Bhosari : एक मूठ धान्य केरळ पूरग्रस्तांसाठी उपक्रमातून दीड हजार किलो धान्य जमा

भोसरी मधील आदर्श शिक्षण संस्थेचा उपक्रम

एमपीसी न्यूज – आदर्श शिक्षण संस्था भोसरी येथील विद्यार्थ्यांनी केरळमधील अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या महापुरातील संकटग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. एक मूठ धान्य पूरग्रस्तांसाठी या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी एका दिवसात सुमारे डिड हजार किलो धान्य जमा केले. चिमुकल्यांनी पूरग्रस्तांच्या वेदना समजून त्यांना दिलेला मदतीचा हात परिसरातील नागरिकांसाठी आदर्श शिक्षणाचा पायंडा घालून देणारा आहे.

नगरसेविका प्रियांका प्रवीण बारसे यांनी संस्थेतील विद्यार्थ्यांना याबाबत आवाहन केले. या आवाहनाला साद देत मुलांनी धान्य संकलन केले. आवाहनाचा दुस-या दिवशी मुलांनी शाळेच्या मैदानात एकच गर्दी केली. प्रत्येकाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदत स्वरूपात धान्य, कपडे आणि उपयोगी साहित्य आणले होते. यामध्ये सुमारे 1 हजार 200 किलो तांदूळ, सुमारे 200 किलो दाळ, तेरा पोते भरून कपडे जमा करण्यात आले.

प्रियांका बारसे यांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन महापालिकेच्या माध्यमातून केरळवासीयांना दिले आहे. तसेच परिसरातील अमित वाघ, सविता वाघ, कान्होपात्रा थोरात, अनुराधा दौंड, आनंद दौंड, वंदना पोखरकर, चंद्रभान पोखरकर, नितीन होळ, पूनम शेलार आदी नागरिकांनी सढळ हाताने आर्थिक मदत केली. संस्थेने एक हजार बिस्कीट पुडे मदत स्वरूपात दिले. संस्थेच्या शिक्षकांनी देखील आर्थिक मदत केली. जमा झालेले सर्व मदत साहित्य संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड यांच्या माध्यमातून केरळ पुरग्रस्तांपर्यंत पोहोचविले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.