Pimpri: लगतच्या पुण्यात काही तासांत दहा जणांचा बळी; पिंपरी-चिंचवडकरांनो जागृत व्हा, घराबाहेर पडू नका!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकडे पुण्याचे जुळे शहर म्हणून पाहिले जाते. या लगतच्या पुण्यात कोरोनाने हाहा:कार माजविला आहे. काही तासांत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुण्यात कोरोनाने 18 जणांचा बळी घेतला आहे.  त्यामुळे पुण्यापासून धडा घेत आता पिंपरी-चिंचवडकरांनी अधिकची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. पुढील काही दिवस ‘हाय अलर्ट’ आहेत. त्यामुळे शहरवासीयांनो जागृत व्हा, घराबाहेर पडू नका, मास्कचा वापर करा, असे आवाहन केले जात आहे.  शहरात देखील काही तासात दोन नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्याही दहावर गेली आहे.

आपल्या बाजूच्या पुणे शहरात रोजच्या रोज नव्या रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांनी आता अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. पिंपरी-चिंचवड शहरात देखील रुग्णाच्या संखेत वाढ होऊ लागली आहे. आजपर्यंत 22 जण कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, सक्रिय 10 रुग्णांवर वायसीएम रुग्णालयात  उपचार सुरु आहेत. सुदैवाने कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही.

आपल्या शहरात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. मागील काही तासात नवीन दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.  त्यामुळे महापालिकेने कडक पाऊले उचलत दिघी, खराळवाडी, दिघी, चिखली, थेरगाव परिसर आजपासून ‘सील’ केला आहे. त्यामुळे नागरिकांनी आता अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. पुढील काही दिवस ‘हाय अलर्ट’ आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेकडून नागरिकांना बाहेर पडू नये असे आवाहन केले जात आहे; मात्र नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

नागरिक खबरदारीच्या उपाययोजनांना गांभिर्याने घेत नाहीत. अत्यावश्यक काम नसतानाही शहरातील काही भागात अनेक नागरिक घराबाहेर पडताना दिसून येत आहेत. मास्कचा वापर देखील करत नसल्याचे दिसून येतात. त्यामुळे नागरिकांनी सावध व्हावे, खबरदारी घ्यावी. नागरिकांची गर्दी अशीच राहिली, नियमांचे पालन केले नाही. तर, कोरोना विषाणूला रोखणे हाताबाहेर जाईल, अशी भिती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

राज्यातील कोरोना बाधितांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. रुग्ण वाढण्याची सुरुवात झाली आहे. रुग्ण संख्या कधीही वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. घरातच रहावे. प्रशासनाला सहकार्य करावे. हात स्वच्छ धुणे, शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल ठेवणे, मास्कचा वापर करणे, गर्दीत जाणे टाळणे, सर्दी, खोकला असल्यास घरातच थांबणे, गरज नसताना घराच्या बाहर पडून नये, अशा सूचना महापालिकेकडून सातत्याने केल्या जात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.