Pune : वाढत्या बेरोजगारीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राला ठोकले टाळे

एमपीसी न्यूज- वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी आज, बुधवारी पुण्यातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राला टाळे ठोकून आंदोलन केले.

देशात आणि राज्यात भाजपची सत्ता येण्यापूर्वी तरुणांना दरवर्षी 2 कोटी रोजगार दिले जातील अशी घोषणा भाजपकडून देण्यात आली होती. मात्र त्या घोषणेचा सत्ताधारी भाजपला विसर पडला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राला टाळे ठोकण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख म्हणाले की, मागील पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणांमुळे देशाचा विकासदर कमी झाला आहे. उद्योग आणि रोजगारात वाढ होण्याऐवजी घट झाली आहे. राज्य सरकारच्या मुद्रा योजनेसारख्या अनेक योजना फसव्या ठरल्या आहेत. यामुळे तरुणांच्या बेरोजगारीत वाढ झाली आहे. त्याच्या निषेधार्थ आज जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर टाळे ठोकले आहे. या आंदोलनाची दखल सरकारने न घेतल्यास भविष्यात मंत्र्यांना रस्त्यावर फिरकू देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.