• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
14 Jun 2017

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. मावळ भागातील एकूण 72 शाळांपैकी 13 शाळांचा निकाल 100 टक्के लागला असून त्यामध्ये या शाळेचा देखील समावेश आहे.

कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या नरेंद्र हरदेवराम मुहाल या विद्यार्थ्याने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 92.40 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. नेहा विश्वभंर बोडके हिने 92 टक्के गुण मिळवून व्दितीय तर ज्योती संजयकुमार यादव व अथर्व अनील तानकर यांनी प्रत्येकी 88.80 टक्के गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक मिळविला.

संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत काकडे, शाळा अध्यक्ष संदीप काकडे, डॉ. दिलीप भोगे, प्रा. अनिल तानकर राजश्री म्हस्के, गौरी काकडे, मुख्याध्यापिका मीना अय्यर, वर्गशिक्षिका निशा थॉमस यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये अनुराग ईश्वर ढगे या विद्यार्थ्याने 85.80 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. प्रिया सुनील पाटीलने 84.20 टक्के गुण मिळवून द्वितीय, तर सोनाली बाळासाहेब जाधव हिने 80.00 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. संस्थेचे अध्यक्ष संतोष खांडगे, सचिव मिलींद शेलार, शालेय समितीच्या अध्यक्षा रजनीगंधा खांडगे, मुख्याध्यापिका शमशाद शेख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


तळेगाव दाभाडे येथील 4 शाळांचा निकाल 100 टक्के

> कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल
> स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल
> जैन इंग्लिश स्कूल
> डॉ. आण्णासाहेब चोबे हायस्कूल ​

13 Jun 2017

एमपीसी न्यूज - मोटार कारची काच पुसण्यासाठी थांबलेल्या चालकाला  चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून बार तोळे सोन्याचे दागिने व रोख दहा हजार रूपये असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना आज (मंगळवारी)  पहाटे चारच्या सुमारास मुंबई – पुणे द्रुतगतीमार्गावर उर्से टोलनाक्याजवळ घडली.

पोलीस  सुत्रांनी  दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल उत्तम सिरसाठ (वय २४ रा. एरोली नवी मुंबई) हे त्यांच्या पत्नीसह स्कॉर्पियो (एमएच ४३ एजे ७४७३) गाडीतून मुंबई येथून सातारा येथे जात होते. त्यांची गाडी उर्से (ता.मावळ) हद्दीत मुंबई – पुणे द्रुतगतीमार्गावर उर्से टोलनाक्याजवळ आली असता, गाडीच्या समोरील काच धूसर झाल्याने पुसण्यासाठी  ते थांबले. त्यावेळी अज्ञात चार चोरट्यांनी राहुल सिरसाठ त्यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून बार तोळे सोन्याचे दागिने व रोख दहा हजार रुपये  असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल  लाबवला.

 या  संदर्भात राहूल शिरसाठ  यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर करीत आहे.

13 Jun 2017

एमपीसी न्यूज - सुदवडी (ता. मावळ) हद्दीत सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास मावळ परिसरात आलेल्या दमदार पावसात मेंढपाळांच्या कळपात वीज पडून एका कुत्र्यासह सुमारे ४५ शेळ्या व मेंढ्यांचा मृत्यू झाला तर अनेक शेळ्या व मेंढ्या गंभीर व किरकोळ जखमी झाल्या. अंधार व पाऊस पडत असल्याने पोलीस व तलाठ्यांना पंचनामा करता आला नाही. सुमारे साडे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. जखमी शेळ्या व मेंढ्या उपचार करण्यास अडचणी आल्याने मृत्यूंचा आकडा वाढण्याची शक्यता, सुदैवाने मेंढपाळ बचावले.

 

पोलीस उपनिरीक्षक अरविंद हिंगोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू गोपाळा शिंगोटे व आबू गोपाळा शिंगोटे ( मूळ रा. पारनेर जि. अहमदनगर) यांचे शेळ्या व मेंढ्यांचा कळप असून ते सायंकाळी सुदवडी (ता. मावळ) हद्दीत मुक्कामाला राहिले होते. सायंकाळी दमदार पावसाला सुरुवात झाली त्यावेळी अचानक वीजेचा लखलखाट हिवून वीज शेळ्या व मेंढ्यांचा कळपावर पडली. यात एका कुत्र्यासह सुमारे ४५ शेळ्या व मेंढ्यांचा मृत्यू झाला तर अनेक शेळ्या व मेंढ्या गंभीर व किरकोळ जखमी झाल्या. गंभीर व किरकोळ जखमी शेळ्या व मेंढ्या उपचार करण्यास अडचणी आल्याने मृत्यूंचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सुदैवाने मेंढपाळ बचावले पण आयुष्याची मेहनत डोळ्यादेखत संपल्याने ही करुण कहाणी सांगताना त्यांचे दुःख अनावर झाले.

 

घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अरविंद हिंगोले, पोलीस कर्मचारी प्रशांत सोरटे, सचिन काचोळे व तलाठी निंबाळकर आदी पोहचले, पण अंधार व पाऊस पडतअसल्याने मृत शेळ्या व मेंढ्या विखुरल्याने अडथळा निर्माण झाला. स्वतःच्या पोराबाळाप्रमाणे सांभाळलेल्या शेळ्या व मेंढ्यांचा डोळ्या देखत मृत्यू झाल्याने सुमारे साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाल्याने हतबल झाले. या अस्मानी संकटाची नुकसानभरपाई कधी मिळेल असा प्रश्न केला. मेंढपाळांचा संसार उघड्यावर पडल्याने तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

12 Jun 2017

आमदार बाळा भेगडे यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

एमपीसी न्यूज - सुकाणू समिती आणि सरकार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार महाराष्ट्र शासनाने शेतक-यांची तत्वतः सरसकट कर्जमाफी केल्याबद्दल मावळ तालुका भाजपच्या वतीने राज्य शासनाचे अभिनंदन करण्यात आले. मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

राज्यातील शेक-यांच्या विविध मागण्यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने नेमलेल्या उच्चस्तरीय मंत्रीगट समितीने रविवारी  शेतक-यांच्या विविध संघटनेच्या नेत्यांशी मुंबईमध्ये बैठक घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या व त्यावर चर्चा केली व यामध्ये शासनाच्या कर्जमाफी करण्याच्या या सकारात्मक भूमिकेचे मावळ तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी व शेतक-यांनी पोटोबा महाराज मंदिर वडगाव मावळ येथे जल्लोषात स्वागत करून आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी आमदार बाळा भेगडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व शासनाचे आभार मानले व अभिनंदन केले. यावेळी सभापती गुलाबराव म्हाळसकर, प्रशांत ढोरे, नितीन मराठे, एकनाथराव टिळे, शांताराम काजळे, बाळासाहेब घोट्कुले, अनंता कुडे, बाळासाहेब काळोखे, संतोष दाभाडे, अरुण भेगडे, नंदाताई सातकर, सुधाकर ढोरे, बाबूलाल गराडे, संतोष जांभूळकर, सूर्यकांत सोरटे, बाळासाहेब ढोरे, संभाजी म्हाळसकर, महेंद्र म्हाळसकर, किरण भिलारे, किरण म्हाळसकर, सुमित्राताई जाधव व आदि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

11 Jun 2017

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघाच्या आयटी व सोशल मीडिया प्रमुखपदी वडगाव मावळ येथील काँग्रेसचे निष्ठावंत युवा कार्यकर्ते सिद्धेश राजाराम ढोरे यांची निवड करण्यात आली.  

          
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख भूपेंदरसिंग गुप्ता यांनी ढोरे यांची निवड केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी आमदार रमेश बागवे, आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख भूपेंदरसिंग गुप्ता आदी उपस्थित होते. मुंबईतील दादर येथील टिळक भवनातील कार्यक्रमात ढोरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. सिद्धेश ढोरे हे काँग्रेस पक्षाचे एक निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून परिचित असून ते अभियांत्रिकी पदवीधर आहेत.

11 Jun 2017

तळेगाव पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - तळेगाव रेल्वेस्थानक परिसरात दुचाकीवरून जाणा-या तिघांकडून तळेगाव पोलिसांनी तीन कोयते व दोन चॉपर जप्त केले आहेत. ही कारवाई काल (शनिवारी) रात्री आठच्या सुमारास केली.

सुनील साहेबराव देशमुख (वय. 26 रा. बालाजी मंदिरापाठीमागे, तळेगाव, मुळचा पूसद यवतमाळ) राजू दत्तू मराठे (वय 19 रा. मावळवाडी, मावळ) परशुराम शंकर केसापूर (वय 19 रा. समता कॉलनी वराळे, मावळ), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.

तळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव रेल्वेस्थानक परिसरात घातक हत्यार घेऊन तिघे मोटर सायकलवरून येणार असल्याची बातमी मिळताच पोलिसांनी रात्री आठच्या सुमारास सापळा रचत तिघांना अटक केले. यावेळी त्यांच्याकडून तीन कोयते व दोन चॉपर व एक दुचाकी, असा 21 हजार 700 रुपयांचा ऐवज जप्त केला. या तिघांनाही वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता न्यालयाने 23 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी पुढील तपास पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे करत आहेत.  

10 Jun 2017

एमपीसी न्यूज - भारतीय जनता युवा मोर्चा तळेगाव दाभाडे शहरतर्फे आज (शनिवार) महावितरण कार्यालयावर "हल्ला बोल" आंदोलन करण्यात आले. महावितरणने दोन दिवसांमध्ये जर वीजपुरवठा सुरळीत नाही केला तर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.

तळेगाव दाभाडे भागातील काही भागांमध्ये वीजपुरवठा नियमित होत नसल्याने परिसरातील नागरिकांची वीजेवाचून हेळसांड होत असल्याने आंदोलन करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले. यावेळी युवा मोर्चाचे अध्यक्ष विनायक भेगडे, कार्याध्यक्ष गोकुळ किरवे, उपाध्यक्ष सागर खोल्लम, सरचिटणीस संदीप सावंत, चिटणीस शैलेश बेल्हेकर, गौरव गुंड, संघटक सुनील कांबळे, सारंग साळवेकर व परिसरातील पीडित नागरिक उपस्थित होते.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तळेगाव महावितरण कार्यालयास निवेदन देण्यात आले.

10 Jun 2017

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथे पक्ष कार्यालयात पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या बैठकीत वडगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य विलास लक्ष्मण दंडेल यांची वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेशअप्पा ढोरे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.


याप्रसंगी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, मा ता रा काँ सहकार सेलचे अध्यक्ष सुभाष जाधव,आंदर मावळ रा काँ अध्यक्ष मंगेश ढोरे, मा जि प समाज कल्याण सभापती आतिष परदेशी, जिल्हा परिषद सदस्या शोभाताई कदम, कुसुमताई काशिकर, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय शेवाळे, सुनिल ढोरे, अमोल केदारी, शुभांगी राक्षे, गंगाधर ढोरे, चंदुकाका ढोरे, बारकू ढोरे राहुल ढोरे अफताब सय्यद मंगेश खैरे,चंद्रजीत वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकीत या आधीचे अध्यक्ष राजेंद्र कुडे यांनी पक्षाच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविली होती. त्यामुळे त्यांची 6 वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. तेव्हापासून ही जागा रिक्त होती. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सर्व युवक कार्यकर्ते व जेष्ठांचा समन्वय घडवून सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आणि नागरीकांचे शासकीय, निमशासकीय प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

09 Jun 2017


एमपीसी न्यूज - वटपौर्णिमा हा सण महिलावर्गासाठी खूप उत्साहात असतो. मात्र, याच सणाच्या दिवशी जर तुमचे 10 ते 15 तोळे वजनाचे गंठण चोरीला गेले तर नक्कीच सावित्रींना सात जन्माची आठवण राहील. अशाच घटना काल तळेगाव, वडगाव मावळ, चाकण या परिसरात घडल्या.

देहूगाव येथेही काल एका महिलेच्या गळ्यातील 5 लाख 70 हजार रुपयांचे तब्बल 19 तोळे सोने चोरीला गेले. तर वडगावमावळ येथेही 17 तोळे सोने चोरांनी लाबंवले तसेच चाकण येथेही एका महिलेचे 2 लाख किमतीचे 10 तोळे सोन्याचे गळ्यातील दागिने हिसकावले, तर तळेगावातही 5 तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले.

या सर्व प्रकारात चोरी करण्याची पद्धत एकच होती. दोन अज्ञात इसम तोंडाला रुमाल बांधून मोटारसायकलवरून येतात. त्यातील सर्वात पाठीमागचा गळ्यातील दागिने हिसकावतो व ते पळून जातात. काही ठिकाणी त्यांच्या गाडीवर गाडी क्रमांकही नव्हता. त्यामुळे कालची वटपौर्णिमा महिलांना सोनसाखळी चोरांमुळे चांगलीच महागात पडली आहे.

याबाबत एमपीसी न्यूजशी बोलताना देहूरोड पोलीस उपअधीक्षक जी.एस.माडगुळकर म्हणाले की, सोनसाखळी चोरांना पकडण्यासाठी आमचे पाच जणांचे विशेष पथक तयार केले आहे. परिसरात गस्तही चालू आहे, ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे. तसेच लग्न किंवा सण अशा ठिकाणी विशेष फौजफाटा तैनात केला जात आहे. अद्याप कोणासही अटक झालेली नाही.

तरीही आमची नागरिकांना विनंती आहे विशेष करून महिला वर्गाला की बाहेर जाताना अंगावर अधिक दागिने घालणे टाळावे, सोनसाखळी चोरी होताच त्वरीत पोलिसांना कळवावा, असे आवाहनही माडगुळकर यांनी केले. महिला वर्गानेही लग्न किंवा सण साजरे करत असताना आपल्या दागिन्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा वटपौर्णिमेप्रमाणे  लग्नसमारंभ महागात पडू शकतो.

09 Jun 2017

 

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा काल (गुरुवार, दि. ८) रोजी पार पडला. स्थानिक खासदार, आमदार व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत परिसरात विविध विकास कामे करण्यात आली आहेत. 

कुडेवाडा ते डेक्कन हिल्स रस्ता डांबरीकरण, आमदार फंडातून पंचायत समिती चौक व पोटोबा महाराज मंदिर प्रांगण हायमास्ट दिवे लावणे, जिल्हा परिषद फंड व पंचायत समिती फंडातून अंकुश शिंदे ते प्रमोद म्हाळसकर यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण, आमदार फंडातून वडगाव दफनभूमी संरक्षण भिंत काम, खासदार फंडातून कुडेवाडा येथे बस थांबा अशा विविध कामांचे लोकार्पण करण्यात आले.
 
लोकार्पण सोहळ्यासाठी मावळ भागाचे खासदार श्रीरंग बारणे, मावळ तालुक्याचे आमदार बाळा भेगडे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, भाजपा प्रभारी भास्कर म्हाळसकर, अॅड. तुकाराम काटे, अॅड. विजय जाधव, प्रभारी सरपंच संभाजी म्हाळसकर, किरण भिलारे, कल्पना चव्हाण, सुशीला ओव्हाळ, दीपाली म्हाळस्कर, चंद्रशेखर भोसले, प्रवीण चव्हाण, बाळा म्हाळसकर, नंदकुमार चव्हाण, दादा वाघवले, नंदकुमार दंडेल, राणी म्हाळसकर, रुपाली कुडे, अनंता कुडे, मनोज ढोरे, नारायण ढोरे, प्रवीण पवार, रमण ढोरे, प्रसाद पिंगळे, डी. एस. शिरसाट आदी उपस्थित होते.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर ढोरे यांनी केले. नितीन कुडे यांनी आभार व्यक्त केले. बंद असलेली विकास कामे पुढील काळात लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे संभाजी म्हाळसकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
Page 3 of 20
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start