Pimpri: लक्ष्य अजितदादा मात्र उद्दिष्ट सुप्रीयाताईंच्या पराभवाचे – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजितदादांचा पराभव करण्याचे टार्गेट आहे. ते प्रॅक्टिकल असून त्यापेक्षाही 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रियाताईंच्या पराभवाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (मंगळवारी) सांगितले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आमची व्यूहरचना कमी पडली असे पाटील म्हणाले. तसेच 15 दिवसातून बारामतीला एकदा जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर पाटील यांनी आज (मंगळवारी) पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या मोरवाडीतील कार्यालयाला भेट दिली. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. त्यांनतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. लोकसभा निवडणुकीत बारामतीची जबाबदारी पाटील यांच्यावर होती. परंतु, बारामतीत यश आले नाही. बारामतीचा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आतापासूनच 2024 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पेरणी सुरू केली आहे.

पाटील म्हणाले, “बारामती मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत आम्हाला यश आले नाही. सुप्रिया सुळे यांचा निसटता विजय झाला आहे. बारामती, इंदापूर, भोर मध्ये आम्ही कमी पडलो. विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या पराभवाचे आमचे टार्गेट आहे. ते प्रॅक्टिकल असून आमचे मुख्य उद्दिष्ट 2024 लोकसभा निवडणुकीत सुप्रीताईंच्या पराभवाचे मुख्य उद्दिष्ट आहे”

“नागरिकांना वाटायला नको की केवळ निवडणुकीपुरते बारामतीत येत आहोत. त्यासाठी बारामती मतदारसंघात 15 दिवसांतून एकदा जाणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. इंदापूर, भोर आणि बारामतीत आम्ही कमी पडलो. तिथे आता जोर देऊन काम करणार आहोत”असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.