Dehugaon : इंद्रायणीमध्ये आढळलेल्या मृत माशांचा दशक्रियाविधी मंगळवारी

इंद्रायणीत आढळलेल्या हजारो मृत माशांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार !

एमपीसी न्यूज- आपल्या आप्त स्वकीयांचे निधन झाल्यावर होणारे दुःख आपण समजू शकतो. पण मुक्या प्राण्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यसंस्कार करून समाजामध्ये पर्यावरण जागृतीचा संदेश देहूगावातील निसर्गमित्रांनी दिला. इंद्रायणी नदीच्या किनाऱ्यावर मागील रविवारी मृतावस्थेत आढळून आलेल्या सुमारे दोन हजार मृत माशांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. येत्या मंगळवारी सकाळी 9 वाजता मृत माशांचा दशक्रियाविधी होणार आहे.

इंद्रायणी नदीत वाढते जलप्रदूषण आणि खालावणारी पाण्याची पातळी यामुळे नदीतील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मागील रविवारी (दि.9) दुपारी बाराच्या सुमारास देहूगावमधील गोपाळपुरा येथील इंद्रायणी नदीपात्रात अचानक हजारो मृतमासे पाण्यावर तरंगू लागले. फ्रेंडस ऑफ नेचरच्या सदस्यांनी पाण्यात जाऊन बघितले असता मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच आढळून आला. नागरिकांनी सर्व मासे पाण्यातून बाहेर काढले. सुमारे दोन हजार मृतमासे नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. अचानक मोठ्या प्रमाणात आढळलेल्या मृत माशांमुळे देहूगावातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त करण्यात आली.

नुसती हळहळ करून देहूकर गप्प बसले नाहीत तर या माशांवर शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यविधी करून समाजासमोर वेगळा संदेश दिला. या अंत्यविधीसाठी 30 मण सरपण, सुमारे 10 हजार गवऱ्या तेल आणि तुपाचे प्रत्येकी दोन डबे संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी उपलब्ध करून दिले. यावेळी देहूगावातील नागरिक, निसर्गमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना जलप्रतिज्ञा देण्यात आली. त्याचप्रमाणे इंद्रायणी नदीमध्ये सांडपाणी सोडण्यास विरोध करण्यात आला. त्यासाठी 100 दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. त्यानंतर चक्रीउपोषण करून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे येत्या मंगळवारी सकाळी 9 वाजता (दि. 18) मृत माशांचा दशक्रिया विधी देखील इंद्रायणी नदीकाठी होणार असल्याचे निसर्गमित्र आबा मसुगडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.