Pimpri : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा गुरुवारी एम्प्लॉयमेंट ऑफिसवर मोर्चा

एमपीसी न्यूज – तरुणांच्या बेरोजगारीत वाढ होत असल्याच्या निषेधार्थ पुणे व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने उद्या, गुरुवारी (दि. 19 ) दुपारी 12 वाजता रास्ता पेठ येथील जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

मागील पाच वर्षात केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणांमुळे देशाचा विकासदर कमी झाला आहे. उद्योग व रोजगारात वाढ होण्याऐवजी घट झाली आहे. राज्य सरकारच्या मुद्रा योजनेसारख्या अनेक योजना फसव्या ठरल्या आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

चिंचवड येथे सोमवारी (दि. 17) युवक कॉंग्रेसच्या पदाधिका-यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निरीक्षक निशांत वाघमारे यांच्या उपस्थितीत व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी युवक काँग्रेसचे प्रदेश संघटक विशाल काळभोर, प्रदेश सरचिटणीस संदीप (लाला) चिंचवडे, युवक कार्याध्यक्ष योगेश गवळी, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष शेखर काटे, चिंचवड विधानसभा युवक अध्यक्ष शाम जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.