• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
23 Jun 2017
 
(स्मिता जोशी)
 
एमपीसी न्यूज - मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आई-वडील आणि मुलांमध्ये साधारणपणे नेहमी वेगवेगळी पैज लागत असते. तू अमुक केलेस तर तुला हे देऊ, तमुक केलेस तर ते देऊ असे त्याचे साधारण स्वरुप असते. अशाच प्रकारची एक वेगळी पैज मुलगा आणि वडिलांमध्ये लागली. चार-पाच वर्षांच्या कालावधीत मुलगा जिद्दीला पेटून परिश्रम घेत असल्याचे वडिलांना दिसत होते. मग काय? त्यांना देखील त्यांची पैज पूर्ण करण्याचे मनावर घ्यावे लागले आणि त्याचे फलस्वरुप म्हणून काही दिवसांपूर्वी दोघांनीही आपापला शब्द खरा करुन एकमेकांना दिलेले चॅलेंज पूर्ण केले.
 
ही पैज लागली होती, निगडीचे रहिवासी असलेले सुप्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. शैलेश देशपांडे आणि त्यांचा मुलगा पार्थ देशपांडे यांच्यात आणि चॅलेंज होते ते डॉ. देशपांडे यांनी सिव्हील एव्हिएशनमधील विमानोड्डाणाचे ठराविक तास पूर्ण करुन कॅप्टन (पायलट) व्हायचे आणि पार्थने नौदलातील आपला अभ्यासक्रम पूर्ण करुन सब लेफ्टनंट ही पदवी मिळवायची. नुकतेच काही दिवसांपूर्वी पार्थने आपला कन्नूर येथील अभ्यासक्रम पूर्ण करुन सब लेफ्टनंट ही नौदलातील पहिली पोस्ट मिळवताना इलेक्ट्रिक आणि कम्युनिकेशन मधील बी.टेक ही पदवी मिळवली. आणि डॉ. देशपांडे यांनी दोनशे तास विमान चालवून कॅप्टन (पायलट) ही पोस्ट मिळवली. अशा रितीने दोघांनीही एकाच वेळी आपापल्या क्षेत्रात नैपुण्य मिळवून पैज पूर्ण केली.
 
पार्थ सातवीत असतानाच त्याने त्याचे ध्येय ठरवले होते. मोठा होऊन त्याला आकाशभरारी घ्यायची होती. आणि डॉ. देशपांडे यांना देखील विमानोड्डाणाचे स्वप्न खुणावत होतेच. मग काय गमती गमतीतच एकमेकांची पैज लागली. जर पार्थने नौदलातील त्याचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला तर त्याचे बाबा देखील हौशी पायलट होतील आणि त्यानंतर मग पार्थ फायटर प्लेन चालवण्याचे शिक्षण घेईल आणि दोघेही जण आकाशभरारीचे आपले स्वप्न पूर्ण करतील.
 
त्यानुसार डॉ. शैलेश देशपांडे यांनी 2013 पासून  बारामती येथील कार्व्हर एव्हिएशनमध्ये विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी त्यासाठी दोनशे तास विमान चालवले. आणि मग त्यांना कॅप्टन (पायलट) ही पदवी मिळाली. याच कालावधीत पार्थने कन्नूर येथील नौदलाच्या प्रशिक्षण केंद्रात युपीएससीच्या माध्यमातून प्रवेश घेतला. आणि चार वर्षांचा आपला अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. आणि त्याला सब लेफ्टनंट ही नौदलातील पहिली पोस्ट मिळाली. आता त्याला नौदलाच्या पुढील अभ्यासक्रमानुसार सहा महिने नौदल अधिकारी म्हणून अनुभव घ्यावा लागेल. त्यानंतर त्याचे पुढील ध्येय आहे ते विमानवाहू युद्धनौकेवरून उड्डाण घेण्या-या फायटर विमानाचे सारथ्य करण्याची. म्हणजेच ज्याला अत्यंत अचूकतेची गरज असते अशा विमानवाहू युद्धनौकेवर उतरणा-या फायटर विमानाचे पायलट होण्याचे आणि डॉ. शैलेश देशपांडे यांच्या समोर ध्येय आहे ते स्वत:च्या विमानातून स्वत: विमान चालवत जगप्रवास करण्याचे. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः एक विमान देखील विकत घेतले आहे. डॉ. शैलेश देशपांडे यांनी स्वतःचे वैद्यकीय नैपुण्य कायम ठेवत ही अवकाश भरारी घेतली आहे.
Page 2 of 2
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start