभीम भालेराव, वर्गशिक्षक चंद्रकांत धनवे, सर्व विषय शिक्षक तसेच केंद्राचे व्यवस्थापक जयसिंग हिरे यांचे योग्य मार्गदर्शन लाभले, असे विद्यार्थी सांगतात.

संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, सचिव संतोष खांडगे, शालेय समितीचे अध्यक्ष दामोदर शिंदे, सुरेशभाई शहा, इंद्रायणी अंध-अनाथ केंद्राचे संस्थापक अध्यक्ष संजय चव्हाण, उपाध्यक्ष राजेंद्र मुनोत व पदाधिका-यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Page 1 of 20
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start