Pune : विद्यार्थ्यांचा आवाज दाबू देणार नाही- सुहास उभे

आंदोलकांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे उभी राहणार

एमपीसी न्यूज- विद्यापीठाच्या रिफेक्टरी प्रश्नात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी आवाज उठविणाऱ्या सोमनाथ लोहारच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि विद्यार्थ्यांचा आवाज दाबू दिला जाणार नाही यासाठी लढत सुरु ठेवू,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश समन्वयक सुहास उभे यांनी आज सायंकाळी पत्रकाद्वारे सांगितले.

रविवारी (दि.23) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात सोमनाथ लोहार या विद्यार्थ्याने रिफेक्टरी प्रश्नात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी आवाज उठविण्याचा प्रयत्न केल्याने त्याला चतुःशृंगी पोलिसांनी ताब्यात घेतले. या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी सुहास उभे यांनी कार्यकर्त्यांसह चतुःशृंगी पोलीस स्टेशनला जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली .

‘सोमनाथ लोहारचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी ‘भारत माता की जय ‘च्या घोषणा देऊन उपस्थितांचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न केला’ असा आरोपही उभे यांनी केला. या कार्यक्रमात सकाळपासून सहभागी ‘कमवा आणि शिका ‘ योजनेतील विद्यार्थ्यांना दुपारपर्यंत जेवण मिळाले नाही. ते मिळण्यासाठी आम्हाला विद्यापीठ अधिकाऱ्यांशी फोनाफोनी करावी लागली असेही सुहास उभे यांनी सांगितले.

‘न्याय्य मागण्यांसाठी आवाज उठविणाऱ्या सोमनाथ लोहारच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि विद्यार्थ्यांचा आवाज दाबू दिला जाणार नाही यासाठी संवैधानिक मार्गाने लढत सुरु ठेवू ‘असेही उभे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.