Hinjawadi : चार जणांनी दुचाकीस्वाराला लुटले

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जात असलेल्या एका तरुणाला दोन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चार चोरटयांनी लुटले. दुचाकीस्वार तरुणाकडून दुचाकी, बॅग आणि टॅब फोन चोरून नेला. ही घटना कात्रज-देहूरोड बायपास रोडवर चांदणी चौकाजवळ मंगळवारी (दि. 18) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.

अंशुमन रक्षापाल सिंग (वय 28, रा. नाना पेठ, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंशुमन त्यांच्या मित्रासोबत दुचाकीवरून (युपी 35 / एएस 5962) ठाण्याला जात होते. कात्रज-देहूरोड बायपास रोडवर चांदणी चौकाजवळ आले असता दोन दुचाकीवरून चारजण आले. त्यांनी अंशुमन यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्यांच्याजवळ असलेली बॅग, तीन टॅब फोन आणि दुचाकी असा एकूण 59 हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून घेऊन गेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.