• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
16 Jun 2017


एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील आदर्श विद्या मंदिर शाळेची प्राजक्ता संदीप देवरे ही विद्यार्थीनी दहावीच्या परीक्षेत 98 टक्के गुण मिळवून तळेगाव शहरासह मावळ तालुक्यात पहिली आली आहे.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. कृष्णकांत वाढोकर, उपाध्यक्ष यादवेंद्र खळदे, सचिव डॉ. दत्तात्रय बाळसराफ, मुख्याध्यापक प्रकाश शिंदे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, जितेंद्र खळदे, विशाल वाळुंज, संजय कसाबी यांच्यासह अनेकांनी प्राजक्ताच्या घरी जाऊन तिचे अभिनंदन केले.

तळेगाव शहरात मराठी माध्यमाच्या पाच शाळा व इंग्रजी माध्यमाच्या सहा शाळांमधून एकूण 1 हजार 14 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 988 विद्यार्थी उत्तीर्ण तर 26 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. तळेगाव शहराचा निकाल 97.43 टक्के लागला आहे. मराठी माध्यमाच्या शाळेतील प्राजक्ता देवरे हीने 98 टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला असून शहरात दहावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे.

तसेच शहरात सरस्वती विद्यालयाच्या शंतनू देवेंद्र हळदवणेकर याने 96 टक्के गुण मिळवून तळेगाव शहरात द्वितीय क्रमांक मिळविला. तर रामभाऊ परुळेकर विद्या निकेतनचा रोहित मच्छिंद्र घोजगे 95.40 टक्के गुण मिळवून शहरात तृतीय क्रमांक मिळविला. 

मराठी माध्यमाच्या आदर्श विद्या मंदिरचा निकाल 100 टक्के लागला असून इंग्रजी माध्यमाच्या जैन इंग्लिश स्कूल, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, कांतिलाल शाह विद्यालय, डॉ. अण्णासाहेब चोभे हायस्कूल व कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

16 Jun 2017
एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील इंदोरी येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित प्रगती विद्या मंदिर या शाळेचा यावर्षीचा दहावीचा निकाल 96 टक्के लागला आहे. पूजा हरिसिंग कुशवाह या  विद्यार्थीनीने  97.40 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मिहीरा शिवाजी काशिद 94.80 टक्के गुण मिळवून विद्यालयात द्वितीय तर धीरज प्रवीण राऊत 92.72 टक्के गुण मिळवून तृतीय आला आहे.
 
प्रथम क्रमांक मिळवलेली पूजा कुशवाह या विद्यार्थिनीने प्रतिकुल परिस्थितीवर मात करत हे यश संपादन केले आहे. तिची आर्थीक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून वडील गवंडीकाम करतात. पूजाने नववीमध्ये एमटीएस परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत 27 वा क्रमांक मिळवला होता. तर दहावीमध्ये असताना एनटीएस परीक्षेत राज्यात चौथा क्रमांक मिळविला आहे.
 
मुख्याध्यापक दशरथ ढमढेरे, पर्यवेक्षक बलभीम भालेराव, वर्गशिक्षक मच्छिंद्र बारवकर, ज्येष्ठ अध्यापक लक्ष्मण मखर, पांडुरंग कापरे तसेच सर्व विषय शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभले असे पूजा सांगते.
 
संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, सचिव संतोष खांडगे, शालेय समितीचे अध्यक्ष दामोदर शिंदे, पालक सदस्य सुरेश शहा यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
15 Jun 2017

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी स्कूलच्या दहावीच्या पहिल्याच बॅचच्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेत नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. त्यानिमित्त संस्थेतर्फे आज (गुरूवार) गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक बाळासाहेब शेळके तर प्रमुख पाहुणे आमीन खान होते. तसेच यावेळी व्यासपीठावर सरस्वती विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, उद्योजक संतोष शेळके, निवृत्त पोलीस उपअधीक्षक भास्करराव मोरे, प्रभाकर तुमकर, दत्तात्रय निम्हण, संजय शेळके, रंगनाथ बोरकर, उप-प्राचार्या रंजना जोशी, सुपरवायझर फिओना मेंडोसा, क्रीडा शिक्षक विशाल मोरे, मल्लेश बिरादार आदी उपस्थित होते.

कार्तिकी प्रभाकर तुमकर या विद्यार्थीनीने शाळेत पहिला क्रमांक मिळविला आहे. तिचा सत्कार मावळ समृद्ध समाचारचे संपादक आमीन खान यांच्या हस्ते करण्यात आला. व्दितीय क्रमांक मिळविलेल्या यशराज श्रीकृष्ण गव्हाणेचा सत्कार बाळासाहेब शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच तिस-या क्रमांकावरील मंजुळा मल्लपा बिरादार, चौथा आलेला इमॅन्यूल वैभव घाटे आणि पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या प्रथमेश नंदकुमार गुंजाळ यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

ज्या शाळेने आपणास ज्ञानदानातून यशाचा मार्ग दाखविला त्या मार्गावरून जाताना स्वत:बरोबरच इतरांना देखील अभिमान वाटावा, असे कार्य विद्यार्थ्यांनी करावे, असे मत आमीन खान यांनी व्यक्त केले. आई-वडील आणि गुरुजनांविषयी कृतज्ञतेची भावना अखेरपर्यंत ठेवणारेच यशाची शिखरे सर करू शकतात, असे मत सुरेश झेंड यांनी व्यक्त केले.

प्राचार्या रंजिता थंपी यांनी प्रास्ताविकात यशस्वी विद्यार्थी, त्यांचे शिक्षक आणि संस्थाचालकांनी एकदिलाने केलेल्या प्रयत्नांचे हे फल असल्याचे सांगितले. माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येत असलेल्या मल्लसम्राट सचिनभाऊ शेळके क्रीडा संकुल व प्रबोधिनीतर्फे गुणवंत खेळाडूंना दत्तक घेणार असल्याची घोषणा संतोष शेळके यांनी यावेळी केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तेजश्री अभ्यंकर यांनी मानले.

15 Jun 2017


एमपीसी न्यूज - झाडे लावा, झाडे जगवा'चा जागर करून पर्यावरण संवर्धन रक्षणासाठी शासकीय स्तरापासून ते सामाजिक संघटनांपर्यंत व्यापक प्रमाणात प्रयत्न होत असले तरी, दुसरीकडे अवैध वृक्षतोड सुरूच आहे. निसर्गसंपन्नतेने बहरलेल्या भंडारा डोंगर परसिरात काही दिवसांपासून थोड्या फार प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचा प्रकार समोर येत आहे.


प्रशासन जास्त वृक्षतोड होण्याची वाट बघत आहे का? यात वाढ न होण्यासाठी प्रशासनाने आधीच काही खबरदारी घेणे आवश्यक नाही का? असा प्रश्न स्थानिक नागरिकांमधून केला जात आहे. भंडारा डोंगर तसेच परिसरात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली आहे. डोंगराचा परिसर  वनसंपदेने बहरला आहे. आपला राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांची संख्या देखील डोंगरावर मोठ्या प्रमाणात आहे. वृक्षतोडीमुळे डोंगरातील मोरांचा वावर आजूबाजूच्या शेतांमध्ये वाढताना दिसत आहे आणि भटकी कुत्रीसुद्धा डोंगरामध्ये वावरताना दिसत असल्यामुळे मोरांना त्यापासून धोका वाढत आहे.

घनदाट वृक्षांमुळे डोंगराचे सौंदर्य बहरले असल्याने हा परिसर पर्यावरणप्रेमींच्या तसेच भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात या परिसरात जॉगिंग करण्यासाठी रोज सकाळी मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. जॉगिंग करताना सोपान कराळे, राजेंद्र टिळेकर, अरुण कराळे, शैलेंद्र चव्हाण या जागरूक नागरिकांच्या निदर्शनास वृक्षतोडीचा प्रकार आला.

दुपारच्या सुमारास काही लोक ही वृक्षतोड करीत असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. तर, रात्रीच्या वेळेस तोडलेली झाडे सरपण (इंधन) म्हणून नेली जातात. वृक्षतोडीमुळे वनसंपदा तसेच प्राणिसंपदा देखील धोक्यात येण्याची शक्यता असल्यामुळे वृक्षलागवडीबरोबर त्याच्या संरक्षणाची सुद्धा गरज निर्माण झाली आहे.

15 Jun 2017


एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी लहान मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेले डोरेमॉन आणि मिकी माउस विद्यार्थ्यांच्या स्वागताला हजर होते. लहान मुलांमध्ये शाळेची आवड निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम करण्यात आला.

शाळाबाह्य विद्यार्थी किंवा नियमित विद्यार्थ्यांच्या मनात शाळेविषयी आवड व्हावी. यासाठी काही शाळांमध्ये पहिल्या दिवशी प्रभात फेरी काढली जात आहे. काही शाळांमध्ये आणखी विविध उपक्रम घेतले जात आहेत. त्याच धर्तीवर कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलने देखील अनोखा उपक्रम राबविला. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना डोरेमॉन आणि मिकी माउसने फुगे आणि टोप्या देऊन स्वागत केले.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या मनावर एक प्रकारे दडपण आलेले असते. शाळेत येण्यासाठी मन कुचरत असते. अशा वेळी घरची फार आठवण येते. भरपूर मुलांसोबत असूनही एकटे वाटते. काही चेहरे ओळखीचे तर काही अनोळखी वाटतात. काही मुले बळजबरीने वर्गात बसतात, तर काही विद्यार्थी अक्षरशः डोळ्यातून अश्रूंना वाट मोकळी करून देतात.

14 Jun 2017

1 कोटी 66 लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्याचे आमदार संजय भेगडे यांनी टंचाई आराखडा जिल्हाधिका-यांकडे सादर केला होता. त्या आराखड्यास दोन टप्प्यांमध्ये मंजुरी मिळाली असून एकूण 1 कोटी 66 लाख रुपयांच्या पाणीपुरवठा व विंधन विहिरींच्या विकास कामांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी मिळाली आहे.

मूळ टंचाई आराखड्यानुसार 34 अस्तित्वातील विंधन विहिरींची कामे सुरुवातीला पूर्ण करण्यात येणार असून 11 नळपाणी पुरवठा योजनेच्या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. ही कामे तालुक्यातील कान्हे, कामशेत, लष्करवाडी (वडेश्वर), मिंडेवाडी (नवलाख उंब्रे), पवळेवाडी (कल्हाट), सुदवडी, नाणे, उकसान पुनर्वसन, वळख, घोणशेत आणि कुसूर या गावांमध्ये करण्यात येणार आहेत. या कामांची अंदाजपत्रकीय रक्कम कोटी, 34 लाख, 25 हजार रुपये आहे.

पुरवणी टंचाई आराखड्यानुसार 56 नवीन विहिरी आणि 15 अस्तित्वातील विंधन विहिरींना सुधारण्याचे काम करण्यात येणार आहे. नवीन विंधनविहिरी व अस्तित्वातील विंधन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामासाठी अंदाजपत्रकीय रक्कम 31 लाख, 75 हजार रुपये आहे, अशी एकूण मावळ तालुक्यातील टंचाई आराखड्यासाठी 1 कोटी 66 लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजूर करण्यात आला आहे.

वरील कामे योग्य रितीने लवकर पार पडण्याचा मानस असून कामांची पूर्तता झाल्यानंतर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी चांगली मदत होणार आहे, अशी माहिती मावळ तालुक्याचे आमदार संजय भेगडे यांनी दिली.

14 Jun 2017

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. मावळ भागातील एकूण 72 शाळांपैकी 13 शाळांचा निकाल 100 टक्के लागला असून त्यामध्ये या शाळेचा देखील समावेश आहे.

कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या नरेंद्र हरदेवराम मुहाल या विद्यार्थ्याने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 92.40 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. नेहा विश्वभंर बोडके हिने 92 टक्के गुण मिळवून व्दितीय तर ज्योती संजयकुमार यादव व अथर्व अनील तानकर यांनी प्रत्येकी 88.80 टक्के गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक मिळविला.

संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत काकडे, शाळा अध्यक्ष संदीप काकडे, डॉ. दिलीप भोगे, प्रा. अनिल तानकर राजश्री म्हस्के, गौरी काकडे, मुख्याध्यापिका मीना अय्यर, वर्गशिक्षिका निशा थॉमस यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये अनुराग ईश्वर ढगे या विद्यार्थ्याने 85.80 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. प्रिया सुनील पाटीलने 84.20 टक्के गुण मिळवून द्वितीय, तर सोनाली बाळासाहेब जाधव हिने 80.00 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. संस्थेचे अध्यक्ष संतोष खांडगे, सचिव मिलींद शेलार, शालेय समितीच्या अध्यक्षा रजनीगंधा खांडगे, मुख्याध्यापिका शमशाद शेख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


तळेगाव दाभाडे येथील 4 शाळांचा निकाल 100 टक्के

> कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल
> स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल
> जैन इंग्लिश स्कूल
> डॉ. आण्णासाहेब चोबे हायस्कूल ​

13 Jun 2017

एमपीसी न्यूज - मोटार कारची काच पुसण्यासाठी थांबलेल्या चालकाला  चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून बार तोळे सोन्याचे दागिने व रोख दहा हजार रूपये असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना आज (मंगळवारी)  पहाटे चारच्या सुमारास मुंबई – पुणे द्रुतगतीमार्गावर उर्से टोलनाक्याजवळ घडली.

पोलीस  सुत्रांनी  दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल उत्तम सिरसाठ (वय २४ रा. एरोली नवी मुंबई) हे त्यांच्या पत्नीसह स्कॉर्पियो (एमएच ४३ एजे ७४७३) गाडीतून मुंबई येथून सातारा येथे जात होते. त्यांची गाडी उर्से (ता.मावळ) हद्दीत मुंबई – पुणे द्रुतगतीमार्गावर उर्से टोलनाक्याजवळ आली असता, गाडीच्या समोरील काच धूसर झाल्याने पुसण्यासाठी  ते थांबले. त्यावेळी अज्ञात चार चोरट्यांनी राहुल सिरसाठ त्यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून बार तोळे सोन्याचे दागिने व रोख दहा हजार रुपये  असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल  लाबवला.

 या  संदर्भात राहूल शिरसाठ  यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर करीत आहे.

13 Jun 2017

एमपीसी न्यूज - सुदवडी (ता. मावळ) हद्दीत सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास मावळ परिसरात आलेल्या दमदार पावसात मेंढपाळांच्या कळपात वीज पडून एका कुत्र्यासह सुमारे ४५ शेळ्या व मेंढ्यांचा मृत्यू झाला तर अनेक शेळ्या व मेंढ्या गंभीर व किरकोळ जखमी झाल्या. अंधार व पाऊस पडत असल्याने पोलीस व तलाठ्यांना पंचनामा करता आला नाही. सुमारे साडे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. जखमी शेळ्या व मेंढ्या उपचार करण्यास अडचणी आल्याने मृत्यूंचा आकडा वाढण्याची शक्यता, सुदैवाने मेंढपाळ बचावले.

 

पोलीस उपनिरीक्षक अरविंद हिंगोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू गोपाळा शिंगोटे व आबू गोपाळा शिंगोटे ( मूळ रा. पारनेर जि. अहमदनगर) यांचे शेळ्या व मेंढ्यांचा कळप असून ते सायंकाळी सुदवडी (ता. मावळ) हद्दीत मुक्कामाला राहिले होते. सायंकाळी दमदार पावसाला सुरुवात झाली त्यावेळी अचानक वीजेचा लखलखाट हिवून वीज शेळ्या व मेंढ्यांचा कळपावर पडली. यात एका कुत्र्यासह सुमारे ४५ शेळ्या व मेंढ्यांचा मृत्यू झाला तर अनेक शेळ्या व मेंढ्या गंभीर व किरकोळ जखमी झाल्या. गंभीर व किरकोळ जखमी शेळ्या व मेंढ्या उपचार करण्यास अडचणी आल्याने मृत्यूंचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सुदैवाने मेंढपाळ बचावले पण आयुष्याची मेहनत डोळ्यादेखत संपल्याने ही करुण कहाणी सांगताना त्यांचे दुःख अनावर झाले.

 

घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अरविंद हिंगोले, पोलीस कर्मचारी प्रशांत सोरटे, सचिन काचोळे व तलाठी निंबाळकर आदी पोहचले, पण अंधार व पाऊस पडतअसल्याने मृत शेळ्या व मेंढ्या विखुरल्याने अडथळा निर्माण झाला. स्वतःच्या पोराबाळाप्रमाणे सांभाळलेल्या शेळ्या व मेंढ्यांचा डोळ्या देखत मृत्यू झाल्याने सुमारे साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाल्याने हतबल झाले. या अस्मानी संकटाची नुकसानभरपाई कधी मिळेल असा प्रश्न केला. मेंढपाळांचा संसार उघड्यावर पडल्याने तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

12 Jun 2017

आमदार बाळा भेगडे यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

एमपीसी न्यूज - सुकाणू समिती आणि सरकार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार महाराष्ट्र शासनाने शेतक-यांची तत्वतः सरसकट कर्जमाफी केल्याबद्दल मावळ तालुका भाजपच्या वतीने राज्य शासनाचे अभिनंदन करण्यात आले. मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

राज्यातील शेक-यांच्या विविध मागण्यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने नेमलेल्या उच्चस्तरीय मंत्रीगट समितीने रविवारी  शेतक-यांच्या विविध संघटनेच्या नेत्यांशी मुंबईमध्ये बैठक घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या व त्यावर चर्चा केली व यामध्ये शासनाच्या कर्जमाफी करण्याच्या या सकारात्मक भूमिकेचे मावळ तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी व शेतक-यांनी पोटोबा महाराज मंदिर वडगाव मावळ येथे जल्लोषात स्वागत करून आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी आमदार बाळा भेगडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व शासनाचे आभार मानले व अभिनंदन केले. यावेळी सभापती गुलाबराव म्हाळसकर, प्रशांत ढोरे, नितीन मराठे, एकनाथराव टिळे, शांताराम काजळे, बाळासाहेब घोट्कुले, अनंता कुडे, बाळासाहेब काळोखे, संतोष दाभाडे, अरुण भेगडे, नंदाताई सातकर, सुधाकर ढोरे, बाबूलाल गराडे, संतोष जांभूळकर, सूर्यकांत सोरटे, बाळासाहेब ढोरे, संभाजी म्हाळसकर, महेंद्र म्हाळसकर, किरण भिलारे, किरण म्हाळसकर, सुमित्राताई जाधव व आदि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Page 2 of 20
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start