Chinchwad : नियंत्रण कक्षातील महिला पोलीस कर्मचाऱ्याला फोनवरून शिवीगाळ करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षात 100 नंबर हेल्पलाईन फोन ड्युटीवर कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी महिलेला नियंत्रण कक्षात फोन करून शिवीगाळ केली. तसेच आरोपीने फोन करून बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 27) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

शिवाजी शहाजी समिंदर (वय 32, रा. आंबेडकर वसाहत, औंध) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी 24 वर्षीय पीडित पोलीस कर्मचारी महिलेने फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित पोलीस कर्मचारी महिला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात 100 नंबर हेल्पलाईन या फोन ड्युटीवर कार्यरत असताना आरोपीने गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षात फोन केला. आरोपीने फोन वरून ‘पोलीस काही कामाचे नाही, पोलीस खाते बंद करा’ असे म्हणत फोन वरील कर्मचारी महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच कर्मचारी महिलेला बघून घेण्याची धमकी दिली. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.