बहुचर्चित ‘बंदिशाळा’चे संगीत – प्रोमो प्रकाशित

(दीनानाथ घारपुरे)

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांवर विशेष छाप सोडणार्‍या 2019 या वर्षातील सर्वाधिक चर्चाधिन चित्रपट म्हणजे मुक्ता बर्वे अभिनीत आणि संजय कृष्णाजी पाटील लिखित व मिलिंद लेले दिग्दर्शित ‘बंदिशाळा’. उच्च निर्मितीमूल्य आणि भक्कम साहित्यसमृद्धी यामुळे ‘बंदिशाळा’बाबत रसिकांच्या अपेक्षा ताणल्या गेल्या आहेत. या आधी प्रदर्शित झालेल्या ट्रेलरला संपूर्ण जगभरातून पसंतीची पावती मिळत असून चित्रपटाच्या वेगळ्या विषयाने कुतूहल निर्माण केले आहे. नावाजलेले पट्टीचे कलावंत आणि उच्च निर्मितीमूल्य चित्रपटाची शोभा वाढवत असल्याने आपसूकच रसिक या चित्रपटासोबत जोडले गेले आहेत.

संजय कृष्णाजी पाटील यांच्या शब्दसमृद्ध गीतांना लोकप्रिय संगीतकार अमितराज यांनी संगीतबद्ध करून लोकप्रिय गायिका वैशाली सामंत, प्रियांका बर्वे, आरोही म्हात्रे, आरती केळकर व स्वतः अमितराज यांच्या रसाळ आवाजात स्वरबद्ध करून त्यातील गोडवा वाढवला आहे. या चार गाण्यांच्या अल्बमचे प्रकाशन आज सिटीलाईटमध्ये सर्व कलावंत तंत्रज्ञांच्या उपस्थितीत संपन्न झाले. बंदिशाळाच्या संगीताचा हा खजिना ‘झी म्युझिक’ने रसिकांसाठी खुला केला आहे. सोबत चित्रपटाच्या प्रोमोची झलकही पहायला मिळाली. सशक्त चित्रसंपदा निर्माण करण्याच्या हेतूने पदार्पण करणाऱ्या स्वाती संजय पाटील यांच्या ‘शांताई मोशन पिक्स्चर्स’ला प्रस्तुतकर्ते ‘श्री. माऊली मोशन्स पिक्स्चर्स’ची साथसोबत रसिकांमध्ये अर्थपूर्ण कुतूहल तयार करण्याच्या कामात योदान देत आहे.

‘जोगवा’, ‘पांगिरा’, ‘७२ मैल एक प्रवास’ या गाजलेल्या दर्जेदार चित्रपटांचे लेखक प्रस्तुतकर्ते तसेच ‘दशक्रिया’ चित्रपटाच्या पटकथा लेखनासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित संजय कृष्णाजी पाटील यांनी एका सत्य घटनेचा आधार घेऊन बंदिशाळाचे कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन केले आहे. बंदिशाळा हा एक सामाजिक विषयावरील महत्वाकांशी चित्रपट असून त्याला एका कारागृहाची पार्श्वभूमी लाभली आहे. एका कर्तव्यदक्ष महिला तुरुंग अधिकाऱ्याची कथा या चित्रपटातून उलगडणार असून ही भूमिका आणि हा वेगळा विषय मुक्ता बर्वे या अभिनेत्रीने उत्तुंग शिखरावर पोहचविला आहे. तिने या चित्रपटात माधवी सावंत ही महिला तुरुंग अधिकारी जिवंत केली आहे. आजपर्यंतची सर्वाधिक आव्हानात्मक भूमिका तिला या निमित्ताने करायला मिळाली आहे. संजय कृष्णाजी पाटील आणि मुक्ता बर्वे तब्बल १० वर्षानंतर एकत्र काम करीत आहेत.

मिलिंद लेले दिग्दर्शित ‘बंदिशाळा’ची सहनिर्मिती पायल गणेश कदम, मंगेश रामचंद्र जगताप यांनी केली असून प्रख्यात सिनेमॅटोग्राफर सुरेश देशमाने यांच्या कॅमेऱ्यातून हा घटनाक्रम पहायला मिळणार आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर विठ्ठल पाटील यांनी नृत्यरचना केली असून कार्यकारी निर्मितीची सूत्रे राम कोंडू कोंडीलकर यांनी सांभाळली आहेत. बंदिशाळातील चित्तथरारक साहसदृश्य प्रशांत नाईक यांनी दिग्दर्शित केली असून दिग्दर्शक मिलिंद लेलेंना सुनील मांजरेकर यांनी प्रमुख सहाय्यक दिग्दर्शन केले आहे.

या चित्रपटात मुक्ता बर्वे यांच्यासोबतच विक्रम गायकवाड, शरद पोंक्षे, हेमांगी कवी, सविता प्रभुणे, आशा शेलार, प्रवीण तरडे, अश्विनी गिरी, अजय पुरकर, माधव अभ्यंकर, शिवराज वाळवेकर, आनंद आलकुंटे, अभिजीत झुंजारराव, आनंदा कार्येकर, प्रसन्न केतकर, वर्षा घाटपांडे, सोनाली मगर, प्रताप कळके, राहुल शिरसाट, पंकज चेंबूरकर, लक्ष्मीकांत धोंड, अनिल राबाडे, उमेश बोलके, अनिल नगरकर आणि उमेश जगताप यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘शांताई मोशन पिक्चर्स’ निर्मित ‘बंदिशाळा’ला यावर्षी महाराष्ट्र राज्य शासनाच्या ‘५६ व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्या’मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक – २, ‘सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती’ – शांताई मोशन पिक्स्चर्स – स्वाती संजय पाटील, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मुक्ता बर्वे, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका प्रियांका बर्वे, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत विजय गवंडे, सर्वोत्कृष्ट गीतकार संजय कृष्णाजी पाटील, सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक नरेंद्र हळदणकर अश्या तब्बल ७ सर्वाधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तसेच कान्स मार्केटमधील जगप्रसिद्ध ‘पलास’ चित्रपटगृहामधील ‘सी’ व ‘जे’ या भव्य ऑडीमध्ये बंदिशाळाचे दोन शो महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून दाखविण्यात आले.

जगभरातील दर्दींनी हा चित्रपट पाहिल्यानंतर भरभरून कौतुक केले. बंदिशाळामधील मुक्ता बर्वे यांची अत्यंत धाडसी भूमिका पहाण्यासाठी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. तिला या भूमिकेसाठी मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारामुळे ही उत्सुकता शिगेला पोहचली असून या महिन्यातल्या तिसऱ्या शुक्रवारी म्हणजेच 21 जूनपासून चित्रपटगृहात मुक्ताला पहाण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.