Lonvala: ‘महापौरपद केवळ शोभेचे बाहुले’; राज्यातील महापौरांची खंत

एमपीसी न्यूज – महापौरपद हे केवळ शोभेचे बाहुले असून त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय व वित्तीय अधिकार नाहीत. शहरात काही समस्या उद्भवली. तर, सामान्य नागरिक हे महापौरांना जबाबदार धरतात. महापौरांकडून त्यांच्या रास्त मागण्यांसंबधी न्याय मिळण्याची त्यांची भावना असते; मात्र महापौर हे संबंधित अधिकारी वर्गास सूचना देण्याशिवाय काहीही करु शकत नाहीत. महापौरांना कोणतेही अधिकार नसून हे पद केवळ शोभेचे बाहुले असल्याची खंत राज्यातील महापालिकेच्या महापौरांनी महापौर परिषदेत व्यक्त केली.

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई व महाराष्ट्र महापौर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 19 व्या महापौर परिषदेचे आयोजन नुकतेच लोणावळा येथे करण्यात आले होते. राज्यातील विविध 16 महापालिकांचे महापौर उपस्थित होते. सर्वांनी अधिकार नसल्याबाबत खंत व्यक्त केली. महाराष्ट्र महापौर परिषदेच्या उपाध्यक्षा व नागपूर महापालिकेच्या महापौर नंदा जिचकार, माजी केंद्रीय सचिव जयराज फाटक, अखिल भारतीय स्थानिक स्वराज संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र महापौर परिषदेचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण यावेळी उपस्थित होते.

महापौर परिषदेचे अध्यक्ष व बृहन्मुंबई महापालिकेचे महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले, “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहराचे महापौरपद भूषविले आहे. त्यामुळे महापौरांच्या समस्यांची त्यांना चांगली जाण आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 27 महापालिकेतील महापौरांना विशेष प्रशासकीय व वित्तीय अधिकार द्यावेत” अशी मागणी त्यांनी केली.

पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव व इतर उपस्थित सर्व महापौरांनी परिषदेत यापूर्वी महापौरांना प्रशासकीय व वित्तीय अधिकार मिळण्यासाठी जे विविध ठराव करुन शासनाला पाठविले आहेत. त्याबाबत काहीच ठोस निर्णय न झाल्याने खंत व्यक्त केली. यापुढील महापौर परिषद ही जुलै किंवा ऑगस्टमध्ये पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित करण्यात येईल. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित केले जाईल असे जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदींची अंमलबजावणी, त्यात महापौरांना विविध स्वरुपाचे प्रशासकीय आणि आर्थिक अधिकार मिळावेत, प्रसंगी गरजेनुसार अधिनियमात दुरुस्ती करणे तसेच महापालिका परिसरातील, शहराच्या दृष्टीने अन्य अनुषंगिक अडचणी एकसंधपणे राज्य शासनाकडे सादर करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्यातल्या एकूण सर्व 27 महापालिकांच्या महापौरांची परिषद स्थापन झाली असून बृहन्मुंबई महापालिकेचे महापौर हे या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.