• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
08 Jun 2017

एमपीसी न्यूज - शासन नियमांचे पालन न करता विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची विक्री करणा-या तळेगाव शहरातील शैक्षणिक संस्थांवर कारवाई करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते तथा नगरसेवक अरूण माने यांनी नगर परिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी लक्ष्मण गुळवे यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

माने यांनी निवेदनात म्हटले आहे की, अनुदानित व विनाअनुदानित मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांना पुस्तके, गणवेश आदी शैक्षणिक साहित्याची विद्यार्थ्यांना विक्री करण्यास शासनाने मनाई केली आहे, असे असतानाही तळेगाव शहरातील काही शाळा नियमांचे पालन करीत नाहीत, अशा शैक्षणिक संस्थावर  कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शहरातील काही शाळा ठराविक दुकानांमधून गणवेश, पुस्तके, वह्या, दप्तर आदी शैक्षणिक साहित्य खरेदी करावे, याची सक्ती करीत आहेत. ठाराविक दुकानातूनच बूट, मोजे घेण्याचीही सक्ती करीत आहेत. त्यामुळे पालकांचे आर्थिक शोषण होत असून ही बाब गंभीर आहे. सर्व शाळांची चौकशी होऊन दोषी शाळांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनाची दखल घेत प्रशासन अधिकारी गुळवे यांनी शहरातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांकडे यासंदर्भात सविस्तर अहवाल मागवला आहे. दोषी शाळांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. प्रशासन अधिकारी गुळवे यांनी वेगाने सुत्रे हलविली आहेत. यामुळे अनेक संस्था चालकांचे धाबे दणाणले आहे.

08 Jun 2017

एमपीसी न्यूज - नागरिकांची कामे वेळेत व्हावीत यासाठी कामगारांनी शिस्तीचे पालन करावे. नागरिकांच्या कार्यालयीन समस्या सोडविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावे. कामकाजात तत्परता व  सुरळीतपणा यावा यासाठी सर्वांनी शिस्तीचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी केले आहे.

याबाबत जगनाडे यांनी प्रसिद्धीपत्रकातून माहिती दिली आहे. यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन बायोमेट्रीक मशिनद्वारे करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी  हालचाल रजिस्टरचा वापर करणे बंधनकारक आहे. अन्यथा त्याचा परिणाम वेतनावर होणार आहे. शासकीय नियमानुसार कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी पावणेदहा ते सायंकाळी पावणेसहापर्यंतची असून, प्रत्येक कर्मचा-यांनी भोजनाची वेळ धरून दररोज किमान आठ तास काम करावे, असे बंधन घालण्यात आले आहे. तीन वेळेस उशीर झाल्यास कर्मचा-यांची एक किरकोळ रजा खर्ची पडणार आहे.

जे कर्मचारी कार्यालयीन आदेशाचा भंग करतील, त्यांच्यावर  महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 79 व महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 अन्वये कारवाई करण्याचे आदेश नगराध्यक्षा जगनाडे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्याची अपेक्षा सर्वसामान्य  नागरिक  व्यक्त करीत आहेत. या आदेशाने कामचुकार अधिकारी व कर्मचा-यांचे धाबे दणाणले आहे. यापूर्वीही नगरपरिषदेत बायोमेट्रीक मशिनवर हजेरीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, काही कामगारांनी जाणून बुजून बायोमेट्रीक मशिन नादुरूस्त केली होती. याची पुनरावृत्ती  पुन्हा होण्याची शक्यता नगर परिषद वर्तुळात ऐकायला मिळत होती.

08 Jun 2017


एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथे वडाचे पूजन करून परतणा-या महिलेच्या गळ्यातील 16 तोळ्यांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी हिसका मारून चोरून फरार झाले आहे. ही घटना आज (गुरुवार) दुपारी 3.00 वाजण्याच्या सुमारास खंडोबा मंदिर येथे घडली. याप्रकरणी महिलेचे पती उद्योजक गणेश राजेंद्र वहिले यांनी फिर्याद दिली आहे.

विजया वहिले, असे दागिने चोरीला गेलेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजया या आज दुपारी तीनच्या वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाची पूजा करून परत येत होत्या. यावेळी खंडोबा मंदिर येथून रस्ता ओलांडत असताना काळ्या रंगाच्या पल्सर गाडीवरील दोन अज्ञात इसमांनी वहिले यांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढला. चोरीला गेलेले दागिने जवळपास 16 तोळ्यांचे होते.
पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

08 Jun 2017


वडगाव मावळ पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर वडगाव मावळ पोलिसांनी कारवाई करत 34 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारावाई आज (गुरुवारी) सकाळी अकरा वाजता करण्यात आली. यामध्ये तीन्ही चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याप्रकरणी गाडी मालक श्रीकांत बाळासाहेब चांदेकर (वय 28 रा. वडगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडगाव पोलिसांना गुटखा पुण्याकडे रवाना होणार असल्याची बातमी मिळाली त्यानुसार सापळा रचत पुणे-मुंबई महामार्गावर पुण्याकडे येणारा एमएच 12 सीएन 44 99, एमएच 12 ईडी 93 65 व एमएच 12 एसडी 34 41 या एक आयशर टेम्पो व दोन छोटे टेम्पो अशा तीन गाड्यांमधून गुटख्याची वाहतूक केली जात होती. यावेळी पोलिसांनी तिन्ही गाड्यातून  34 लाख 20 हजार रुपयांचा 200 पोत्यातील गुटखा जप्त केला. यामध्ये गाडीच्या तिन्ही चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

वडगाव मावळ पोलीस ठाण्यात अवैध गुटखा विक्रीस नेल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

08 Jun 2017


एमपीसी न्यूज - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेच्या कार्यकारिणी सदस्या व 14 व्या महाराष्ट्र राज्य बाल नाट्य अंतिम फेरी स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेत्या ‘हॅलो ब्रदर’ नाटकाच्या लेखिका, दिग्दर्शिका, प्रकाश योजनाकार नयना अभय डोळस यांची नाटककार गोविंद बल्लाळ देवल स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात बाल रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्यासाठीच्या देण्यात येणा-या  'अ.सी.केळुस्कर’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे.


बुधवार (दि. 14) रोजी सायंकाळी 5.00 वाजता यशवंत नाट्यगृह, माटुंगा, मुंबई येथे होणा-या पुरस्कार वितरण सोहळ्यात  सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य व विद्यमान नाट्य संमेलन अध्यक्ष जयंत सावरकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.

नयना डोळस यांना गेल्या वर्षी पायवाट या लघुचित्रपट निर्मिती बद्दल राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. त्यांनी अनेक बालनाट्य लिहून सादर केली आहेत व त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले आहे. नयना डोळस तळेगाव येथील जय वकील स्कूलच्या मुख्याध्यापिका आहेत.

08 Jun 2017


एकही व्यापारी अथवा शेतकरी बाजारात आला नाही

एमपीसी न्यूज - वडगाव शहर काँग्रेस आय कमिटीच्या वतीने शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी या आठवड्यात काल (बुधवार) आणि आज (गुरुवार) आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. या संपाला प्रतिसाद देत परिसरातील सर्व शेतक-यांनी संप पाळला.

वडगाव मावळ येथे प्रत्येक बुधवार आणि गुरुवार असा आठवड्यातील दोन दिवस आठवडे बाजार भरतो. या बाजारासाठी वडगावच्या आसपासच्या 15-20 खेड्यांमधून शेतकरी आणि व्यापारी आपला शेतमाल घेऊन विकण्यासाठी येत असतात. वडगाव मावळच्या आठवडे बाजारात एकही शेतकरी अथवा व्यापारी आपला शेतमाल घेऊन आला नाही. त्यामुळे बाजार रिकामा दिसत होता.

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी संपावर गेला आहे. राजकीय वर्तुळातील काही हालचालींमुळे संप काही प्रमाणात आटोक्यात आला असून मागील आठवड्यात अगदी बंद पडलेल्या बाजारपेठा काही प्रमाणात सुरू होत आहेत. संप काही प्रमाणात मागे घेतला असला तरी बाजार समित्यांना कोट्यावधीचा तोटा सहन करावा लागला आहे. सर्व नागरिकांना बळीराजाचे अस्तित्व आता कुठे जाणवू लागले आहे.

08 Jun 2017

रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचा उपक्रम

एमपीसी न्यूज - तळेगाव-चाकण रस्ता अतिशय वर्दळीचा असून याठिकाणी रस्त्यालगत वाहने लावली जातात. यामुळे या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होते ही समस्या लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीच्या वतीने तळेगाव परीसरात नो पार्किंगचे फलक बसवण्यात आले. याचे उद्गाटन नुकतेच तळेगाव स्टेशन येथे तळेगावचे पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील आणि क्लबचे संथापक अध्यक्ष रो. विलासराव काळोखे यांच्या हस्ते करण्यात आले.

 


यावेळी पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी रोटरी सिटी करत असलेल्या सामाजिक कामांचे कौतुक करून नो पार्किंगच्या फलक बसवल्याने आभार मानले. यावेळी रोटरी क्लब सिटीचे संस्थापक अध्यक्ष रो.विलास काळोखे, उपाध्यक्ष रो.शशिकांत हळदे, सेक्रेटरी रो.नितीन शहा, डायरेक्टर रो.हरिषचंद्र गटसिंग, दिलीप पारेख, संजय मेहता, दादासाहेब उर्हे, सुरेश धोत्रे, मनोज ढमाले, बाळासाहेब रिकामे, विश्वास कदम, सचिन भांडवलकर, केशव मोहोळ, दिलीप डोळस आदी उपस्थित होते.

07 Jun 2017


एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथे दर आठवड्याच्या बुधवार आणि गुरुवार रोजी भरणारा आठवडे बाजार येत्या आठवड्यात बंद ठेवण्याचे आवाहन वडगाव शहर काँग्रेस आय कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.


देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी संपावर जात असून या संपाला पाठिंबा देण्यासाठी आज (बुधवार, दि. 7) व उद्या (गुरुवार, दि. 8) रोजी वडगाव मावळ येथे भरणारा आठवडे बाजार या आठवड्यात बंद ठेवण्यात येणार असल्याचे वडगाव शहर काँग्रेस आय कमिटीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांनी सांगितले. बाजारपेठेतील जवळपास सर्व व्यवहार शेतक-यांवर अवलंबून असतात. त्यामुळे आठवडे बाजार एक आठवडा बंद ठेवून शेतकरी राजाच्या संपाला आपण पाठिंबा देऊ, असे ढोरे म्हणाले.

आठवडे बाजार बंदचे संयोजन मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पंढरीनाथ ढोरे, वडगाव ग्रामपंचायत सदस्य मयूर ढोरे, प्रवीण ढोरे आणि रोहिदास गराडे यांनी केले असून वडगाव शहर काँग्रेस आय कमिटी, वडगाव शहर युवक काँग्रेस आय कमिटी यांनी पाठिंबा दिला आहे.

06 Jun 2017


एमपीसी न्यूज - मावळते सरपंच सुवर्णा प्रफुल्ल शिंदे यांनी पक्षश्रेष्ठींनी ठरविल्याप्रमाणे सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत नंदा घोजगे यांचा केवळ एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या प्रसंगी उपसरपंच नंदकुमार घोजगे,  सुवर्णा शिंदे, वामन वारींगे, किसन शिंदे, जितेंद्र घोजगे, मेघा बनसोडे, सुवर्णा नखाते, बायडाबाई गराडे, जयश्री लंके, सरसेनापती उमाबाई दाभाडे पतसंस्थेचे अध्यक्ष समीर दाभाडे, वडगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड मच्छिंद्रनाथ घोजगे, पतसंस्थेचे माजी अध्यक्ष आण्णा दाभाडे, भानुदास दरेकर, शिवाजी पवार, रामनाथ घोजगे, नारायण दरेकर, मारूती घोजगे, दत्ता घोजगे, देविदास पोटवडे, धोंडिभाऊ घोजगे, शंकर गाडे, पिराजी दरेकर आदी उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्कल डी. बी. गवारे यांनी काम पाहिले. गाव कामगार तलाठी सहाय्यक चंद्रकांत पशाले व ग्रामसेवक रूपाली व्यवहारे यांनी सहकार्य केले.

06 Jun 2017


एमपीसी न्यूज - वडगाव मावळ ग्रामपंचायतच्या सरपंच अर्चना विलास भोकरे यांचे मागील आठवड्यात निलंबन करण्यात आले. रिक्त झालेल्या सरपंच पदावर काल (सोमवार) वडगाव मावळ ग्रामपंचायत सदस्य संभाजी म्हाळसकर यांच्याकडे सरपंचपदाची सूत्रे सोपविण्यात आली. तसेच पक्षप्रतोद पदावर उपसरपंच सुधाकर ढोरे यांची नेमणूक करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्यता सुशीला ओव्हाळ, ज्येष्ठ नेते सोपान ढोरे, पंत पिंगळे, बाळा म्हाळसकर, चंद्रकांत ढोरे, गंगाधर ढोरे, बंडोपंत भेगडे, दामोदर भंडारी, चंद्रकांत भोसले, भाऊसाहेब ढोरे, नितीन ओव्हाळ, महेंद्र म्हाळसकर, रमेश ढोरे, निलेश म्हाळसकर, अनंता कुडे, सोमनाथ काळे, गणेश भेडगे, अजय भवार, वसंतराव भिलारे, शामराव ढोरे, बंडोपंत धर्माधिकारी, संजय काकडे, किरण म्हाळसकर, नंदकुमार दंडेल, शरद मोरे, मिलिंद चव्हाण आदी उपस्थित होते.

वडगाव मावळ ग्रामपंचायतच्या सरपंच अर्चना विलास भोकरे यांच्यावर सरकारी जागेत अतिक्रमण करून घराचे बेकायदा बांधकाम व घरात वैयक्तीक शौचालय नसल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य किरण भिलारे यांनी केली होती. त्यानुसार प्रभारी जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी भोकरे यांचे ग्रामपंचायत सदस्यपद अपात्र ठरवत त्यांचे सरपंचपद रद्द केले होते.

सरपंच पदाचा पदभार ग्रहण करताच बंद पडलेल्या विविध सेवा त्वरित सुरु करण्यात येणार आहेत. कर्मचारी हजेरीसाठी बंद पडलेली बायोमेट्रिक मशीन सुरु करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या जुन्या दप्तराच्या स्कॅनिंगचे काम सुरु करून पारदर्शक कारभारासाठी जमा खर्चाचा अहवाल जनतेसमोर सादर करण्यात येणार आहे. बंद पडलेली सारथी सेवा पुन्हा सुरु करण्यात येणार, कर आकारणी ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात येणार, ग्रामसचिवालयाचे बंद पडलेले काम सुरु करण्यात येणार असल्याचे म्हाळसकर यांनी सांगितले.

पंचायत समितीचेज सभापती गुलाब म्हाळसकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. किसान संघाचे शहर अध्यक्ष नारायण ढोरे व उपाध्यक्ष दीपक पावर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य किरण भिलारे यांनी केले. ग्रामपंचायत सदस्य नितीन कुडे यांनी आभार व्यक्त केले.

Page 4 of 20
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start