• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
06 Jun 2017

महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

 

एमपीसी न्यूज - जागतिक मानवाधिकार जनजागरण समिती, अखिल भारतीय सेना, जोशी असोसिएट्स आणि पायोनियर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मातृदिनाचे औचित्य साधून तळेगाव येथील 10 महिलांना आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

स्वरात नगरी येथे महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजप शहर अध्यक्ष संतोष दाभाडे, दिलीप राजगुराव, डॉ. गणेश नांदेडकर, अखिल भारतीय सेना तालुकाध्यक्ष बाळकृष्ण पोटवडे, अॅड.कृष्णा शहाणे, जिल्हा परिषद सदस्य शोभा कदम, साधना कुमारी, डॉ. ताराचंद कराडे, एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार, पत्रकार अतुल पवार आदी उपस्थित होते.

महिला आरोग्य तपासणी शिबिरात पायोनियर हॉस्पिटलच्या वतीने 100 पेक्षा अधिक महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमात 10 आदर्श मातांना 'आदर्श माता पुरस्कार' प्रदान करण्यात आला. माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे, नगरसेविका मंगला भेगडे, माजी नागराध्य्क्षा संगीता धोत्रे, आभाळ माया अनाथ आश्रमाच्या शांताबाई येवले, माई आश्रमाच्या प्रतीक्षा देशपांडे, मावळ वार्ताच्या वार्ताहर संतोषी तोंडे, पार्वती राजगुरव, कला क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्याबद्दल सारिका जाधव, अखिल भारतीय सेनेच्या सरचिटणीस आशा गवळी, नगरसेवक गणेश खांडगे यांच्या मातोश्री तिलोत्तमा खांडगे यांना आदर्श माता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन प्रदीप नाईक, संतोष जाचक यांनी केले. मधुराणी असवले यांनी आभार व्यक्त केले.

05 Jun 2017


एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील ज्या गावांचा समावेश आदर्श ग्राम योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्या गावांनी आपले आदर्श ग्राम विकास आराखडे 30 जूनपर्यंत जमा करावेत, असे मावळ तालुक्याचे आमदार बाळा भेगडे यांनी सांगितले.


आज (सोमवार) रोजी आदर्श ग्राम योजनेंतर्गत समाविष्ट झालेल्या गावातील ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांची बैठक तहसील कार्यालयात संपन्न झाली. त्या बैठकीत आमदार भेगडे बोलत होते. यावेळी तहसीलदार रणजीत देसाई, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, गटविकास अधिकारी निलेश काळे, अतिरिक्त गटविकास अधिकारी गुजर साहेब, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आदर्श ग्राम योजनेत मावळ तालुक्यातील येळसे, माळेगाव खुर्द, ओव्हळे, उकसान, मोर्वे, खडकाळा, चिखलसे या गावांचा समावेश करण्यात आला असून सदर गावातील नागरिकांच्या विकास कामांच्या सूचना लक्षात घेऊन तसा विकास आराखडा 30 जूनपर्यंत सादर करण्यात यावा, अशा सूचना आमदार भेगडे यांनी त्या गावाचे ग्रामसेवक यांना दिल्या. तसेच गावांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य यांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

05 Jun 2017

श्रीरंग कलानिकेतनने केला 16 तासांचा अभिनव संगीत यज्ञ

एमपीसी न्यूज - तळेगावच्या श्रीरंग कलानिकेतन संस्थेने आपला 32 वा वर्धापन दिन, 16 तासांचा संगीत यज्ञ सोहळा करून उत्साहात साजरा केला. तळेगावातील 60 हून अधिक ज्येष्ठ युवा व बाल कलाकारांचा सहभाग असलेला हा संगीत यज्ञ तळेगावातील सांस्कृतिक क्षेत्रात एक मानदंड ठरला आहे.


यज्ञाची सुरुवात तळेगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश काकडे व जेष्ठ संगीतकार विश्वास पाटणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी कलाकार किरण परळीकर, प्रकाश जोशी, लीना परगी, बाल कलाकार धनश्री शिंदे, विलास रानडे, श्रीनिवास कुलकर्णी मयूर पाटील, प्रणव केसकर, विनया केसकर, अश्विनी परांजपे, राजीव कुमठेकर, स्वप्नील झळकी, सम्राट काशीकर, संगीतकार विनायक लिमये, अक्षय देशपांडे आदी उपस्थित होते.

किरण परळीकर यांची गझल 'त्या अजनबी प्रियेला' तर मयूर पाटीलचे 'पंढरीचे भूत' ने रसिकांचे मन जिंकून घेतले. मयूर पाटीलने 'खंडेरायाच्या लग्नाला' आणि प्रणव केसकरने 'स्वर आले दुरुनी' याला प्रेक्षकांनी विशेष दाद दिली.

वर्धापन दिनाच्या दुस-या सत्राचे उद्घाटन संगीत अभ्यासक डॉ. रवींद्र घांगुर्डे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे आणि साप्ताहिक अंबरचे संपादक व गायक सुरेश साखवळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी गायिका आणि संगीत अभ्यासक संपदा थिटे व त्यांच्या शिष्यांच्या वैदिक साम गायन सादर केले. गायक विनोद भूषण आल्पे यांनी रामकली राग सादर केला आणि शास्त्रीय संगीताची मैफिल चांगलीच रंगली.

गायिका वैजयंती बागुल यांनी कलावती राग सदर केला. श्रिया वेल्हाळ व अमेय बिच्चू, अमेय देशपांडे, वैष्णव चव्हाण, सुजित लोहार या कलाकारांनी संगीत यज्ञात आपल्या कलेच्या समिधा अर्पण केल्या. संगीत क्षेत्रातील विविध प्रयोग करणारे श्रीरंगचे संस्थापक शरद जोशी यांनी विविध वाद्यांना एकत्र आणून प्रत्येक वाद्यांच्या वैशिष्ट्यानुसार रचना तयार करून त्या वाद्याचे एकल आणि एकत्रित सादरीकरण केले.

संगीत यज्ञाच्या तिस-या सत्रात नाट्य संगीताच्या समिधा अर्पण करण्यात आल्या या सत्राचा आरंभ कलाक्षेत्रात ज्यांचे नाव सर्वप्रथम आदराने घेतले जाते अशा मावळ विभूषण, कलापिनी विश्वस्त डॉ. अनंत परांजपे व तळेगावचे नाव महाशीर मत्स्य प्रकल्पामुळे भारतभर पोहचवणारे शशांक ओगले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले.

नाट्य संगीत सत्रात तळेगावचे कीर्तनकार शेखर व्यास, तळेगावची स्वरसंपदा संपदा थिटे, मधुकर वन, अद्वैत वेलणकर यांनी घेई छंद मकरंद,  लागी कलेजवा कटार, संपदा थिटेने विकल मन आज व नाही मी बोलत या पदांवरचे कीर्ती ढेंबे –पेडणेकर चे बहारदार नृत्य सादर केले. मधुरा वेलणकरांचे 'पहा ही परमेशाची' व 'वद जावू कुणाला शरण',  श्रुती देशपांडे यांचे 'गर्द सभोवती' व 'हे सुरांनो चंद्र व्हा' ही गीते यावेळी सादर करण्यात आली.

संगीत यज्ञाला रंगदार साथसांगत होती संपदा थिटे (संवादिनी), मंगेश राजहंस (तबला), राजेश झिरपे (सिंथेसायझर), प्रवीण ढवळे, निरंजन थिटे व ओंकार ढवळे (ताल वाद्य), लीलाधर चक्रदेव (ऑर्गन) केदार कुलकर्णी, विनय कशेळकर (तबला) या संगीत साथीदारांनी साथ दिली.

05 Jun 2017


टोलनाका, महामार्ग व आसपासच्या परिसरात कडेकोट  बंदोबस्त

एमपीसी न्यूज - राज्यव्यापी शेतक-यांच्या संपामुळे सर्वच पोलीस दलाची धांदल उडाली असून राज्यभर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यातच भर म्हणून पुणे-मुंबई महामार्गावरील उर्से टोलनाका पेटवून दिला अशी अफवा पसरल्यानंतर तळेगाव पोलीस, राज्य राखीव पोलीस दल यांची चांगलीच धांदल उडाली.


व्हॉटस्अॅपवर आज सकाळपासून एका पेटलेल्या टोलनाक्याचे फोटो फिरत होते. हा टोलनाका पुणे-मुंबई महामार्गावरील उर्से टोलनाका असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांचा काल मध्यरात्रीपासूनच फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

याविषयी एमपीसी न्यूजशी बोलताना तळेगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुट पाटील म्हणाले की, आम्हाला त्यासंदर्भात फोटो मिळाले तसेच काही विचारणा करणारे फोनही आले. मात्र, चौकशी अंती ही केवळ अफवा असल्याचे समोर आले. तरीही सुरक्षितता म्हणून गेले 12 तासापासून तेथे फौजफाटा तैनात केला आहे. यामध्ये उर्से टोलनाक्यावर 35 कर्मचारी एसआरफीएफचे जवान, 5 अधिकारी असा फौजफाटा आहे. तर तळेगाव चाकण मार्गावर 8 कर्मचारी व 1 अधिकारी, सोमाटणे टोलनाका येथे 15 कर्मचारी व 3 अधिकारी असा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.

तसेच संपाच्या काळात नागरिकांनी अफवा पसरवू नयेत तसेच खात्री पटल्याशिवाय त्यांच्यावर विश्वासही ठेवू नये व पोलीस कर्मचा-यांना सहकार्य करावे, असे आवाहन मुकुट पाटील यांनी केले आहे.

05 Jun 2017


एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील वराळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सारिका रामदास मांडेकर या दोन मतांनी विजयी झाल्या. संतोष मराठे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते.


उपसरपंचपदासाठी गुप्त पद्धतीने निवडणूक होऊन सारिका रामदास मांडेकर यांना 8 मते तर विरोधी उमेदवार विजय फुले यांना 6 मिळाल्याने 2 मतांनी सारिका मांडेकर यांना निवडणूक निर्णय अधिकारी पी. पी. घोडेकर यांनी विजयी घोषित केले. या प्रसंगी सदस्य निलेश मराठे, कल्पेश मराठे, निलम मराठे, संतोष मराठे, आशाताई भवार, अमोल गरूड, रूपाली मराठे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेशअप्पा ढोरे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, उपनगराध्यक्ष गणेश  काकडे, काँग्रेस आयचे अध्यक्ष  बाळासाहेब ढोरे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, राजेंद्र दाभाडे, प्रफुल्ल शिंदे, पिराजी वारिंगे, भगवानराव शिंदे, दीपक दाभाडे, विश्वनाथ मराठे, काळूराम मराठे, रामचंद्र मराठे, किसन लोंढे, चंद्रकांत सोनवणे, प्रकाश कलवडे, तुकाराम वारींगे, बाळोबा वारींगे, दत्तात्रय वारींगे सुदाम मराठे आदिंनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा अभिनंदन करून सत्कार केला. त्यानंतर त्यांची फटाके वाजवून विजयी मिरवणूक काढण्यात आली.

01 Jun 2017


महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत मावळ तालुका धरणग्रस्तांची बैठक

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील पवना प्रकल्पात वीस गावांमधील जमिनी गेल्या असून ज्या शेतक-यांच्या जमिनी प्रकल्पात गेल्या आहेत त्यांच्या समस्या आता लवकरच मार्गी लागणार आहेत. पवना प्रकल्पामुळे 1203 कुटुंबे बाधित झाली आहेत. त्यापैकी मावळ व खेड तालुक्यातील 340 प्रकल्प ग्रस्तांना प्रत्येकी एक एकरप्रमाणे जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. आणखी 863 प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचे मावळ तालुक्याचे आमदार बाळा भेगडे यांनी सांगितले.

मावळ तालुक्यातील पवना, आंद्रा, जाधववाडी, वडिवळे येथील धरणग्रस्तांच्या विविध समस्यांबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत शेतक-यांची बैठक काल (बुधवारी) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार भेगडे बोलत होते. यावेळी सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, पवना धरण कृती समितीचे अध्यक्ष मुकुंदराव काऊर, उपाध्यक्ष दशरथ शिर्के, बाळासाहेब काळे, भाऊसाहेब कडू, आदि पवना धरण कृती समितीचे पदाधिकारी, भाजप सरचिटणीस बबनराव कालेकर, संदीप भुतडा, मधुकर धामणकर, पंढरीनाथ पिंगळे त्याचप्रमाणे पवना, आंद्रा, जाधववाडी, वडिवळे आदी धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते. त्याचप्रमाणे पाटबंधारे विभाग, महसूल विभाग, आयुक्त व सबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पवना प्रकल्पाअंतर्गत केवरे, कादव, शेवती, कोळे चाफेसर, फांगने, जवन, पानसोली, चावसर, पाले, काले, खडकगेव्हंडे, माजगाव, वाघेश्वर, गेव्हंडे, अजिवली अशी एकूण 20 गावे आहेत. या प्रकल्पात बाधित खातेदार 1051 आहेत. जमीन वाटप केलेले खातेदार 375 आहेत. तर जमीन 676 खातेदार शिल्लक आहेत. पवना प्रकल्पाच्या बुडित क्षेत्राकरिता संपादित करण्यात आलेल्या ज्या जमिनी प्रत्यक्षात बुडाल्या आहेत. त्या जमिनी मूळ शेतक-यांना परत करण्यात याव्यात, अशी मागणी आमदार भेगडे यांनी केली.

महसूल मंत्र्यांकडे आमदार भेगडे यांनी सादर केल्या विविध मागण्या

- नागरी सुविधांचे अधिकार जिल्हाधिका-यांना देण्यात यावेत

- आंद्रा खोरे प्रकल्पाअंतर्गत बाधित होणा-या शिरे, शेटेवाडी या गावांचे खास बाब म्हणून पुनर्वसन व्हावे

-  धरण क्षेत्राच्या उर्वरित क्षेत्रातील शिल्लक असलेल्या जमिनी शेतक-यांना परत देण्यात याव्यात

- 1997 पासून खरेदी-विक्रीवर घातलेली बंदी तात्काळ उठविण्यात यावी

- जाधववाडी प्रकल्पासाठी इंद्रायणी नदीच्या काठावरील इंदोरी, सांगुर्डी, कान्हेवाडी, खालुंब्रे व येलवाडी गावांमधील जमिनी संपादित होत आहेत, ते थांबवावे.

विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी संबंधित विषयात लक्ष घालून योग्य कार्यवाही करावी, असे आदेश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले. या प्रश्नांवर योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे आश्वासनही पाटील यांनी दिले.

01 Jun 2017

एमपीसी न्यूज - चांदखेड (ता.मावळ) येथील शेतकरी कुटुंब व वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कार्यकर्त्या द्रौपदाबाई मारुती बांदल (वय 86) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

 

द्रौपदी बांदल यांच्यामागे दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. संत रामजीबाबा विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन अशोक बांदल व तळेगाव रोटरीचे सदस्य राजेंद्र बांदल यांच्या त्या मातोश्री होत.

31 May 2017

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील वडगाव येथील युवा शेतकरी तुषार वहिले यांनी आपला वाढदिवस गरीब, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करून सत्कारणी लावला. अतिरिक्त आणि वायफळ खर्च टाळून विद्यार्थ्यांना मदत केल्याने त्यांना समाधान वाटत आहे.

दिवसेंदिवस शाळेचा खर्च अवाढव्य स्वरूप वाढत चालला आहे. वाढीव खर्चाचा बोजा गरीब विद्यार्थ्यांवर पडत आहे. शिकण्याची आवड आहे, शाळेत हुशार आहे, पण घरची गरिबी असल्याने शिकता येत नाही. अशी बरीच उदाहरणे समाजात पाहायला मिळतात. हा प्रकार कमी करण्यासाठी वैयक्तिक स्तरावर आपण काय प्रयत्न करू शकतो याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. असाच विचार तुषार वहिले यांनी केला व वडगाव येथील मिलिंदनगर परिसरातील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप केले.

वह्या मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेह-यावर निरागस समाधान पसरलेले पाहून तुषार यांना वाढदिवस योग्य कामासाठी खर्ची लागल्याचे समाधान मिळाले. तुषार सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रचे क्रियाशील सभासद असून विविध समाजकार्यात अग्रेसर असतात तसेच वडगाव येथील जय मल्हार ढोल पथकाचे ते प्रमुख आहेत.

bhiku waghere advt

31 May 2017

एमपीसी न्यूज - मावळ व मुळशी तालुक्यातून जाणारा रिंगरोड शासनाने ताबडतोब रद्द करावा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा मावळ व मुळशी तालुक्यातील दहा गावातील शेतक-यांनी दिला. याबाबत अनेक वेळा शासनाला निवेदने दिली असून शासनाने रिंगरोड बंदच करावा, असा सूर शेतक-यांमधून येत होता.

पोपट राक्षे, राजू राक्षे, सुनील राक्षे, दत्तात्रय राक्षे, प्रवीण राक्षे, मारुती राक्षे, शंकर लिमिन, पंढरीनाथ आमले, संतोष धामणकर, अनिल राक्षे यांसह दहा गावातील शेतक-यांनी मावळातील रिंगरोड प्रकल्प शासनाने कायमचा रद्द करावा. पर्यायी चर्चा करू नये, अशी मागणी करत पुढील दिशा ठरविण्यासाठी 2 जून रोजी गोडुंबे येथे विशेष बैठक आयोजित केली आहे.

प्रस्तावित रिंगरोड मुळशी तालुक्यातील हिंजवडी, मारुंजी, नेरे आणि मावळ तालुक्यातील सांगवडे, दारुंब्रे, साळुंब्रे, गोडुंब्रे, धामणे, परंदवडी आणि उर्से असा तळेगाव एमआयडीसी मार्गे जाणार आहे. या भागातील शेतकरी प्रस्तावित रस्त्याच्या भागात ऊस, भाजीपाला, फुलशेती, भात अशी पिके घेणारी शेकडो एकर सुपीक आणि बागायतीची जमीन यामध्ये जाण्याचा धोका असल्याने शेतक-यांकडून या रस्त्याला विरोध केला जात आहे.

या रस्त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. तर बांधकाम व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी शासन या रिंगरोडसाठी धावपळ करत आहे, असे शेतक-यांचे म्हणणे आहे.

bhiku waghere advt

31 May 2017

एमपीसी न्यूज - वडगाव-कातवी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्चना विलास भोकरे यांच्यावर सरकारी जागेत अतिक्रमण करून घराचे बेकायदा बांधकाम व घरात वैयक्तिक शौचालय नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार प्रभारी जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी भोकरे यांना ग्रामपंचायत सदस्यपदी अपात्र ठरवत त्यांचे सरपंचपद रद्द केले आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे  कलम 14 (ज- 3) व ज (ज-5) अन्वये कालच्या  (दि. 30)  निकालपत्रात त्यांचे सदस्यपद रद्द करण्यात आले. भोकरे यांनी व त्यांच्या कुटुंबाने सरकारी जागेत अतिक्रमण करून घराचे बेकायदा बांधकाम केले आहे. व त्यांच्याकडे वैयक्तिक शौचालय नसल्याने त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी वडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य किरण भिलारे यांनी 11 जानेवारी 2017 रोजी जिल्हाधिका-यांकडे केली होती.

याबाबत जिल्हाधिकारी काळे यांनी दोन्ही बाजूंकडून सादर करण्यात आलेले पुरावे व झालेला युक्तिवाद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मिळालेला अहवाल या सर्व बाबींचा विचार करून काल ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचा आदेश देण्यात आला. त्याचबरोबर भोकरे यांच्याकडे वैयक्तिक शौचालय नसल्याने त्या सार्वजनिक शौचालयाचा वापर करत असल्यामुळे त्यांना ग्रामपंचायत सदस्यपदी कार्यरत राहण्यास अपात्र ठरविले आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अर्चना भोकरे या भाजपच्या वतीने  निवडून आलेल्या होत्या. मागील वर्षी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व सरपंचपदी बिनविरोध निवडून आल्या. त्यांनी केलेल्या या बंडखोरीमुळे भाजपला  ग्रामपंचायतीवरील सत्ता गमवावी लागली होती. त्या गोष्टीचे मोठे शल्य भाजपला होते.

bhiku waghere advt

Page 5 of 20
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start