Pune News: अभय योजनेतून तब्बल 100 कोटींची सवलत

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेकडून अभय योजनेत सुमारे 99.53 कोटी रुपयांची दंड सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे, उत्पन्नाच्या सुमारे 48 टक्के सवलतच पालिकेने दिल्यामुळे त्यावर टीका होत आहे. तर प्रत्यक्षात प्रामाणिक करदाते नियमित कर भरत असताना त्यांना पालिका नाममात्र सवलत देते. तर दुसरीकडे थकबाकीदारांना इतक्‍या मोठ्या प्रमाणात सवलत दिल्याने भविष्यात थकबाकीदारांची संख्या वाढेल, अशी भीती व्यक्‍त केली जात आहे.

थकीत मिळकतकर वसुलीसाठी पालिकेने राबवलेल्या अभय योजनेत आतापर्यंत केवळ 12 टक्‍के थकबाकीदारांनीच कर भरण्यास प्राधान्य दिले आहे. या योजनेतून महापालिकेस 1,743 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ 219.54 कोटींचाच महसूल आतापर्यंत मिळाला आहे. उर्वरित आठडाभरात जास्तीत जास्त कर वसुलीसाठी मिळकतधारकांना सूचना केल्या जात आहेत.

50 लाख रुपयांच्या आत थकबाकी असलेल्या करदात्यांना थकबाकीवर आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत 80 टक्के सवलत देण्यात येत आहे. तर 50 लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या 50 ते 70 टक्‍क्‍यांपर्यंत टप्प्याटप्प्याने सवलत देण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत महापालिकेने सुमारे 4 लाख 88 हजार 732 नोटीस बजावल्या होत्या. त्यांची सुमारे 1,743 कोटी 61 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर, या योजनेत आतापर्यंत सुमारे 82 हजार 153 मिळकतधारकांनी सुमारे 219.54 कोटी रुपये कर जमा केला आहे, असे प्रशासनाने सांगितले.

नेमकी किती वसुली झाली….

आतापर्यंत केवळ 12 टक्‍केच वसुली

एकूण थकबाकी 1,743 कोटी रु.

प्रत्यक्ष वसुली 219.54 कोटी रु.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.