• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
04 May 2017

एमपीसी न्यूज - सोमाटणे फाटा टोल नाक्याजवळ आमच्या गाडीला ओव्हर टेक का केले अशी विचारणा करत दिनकर बाबुराव होळकर (वय 47, रा. वडगाव मावळ) यांना दोघांनी मारहाण केली. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली.

याविषयी होळकर यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात सतिश शंकरराव शिंदे व त्याचा भाऊ सुनिल शंकरराव शिंदे यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे. आमच्या गाडीला वारंवार ओव्हरटेक का करतोस म्हणून दोघांनी  होळकर यांना शिवीगाळ करत काठीने मारहाण केली.त्यानुसार  तळेगाव  दाभाडे पोलीस ठाण्यात या दोघांवर हाणामारीचा गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणासही अटक झालेली नाही.

पुढील तपास तळेगाव पोलीस करत आहेत.

04 May 2017

एमपीसी न्यूज - मावळातील सांगवडे गावच्या सरपंच दिपाली लिमण यांचे पती व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नवनाथ अर्जुन लिमण (वय 32,सांगवडे मावळ) यांच्या खुनातील सहा आरोपींच्या पोलीस कोठडीत मंगळवारी (दि.2) वडगाव मावळ न्यायालयाने  पाच दिवसांची वाढ केली आहे.

या सहा आरोपींची मंगळवारी पोलीस कोठडी संपली होती. त्यामुळे त्यांना वडगाव मावळ न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर हजर  केले असता, गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी शनिवार (दि 6) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पोलीस निरीक्षक एम. बी. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवडे येथील ग्रामदेवता मंदिरात कीर्तन चालू असताना, आरोपी योगेश गजानन राक्षे (वय 23रा. सांगवडे, मावळ), गजानन धोंडीबा राक्षे (वय 54 रा. सांगवडे, मावळ) सागर विभूषण थोरात (वय 22 रा. चिंचवड), गणेश भारत डबरे (वय 22 रा. चिंचवड), दत्ता विठ्ठल आगलावे (वय 23रा. चिंचवड) व किरण गोरख बराटे (वय 21 रा. चिंचवड) यांनी 23 एप्रिल रोजी मध्यरात्री बाराच्या सुमारास नवनाथ लिमण यांच्यावर कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता.

आरोपींना  पोलिसांनी 25 एप्रिलला अटक केली होती. तसेच त्यांना 26 एप्रिलला वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी खुनाच्या गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्या कोठडीत वाढ करत ती आता 6 मे पर्यंत वाढविली आहे.

04 May 2017
एमपीसी न्यूज - परिक्रमा कथक नृत्यालयाच्या विद्यार्थिनींचा प्रथम नृत्यप्रस्तुतीचा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक संघाच्या चाफेकर हॉल तळेगाव येथे उत्साहात पार पडला.
 
यावेळी भरतनाट्यम नृत्यांगणा मीनल कुलकर्णी, दिनेश कुलकर्णी, गायिका मधुरा वेलणकर, श्रीरंग कलानिकेतनचे अध्यक्ष प्रकाश जोशी, विनायक लिमये आदी उपस्थित होते. जागतिक नृत्यदिनानिमित्त आयोजित परिक्रमा प्रथम चरण कार्यक्रमात तीन तालामधील तोडे, तुकडे, तिहाई, गतनिकास अशा प्रकारची प्रसूती करण्यात आली. गुरू डॉ. रोहिणी भाटे यांच्या शिष्या गुरू अमला शेखर यांच्याकडे कथकचे धडे घेणा-या मानसी दांडेकर यांनी श्रावणमासी हर्ष मानसी ही बालकवींची सुपरिचित कविता सादर केली. या कवितेस त्यांना विशेष दाद देखील मिळाली.
 
कथक केवळ नृत्य नाही तर त्यामध्ये अभिनय देखील आहे. याची झलक 'कथा काहे सो कथक कहलावे' यातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या कार्यक्रमध्ये इयत्ता तिसरी पासून ते गृहिणींपर्यंतच्या विद्यार्थिनींचा सहभाग होता. यावेळी तबला साथ मंगेश राजहंस, हार्मोनियम चैतन्य पानसे यांनी दिली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिक्रमा संस्थेच्या विद्यार्थिनी समीक्षा, स्नेहा, सपना यांनी केले. तर मानसी दांडेकर यांनी आभार मानले.

04 May 2017

एमपीसी न्यूज -  महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भाजप युवा मोर्चा तळेगाव दाभाडे शहर संघटनेच्या वतीने नगरपालिकेच्या ज्येष्ठ महिला कामगारांचा सत्कार करण्यात आला. भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे यांच्या हस्ते कामगारांचा आणि इतर क्षेत्रातील ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला.

मीरा गोविंद मकवाना, ज्येष्ठ पोस्टमन गरुड काका, जनरल हॉस्पिटलचे कामगार पांडुरंग सावंत, तळेगाव एम-आय-डी-सी पोलीस स्टेशनचे शेळके, नगरपालिकेचे पाणी खात्याचे ज्येष्ठ कर्मचारी बिराजदार यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे, कार्याध्यक्ष गोकुळ किरवे, उपाध्यक्ष सागर खोल्लम, चिटणीस गौरव गुंड, संघटक सुनील कांबळे, संतोष हरीदास शेळके, लिगाप्पा बिराजदार, सुर्यकांत गरूड आदी उपस्थित होते.

03 May 2017

एमपीसी न्यूज - बहुप्रतिक्षित बाहुबली गेल्या काही दिवसात प्रसिद्ध झाला. त्यामुळे अनेक चाहत्यांना हायसे वाटले. मात्र, या प्रतिक्षेमुळे बाहुबलीचे आकर्षण फार वाढले. यामध्ये  आकर्षणाची आणखी एक गोष्ट ठरली ती म्हणजे बाहुबलीचे ब्रेसलेट. हेच ब्रेसलेट तळेगावच्या भगवती ज्वेलर्स यांच्याकडे दाखल झाले असून त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

याविषयी एमपीसी न्यूजशी बोलताना भगवती ज्वेलर्सचे नितीश मालपाठक म्हणाले की, बाहुबली ब्रेसलेट हे पूर्णपणे शुद्ध चांदीपासून तयार झालेले आहेत. यामध्ये सात ते आठ प्रकार आले आहेत. हे ब्रेसलेट ट्रेन्डी तर आहेच शिवाय त्याची घटण शुद्ध चांदीतून झाली असल्याने त्यांची मोडही ग्राहक करू शकातो. त्याचा फायदा असा की जर पुढे फॅशन बदललीच तर तुम्ही त्याच चांदीतून दुसरा दागिना घटवू शकता. हे ब्रेसलेट आमच्याकडे अडीच ते पाच तोळ्या्च्या स्वरुपात असून ते दीड हजार ते अडीच हजाराच्या दरात उपलब्ध आहेत. त्यामुळे ते सर्वांनाच परवडू शकणारी अशी फॅशन म्हणायला हरकत नाही, असेही मालपाठक यांनी सांगितले.

बाहुबली चित्रपटात दाखवलेल्या माहेश्मती साम्राज्याचे चिन्ह हे या ब्रेसलेटचे मुख्य आकर्षण आहे. ब्रेसलेटच्या मधोमध किंवा एका बाजुला गोल चौकोनी अशा स्वरुपात अशी ब्रेसलेटची डिझाईन उफलब्ध आहे. तसेच त्यांचा दर पाहता अगदी आपल्या पॉकेटमनीमधूनही हे ब्रेसलेट तुम्ही मित्र किंवा भाऊ यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता. कॉलेजमधील तरुण वर्गाची याला चांगलीच पसंती मिळत आहे.

03 May 2017

तळेगाव दाभाडे येथे टीपीएलची दमदार सुरुवात

 

एमपीसी न्यूज - विरोधक असल्याशिवाय जिंकताच येत नाही परंतु हा विरोध खिलाडू वृत्तीने घेतला पाहिजे, पराभुतांमुळेच आपले अस्तित्व आहे, हे विजेत्यांनी कायम लक्षात ठेवत एकमेकांचा आदर ठेवला पाहिजे, असे मत नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी व्यक्त केले. 

तळेगाव दाभाडे प्रीमियर लीग स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार कृष्णराव भेगडे इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर, नगरसेविका शोभा भेगडे, नीता काळोखे, विभावरी दाभाडे, कल्पना भोपळे, नगरसेवक गणेश भेगडे, अरुण भेगडे,  शिक्षण मंडळाचे माजी सभापती ब्रिजेंद्र किल्लावाला आदी उपस्थित होते.

प्रति आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टीपीएल स्पर्धेला काल (मंगळवारी) सुरुवात झाली उद्योन्मुख खेळाडूंना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि तरुणांमधील एकीची भावना वाढीस लागावी, यासाठी तळेगाव प्रीमियर लीग स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने या स्पर्धेचे मागील तीन वर्षांपासून आयोजन करण्यात येत असल्याचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी प्रास्ताविकात सांगितले. प्लास्टिक बॉलवर भव्य स्वरूपात खेळली जाणारी ही एकमेव स्पर्धा आहे. स्पर्धेमध्ये फाऊंडेशनच्या सदस्यांचे 12 संघ तयार करण्यात आले असून प्रत्येक संघास स्वतंत्र संघमालक व स्वतंत्र प्रशिक्षक आहे. स्पर्धेतील सलामीचा सामना संघमालक व प्रशिक्षक या दोन संघांमध्ये खेळण्यात आला.

महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, ज्येष्ठांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. तब्बल पाच हजार प्रेक्षक बसतील एवढी मैदानाची एकूण आसन क्षमता असून तळेगाव प्रीमियर लीग 2017 सर्वांसाठी विनामूल्य असल्याचे संयोजक गोरख काकडे आणि संजय वाघमोरे यांनी सांगितले. 8 मे रोजी अंतिम फेरी होईल बक्षीस समारंभ त्याच दिवशी होणार असून क्रिकेट जगतातील मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार असल्याचे मुख्य व्यवस्थापक सुधाकर शेळके यांनी सांगितले

03 May 2017

एमपीसी न्यूज - मावळातील आपटी धामदरा येथील रहिवाशी सोमनाथ कोकरे यांच्या घरोसमोर असलेल्या शेतात मंगळवारी (2 मे) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आढळून आलेल्या अजगराला पकडून वन्यजीव रक्षक मावळच्या सदस्यांनी सर्पमित्रांनी जीवदान दिले.

 

आपटी धामदरा येथील शेतात अजगर असल्याची माहिती सर्पमित्र आणि वन्यजीव रक्षक मावळचे सदस्य मोरेश्वर मांडेकर यांना संबंधित शेतक-याने दिली होती. त्यानंतर मांडेकर यांनी वनविभागाला कळवून सदर अजगराला वनरक्षक आफ्रीन गुलबर्गेवाले व वन्यजीव रक्षक मावळचे निलेश गराडे, मोरेश्वर मांडेकर, अनिल आंद्रे, हार्दिक मालवाडीया, निलम उपाध्याय, दक्ष काटकर, संकेत दहीतुले, मयुर दाभाडे,गणेश फाळके यांच्या मदतीने आपटी धामदरा येथे जाऊन सुरक्षितपणे पकडले.

 

या अजगराला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. सर्पमित्रांनी पकडलेला हा अजगर 9 फूट लांबींचा असून, इंडियन रॉक पायथॉन जातीचा आहे. सदरचा अजगर अशक्त असल्यामुळे वडगाव वनपरिक्षेत्र ऑफीसमध्ये नोंद करुन पुढील उपचारासाठी त्याला राजीव गांधी प्राणी संग्रहालयात पोहोचवण्यात आले आहे.

02 May 2017

2 ते 8 मे दरम्यान होणार सामने

 


एमपीसी न्यूज - महाराष्ट्रामध्ये प्रथमच लीग पद्धतीने होणा-या प्लास्टिक बॉल नाईट क्रिकेट स्पर्धेची रंगतदार सुरुवात काल (मंगळवार) पासून तळेगाव दाभाडे येथे थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे (पाटील) शाळा क्र. 2 येथील भव्य मैदानावर होत आहे. तळेगाव प्रीमियर लीग स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने सलग तिस-या वर्षी घेण्यात येणा-या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार कृष्णाराव भेगडे व आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते होणार आहे. तळेगाव उपनगराध्यक्ष सुनील शेळके हे या स्पर्धेचे प्रायोजक आहेत, अशी माहिती आयोजक गोरख काकडे यांनी दिली.

 

स्पर्धेची सुरुवात रॅलीने होणार असून रॅलीची सुरुवात सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौक येथून होणार असून तळेगाव स्टेशन, जिजामाता चौक मार्गे स्पर्धेच्या मैदानावर शेवट होणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता मैदानाचे पूजन व श्रीगणेश वंदना नृत्याचे सादरीकरण झाल्यानंतर सर्व टीमचे मैदानावर संचालन होणार आहे.

 

प्रत्येक संघासाठी स्वतंत्र संघमालक आणि स्वतंत्र प्रशिक्षक असून संघमालक आणि प्रशिक्षक यांच्यामध्ये स्पर्धेचा स्वागत सामना खेळला जाणार आहे. महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, ज्येष्ठांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण असणार आहे. साधारणतः पाच हजार प्रेक्षक बसतील एवढी मैदानाची एकूण आसन क्षमता असून तळेगाव प्रीमियर लीग 2017 सर्वांसाठी विनामूल्य आहे.

 

तळेगाव आणि मावळ परिसरातील तळेगाव प्रीमियर लीग स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या सदस्यांचे 12 संघ तयार करण्यात आले असून त्या संघांना इंडियन प्रीमियर लीग मधील संघांच्या नावाप्रमाणे तळेगाव दाभाडे सुपर किंग्ज, तळेगाव दाभाडे इंडियन, तळेगाव दाभाडे नाईट रायडर, तळेगाव दाभाडे लायन्स, तळेगाव दाभाडे पँथर, तळेगाव दाभाडे सन रायझर्स, तळेगाव दाभाडे टायगर्स, तळेगाव दाभाडे व्हिक्टोरियन्स, तळेगाव दाभाडे वॉरियर्स, तळेगाव दाभाडे ब्लास्टर, तळेगाव दाभाडे डेरडेव्हिल, तळेगाव दाभाडे रॉयल अशी नावे देण्यात आली आहेत.

 

तसेच प्रत्येक संघास स्वतंत्र झेंडे असून स्वतंत्र आसनव्यवस्था देखील करण्यात आली आहे. मैदानाला आंतरराष्ट्रीय बॉण्ड्रीलाईन करण्यात आली आहे. हे सामने यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ओंकार मांडोळे, अक्षय दाभाडे, प्रणव भेगडे, ओंकार भेगडे, चैतन्य कुलकर्णी, पृथ्वीराज मोरे, दत्ता म्हाळस्कर, गौरव परदेशी, सुधीर सरोदे, प्रदीप शिंदे, विक्रम बेगडे या सदस्यांच्या देखरेखीखाली आयोजन समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच धीरज शेठ रांका, आशा मेघी, श्रावण मेहता, शैलेश शहा आदींचे विशेष सहकार्य लाभले आहे, असेही काकडे यांनी सांगितले.

 

टीपीएलच्या सर्व सामन्यांमध्ये वेगवेगळ्या माध्यमांमधून प्रेक्षकांनी आपला उत्साह दाखविण्याचे आवाहन टीपीएल स्पोर्ट्स फाउंडेशन व आयोजक प्रायोजक सुनील शेळके, प्रशांत वाघमोरे, गोरख काकडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

टीपीएलच्या चाहत्यांसाठी विविध माध्यमांमधून प्रक्षेपण


5 एच डी कॅमे-यांच्या साहाय्याने मैदानात लावण्यात आलेल्या एल ई डी स्क्रीनवर सामने दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रीव्हिव व रिप्लेच्या साहाय्याने सामन्यांच्या प्रक्षेपणात आकर्षकता आणली असून सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र 1 न्यूज चॅनलवर दाखविण्यात येणार आहे. टीपीएल फाऊंडेशनच्या वतीने 'टीपीएल' मोबाईल ऍप्लिकेशन तयार करण्यात आले असून गूगल प्लेस्टोअर वरून ते डाऊनलोड करता येईल. TPL या युट्युब चॅनेलवर हे सामने विनामूल्य पाहता येणार आहेत.

 

महिलाही होणार सहभागी


तळेगाव प्रीमियर लीगमध्ये रांगोळी स्पर्धांच्या माध्यमातून महिलांचाही सहभाग होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी साडेचार ते साडेसहा या वेळेत स्वतंत्र दालनात रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये साधारणतः  100 महिला सहभागी होणार असून विजेत्या महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याचेही काकडे यांनी सांगितले.

30 Apr 2017

तळेगावमध्ये पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या लीलावती ग्रीन गृहप्रकल्पाच्या वाहनतळात उभी असलेली कार रात्री साडेदहाच्या सुमारास आग लागून भस्मसात झाली.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली. आगीचे कारण समजू शकले नाही.

29 Apr 2017
एमपीसी न्यूज - चिंचवड येथील खासगी रुग्णालयात आज (शनिवारी) एका 38 वर्षीय महिलेचा स्वाईन फ्ल्युने मृत्यू झाला. त्या तळेगाव दाभाडे येथील रहिवाशी होत्या. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्ल्युने मृत्यू झालेल्यांची संख्या 16  झाली आहे.
 
एका 38 वर्षीय महिलेवर तळेगाव दाभाडे येखील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुवारी त्यांना उपचारासाठी चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे स्वाईन फ्ल्युने मृत्यू झालेल्यांची संख्या16 झाली असून व्हेंटिलेटवर 22 रुग्ण आहेत.
 
या संसर्गजन्य आजारामुळे आतापर्यंत 16 रुग्ण दगावले आहेत. स्वाइन फ्लुच्या या वाढत्या संसंर्गामुळे लोक धास्तावले आहेत.
Page 9 of 20
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start