Pimpri: महापौर, सभागृह नेत्यांनी केली नालेसफाईची पाहणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रिय कार्यालय परिसरातील नालेसफाईची महापौर राहुल जाधव आणि सभागृह नेते एकनाथ पवार यांनी पाहणी केली. नाल्याची अनेक कामे शिल्लक आहेत. नाले तुंबले नाहीत. ही प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या.

‘फ’ प्रभागाच्या अध्यक्ष योगीता नागरगोजे, नगरसेविका संगीता ताम्हाणे, नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, संजय नेवाळे, क्षेत्रिय अधिकारी मनोज लोणकर, उपअभियंता सतीश वाघमारे, आरोग्य निरीक्षक हनुमंत शिंदे, वैभव घोळवे, डी. आर. कांबळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डी. जी. शिर्के, जलनिस्सारण विभागाचे कनिष्ठ अभियंता ए.ए.चव्हाण उपस्थित होते.

शहरात सोमवारी (दि.10)मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शहरातील अनेक नाले, गटारी तुंबून रस्त्यावर पाणी साचल्याच्या तक्रारी आल्या. त्याअनुषंगाने महापौर जाधव, सभागृह नेते पवार यांनी ‘फ’ क्षेत्रिय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 1, 11 आणि 12 येथील नाल्यांची पाहणी केली. नाल्यांची बरीच कामे झाली नसल्याने नाले तुंबल्याचे निदर्शनास आले.

नालेसफाईच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत नाल्यांची कामे तातडीने आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना महापौर जाधव यांनी अधिका-यांना दिल्या. अन्यथा जबाबदार अधिका-यांवर व संबंधित ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेत आतापर्यंत नाले साफसफाई केलेल्या कामकाजाचा अहवाल मागविण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.