• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
18 May 2017

एमपीसी न्यूज - धामणे प्रकरणातील ज्येष्ठ टाळकरी कै. नथुमामा फाले त्यांच्या पत्नी कै. छबाबाई नथु फाले व मुलगा कै. अत्रिनंदन ऊर्फ आबा नथु फाले यांचा करुण अंत झाला. मात्र, या तपासाबाबत त्यांच्या नातेवाईकांना व नागरिकांना कोणतीही सविस्तर माहिती न दिल्याने शनिवारी (दि.20) तळेगावात पोलिसांविरुद्ध निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.


या घटनेला एक महिना होत असून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या वतीने पाच आरोपी अटक केले असल्याचे सांगितले गेले. परंतु पुढील कार्यवाही तसेच कोणत्या कारणासाठी दरोडा घातला व कशाप्रकारे घातला हे पोलिसांच्या वतीने सांगितले गेले नाही. तसेच पुढील तपासाबाबत काहीही माहिती नातेवाईकांना व समाजाला दिली नाही. त्यामुळे येत्या शनिवारी सकाळी दहा वाजता तळेगाव पोलीस ठाण्यावर फाले यांचे नातेवाईक, तालुक्यातील सर्व वारकरी क्षेत्रात कार्यरत असणारे सर्व मान्यवर, तसेच समाजातील सर्व क्षेत्रात काम करणारे सर्व नागरिक निषेध मोर्चा काढणार आहेत.

 

यामध्ये मावळ तालुक्यातील धामणे गावातील सशस्त्र दरोड्यात नथू विठोबा फाले (वय 65), छबाबाई नथू फाले (वय 60), अत्रीनंदन तथा आबा नथू फाले (वय 30) अशी दरोडेखोरांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्यांची नावे होती. या घटनेत नथू फाले यांची सून तेजश्री (वय 25) व नात अंजली (वय 6) जखमी झाल्या आहेत. त्यापैकी तेजश्री या गंभीर जखमी असून अंजली किरकोळ जखमी होती. डोक्यात टिकावाचे घाव घालून तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

 

तळेगाव पोलिसांनी या प्रकरणी 11 आरोपींपैकी 5 आरोपींना अटक केली आहे.

18 May 2017

एमपीसी न्यूज - प्रदीप ओव्हाळ यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी मधुरा ओव्हाळ यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी सरपंच राजश्री सातकर, माजी उपसरपंच प्रदिप ओव्हाळ, किशोर सातकर, सागर येवले, सतिष सातकर, अभिजीत सातकर, पुनम सातकर, शशिकला सातकर ग्रामविकास अधिकारी शांताराम धेंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

मधुरा ओव्हाळ यांनी गावातील रस्ते व बंदिस्त गटार योजना, तसेच महिला व बालकांच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. किशोर सातकर व सागर येवले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदीप ओव्हाळ यांनी सूत्रसंचालन व अभिजीत सातकर यांनी आभार मानले.

17 May 2017

कलापिनीच्या युवांचे नाटक 'आपलं बुवा असं आहे'

एमपीसी न्यूज - कलापिनी कलामंडळ आयोजित कै. रजनी धोपावकर स्मृती पुष्पांतर्गत 'आपलं बुवा असं आहे' हे मोहन काटदरे लिखित दोन अंकी नाटक नुकतेच कलापिनी सांस्कृतिक केंद्र येथे संपन्न झाले.

या नाटकातून इगो हाच खरा नात्यांमधील संबंधात बाधा आणतो...त्यावर ताबा मिळवला तर आपले जीवन सुखी होते हा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात कलापिनीचे युवा कलाकार यशस्वी झाले. सबकुछ युवा असलेले हे नाटक मोहन कुंटे यांनी दिग्दर्शित केले होते. 40 वर्षांपूर्वी लिहिलेले हे नाटक अमोल पालेकर, चित्र पालेकर आणि दिलीप कुलकर्णी यांनी गाजवले होते.

परस्परांवरील विश्वासावर बेतलेले हे नाटक काल सापेक्ष आहे. त्यामुळेच ते आजही सादर करणा-यांना आणि प्रेक्षकांना ही तेवढीच भूरळ घालते. मोहन कुंटे यांनी विनोदी अंगाने जाणाऱ्या या नाटकात कालानुरूप केलेले बदल रसिकांची दाद मिळवून गेले आणि त्यांनी निखळ आनंद लुटला.

या नाटकात भूमिका करणाऱ्या विजय कुलकर्णी, मिहीर देशपांडे आणि माधुरी कुलकर्णी यांनी आपल्या सहज सूंदर अभिनयाने प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद तर मिळवलीच पण नाटकाची रंगत आणखीनच वाढविली. कलापिनीच्या युवा कलाकारांनी तळेगावकर रसिकांच्या अपेक्षा वाढविल्या आहेत.

मध्यंतरात नागेश धोपावकर यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी कलापिनीच्या कार्याबद्दल संतोष व्यक्त केला आणि आपण योग्य ठिकाणी देणगी दिल्याचे समाधान मिळाल्याचे सांगितले. या नाटकाचे नेपथ्य विराज सवाई, प्रतिक मेहता यांनी नेटके केले होते, प्रकाश योजना अभिलाष भवार, पार्श्वसंगीत वादिराज लिमये नाटकाला पूरक, रंगमंच व्यवस्था विशाखा बेके, हृतिक पाटील, रंगभूषा मुक्ता भावसार, ध्वनी संयोजन सुमेर नंदेश्वर, तर अशोक बकरे समन्वयक होते.

नाट्य प्रयोग यशस्वी होण्यासाठी खगेश जोशी, चेतन पंडित, चैतन्य जोशी, निनाद चौधरी, प्रणव केसकर यांचे मोलाचे सहाय्य झाले. कलामंडळाच्या व्यवस्थेविषयी काही सूचना असल्यास जरूर कळवा, असे कलापिनीचे विश्वस्त डॉ.परांजपे यांनी सांगितले. आपण आपल्या सूचना फेसबुक, व व्हॉटस अप ग्रुपवरून करू शकता, असे आवाहनही त्यांनी केले.

15 May 2017

पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडविल्याने तळेगावमध्ये गटारी तुंबल्या

एमपीसी न्यूज - तळेगाव स्टेशन येथील शुभम कॉम्प्लेक्ससमोर अज्ञातांनी पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवल्याने तुंबलेल्या गटारांमुळे आणि सलग दोन दिवस वळवाच्या पावसाचे पाणी परिसरातील काही दुकानांसमोर आणि खाजगी कार्यालयात घुसल्याने व्यापा-यांना मनस्ताप सहन करावा लागला. यापुढे अशा प्रकारचा त्रास न होण्यासाठी ठोस उपाययोजना करून कायमचा तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी दिले.

तुंबलेल्या गटारीमुळे तळेगाव परिसरातील व्यापारी व व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. त्याबाबत सर्व व्यावसायिक व व्यापा-यांच्या वतीने नगराध्यक्षा चित्रा जगनाडे व मुख्याधिकारी वैभव आवारे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पक्ष प्रतोद सुशील सैंदाणे, सभापती अमोल शेटे, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, नगरसेवक संग्राम काकडे, सचिन टकले, कल्पना भोपळे,  अरुण भेगडे आदी उपस्थित होते.

तळेगाव शहर व तळेगाव स्टेशन परिसरात शुक्रवारी आणि शनिवारी सायंकाळी सलग दोन दिवस वादळी वा-यासह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. यामुळे चाकण रस्त्यालगतच्या बहुतांशी गटारी तुंबल्याने या पावसाचे पाणी थेट लगतच्या इमारतीच्या तळमजल्यातील दुकाने आणि कार्यालयात घुसले. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. तळमजल्यातील अनेक दुकाने व कार्यालयात गुढघाभर पाणी साचले. यामुळे कागदपत्रे, फाईल्स ,फर्निचर आणि इतर सामान भिजल्याने व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले.

पाणी अडवून गटारीचा नैसर्गिक प्रवाह बंद करण्यात आल्याने समर्थ छाया अपार्टमेंट, भक्ती अपार्टमेंट व शुभम कॉम्प्लेक्स येथील तळमजला परिसरात पाणीच पाणी झाले. या ठिकाणी असलेल्या नैसर्गिक प्रवाहाच्या गटारीस अडथळा निर्माण करण्यात आल्याने पाणी निच-याची समस्या निर्माण झाली आहे. सद्य स्थितीत पाण्याचा निचरा योग्य रितीने होत नसल्याने या समस्येस सामोरे जावे लागत असल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे.

14 May 2017

एमपीसी न्यूज - नव्याने स्थापन झालेल्या तळेगाव शहर जैन समाज अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षपदी तळेगाव नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती दिनेश वाडेकर यांची तर कार्याध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते किरण ओसवाल यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अखिल भरतीय जैन समाज अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष ललीतभाई गांधी यांनी कार्यकारिणी सदस्य व पदाधिका-यांच्या बिनविरोध निवडी जाहीर केल्या.

 

नूतन कार्यकारिणी या प्रमाणे: अध्यक्ष - दिनेश वाडेकर,कार्याध्यक्ष- किरण ओसवाल,उपाध्यक्ष-घनःशाम राठोड,सेक्रेटरी- गौरव शहा, खजिनदार- विकेश ओसवाल, कार्यकारिणी सदस्य: राकेश ओसवाल,विनोद राठोड,निर्मल ओसवाल,जयेश संघवी,कुशल शहा, केयुर जव्हेरी,केतन ओसवाल.

 

जैन समाजातील वंचित अल्पसंख्यांक घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे अध्यक्ष दिनेश वाडेकर व कार्याध्यक्ष किरण ओसवाल यांनी निवडीनंतर सांगितले.

13 May 2017

एमपीसी न्यूज - तळेगावातील पंचशील निलकंठ नगर भागात शॉर्ट सर्किट होऊन घराला आज सकाळी साडेअकराच्या सुमारास आग लागली. स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांनी तासाभरात आग आटोक्यात आणली. या आगीत घरातील संपूर्ण संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पंचशील निलकंठ नगर भागात सुनील गुणीराम परदेशी (वय 40) यांच्या घरात शार्टसर्कीट होऊन सकाळी साडेअकराच्या सुमारास आग लागली. येथे असलेल्या अरूंद रस्त्यामुळे तळेगाव  नगर परिषदेचा अग्निशामक बंबाचा उपयोग झाला नाही.  मात्र, स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून तासाभरात आग आटोक्यात आणली.

या आगीत टीव्ही संच, लॅपटॉप, फॅन, लाकडी कपाट, दिवाण, कपडे व संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.  स्थानिक नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखवून घरातील गॅस  सिलिंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला व कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र, सर्व संसारोपयोगी वस्तू जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

13 May 2017
एमपीसी न्यूज - तळेगाव स्टेशन, जोशीवाडी येथे नूतन विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा वर्धापन सोहळा रविवारी (दि. १४) होणार आहे.
 
वर्धापन सोहळा रविवारी सकाळी ७ वाजता सुरू होणार असून प्रथम विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची महापूजा आणि देवकला वर्धापन होम होणार आहे. यानंतर दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता महाआरती करण्यात येणार आहे.
 
महाआरतीनंतर सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध गायिका सायली तळवलकर आणि प्रसिद्ध गायक पंडित संजय गरुड यांचा 'बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल' हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विठ्ठल रुक्मिणी भक्तांना चांगली सांस्कृतिक मेजवानीचा आनंद घेता येणार आहे. कार्यक्रमाच्या स्वागतोत्सूक तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगरसेविका सुलोचना गंगाराम आवारे असून सर्वांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन देखील त्यांच्याकडून करण्यात आले आहे.
12 May 2017

दीर्घकाळ विजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल

 

एमपीसी न्यूज - मावळ भागात काल (शुक्रवारी) पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी सातच्या सुमारास आलेल्या अचानक पावसाने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. पावसाने बाजरीच्या पिकांचे नुकसान झाले. पावसाने हजेरी लावली असली तरी भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. वा-याने मोठ्या झाडांच्या फांद्या तुटल्याने वडगाव भागातील रस्त्यांवर झाडांच्या फांद्यांची पसरण झाली.

 

तालुक्याच्या पूर्व भागातील तळेगाव दाभाडे, माळवाडी, कोटेश्वरवाडी, इंदोरी, कुंडमळा, सुदुंबरे, सुदवडी, जांबवडे, नवलाख उंबरे या गावांच्या शिवारातील उन्हाळी बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी बाजरी काढली असून ती भिजल्याने कणसे काळी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वादळी पावसाने बाजरीचे उभे पीक शेतात आडवे झाल्याने मोठे नुकसान झाले असल्याची माहिती इंदोरी येथील प्रगतिशील शेतकरी मनोहर काशिद पाटील यांनी दिली.

 

शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तळेगाव शहर परिसरात सोसाट्याचा वारा सुटला. यामध्ये कडोलकर कॉलनी भागामधील एक मोठा वृक्ष रस्त्यावर उन्मळून पडला. यामुळे विजेच्या तारा तुटल्या. सातच्या सुमारास शहर परिसरातील संपूर्ण वीज पुरवठा खंडित झाला. संपूर्ण शहर अंधारात बुडाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तळेगाव शहराच्या पाणी पुरवठ्यावर याचा मोठा परिणाम होणार आहे.

 

बत्तीगुल झाल्याने बाजारपेठेसह सर्वच व्यवहार ठप्प झाले. शुक्रवारी लग्नाची तिथी जोरात असल्याने परिसरातील अनेक कार्यालयातील व-हाडी मंडळींना या वादळी पावसाचा जोरदार फटका बसला. या पावसाने व-हाडी मंडळींच्या तोंडचे ख-या अर्थाने पाणी पळविले. विट उत्पादक शेतकरी व मेढपाळ यांची धावपळ झाली.

 

जोरदार पावसाच्या सरी बरसल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. हवेत गारवा निर्माण झाल्याने प्रचंड उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली.परंतु वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. तसेच इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने तरुणाईचे कंबरडे मोडल्याचा भास एका रात्रीत झाला असून रात्री अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने त्याचा परिणाम सकाळी येणा-या पाण्यावर झाल्याचे वडगाव येथील रहिवासी रणजित वानखेडे यांनी सांगितले.

12 May 2017

एमपीसी न्यूज - मावळ तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथील सभेमध्ये शेतक-यांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधात वडगाव मावळ पंचायत समिती कार्यालयासमोरील चौकात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांच्या नेतृत्वाखाली दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून त्यावर पेट्रोल टाकून दहन करण्यात आले.

 

यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, मावळ लोकसभा अध्यक्ष यशवंत मोहोळ, कार्याध्यक्ष खंडूजी तिकोणे, माजी तालुकाध्यक्ष दिलीप ढमाले, युवकाध्यक्ष गणेश काजळे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, भाऊसाहेब कालेकर, राजेंद्र शिंदे, अनंता लायगुडे, मारुती चव्हाण, हनुमंत म्हाळसकर, शहराध्यक्ष किसनराव वहिले, निखिल कविश्वर, सिद्धेश ढोरे, प्रदीप ढोरे, मयूर ढोरे, रघुनाथ मालपोटे, नारायण मालपोटे, सतीश ढोरे, अर्जुन ढोरे, गणेश जाधव, रामदास ढोरे, कांतिलाल कर्नावट, गोरख ढोरे उपस्थित होते.

 

भाजपच्या नेत्यांना सत्तेची मस्ती आली आहे. शेतकरी या देशाचा पोशिंदा आहे. त्यांचा कोणी अपमान केलेला आम्हाला सहन होणार नाही. सध्या शेतकरी ज्या परिस्थितीत आपले जीवन जगत आहे, अशा परिस्थितीत त्याला मदत करायची सोडून अशी बेताल वक्तव्य करणा-या दानवे यांनी शेतक-यांची जाहीरपणे माफी मागावी आणि आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.

 

दानवे जाहीर माफी मागून आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देत नाहीत तो पर्यंत काँग्रेस पक्ष मावळ तालुका यांच्या वतीने विविध मार्गाने तीव्र आंदोलने केले जातील, याची शासनाने गंभीरपणे दखल घ्यावी, असे मावळ तालुका काँग्रेस आय कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांनी याप्रसंगी सांगितले.

 

'रावसाहेब दानवे मुर्दाबाद', 'बेताल वक्तव्य करणा-या दानवेंचं करायचं काय - खाली डोकं वर पाय' अशा प्रकारच्या घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला. या आंदोलनात मावळ तालुक्यातील काँग्रेस आयचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.

12 May 2017

नारद जयंती निमित्त रा.स्व.संघातर्फे पत्रकारांचा सत्कार

एमपीसी न्यूज -  प्रसारमाध्यमांचे स्वरुप दिवसेंदिवस बदलत असुन तंत्रज्ञानातसुद्धा अमुलाग्र बदल घडत आहेत. माध्यमे ही लोकांच्या दैनिंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली असुन त्याचा व्यैक्तिक जीवनावर तसेच समाजावर परिणाम होत आहे. समाजाच्या उन्नतीसाठी हितकारक बातम्या देण्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. माध्यमे ही वास्तव व प्रतिमा घडवतात व आपण त्याचा स्वकार करत असतो. मात्र माध्यमात प्रसिध्द झालेल्या गोष्टी या संपुर्ण सत्य असतातच असे नाही. नागरिकांनी त्याची चिकित्सा केली पाहिजे. बदलत्या प्रसारमाध्यमांचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होत असल्याने नवीन माध्यमे आत्मसात करण्यासाठी नव्या माध्यम साक्षरता चळवळीची गरज असल्याचे मत पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख प्रा.संजय तांबट यांनी व्यक्त केले.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे जिल्ह्याच्या वतीने ‘नारद जयंती’ निमित्त आयोजित कार्यक्रमात ते ‘प्रसारमाध्यमांचे बदलते स्वरुप आणि आव्हाने’ विषयावर बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेशजी साखवळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून रा.स्व.संघाचे पुणे जिल्हा माजी संघचालक डॉ.भास्कर भोसले, मावळ तालुका माजी संघचालक विनोद मेहता उपस्थित होते.

यावेळी संघातर्फे केसरीचे ज्येष्ठ वार्ताहर एस.एन.गोपाळे गुरुजी, सकाळचे बातमीदार सुनील वाळुंज, सकाळचे बातमीदार आणि फोटोग्राफर व मावळ तालुका स्वाभिमानी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश जाधव गुरुजी, लोकमतचे वार्ताहर विलासराव भेगडे, साप्ताहिक अंबरचे वार्ताहर बबनराव भिसे, साप्ताहिक मावळ समृध्द समाचारचे संपादक अमीन खान, पुण्यनगरीचे वार्ताहर महेश भागीवंत यांचा सत्कार करण्यात आला.

तांबट म्हणाले, महर्षी नारदांचे महत्व चांगली कृती करण्याने होते व योग्य माहिती संबंधित ठिकाणी पोहचवणे हा त्यांच्या कामाचा हेतू होता. त्याकाळी प्रसारमाध्यमांची साधने नव्हती. वाणी, भाषण याद्वारे संवाद साधला जात असे. मात्र, नंतरच्या काळात संर्पकाकरिता लेखणी आली व शिलालेख, हस्तलिखिते, माहितीपत्रक याद्वारे समाजात संपर्क साधला जाऊ लागला. छपाईचा शोध लागल्यानंतर माहितीची देवाण-घेवाण मोठयाप्रमाणात होवू लागली व सामाजिक घुसळण त्यातून झाली. आधुनिक पत्रकारितेतील तांत्रिक प्रगती वेगवान असली तरी पत्रकारितेची कायमस्वरुपी असलेली मूल्ये आणि सामाजाच्या व्यापक हिताचे विषय हाताळण्याबाबत विचार करणे गरजेचे आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याने वास्तव उभे करणा-या माध्यमांनी सत्याच्या जवळ जाण्याचा आणि लोकहिताचा दृष्टीकोन ठेवला पाहिजे असे ते म्हणाले.

याप्रसंगी सुरेश साखवळकर म्हणाले नारदाला कळीचा नारद म्हटले जात असले, तरी तो दुर्जनांचा नाश आणि चांगल्या गोष्टींना साध्य करण्यासाठीची कृती करत होता हे लक्षात घेतले पाहिजे. नारद एकमेव त्रैलोक्यात संचार करणारा असा व्यक्ती होता. नारदमुनींप्रमाणे पत्रकारांनी देखील सामाजिक हितासाठी लेखनी चालवली पाहिजे. कार्यक्रमास नगरसेवक अमोल शेटे, नगरसेविका शोभा भेगडे, नगरसेविका प्राची हेंद्रे, रा.स्व.संघ प्रांत शाररिक शिक्षण प्रमुख सुनील देसाई, पुणे विभाग प्रचार सदस्य मुकुंद कानडे, मावळ तालुका कार्यवाहक हेमंत दाभाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश फल्ले यांनी तर आभार प्रदर्शन अवधूत पोंक्षे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तुषार जगनाडे, सुहासराव नाखरे, प्रकाशराव मुंगी, गणेश टाव्हरे यांनी सहकार्य केले.

Page 7 of 20
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start